Next
माझ्या मराठीचा बोलु.... हुकुमावरून!
BOI
Monday, May 14 | 06:45 AM
15 0 0
Share this story

सात मे रोजी सरकारने एक आदेश काढून सरकारी कार्यालयांत मराठीच्या वापराची सक्ती केली आहे. खरे तर ‘महाराष्ट्र राजभाषा अधिनियम, १९६४’नुसार मराठीचा वापर एक मे १९६६पासूनच अनिवार्य करण्यात आला आहे; पण एवढ्या वर्षांनी हा आदेश पुन्हा काढावा लागतो, यावरून आपण आपल्या भाषेच्या जतनात किती प्रगती केली आहे, याची कल्पना येते. ही जेवढी सरकारची नामुष्की, तेवढीच लोकशाही राज्यातील नागरिक म्हणून आपलीही. माझ्या मराठीचा बोलु हा कौतुकेच यायला हवा; अशा आदेशावरून किंवा हुकुमावरून नव्हे.
.............
महाराष्ट्र सरकारने गेल्या आठवड्यात एक आदेश काढल्यामुळे मराठी अभिमान असलेल्यांचा ऊर भरून आला असल्यास नवल नाही. सरकारी कार्यालयांत यापुढे इंग्रजीचा वापर बंद करावा आणि प्रशासनात मराठीचा जास्तीत जास्त वापर करावा, अशी सक्ती या आदेशान्वये राज्य सरकारने केली आहे. हा आदेश ही एक प्रकारे काळाची आणि राज्याची गरज होती. सरकारच्या सर्व कार्यालयांमध्ये मराठी अनिवार्य केली जाणार आहे. तसेच केवळ कागदी आदेश न काढता मराठीचा खरोखर वापर होतो आहे की नाही, हे पाहण्यासाठी प्रत्येक विभागात एक मराठी भाषा दक्षता अधिकारी नेमण्याचेही आदेशही सरकारने दिले आहेत. योजनांची माहिती जनतेला देताना, त्यांची चर्चा करताना, तसेच दूरध्वनीवरून बोलताना सर्व अधिकारी वा कर्मचाऱ्यांनी मराठीचाच वापर करावा, असे या आदेशात म्हटले आहे. प्रत्येक खात्याने शासकीय योजनांची नावे मराठी भाषेत असल्याची दक्षता घ्यावी, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सभेत भाषण करताना अथवा बैठकीत बोलताना मराठी भाषेचा वापर करणे अनिवार्य आहे; वरिष्ठ स्तरावर होणाऱ्या बैठकांत सादरीकरण करताना दर्शविण्यात येणारी माहिती प्रामुख्याने मराठीतून असावी; जनतेशी होणारा सर्व पत्रव्यवहार व इतर कार्यालयीन कामकाज मराठीतून करण्याची खबरदारी घ्यावी; मंत्रालयातील निरनिराळ्या विभागातील सचिव/मंत्री अशा वरिष्ठ स्तरावर दिले जाणारे शेरे, टिप्पण्या व आदेश जाणीवपूर्वक मराठी भाषेतून असावेत; मंत्र्यांनी आपल्याकडे येणारी सर्व प्रकरणे मराठीतून असावीत असा आग्रह धरावा, असे यातील काही निर्देश आहेत. इतकेच नाही, तर रेल्वे स्थानके, गावांची नावे यांच्या नावाचा उल्लेख करताना मराठी भाषेत व देवनागरी लिपीत नावे लिहावीत. उदा. बांद्रा असे नाव न वापरता वांद्रे हे मूळ मराठी नाव वापरावे. सायन असे नाव न वापरता शीव हे मूळ मराठी नाव वापरावे, असेही आदेशात म्हटले आहे.

कल्याणकारी राज्याच्या संकल्पनेनुसार सरकार हे समाजाच्या सर्व अंगांसाठी जबाबदार असते. त्यात भाषेचे संरक्षण व संवर्धन यांचाही समावेश आलाच. त्या अंगाने पाहिले, तर गेल्या सोमवारी (७ मे) सरकारने काढलेला हा आदेश कौतुकास्पदच म्हणावा लागेल. प्रश्न असा आहे, की मराठी ही आपली ‘मायमराठी’ असेल, ती आपली मायबोली असेल, तर सरकारला असे आदेश काढण्याची वेळ का यावी?

स्वातंत्र्यापूर्वी काँग्रेसने (तत्कालीन राष्ट्रीय सभेने) भाषावर प्रांतरचनेचे तत्त्व स्वीकारले होते. या तत्त्वानुसार भारताचे (विविध संस्थानांसह) सुमारे सोळा निरनिराळे प्रांत पाडण्यात आले होते. त्यात (१) महाराष्ट्र (मराठी भाषा); (२) गुजराथ (गुजराथी); (३) सिंध (सिंधी); (४) पंजाब व वायव्य सरहद्द प्रांत (पंजाबी); (५) दिल्ली, अजमेर, मेवाड व ब्रिटिश राजपुताना (हिंदुस्थानी); (६) संयुक्त प्रांत (हिंदुस्थानी); (७) मध्य प्रांत (हिंदुस्थानी); (८) वऱ्हाड- मध्य प्रांत (मराठी); (९) बिहार (हिंदुस्थानी); (१०) ओरिसा, बंगाल, आंध्र व मध्य प्रांत यांतील उडिया भाषा असलेले प्रदेश (उडिया); (११) बंगाल व आसाम (बंगाली); (१२) ब्रह्मदेश (ब्रह्मी); (१३) मद्रास (तमिळ); (१४) आंध्र (तेलुगू); आणि (१६) कर्नाटक (कन्नड) यांचा समावेश होता. यांपैकी मराठी भाषेचे दोन वेगळे प्रांत न करता त्यांना एकत्र करून महाराष्ट्र राज्याची निर्मिती करण्यात आली.

