Next
रमणीय रत्नागिरी जिल्हा – भाग तीन
BOI
Wednesday, May 29, 2019 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

मार्लेश्वर धबधबा

‘करू या देशाटन’
या सदरात सध्या आपण रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यटनस्थळांची माहिती घेत आहोत. आजच्या भागात पाहू या संगमेश्वर आणि चिपळूण तालुक्यांतील काही पर्यटनस्थळांबद्दल....
.............
नारळी-पोफळी आणि सुरूची बने, डोंगर-दऱ्या, त्यातून खळखळत वाहणारे निर्झर, त्यांच्या संगतीत राहणारी, आंब्याचा गोडवा असणारी, देवभोळी, पण व्यवहारी माणसे हे कोकणचे वैशिष्ट्य. पश्चिमेस अंजनवेलपासून तवसाळपर्यंत असलेला सुंदर सागरकिनारा, त्यावर असलेली पुरातन मंदिरे, पूर्वेस सह्याद्रीच्या उतरंडीवरील मार्लेश्वरपासून अलोऱ्यापर्यंत असलेली निसर्गरम्य, ऐतिहासिक ठिकाणे पर्यटकांना साद घालीत असतात. 

मार्लेश्वर गुंफा

मार्लेश्वर :
संगमेश्वर तालुक्यातील श्री क्षेत्र मार्लेश्वर हे उभ्या महाराष्ट्राचे श्रद्धास्थान आहे. श्रावण महिन्यात येथे भाविकांची गर्दी होते. खरे तर येथे पावसातच येण्यात मजा आहे. येथे एका नैसर्गिक गुहेत दोन शिवपिंडी आहेत. त्यातील एक स्वयंभू मार्लेश्वराची व दुसरी स्वयंभू मल्लिकार्जुनाची. भाविकांच्या श्रद्धेप्रमाणे हे दोघे भाऊ असून, मल्लिकार्जुन हा मोठा भाऊ आहे. मंदिरातील गुहेत समयांच्या व्यतिरिक्त इतर कोणताही दिवा लावण्यास परवानगी नाही. गुहेतील खबदाडींमध्ये ‘डुरक्या घोणस’ या जातीच्या बिनविषारी सापांचे अस्तित्व आहे. परंतु त्यांचा कोणालाही उपद्रव झाल्याचे ऐकिवात नाही. येथे त्या सापांना कुठल्याही प्रकारचा धोका निर्माण करायला मनाई आहे. जेव्हा हे स्थान निर्माण झाले, तेव्हा येथे पार्वती नव्हती. म्हणूनच या देवस्थानाच्या पद्धतीप्रमाणे येथे दर मकरसंक्रांतीला शिव-पार्वतीचे लग्न लावले जाते. येथील मार्लेश्वर हा ‘वर’ आणि साखरपा या गावाची भवानी (गिरिजादेवी) ही ‘वधू’ यांचे लग्न लावले जाते. (या विशेष विवाहसोहळ्याबद्दल सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

बावनदीवरील सुमारे २०० फूट उंचीवरून पडणारा येथील धबधबा धारेश्वर या नावाने ओळखला जातो. मोठ्या पावसात या धबधब्याला एकूण बारा छोटे-छोटे धबधबे येऊन मिळतात. अर्थात उन्हाळ्यामध्ये हा क्षीण होतो. अतिशय निसर्गरम्य ठिकाण म्हणून हे ठिकाण ट्रेकर्सच्या यादीत आहे. मार्लेश्वरच्या पायथ्यापर्यंत वाहन जाते. तेथून साधारण एक किलोमीटरची चढण असून, ५०० पायऱ्या चढून मंदिरात जावे लागते. कोल्हापूरहून येताना आंबा घाटामध्ये कळकदरा येथून खडी-कोळवणमार्गे मार्लेश्वर सुमारे २० किलोमीटर अंतरावर आहे. रत्नागिरीहून वा मुंबईहून येताना देवरूखहून हातीवमार्गे हे ठिकाण सुमारे १८ किलोमीटर दूर आहे.  

