Next
‘१०८’ रुग्णवाहिका सेवेद्वारे पाच वर्षांत ४२ लाख जणांना जीवदान
राज्यात ९३७ रुग्णवाहिका कार्यरत
BOI
Thursday, August 22, 2019 | 02:59 PM
15 0 0
Share this article:


पुणे : अपघात किंवा आपत्कालीन परिस्थितीमध्ये जखमी झालेल्या रुग्णांना तातडीने वैद्यकीय मदत देण्यासाठी सुरू झालेली ‘१०८’ ही रुग्णवाहिका सेवा राज्यभरातील लाखो जणांना जीवदान देणारी ठरली आहे. पूरग्रस्त भागातही या रुग्णवाहिकांमुळे हजारो नागरिकांना मदत झाली आहे. ९३७ रुग्णवाहिकांद्वारे २०१४ पासून जुलै २०१९ पर्यंत ४२ लाख ४४ हजार २२२ रुग्णांना जीवदान देण्याचे काम या सेवेमुळे शक्य झाले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने २०१४ मध्ये महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा सुरू केली. अपघाताच्या ठिकाणावरून कोणीही १०८ या क्रमांकावर फोन केल्यावर तातडीने वैद्यकीय मदत दिली जाते. ही सेवा नागरिकांसाठी मोफत आहे. आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय उपचारासाठी सुरू करण्यात आलेल्या रुग्णवाहिकेत सुमारे ३३ हजार बाळंतपणे सुखरूपपणे पार पडली आहेत. गेल्या आठवड्यात सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे या पूरग्रस्त भागातदेखील या रुग्णवाहिकेच्या माध्यमातून सुमारे हजारो नागरिकांना सुखरूपपणे रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे.

२०१४ ते जुलै २०१९पर्यंत रस्ते अपघातातील सुमारे तीन लाख ४६ हजार जखमींना रुग्णालयात दाखल करण्याचे काम या रुग्णवाहिकेमुळे शक्य झाले आहे. अपघातानंतर लगेचच आवश्यक ती प्राथमिक उपचार सेवा मिळाल्याने अनेकांचे प्राण वाचले आहेत. आतापर्यंत विविध १३ प्रकारच्या वैद्यकीय आपत्कालीन स्थितीतील रुग्णांना वेळेत उपचार मिळाले आहेत. रस्ता अपघात, नैसर्गिक आपत्ती, वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत रुग्णाला गोल्डन अवरमध्ये उपचार मिळण्याकरिता अत्याधुनिक रुग्णवाहिकेची ही सेवा सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी १०८ हा टोल फ्री क्रमांक देण्यात आला आहे. 

लक्षणीय बाब म्हणजे ही रुग्णवाहिका चाकावरचे प्रसूतिगृहही ठरले आहे. मागील पाच वर्षांत सुमारे ३३ हजार गर्भवतींचे बाळंतपण या रुग्णवाहिकेत सुखरूपपणे करण्यात यश मिळाले आहे. राज्यात ९३७ रुग्णवाहिका चालविल्या जात आहेत; तसेच दोन वर्षांपूर्वी राज्यात मुंबईमध्ये बाइक ॲम्ब्युलन्स सुरू करण्यात आली. त्या माध्यमातून आतापर्यंत २२ हजार रुग्णांना सेवा देण्यात आली आहे. या सेवेचा विस्तार करीत मुंबईमध्ये १८, पालघर, अमरावती येथे प्रत्येकी पाच तर सोलापूर आणि गडचिरोली येथे प्रत्येकी एक अशा एकूण ३० बाइक ॲम्ब्युलन्स सध्या कार्यरत आहेत.

रस्ते अपघातात जखमी झालेल्या रुग्णांना तातडीने वैद्यकीय मदत मिळाल्यास त्यांना जीवनदान मिळण्याची शक्यता वाढते. हेच आता महाराष्ट्रातही सिद्ध झाले आहे. २०१४ मध्ये ११.४८वर (एक लाख लोकसंख्येसाठी) असलेले हेच गुणोत्तर २०१६ मध्ये राज्यात १०.०८ इतके खाली आले आहे.  
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search