Next
‘राही’चा सुवर्णवेध
BOI
Friday, August 31, 2018 | 06:45 AM
15 1 1
Share this story

राही सरनोबतआंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक पदके मिळवलेल्या कोल्हापूरच्या राही सरनोबतने यंदाच्या आशियायी क्रीडा स्पर्धेत चमत्कार घडवला. या स्पर्धेत नेमबाजीत सुवर्ण मिळवणारी ती पहिलीच नेमबाज ठरली. या ऐतिहासिक कामगिरीसोबतच राहीने आगामी टोकियो ऑलिंपिकसाठी आशा पल्लवीत केल्या आहेत... ‘क्रीडारत्ने’ सदरात या वेळी पाहू या नेमबाज ‘राही सरनोबत’बद्दल...
.........................................
कोल्हापूरची नेमबाज तेजस्विनी सावंत हिने २००६मध्ये नेमबाजीत राष्ट्रीय पदक मिळवले होते, त्या वेळी कोल्हापूरमध्ये तिची जंगी मिरवणुक काढण्यात आली होती. त्या वेळी या मिरवणूकीत राही सरनोबत तेजस्विनीला पहिल्यांदा भेटली. या भेटीमुळे राही इतकी प्रभावित झाली, की आपणही तेजस्विनीप्रमाणेच नेमबाजी शिकावी आणि देशाचे प्रतिनिधित्व करावे अशी स्वप्नेही पाहू लागली. राही त्या वेळेस केवळ दहावीत होती. वडील जीवनराव आणि आई प्रभा यांना त्यांच्या मुलीने म्हणजे राहीने विज्ञान शाखेची पदवी घ्यावी, असे वाटत होते. मात्र पदवीपेक्षा आंतरराष्ट्रीय पदक मिळवणे हेच राहीचे ध्येय होते. 

२००८पासून राहीने अजित पाटील यांच्याकडे संभाजी राजे क्रीडा संकुलात नेमबाजीचा सराव सुरू केला. त्यानंतर आद्ययावत सरावासाठी ती पुण्यात लक्ष्य या संस्थेत दाखल झाली. त्याच वर्षी पुण्यात झालेल्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेत तिने कारकिर्दीतील पहिलेवहिले पदक जिंकले. त्यानंतर तिने मागे वळून पाहिलेच नाही. आजमितीला जिल्हा, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मिळून शेकडो पदके तिने मिळवली आहेत. २०१७मध्ये झालेल्या दुखापतीमुळे तिला ऑलिंपिक पात्रता स्पर्धेत खेळता आले नाही, परिणामी तिची ऑलिंपिक खेळण्याची संधी हुकली. परंतु आता आशियायी खेळांमधील मिळविलेल्या पदकामुळे २०२०च्या ऑलिंपिकसाठी ती पूर्ण सज्ज आहे.

राही सरनोबतने आशियाई क्रीडा स्पर्धेतील २५ मीटर एअर पिस्तूलमध्ये सुवर्णपदक मिळवले. या पदकासोबतच तिने एक विक्रमही केला. आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणारी ती भारताची पहिलीच महिला नेमबाज ठरली. यंदाच्या आशियाई स्पर्धेतील नेमबाजीतील भारताचे हे दुसरे सुवर्णपदक ठरले.
महिलांच्या २५ मीटर एअर पिस्तूलमध्ये राही सरनोबत आणि थायलंडची नफास्वान यांगपाईबून यांच्यात चांगलीच चुरस पाहायाला मिळाली. श्वास रोखून धरायला लावणारे दोन शूटऑफ हे या नेमबाजांसाठी कसोटीचे ठरले. अखेर महाराष्ट्रातील कोल्हापूरच्या २७ वर्षीय राहीने स्पर्धा विक्रमासह सुवर्णपदक मिळवले.
नफास्वानला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. अंतिम फेरीत प्रत्येक नेमबाजाला दहा सीरिजना सामोरे जायचे होते. यात प्रत्येक सीरिजमध्ये नेमबाजाला पाच नेम साधायचे होते. या दहा सीरिजमध्ये राहीने ५, ५, ४, २, ४, ५, ३, २, २, २ अशा एकूण ३४ गुणांचा वेध घेतला.  नफास्वानचेही समान ३४ गुण झाले. त्यामुळे शूट-ऑफचा निर्णय घेण्यात आला. यात दोघी नेमबाजांनी पाच पैकी चार वेळा लक्ष्य साधले. त्यामुळे पुन्हा बरोबरी झाल्याने दुसरा शूट-ऑफ देण्यात आला. यात राहीने तीन वेळा लक्ष्य साधून तीन गुण मिळवले, तर नफास्वानला दोनच गुण मिळवता आले. दक्षिण कोरियाच्या किम मिनजुंगने रौप्यपदक मिळवले.