प्रचितगड

प्रचितगड :
संगमेश्वरजवळील शृंगारपूर या ऐतिहासिक गावाजवळ प्रचितगड आहे. या गडावर वाट काढत जायचे म्हणजे बिकट परिस्थितीचा सामना करावा लागतो. अनेक संकटांची प्रचिती देणारा तो प्रचितगड असे म्हटले, तरी वावगे ठरणार नाही. शिवरायांनी २९ एप्रिल १६६१ रोजी शृंगारपूर जिंकले. त्याच वेळी कोकणावर नजर ठेवता येईल असा प्रचितगडही घेतला. १७१०-१२मधील छत्रपती शाहू महाराज व रामचंद्रपंत अमात्य यांच्या करारात प्रचितगडाचा उल्लेख येतो. 

नंतर जानेवारी १८१८मध्ये कर्नल प्रॉथरने प्रचितगडाचा ताबा घेतला. रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यांच्या सीमेवर असणारा हा महत्त्वाचा टेहळणी किल्ला आहे. संगमेश्वर तालुक्याच्या शृंगारपूर गावातून या गडावर सह्याद्री पर्वतामधून पायवाटेने जाता येते. शृंगारपूर गावामधून साडेचार तासांची अवघड चढण पार केल्यावर प्रचितगडावर पोहोचता येते. कंधारडोह येथून तीन तासांचे अंतर चालून गेल्यानंतर प्रचितगडावर पोहोचता येते. नेरदवाडी येथून किमान सहा तासांची पायपीट करावी लागते. नेरदवाडीतून तीन तासांचे अंतर मळेघाटमार्गे पार केल्यावर सातारा जिल्ह्याची हद्द लागते. सातारा जिल्ह्याच्या हद्दीतून मार्गक्रमण करीत कंधार या प्रसिद्ध डोहावर जावे लागते. प्रचितगडावर चार तोफा व पडीक वास्तू असून, येथील कातळाच्या कुंडात असणारे थंडगार पाणी म्हणजे निसर्गाचा एक चमत्कारच म्हटला पाहिजे. 

कर्णेश्वर मंदिर, कसबाकसबा संगमेश्वर : संगमेश्वरजवळ पुलाच्या अलीकडेच चिपळूणकडून येताना डाव्या बाजूला कसबा येथे कर्णेश्वराचे मंदिर आहे. मंदिरशैली इ. स. ७०० ते १०००मधील असावी. सभामंडपाची रचना मध्य कर्नाटकमधील हुबळीजवळील हनगल येथील मंदिरांसारखी वाटते. इसवी सन १०६४च्या सुमारास गुजरातच्या कदंब राजांचा जावई चालुक्य (चौलुक्य) राजा कर्ण त्या ठिकाणी राज्य करत होता. त्याने हे मंदिर बांधले. ते त्याच्या नावाने ‘कर्णेश्वर शिवमंदिर’ म्हणून ओळखले जाऊ लागले. मंदिरातील शिल्पकला अप्रतिम आहे. क्वचित दिसणारी कार्तिकस्वामी व सूर्यनारायण यांची दोन मंदिरे कसब्यात आहेत. याचे ऐतिहासिक महत्त्व म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांना या मंदिराच्या जवळ असलेल्या देसाई वाड्यातच मुघलांनी दगाफटक्याने पकडून नेले. मंदिराजवळच देसाईवाडा आहे. (मार्लेश्वर आणि कर्णेश्वर मंदिराबद्दल अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

देवरूख : हे एक ऐतिहासिक ठिकाण आहे. रायगडावरून विशाळगडावर जाताना छत्रपती शिवाजीमहाराज व छत्रपती संभाजीराजे श्री सोळजाई मंदिरात दर्शनासाठी येथे येत असत. येथे त्या वेळची घोड्यांची पागाही आहे. समाजसुधारक पार्वतीबाई आठवले व भूदानयज्ञातील विनोबाजींचे सहकारी शरदशेठ सार्दळ व त्यांची कन्या स्वातंत्र्यसैनिक विमल सार्दळ यांचे जन्मस्थान येथे आहे. 