स्वातंत्र्यानंतर एक मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली; मात्र मराठी भाषेसाठी निर्माण झालेल्या या राज्याच्या अधिकृत भाषेला मान्यता मिळण्यासाठी पाच वर्षे जावी लागली. २६ जानेवारी १९६५पासून ‘महाराष्ट्र राजभाषा अधिनियम, १९६४’ हा कायदा लागू झाला आणि महाराष्ट्र राज्याची राजभाषा म्हणून देवनागरी लिपीतील मराठी भाषेचा अंगीकार करण्यात आला. या कायद्यात सर्व सरकारी प्रयोजनांकरिता मराठी भाषा वापरणे एक मे १९६६पासून अनिवार्य करण्यात आले आहे. त्यात काही अपवाद नमूद करण्यात आले आहेत. हे अपवाद वगळले, तर सर्व मंत्रालये व विभाग, राज्य शासकीय कार्यालये, शासन अंगीकृत व्यवसाय (मंडळे/ महामंडळे/प्राधिकरणे) आणि शासकीय उपक्रम यांनी, तसेच त्यांच्या अंतर्गत येणारे अधिकारी व कर्मचारी यांनी कामकाजासाठी मराठी भाषेचाच वापर करावा, असे स्पष्टपणे सांगितलेले आहे. महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या रौप्यमहोत्सवी वर्षापर्यंत म्हणजे एक मे १९८५पर्यंत अशा प्रकारे मराठी भाषेतून कामकाज करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले होते.

... मात्र आज, राज्यस्थापनेचा सुवर्णमहोत्सव उलटून आठ वर्षे झालेली असताना आणि ६० वर्षे पूर्ण करण्यासाठी दोन वर्षे उरलेली असताना तोच आदेश परत काढण्यात आला आहे. यावरून आपण आपल्या भाषेच्या जतनात किती प्रगती केली आहे, याची कल्पना येऊ शकते. ही जेवढी सरकारची नामुष्की, तेवढीच लोकशाही राज्यातील नागरिक म्हणून आपलीही. या निमित्ताने काढलेल्या आदेशातच सरकारने मागील अनेक आदेशांचा हवाला दिला आहे. राज्य मराठी विकास संस्था, साहित्य आणि संस्कृती मंडळ, भाषा संचालनालय व विश्वकोश निर्मिती मंडळ व मराठी भाषा विभागाच्या (पूर्वी स्थापन झालेल्या) संस्थांच्या माध्यमातून अनेक छोटे-मोठे उपक्रम सुरू आहेत. याचा अर्थ सरकार आपल्या परीने मराठीसाठी काम करत आहे. मराठी भाषा विभागाने अनेक शब्दकोश आणि परिभाषा कोश प्रसिद्ध केले आहेत. त्यांचा वापर करण्याची ऊर्मी आपल्यात आहे की नाही, हा खरा प्रश्न आहे. ‘मनी नाही माया, मोले घातले रडाया’ अशी तर आपली अवस्था झाली नाही ना?

वर ज्या १६ प्रांतांची यादी दिली आहे, त्यातील सर्वांना आपापली भाषा मिळाली आहे. तमिळ, कन्नड, तेलुगू, उडिया व मल्याळम् या भाषांनी अभिजात भाषा म्हणून स्थान मिळविले आहे. चित्रपट, साहित्य व कला या माध्यमांतूनही त्या भाषा वाढत आहेत. आदेश काढून वापर करण्याची वेळ मात्र फक्त मराठीवरच आलीय! माझ्या मराठीचा बोलु हा कौतुकेच यायला हवा, मनापासून अंतरीच्या उमाळ्यानेच यायला हवा; अशा आदेशावरून किंवा हुकुमावरून नव्हे. सरकारने आदेश काढला हे कौतुकास्पद आहेच, ते सरकारचे काम आहे आणि सरकारने आपले काम चोख बजावल्याचे गुण त्याला द्यावे लागतीलच; पण आपण त्यात किती वाटा उचलणार, हा आपल्यासाठी कळीचा मुद्दा आहे. महाराष्ट्राच्या स्थापनेचे पुढील टप्पे (म्हणजे ६०वे वर्ष, ७५वे वर्ष) साजरे करताना असे आदेश काढण्याची वेळ येऊ नये, तेव्हाच आपण मिळवली असे म्हणावे लागेल!

– देविदास देशपांडे
ई-मेल : devidas@dididchyaduniyet.com

(लेखक मुक्त पत्रकार व अनुवादक असून, भाषा हा त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे. ‘बाइट्स ऑफ इंडियावर दर सोमवारी प्रसिद्ध होणारे त्यांचे सर्व लेख https://goo.gl/wvsqQ8 या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)

(मराठी भाषेचे वैभव उलगडून दाखविणारे लेख, कविता वाचण्यासाठी, उत्तम साहित्याच्या अभिवाचनाचे व्हिडिओ पाहण्यासाठी https://goo.gl/qgDdWU या लिंकवर क्लिक करा.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link