राहीने मिळवलेले हे सुवर्णपदक आजवरच्या आशियायी स्पर्धांमधील नेमबाजीत भारताचे नववे सुवर्ण ठरले. याआधी यंदाच्याच आशियायी स्पर्धेत सौरभ चौधरीने सुवर्ण पटकावले. तत्पूर्वी, १९९४ आणि २००६च्या आशियायी स्पर्धांमधील २५ मीटर सेंटर फायर पिस्तूलमध्ये जसपाल राणाने सुवर्ण मिळवले होते. २०१४ आशियायी स्पर्धांमधील ५० मीटर पिस्तूलमध्ये जितू रायने, १९७८ आशियायीमध्ये रणधिरसिंगने, २०१० आशियायी ट्रॅपमध्ये रंजन सोधीने सुवर्णपदक पटकावले होते. तसेच २००६ दोहा आशियायी स्पर्धांमध्ये २५ मीटर सेंटर फायर पिस्तूलमध्ये भारतीय संघाने सुवर्ण पटकावले होते. या सुवर्णविजेत्या संघात समरेश जंग, विजय कुमार, जयपाल यांचा समावेश होता.

२०१३मध्ये राहीने कोरीयात झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेत २५ मीटर पिस्तूलमध्ये सुवर्णपदक मिळवले होते. त्यानंतर राष्ट्रकुल स्पर्धेमध्येही २०१० आणि २०१४मध्ये सुवर्णपदकाची कमाई केली होती. २०१०च्या स्पर्धेत तिने दोन सुवर्णपदके मिळविली होती. आशियायी खेळांमधील तिच्या सुवर्ण कामगिरीवर आता आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. तो म्हणजे हे सुवर्णपदक तिने स्पर्धा विक्रमासह मिळवले आहे. तिच्या या कामगिरीबद्दल महाराष्ट्र सरकारने राहीला ५० लाख रूपयांचे बक्षिस जाहीर केले आहे. तसेच या स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या प्रत्येक खेळाडूला ५० लाख, रौप्य विजेत्या खेळाडूला ३० लाख आणि कांस्य पदक विजेत्या खेळाडूला २० लाख रूपयांचे पारितोषिक सरकारतर्फे जाहीर करण्यात आले आहे.  

केंद्रिय क्रीडा मंत्रालयाच्या टीओपी (टार्गेट ऑलिंपिक पोडियम) योजनेत राहीचा समावेश आहेच. त्यामुळे तिला मानधनाव्यतिरिक्त अत्याधुनिक सोयीसुविधादेखील मिळत आहेत. नेमबाजांसाठी ज्या बुलेट आवश्यक प्रमाणात उपलब्ध होणे गरजेचे आहे तितके मात्र होताना दिसत नाही, येत्या काळात यात सुधारणा झाली, तर अनेक नेमबाजांना सर्वोत्तम सराव करता येईल. राहीची सध्याची कामगिरी पाहता २०२०च्या टोकिओ ऑलिंपिकमध्ये राही भारताला निश्चितच पदक मिळवून देईल असा विश्वास वाटतो.

- अमित डोंगरे
ई-मेल : amitdongre10@gmail.com

(लेखक पुण्यातील मुक्त क्रीडा पत्रकार आहेत. 'क्रीडारत्ने' सदरातील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/Fot1VH या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
15 1 1
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link