देवरूख येथे गणेशमूर्तींचे अनोखे संग्रहालय आहे. भारतातीलच नव्हे, तर जगभरातील तब्बल दोनशे गणेशमूर्ती तेथे पाहायला मिळतात. (या संग्रहालयाबद्दल अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

भाद्रपद महिन्याच्या शुद्ध पक्षातील चतुर्थीला गणेशोत्सवाची सुरुवात होते, अशी परंपरा आहे; मात्र देवरुख येथील ऐतिहासिक चौसोपी वाड्यातील उत्सव भाद्रपद शुद्ध प्रतिपदेला सुरू होतो आणि शुद्ध षष्ठीला संपतो. गेली ३५० वर्षे हा उत्सव सुरू आहे. (या अनोख्या गणेशोत्सवाबद्दल अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

शिरंबेचा मल्लिकार्जुन

शिरंबेचा मल्लिकार्जुन :
संगमेश्वर तालुक्यात माखजन, वहाळ गावाजवळ हे ठिकाण आहे. निसर्गरम्य परिसरात सुमारे ५० चौरस फुटांच्या तळ्याच्या मध्यभागी कोकणी पद्धतीच्या मंदिराची उभारणी केली गेली आहे. मंदिरात जाण्यासाठी छोटा पूल बांधण्यात आला आहे. मंदिराच्या चारही बाजूंनी स्वच्छ, वाहते पाणी आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील हे एकमेव मंदिर असे आहे, की जे पाण्यात आहे. येथील शिवलिंगही पाण्यामध्येच आहे. गाभारा सभामंडपाच्या खूप खाली आहे. शिवलिंग निम्मे पाण्यातच आहे. मंदिराजवळ ग्रामदेवता व गणपतीचे मंदिर आहे. संगमेश्वर एसटी बसस्थानकावरून शिरंबे येथे जाण्याची सोय आहे. 

भातगाव खाडीपूल

भातगाव खाडी

भातगाव खाडीपूल :
सागरी मार्गावर अनेक ठिकाणी पूल झाल्यामुळे कोकणातील दळण वळण खूप सोपे झाले आहे. असाच हा एक पूल आहे, जो कोकणाचे सौंदर्य अधिक खुलवून दाखवितो. या पुलाच्या पूर्वेला कापशी, गड व शास्त्री या नद्यांचा त्रिवेणी संगम आहे. त्यामुळे शास्त्री नदीचे विशाल पात्र एखाद्या छोट्या समुद्रासारखे भासते. गणपतीपुळ्याहून येताना जाकादेवीजवळ डावीकडे वळल्यावर हा पूल लागतो. येथून गुहागर व चिपळूण जवळ पडते. हा पूल जयगड खाडीवर (शास्त्री नदीवर) आहे. येथून शास्त्री नदी जयगडपर्यंत नागमोडी वळणे घेत जाते. दुतर्फा उंच सदाहरित डोंगर व मधून जाणारी शास्त्री नदी हे अतिशय सुंदर दृश्य दिसते. जयगडजवळील तवसाळपासून इथपर्यंत तासिका तत्त्वावर डुबको (मोटरबोट) मिळतात व केरळप्रमाणे खाडीतील नौकानयनाचा आनंद येथे मिळतो. भातगाव हे माझे गाव आहे. गावात जुगाई देवीच्या देवळाच्या जीर्णोद्धाराचे काम चालू आहे. गावाच्या वरच्या बाजूने गुहागरकडे जाणारा रस्ता आहे. तेथूनही खाडीचे विहंगम दृश्य दिसते. 

वीर-देवपाट पालखीवीर/देवपाटचा धबधबा : वीर येथे देवपाटचा बारामाही धबधबा आहे. हा धबधबा दोन टप्प्यांत आहे. काळ्या कातळातून डोहात कोसळणाऱ्या आणि पोफळीच्या दाट रांगांच्या बाजूला असणाऱ्या या धबधब्याचे सौंदर्य काही वेगळेच आहे. धबधब्यापर्यंत जाणारा रस्ता दाट झाडीतून जातो. कोकणात महामार्गापासून किंवा सागरकिनाऱ्यापासून अशी अनेक ठिकाणे दडलेली आहेत, की तेथे कोकणाचे अस्तित्व टिकून आहे. असेच एक जोडगाव म्हणजेच वीर व देवपाट. चिपळूणकडून येताना सावर्ड्याच्या पुढे थोड्या अंतरावर उजवीकडे वहाळकडे एक रस्ता गेला आहे. वहाळच्या पुढे देवपाट आहे. येथे एक धबधबा आहे. तसेच या गावात श्री लक्ष्मी मल्लमर्दन देवस्थान, आहे. या गावात पारंपरिक दशावतार नाटके व सांस्कृतिक कार्यक्रम होतात. कोकणातील अशा सर्वच गावांतून गणपती, होळी व गावच्या देवाची जत्रा हे सण दिवाळीपेक्षाही मोठ्या आनंदाने, पारंपरिक पद्धतीने साजरे होतात. पालखी घेऊन केलेले नृत्य खूप उत्साहित करणारे असते. आता रस्ते झाल्यामुळे खाडीचे सौंदर्य बघता येत नाही. शास्त्री नदीला आरवलीकडून गड नदी व देवपाटकडून कापशी नदी अशा दोन नद्या मिळतात. भातगाव पुलाच्या पूर्वेला हा त्रिवेणी संगम आहे. 

