Next
सुशील-माधव न्यासतर्फे पुरस्कारांचे वितरण
प्रेस रिलीज
Friday, February 01, 2019 | 02:21 PM
15 0 0
Share this storyपुणे : येथील सुशील-माधव न्यास यांचा वतीने यंदाचा भक्तीसेवा पुरस्कार अनिल केळगणे यांना, तर संस्कृत साधना पुरस्कार कर्नाटक संस्कृत विश्‍वविद्यालय बंगळुरू येथून एमए संस्कृत उत्तीर्ण असलेले व सध्या पीएचडी अभ्यास करत असलेले रितेश कुलकर्णी यांना प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार सोहळा एस. एम. जोशी सभागृह येथे झाला.

भक्तीसेवा पुरस्काराचे स्वरूप मानचिन्ह मानपत्र आणि रोख पाच हजार रुपये, तर संस्कृत साधना पुरस्काराचे स्वरूप रोख अडीच हजार, मानपत्र व मानचिन्ह असे होते. या कार्यक्रमाला ‘सीआरपीएस’चे कार्यकारी संचालक व निवृत्त डीजीपी महाराष्ट्र राज्य अजित पारसनीस, सुशील-माधव न्यासचे संयोजक आनंद माडगूळकर. राधाकांत देशपांडे, कवियित्री मंगलाताई जोशी, राजेंद्र कुलकर्णी, श्रीकांत कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. हे पुरस्काराचे नववे वर्ष आहे.

या वेळी साहसी ट्रेकर व महाबळेश्‍वर अ‍ॅडव्हेंचर ट्रेकर्स असोसिएशनचे संस्थापक अनिल केळगणे म्हणाले, ‘आघातामधून आधाराकडे हे महाबळेश्‍वर अ‍ॅडव्हेंचर ट्रेकर्स असोसिएशनचे ब्रीद आहे. एखादी अपघातग्रस्त घटना घडल्यावर केवळ १२-१५ मिनिटांमध्ये संस्थेचे कार्यकर्ते घटनास्थळी पोहोचतात आणि कामगिरी पूर्ण करतात. आम्ही सर्वांची काळजी घेतच असतो तरीदेखील पर्यटकांनी व पदभ्रमण करणार्‍यांनी स्वतःची काळजी घ्यावी. २०१२पासून ही संस्था कार्यरत असून, आजवर सुमारे १०० पेक्षा अधिक जणांना आम्ही जीवदान देण्यात मदत केली आहे. या पुरस्काराने पुढील कार्याला नवीन ऊर्जा मिळेल.’ या वेळी त्यांनी अनुभवलेल्या घटनांचे दाखले दिले.

रितेश कुलकर्णी म्हणाले, ‘सध्याच्या काळात वेदाचा आणि संस्कृत भाषेचा प्रसार कमी होत असून, या दोन्ही बाबींचे संरक्षण व्यापक प्रमाणात केल्यास देशाची प्रगती अधिक गतीने होण्यास मदत होईल. भारतीय संस्कृतीमध्ये आई वडील आणि गुरू हेच दैवत आहे त्यांचे पूजन म्हणजेच संस्कृतीचे पूजन आहे. आजचा पुरस्कार म्हणजे आजवर केलेल्या कार्याची पावती आहे.’

प्रारंभी कवयित्री मंगला जोशी यांनी स्वागत करून प्रास्ताविक केले. आनंद माडगुळकर यांनी पुरस्कारामागची भूमिका विशद केली. मकरंद टिल्लू यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

या कार्यक्रमाच्या उत्तरार्धात ‘अपघातग्रस्तांना मदत कशी कराल’ यावर अजित पारसनीस यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद झाला. यात दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या आयसीयू विभागाचे प्रमुख डॉ. प्रसाद राजहंस, पोलिस निरीक्षक महेशकुमार सरतापे, पोलिस उपनिरीक्षक दिगंबर जाखडे, जीवरक्षक राजेश काची व गिरीदर्शन ट्रेकिंगचे सतीश मराठे हे सहभागी झाले होते.
 
‘गंभीर अपघातांमध्ये बर्‍याच रुग्णांना वेळेत उपचार न मिळाल्याने आपले प्राण गमवावे लागतात. त्यामुळे कुठलाही विचार न करता आपले प्रथम कर्तव्य म्हणून लोकांनी अपघातग्रस्तांची मदत करावी,’ असे मत विविध वक्त्यांनी व्यक्त केली.

डॉ. राजहंस म्हणाले, ‘अपघातप्रसंगी घटनास्थळी येणार्‍या पहिल्या नागरिकाने (फर्स्ट रिस्पाँडर) १०८ क्रमांकावर संपर्क साधून त्वरित मदत मागणे गरजेचे आहे. अपघात प्रसंगी अगदी प्रत्येक मिनिटदेखील प्रत्येक तासासारखा वाटतो आणि अशा वेळेस मदत करणारी लोकं खासगी वाहनांमधून रुग्णांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात. पण शक्यतो प्रथमोपचारासाठी तयार असलेल्या रुग्णवाहिकेतून अपघातग्रस्तांना घेऊन जाणे योग्य आहे किंवा रुग्णवाहिका येण्यास विलंब होत असेल, तर छोट्या वाहनातून न नेता जखमी व्यक्तीला झोपविता येईल अशा वाहनातून नेणे योग्य ठरेल, कारण अशा वेळेस मानेच्या व पाठीच्या मणक्यांना झालेली जखम अधिक तीव्र होण्याची शक्यता असते. त्याशिवाय जखमी बेशुद्ध असेल, तर पाणी पाजू नये, जेणेकरून अन्न व श्‍वास नलिकेला अधिक अडथळा येईल. रक्तस्त्राव होत असेल, तर स्वच्छ फडके किंवा रूमाल घट्ट बांधावा.’

पोलिस निरीक्षक सरतापे म्हणाले, ‘अपघातग्रस्तांची मदत करताना पोलिसांकडून अडचणी येतील याची काळजी करू नये. सुप्रिम कोर्टाच्या मार्गदर्शक तत्त्वांनी यावर स्वच्छपणे प्रकाश टाकला आहे की मदत करणार्‍या व्यक्तीला आपली ओळख गुप्त ठेवण्याचा अधिकार आहे व त्यासाठी त्याला पोलिसांकडून कोणताही त्रास होणार नाही.’

गिरीदर्शनचे मराठे म्हणाले, ‘साहसी पर्यटनामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असून, फक्त प्रोफेशनल ट्रेकर्सच नाही, तर हौस किंवा आवड असल्यामुळे पदभ्रमणसाठी जाणार्‍यांची संख्या वाढत आहे. रस्ते अपघातामध्ये किमान मदत ही तत्परतेने मिळू शकते; मात्र दुर्गम भागात साहसी पर्यटनादरम्यान अपघात झाल्यास हॉस्पिटलपर्यंत पोहोचण्यासाठी चार ते पाच तास लागू शकतात. त्यामुळे प्रत्येकाने आपली काळजी स्वत: घेतली पाहिजे आणि निसर्गाचे नियम पाळले पाहिजे.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link