Next
पी. जी. वुडहाउस, नारायण सुर्वे
BOI
Sunday, October 15, 2017 | 04:00 AM
15 1 0
Share this article:

‘वुडहाउसचा मझा त्याच्या इंग्लिशमधूनच घ्यायला हवा. त्या पठ्ठ्यापुढे आपण शरण आहोत. इंग्लिश भाषा कधीच त्याच्यापुढे ‘येस सर’ म्हणत उभी आहे, स्वतःच्या पुस्तकांचं व्यसन जडवणारा तो लेखक’ असं साक्षात ‘पुलं’नी ज्याचं वर्णन केलंय त्या पी. जी. वुडहाउसचा आणि ‘माझे विद्यापीठ’ या मुक्त शैलीतल्या रचनांसाठी सोव्हिएत लँड नेहरू पुरस्कार मिळवणारे कवी नारायण सुर्वे यांचा १५ ऑक्टोबर हा जन्मदिन. त्यानिमित्त आज ‘दिनमणी’मध्ये पी. जी. वुडहाउस आणि सुर्वे यांच्याविषयी.... 
....... 

पेल्हम ग्रेनव्हिल वुडहाउस
 
१५ ऑक्टोबर १८८१ रोजी गिल्डफर्डमध्ये जन्मलेला पेल्हम ग्रेनव्हिल वुडहाउस उर्फ प्लम हा इंग्लिश भाषेला लीलया खेळवत तुफान विनोदनिर्मिती करणारा इंग्लिश भाषेतला सर्वश्रेष्ठ विनोदी कादंबरीकार... आपल्या ९३ वर्षांच्या आयुष्यात ९२ कादंबऱ्या-कथासंग्रह, ४४ संगीतिका, ११ हॉलिवूड फिल्म्सच्या पटकथा आणि कित्येक वृत्तपत्रं आणि नियतकालिकांसाठी लेखन करणारा, आपल्या सकस, धमाल आणि सातत्यपूर्ण विनोदी लेखनानं अलम जगाला हसवत ठेवणारा ‘मास्टर’!

असं म्हटलं जातं, की ‘जगात दोन प्रकारची माणसं असतात. एक - वुडहाउस वाचून त्याचे आजन्म भक्त असणारी आणि दुसरी वुडहाउस अजिबात न वाचलेली!’ अशी पराकोटीची लोकप्रियता आपल्या सातत्यपूर्ण विनोदी लेखनामुळे प्राप्त झालेला आणि सामान्य वाचक तर सोडाच; पण प्रथितयश आणि नावाजलेल्या इंग्लिश लेखकांनी, पत्रकारांनी आणि समीक्षकांनी उच्च कोटीची स्तुतिसुमनं ज्याच्यावर उधळली असा थोर विनोदी लेखक म्हणजे वुडहाउस! वाचकांचं ‘निखळ मनोरंजन’ एवढा एकच निकष त्याच्या कादंबऱ्यांना लावता येतो. 

शाब्दिक क्लृप्त्या, नावांमधल्या गमती, स्वभावातल्या जमती, विसंगती, मोठ्या माणसांमध्ये दडलेले टवाळखोर बालक, भोळे मालक, त्यांचे हिकमती नोकर, बावळट नायक आणि लाघवी नायिका, आपल्या प्रेमिकेसाठी वाट्टेल ती भन्नाट साहसं करायला जाणारे प्रेमवीर आणि त्यांच्यावर कोसळणारी विनोदी संकटं अशा सर्वांचं अतर्क्य भन्नाट उपमांच्या साह्यानं चितारलेलं वर्णन त्याच्या कादंबऱ्यांत असतं. त्याच्या बहुतांशी कथा-कादंबऱ्या घडतात त्या त्याच्या प्रिय इंग्लंडमध्ये. प्रामुख्याने एडवर्डिअन काळात घडणाऱ्या कादंबऱ्या, त्या काळचं इंग्लंड, तिथले क्लब्ज, पब्ज, लॉर्ड, अर्ल, बॅरन वगैरे मंडळी, त्यांचे बटलर्स, लंडनहून तास-दोन तास रेल्वेच्या अंतरावर असणाऱ्या त्यांच्या इस्टेट्स, तिथले भव्य किल्लेवजा प्रासाद, तिथे अधूनमधून पाहुणचार झोडायला येणारी विक्षिप्त पाहुणेमंडळी, वेगवेगळी नावं धारण करून तिथल्या मौल्यवान ऐवजांवर डल्ला मारायला येणारे भुरटे चोर, तरुण-तरुणींची धमाल, अमीर-उमरावांच्या विक्षिप्त तऱ्हा, त्यांचे भन्नाट छंद, मजेदार प्रेमप्रकरणं आणि त्यातून उद्भवणारे गैरसमज, घोटाळे, वारंवार ठरून मोडणारे साखरपुडे , तिथल्या गावांतले धमाल पोलीस, आपल्या तरुण मालकाला वेगवेगळ्या लफड्यांमधून बाहेर काढण्यासाठी त्यांच्या बटलर्सनी वापरलेल्या युक्त्या आणि या सर्वांतून अफाट वेगानं पुढे सरकणारं तुफान विनोदी बहारदार कथानक! जुन्या रूढी आणि परंपरा पाळणारे लब्धप्रतिष्ठित लोक, नायकानं पार्टीत मजा करणं आणि मग झिंग चढल्यावर अचाट कृत्य करणं, चोर-पोलिसांची चकवाचकवी, एखादी गोष्ट लंपास करण्यासाठी आणि स्वतः नामानिराळे राहण्यासाठी दुसऱ्या मंडळींना दिलेल्या विनोदी सुपाऱ्या, रात्रीच्या अंधारात चोरीच्या उद्देशानं निघालेल्या व्यक्तींवर कोसळणारे हास्यस्फोटक प्रसंग, याचबरोबर त्या काळचं इंग्लंड. तिथल्या नयनरम्य छोट्या काउंटीजमधला निसर्ग, उच्चभ्रूंचे शिष्टाचार, चित्र-विचित्र गोष्टी, नमुने गोळा करण्याचे एकेकाचे अफलातून छंद, छोट्या छोट्या पुंड कुत्र्यांची, लाडक्या डुकरिणींची आणि मालकांची धम्माल आणि तुफानी कलायमॅक्स - हे सगळं वुडहाउसच्या सर्वच कथा-कादंबऱ्याचं समान वैशिष्ट्य!