आरवली व तुरळ – गरम पाण्याचे झरे : मुंबई-गोवा महामार्गावर संगमेश्वर तालुक्यात आरवली येथे गरम पाण्याचे कुंड आहे. त्वचारोगावर उपाय म्हणून अनेक लोक येथे स्नानासाठी येत असतात. येथील पाणी मध्यम गरम (कोमट) असते. 

आरवली येथून थोडे पुढे गेल्यावर तुरळ येथे अगदी उकळते पाणी कुंडातून सतत बाहेर येत असते. येथील पाणी इतके गरम असते, की कुंडातून बाहेर पडणारे पाणी सुमारे अर्धा किलोमीटरपर्यंत गरम असते. येथे बहिरोबाचे एक जुने मंदिर असून, प्राचीन मूर्तीही पाहायला मिळतात. 

अलोरे विद्युतगृह : महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेल्या कोयना प्रकल्पाची विद्यृतगृहे सह्याद्रीच्या पायथ्याशी आहेत. कोयना धरणाचे पाणी उंचावरून बोगद्याद्वारे खाली आणून त्यावर विद्युतनिर्मिती केली जाते. आता हे विद्युतगृह बघण्यास बंदी आहे. वरच्या बाजूला प्रसिद्ध कुंभार्ली घाट आहे. येथे पावसाळ्यात छोटे-मोठे धबधबे पाहायला मिळतात. येथून लांबवरच्या कोकणाचे दर्शन होते. 

शिवसृष्टी, डेरवण

डेरवणची शिवसृष्टी :
मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूणच्या पुढे सावर्डे गावाजवळ डावीकडे सुमारे दोन किलोमीटर अंतरावर डेरवण येथे श्री संत सीतारामबुवा वालावलकर चॅरिटेबल ट्रस्टतर्फे देखणी शिवसृष्टी उभी करण्यात अली आहे. आहे. येथील परिसरात प्रवेश करतानाच समोर रस्त्यावर दुतर्फा असलेले घोड्यावरील सशस्त्र मावळे आपल्याला शिवकाळात घेऊन जातात. लहान मुले तर मावळे पाहून हरखून जातात. येथे शिवसमर्थ गड या नावाने उभारलेल्या स्मारकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील विविध ऐतिहासिक प्रसंगांवर आधारित शिल्पे कोरण्यात आली आहेत. शिवरायांच्या लहानपणापासून अनेक प्रसंग यात साकारले आहेत. विविध प्रसंग अक्षरशः जिवंत वाटतात व बघणाऱ्यांना खिळवून ठेवतात. शिवराज्याभिषेकाचे शिल्प फारच अप्रतिम आहे. शिवसृष्टीच्या जवळ असलेला समाधी मंदिराचा परिसरही अत्यंत रम्य व शांत आहे. सकाळी आठ ते सायंकाळी सहा या वेळेत पर्यटक शिवसृष्टीला भेट देऊ शकतात. सीतारामबुवा वालावलकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ही भव्य शिवसृष्टी उभारली गेली आहे. कोकणाची पर्यटनातील हे एक प्रमुख ठिकाण झाले आहे. येथे वालावलकर चॅरिटेबल ट्रस्टतर्फे हॉस्पिटलही चालविले जाते. 

तेरव  मंदिर

तेरव  मंदिर

तेरव :
येथील मंदिर ३०० वर्षांपूर्वीचे आहे. १८६०मध्ये त्याचा पहिला जीर्णोद्धार करण्यात आला. त्यानंतर २००२मध्ये लोकवर्गणीतून भव्य मंदिर बांधण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या यादीत अधिकृत पर्यटनस्थळ म्हणून हे समाविष्ट करण्यात आले आहे. मंदिरात चार देवींच्या मूर्ती आहेत. भवानी, वाघजाई, कालकाई आणि नवदुर्गा अशा चार देवता येथे आहेत. तसेच सात उद्यानांनी त्याची शोभा वाढविली आहे. कामथे रेल्वे स्टेशनपासून पश्चिमेला हे निसर्गरम्य ठिकाण आहे. 

