Next
अंतर्बाह्य प्रकाश पसरवणारी दिवाळी
BOI
Friday, November 09, 2018 | 10:00 AM
15 0 0
Share this article:ठाण्याच्या प्रज्ञा पंडित दिवाळीच्या, तसेच अन्य सणांच्या निमित्तानेही अनाथाश्रम आणि वृद्धाश्रमांना शक्य ती मदत करतात, त्या उपेक्षितांना आनंद देण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे दिवाळीत मनात समाधानाची पणती तेवते आणि कोणाच्या तरी जीवनात प्रकाश उजळवण्याचा आनंद मिळतो, असं त्यांना वाटतं. त्यांनी लिहिलेले हे अनुभव...
........


अनाथाश्रम आणि वृद्धाश्रम ह्या दोन्ही सामाजिक संस्था आता माझ्या आयुष्यातल्या एक अविभाज्य भाग झाल्या आहेत. गेल्या चार वर्षांपासून मुंबई, ठाण्यानजीकच्या काही आश्रमांशी माझ्या लेकीमुळे मी जोडले गेले आहे. निमित्त होतं माझी लेक तेजस्वी हिच्या पहिल्या वाढदिवसाचं! तिचा वाढदिवस हा ठराविक पद्धतीनं सगळ्यांना बोलवून आणि वायफळ खर्च करून साजरा न करता काही तरी वेगळ्या प्रकारे आणि ज्यातून खरंच काही मानसिक समाधान मिळेल, अशा पद्धतीनं साजरा करू या, असं ठरवलं. तेव्हापासूनच प्रत्येक वाढदिवस आणि सण आम्ही वाशी, ठाणे, भिवंडी येथील आश्रमात साजरे करत आहोत. दिवाळी म्हणजे प्रकाशोत्सव! आपल्या आजूबाजूचा अंधार दूर करून परिसरच नाही, तर अंतर्बाह्य जीवनही प्रकाशमान व्हावं, असा संदेश दिवाळीचा उत्सव देत असतो. मला वाटतं, की या प्रकाशाची सगळ्यात जास्त गरज आश्रमांतल्या आबालवृद्धांना आहे. नशिबानं पदरात पडलेल्या दुःखाला सामोरं जात निराशेच्या गर्तेत खोल जात असतानाच हे दिवाळी-दसऱ्यासारखे सणही त्यांना नकोसे झालेले असतात. कारण त्यामागे असंख्य जुन्या आठवणी आणि नसलेल्या आपल्या माणसांची उणीव त्यांना भासत असते. आणि हीच एक कमतरता भरून काढण्याचा फूल ना फुलाची पाकळीरूपी छोटासा प्रयत्न मी आवर्जून करते. माझी कितीही इच्छा असली, तरी माझ्या दोन हातांनी मी सगळ्यांचेच लाड, कौतुक करू शकत नाही. त्या चिमुरड्यांना त्यांच्या आवडीच्या गोष्टी घेऊन देता याव्यात म्हणून खूपशी समविचारी मित्रमंडळी, सामाजिक संपर्कात येणाऱ्या इतर व्यक्ती यांना माझ्या कार्यात सामावून घेऊन हे माझं कुटुंब मोठं करण्याचा प्रयत्न मी करत आहे. या विस्तारित कुटुंबाच्या मदतीने दर वर्षी दिवाळीत आश्रमात असलेल्या लहानग्यांना आणि आजी आजोबांना फराळ, गोडधोड पदार्थ, फटाके, कपडे या वस्तू तर मी यथाशक्ती माझ्या परीने घेऊन जातेच; पण आश्रमातील व्यवस्थापनाला मदत म्हणून प्रथमोपचाराशी संबंधित साहित्य, औषधं, आवश्यक ते किराणा सामान देण्यावरही माझा भर असतो. वृद्धाश्रमचालकांना खरी गरज असते ती वैद्यकीय मदतीची! कारण तिथे राहत असलेले ज्येष्ठ नागरिक वयानुरूप आणि दुर्दैवाने पदरी पडलेल्या शारीरिक व्याधींनी ग्रस्त असतात. त्यामुळे त्यांना दैनंदिन औषधे आणि नियमित तपासणीसाठी वैद्यकीय मदत मिळवून देण्यासाठीही मी प्रयत्न करते. ठाणे, मुंबई, बेंगळुरू आदी ठिकाणचे अनेक डॉक्टर या कार्यात मला स्वखुशीने विनाशुल्क मदत करतात.
 


गरजू आणि मदतीची अपेक्षा असणाऱ्या अनोळखी व्यक्तीची त्याच्या कळत-नकळतपणे काळजी घेण्यात, सेवा करण्यात किंवा त्याला आनंद देण्यात एक वेगळीच मजा असते. मला यातून काय मिळतं विचाराल, तर अगदी पोटभर आनंद मिळतो.

आपल्या मदतीच्या बदल्यात समोरच्याकडून काहीच मिळणार नाही हे ठाऊक असतं.. ती व्यक्ती पुन्हा कधी भेटेल की नाही हेही ठाऊक नसतं.. पण तरीही त्याला निःस्वार्थीपणे मदत केली किंवा कुठल्या ना कुठल्या रूपात आनंद दिला, तर यातून आपल्याला मिळणारं समाधान हे लहानपणी कुणीतरी आपल्या हातावर अचानक भरपूर चॉकलेट्स ठेवल्यानंतर जसं वाटायचं ना, तसं असतं!

अर्थात हे सगळं करताना जरासं भान आणि जागरूकताही गरजेची असते बरं का! कारण कोणी तरी म्हटलंच आहे 
‘ये दुनिया जितनी अच्छी है ना.. 
उससे कई ज्यादा बुरी भी है...!!’

दिवाळी म्हणजे आनंद लुटणे आणि आनंद वाटणे. तुम्हीही विचार करा. यंदाच्या दिवाळीपासून.. या अनाथ लेकरांना आणि घरातून नकोशा झालेल्या आजी-आजोबांना तुमच्या कुटुंबात सामावून घेण्याचा! बघा! तुमचीही दिवाळी किती आनंददायी आणि प्रकाशमान होते ते!! 


संपर्क : प्रज्ञा मनीष पंडित, ठाणे
मोबाइल : ९३२०४ ४१११६ 

(‘आठवणीतली दिवाळी’ या मालिकेतील सर्व लेख वाचण्यासाठी https://goo.gl/riz56x या लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search