आपल्या अफाट लेखनकाळात त्यानं शेकडो अजरामर व्यक्तिरेखा निर्माण केल्या. बर्टी वूस्टर, जीव्ह्ज, लॉर्ड एम्स्वर्थ, एम्प्रेस ऑफ बलँडिंग्ज, फ्रेडी थ्रीपवूड, स्मिथ, मलिनर, अंकल फ्रेड, युक्रिज, शेफ अनातोल, आँट अॅगथा, डेलिया, लेडी कॉन्स्टन्स किबल, माँटी बाँडकिन, गस्सी फिंक नॉटल, टपी ग्लॉसप... किती किती धमाल नमुने!...त्या सर्वांमधून जाणारा सामान धागा म्हणजे जुनं इंग्लंड! त्याच्या धमाल विनोदी कथानकांवर ‘वुडहाउस प्लेहाउस’ नावाची सीरिज ‘बीबीसी’नं काढली होती. 

पु.ल: एक साठवण' मधून आणि कॉन्टिनेंटल प्रकाशनच्या 'मला उमगलेला वुडहाउस' मधून वुडहाउस विषयी मराठीत वाचायला मिळतं.

आयुष्यभर धमाल विनोदी प्रेमकथा लिहिणारा हा श्रेष्ठ लेखक जग जेव्हा प्रेमाचा दिवस साजरा करतं, त्या दिवशीच म्हणजे १४ फेब्रुवारी १९७५ रोजी निधन पावला हा नियतीचा योगायोग. 
...... 


नारायण सुर्वे 

१५ ऑक्टोबर १९२६ रोजी जन्मलेले नारायण सुर्वे हे खऱ्या अर्थानं समाजजीवनाची वेदना मांडणारे आणि लढाऊ वृत्तीनं समाजक्रांतीची स्वप्नं पाहणारे कवी. त्यांनी आपल्या कवितेतून कामगारांचं, कष्टकऱ्याचं, शोषितांचं जग आणि त्यातल्या व्यथा मांडल्या. कॉलेज सोडाच, शाळाही धड पूर्ण करू न शकलेल्या सुर्व्यांची कवितेमधली शब्दांची निवड आणि त्यावरची हुकूमत स्तिमित करण्याजोगी.
 
कामगार आहे मी, तळपती तलवार आहे’ म्हणणारे सुर्वे, ‘जसा जगत आहे मी, तसाच शब्दांत आहे’ म्हणणारे सुर्वे... सुर्व्यांचं सारंच लेखन विलक्षण रोखठोक आणि अत्यंत परखड! 

तुझे गरम ओठ : ओठांवर टेकलेस तेव्हा,
तेव्हाही रात्र अशीच होती; घुमी.
पलीकडे खडखडणारे कारखाने
खोल्याखोल्यांतून अंथरले बिछाने
मुल्लाचा अखेरचा अल्लासाठी गजर
काटे ओलांडीत चालले प्रहर
भावंडासह कोनाडा जवळ केला आईने
धुमसत, बिछान्यासह फुटपाथ गाठली बापाने... 

गरीब जोडप्याचं प्राक्तन मांडणारी ही कविता कोणालाही अंतर्मुख करेल अशीच!  

कविता श्रमाची, माझे विद्यापीठ, सनद, सुर्वे, ऐसा गा मी ब्रह्म, दादर पुलाकडची मुले, दलित काव्यदर्शन, गाणी चळवळीची, कहाणी कवितेची, जाहीरनामा अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत. 

१६ ऑगस्ट २०१० रोजी त्यांचा ठाण्यामध्ये मृत्यू झाला.
 
15 1 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search