श्री क्षेत्र परशुराम

श्री क्षेत्र परशुराम :
सात चिरंजीवांपैकी (ज्यांना मृत्यू नाही असे) परशुराम म्हणजे भगवान विष्णूंचा सहावा अवतार मानले जातात. पश्चिम दिशेचे संरक्षणकर्ते म्हणून ते कोकण किनारी वास्तव्य करून आहेत. काश्यप ॠषींना पृथ्वी दान करून स्वतःसाठी समुद्राला मागे हटवून अपरान्त भूमीची म्हणजेच कोकणाची निर्मिती करणाऱ्या श्री परशुरामांचे हे प्राचीन मंदिर आहे. चिपळूणहून मुंबईकडे जाताना घाटाच्या माथ्यावर श्री परशुरामाचे देवस्थान आहे. महामार्गापासून उजवीकडे देवस्थानाला जाण्यासाठी रस्ता आहे. आदिलशाहीत जीर्णोद्धार केलेले हे मंदिर आहे. खाली उतरतानाच्या जांभ्या दगडांच्या पायऱ्या (पाखाडी) जावळीचे चंद्रराव मोरे यांनी सुमारे ३०० वर्षांपूर्वी बांधल्या आहेत. परशुरामाच्या या मंदिराच्या रचनेमध्ये आदिलशाही वास्तुकलेचा प्रभाव स्पष्टपणे जाणवतो. विशेषत: मंदिराचा घुमट या पद्धतीचा आहे. 

श्री परशुराम शयनकक्ष

उपलब्ध पुराव्यानुसार इथला तिसरा घुमट हा आदिलशहाच्या एका बेगमेने उभारला आहे. यामागे एक कथाही सांगितली जाते. ती अशी - एकदा या बेगमेच्या नौका समुद्रात बुडाल्या होत्या. या बेगमेला सागराचा देव म्हणून परशुराम माहिती होता. तिने नवस बोलला, की तारवे परत आल्यास देऊळ बांधीन. त्यानंतर तिच्या नौका खरोखरच सुखरूपपणे किनाऱ्याला लागल्या. त्यानंतर परशुरामाचे मंदिर बांधून तिने नवस फेडला. या मंदिरामध्ये काळ, काम आणि परशुराम यांच्या मूर्ती आहेत. मध्यभागी असलेली परशुरामाची मूर्ती इतर दोन मूर्तींपेक्षा उंच आहे. या मंदिरातली लाकडावर केलेली कलाकुसर सुरेख आहे. श्री परशुराम मंदिराच्या मागील बाजूस परशुरामाची माता रेणुकादेवीचे मंदिर आहे. मंदिराचा वार्षिक उत्सव म्हणजे परशुरामाचा जन्मोत्सव. परशुरामाचा जन्म अक्षय्य तृतीयेचा. त्यामुळे अक्षय्य तृतीयेपासून सुरू होणारा हा उत्सव पुढे तीन दिवस चालतो. 

सवतसडा धबधबा

सवतसडा धबधबा :
चिपळूणपासून पाच किलोमीटर अंतरावर सवतसडा धबधबा आहे. मुंबईहून येताना महामार्गाच्या कडेला डाव्या बाजूसच हा धबधबा कोसळताना दिसतो. जुलै ते ऑक्टोबर या कालावधीत या धबधब्याला भरपूर पाणी असते. धबधब्यापर्यंत जाण्यासाठी पाऊलवाट आहे. चिपळूण आणि सवतसडा रस्त्यावर पेढे या गावात बघण्यासारखे एक दत्त मंदिरही आहे. 

करंजेश्वरी, गोवळकोटमोरवणे : चिपळूणच्या पश्चिमेस खेर्डीच्या पुढे डाव्या बाजूस मोरवणे या निसर्गरम्य गावात एक वैशिष्ट्यपूर्ण मारुती मंदिर आहे. या मंदिरात ४०० वर्षांपूर्वीची प्रताप मारुतीची, तळहातावर सहज मावेल एवढी अंदाजे तीन इंच रुंद, चार इंच लांब आणि एक इंच जाडीची, छोटीशी, काळ्या, मृदू पाषाणातील लहान मूर्ती आहे. श्री रामदास सांप्रदायिक असलेल्या एका स्वामींनी ही मूर्ती सध्याच्या जागेत आणून ठेवल्याचे सांगितले जाते. 

चिपळूणचे म्युझियम

चिपळूण :
मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूण हे महत्त्वाचे ठिकाण आहे. चिपळूण येथे सुरुवातीला सातवाहन, कदंब, क्षत्रप, कलचुरिस व राष्ट्रकूट यांनी राज्य केले. चिपळूण शहर हे साधारणत: दोन हजार वर्षांपूर्वीचे असल्याचा पुरावा सांगणारी कोल्हेखाजण बौद्ध लेणी शहरालगत गुहागर बायपास मार्गावर आहेत. त्यानंतर दिल्ली सल्तनत, आदिलशहा, मराठा यांचे येथे वर्चस्व होते. शहरात हायवेला लागून पाग नावाचा भाग आहे. तेथे पागा असाव्यात. आदिशाहीमध्ये मक्केकडून विजापूरला येण्यासाठी जी बंदरे विकसित केली गेली, त्यापैकी गोवळकोट हे चिपळूणला लागून असलेले महत्त्वाचे बंदर होते. गुहागर तालुका व चिपळूण तालुक्यातील ही महत्त्वाची बाजारपेठ आहे. निसर्गसंपन्न चिपळूण हे अनेक घाटांनी वेढलेले आहे. २४ नोव्हेंबर २०१८ रोजी लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर या १५५ वर्षांच्या संस्थेने चिपळूण वस्तुसंग्रहालयाची स्थापना केली आहे. कोकण परिसरातील इतिहास व वैभवाची ओळख त्यामुळे पर्यटकांना होणार आहे. जुन्या मूर्ती, शास्त्रे, भांडी, दरवाजे अशा दुर्मीळ वस्तूंचा संग्रह चिपळूणच्या वैभवात भर घालत आहे.  (या संग्रहालयाबद्दल अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

मालदोली येथील मगरी

चिपळूण व आसपासचा परिसर हे विविध जातींचे पक्षी बघण्याचे ठिकाण आहे. वाशिष्ठी, जगबुडी या नद्यांमध्ये मोठमोठ्या मगरींचे वास्तव्य आहे. येथील नद्यांच्या खाड्या या निसर्गसंपत्तीने व खारफुटीच्या वनांनी समृद्ध आहेत. जवळच खेर्डी येथे आता औद्योगिक वसाहत उभारण्यात आली आहे. चिपळूणच्या रावतळे परिसरात विंध्यवासिनीचे मंदिर आहे. येथे शाक्तपंथीयांना भावणारी देवीची यादवकालीन अष्टभुजा मूर्ती असून कार्तिकेयाची महाराष्ट्रातील सर्वांत वैशिष्ट्यपूर्ण, सुंदर मूर्ती येथे आहे. 

चिपळूणमधील दळवटणे भागात शिवाजी महाराजांची छावणी होती. शिवाजी महाराजांचा येथे राज्याभिषेकापूर्वी दोन महिने मुक्काम होता. दिवंगत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी चिपळूणला तीन वेळा भेट दिली होती. राज्याचे पहिले कृषिमंत्री दिवंगत प. कृ. सावंत चिपळूणचेच. प्रसिद्ध अभिनेते डॉ. काशिनाथ घाणेकर या गावचेच. माझे वडील चिपळूण नगरपालिकेत ओव्हरसीअर होते. त्याच वेळी जुन्या चिपळूण नगरपालिकेचे कार्यालय त्यांच्या देखरेखीखाली बांधले गेले. माझ्या दोन्ही थोरल्या बंधूंचा जन्म चिपळूणचा. दोघेही केंद्र व राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांचे सचिव होते. 

मालदोली

गोवळकोट :
गोवळकोट ऊर्फ गोविंदगड हा गिरिदुर्ग वाशिष्ठी खाडीच्या तीरावर उभा आहे. प्रसिद्ध मुस्लिम विचारवंत दिवंगत हमीद दलवाई व विद्यमान खासदार हुसेन दलवाई हे गोवळकोटजवळील मिरजोळी या गावचे सुपुत्र. हा किल्ला चिपळूणपासून अगदी जवळ म्हणजे दोन ते तीन किलोमीटर अंतरावर आहे. पायथ्याशी करंजेश्वरी देवीचे पुरातन मंदिर आहे. निसर्गाच्या सान्निध्यातील हे मंदिर खूपच छान आहे. हा किल्ला एखाद्या बेटासारखा आहे. गोवळकोट किल्ल्याच्या तिन्ही बाजूंनी पाणी असून, जवळच गोवळकोट बंदर आहे. पूर्वी किल्ल्यावर २१ तोफा होत्या असे म्हणतात. करंजेश्वरी मंदिराजवळील पायऱ्या चढून गेल्यावर गडावर प्रवेश करण्यापूर्वी समोर दोन बुरुज व त्यामध्ये दरवाजाची जागा दिसते. परंतु आज तिथे किल्ल्याचा दरवाजा, त्याचे खांब व कमान यांच्या फक्त खुणाच शिल्लक आहेत. क्रिकेटपटू गुलाम परकार या गावचेच. 

रामचंद्र वासुदेव मराठे न्यास, मालदोली

मगरींचे गाव - मालदोली :
मालदोली हे खाडीवरील बंदर मगरींसाठी प्रसिद्ध आहे. पूर्वी येथे मालाचे वजन केले जाई. त्यामुळे मालदोली हे नाव पडले, असे मानले जाते. खारफुटीच्या जंगलामुळे येथे मगरींचे वास्तव्य वाढले आहे. त्यामुळे मगरींचे गाव म्हणून ओळख निर्माण झालेल्या मालदोलीमध्ये येणाऱ्या पर्यटकांची संख्याही वाढू लागली आहे. येथे असलेले श्री भैरवेश्वर व्याघ्राम्बर मंदिरही खूप सुंदर आहे. एका सफारीमध्ये किमान आठ ते २० मगरी पाहता येतात. त्यांची लांबी सुमारे आठ ते १० फूट असते. क्रोकोडाइल सफारीसाठी जून ते फेब्रुवारी हा चांगला हंगाम असतो. या काळात मगरदर्शनासाठी बोटसफरींची व्यवस्था करण्यात आली आहे. पश्चिम किनारपट्टीवर मगरींचा नैसर्गिक अधिवास असलेले हे एकमेव ठिकाण आहे. केरळसदृश निसर्ग हे येथील वैशिष्ट्यआहे. केरळप्रमाणे बॅकवॉटरची मजा येथे अनुभवता येते. या गावात नव्वदहून अधिक वर्षांपूर्वी भारतरत्न डॉ. विश्वेश्वरय्या यांच्या कल्पनेतून उभारण्यात आलेल्या अभियांत्रिकी नवल ठरलेल्या ‘रामचंद्र वासुदेव मराठे न्यास’ या हेरिटेज वास्तूला अवश्य भेट द्यावी. (वाशिष्ठी बॅकवॉटर आणि क्रोकोडाइल सफारी यांबद्दल अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

वाशिष्ठी बॅकवॉटर

कसे जाल चिपळूण येथे?
चिपळूण हे कोकण रेल्वे आणि मुंबई-गोवा महामार्गाने जोडलेले आहे. पुण्याहून ताम्हिणी घाट, वरंधा घाट, आंबेनळी घाट (पोलादपूर), कुंभार्ली घाट व कोल्हापूरहून आंबा घाटातून येता येते. जवळचा विमानतळ सध्या कोल्हापूर - २०० किलोमीटर. चिपळूणमध्ये राहण्यासाठी भरपूर चांगली हॉटेल्स आहेत. अतिपावसाचा (जुलै) कालावधी सोडून वर्षभर कधीही जावे. 

(या भागासाठी चिपळूणचे अंतूशेठ ओक यांचे, तसेच पर्यटनविषयक अभ्यासक धीरज वाटेकर यांचे सहकार्य मिळाले.) 

- माधव विद्वांस
ई-मेल : vidwansmadhav91@gmail.com

(लेखक हौशी आणि अभ्यासू पर्यटक आहेत. ‘करू या देशाटन’ या दर बुधवारी आणि शनिवारी प्रसिद्ध होणाऱ्या सदरातील लेख https://goo.gl/nZb2n5 या लिंकवर उपलब्ध आहेत.)

BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.

अॅप, फेसबुकयू-ट्यूबट्विटरइन्स्टाग्रामव्हॉट्सअॅप 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search