Next
‘जनगणना २०२१’ची तयारी सुरू
पहिल्यांदाच होणार ऑनलाइन पद्धतीने माहितीचे संकलन
प्रेस रिलीज
Friday, June 14, 2019 | 04:58 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : भारताच्या ‘जनगणना २०२१’च्या पूर्वतयारीअंतर्गत जनगणनेच्या सर्व टप्प्यांची रंगीत तालीम (प्री-टेस्ट) ऑगस्ट ते सप्टेंबर २०१९दरम्यान देशातील निवडक जिल्ह्यांमधील ग्रामीण व शहरी भागांमध्ये होणार आहे. या जनगणनेमध्ये पहिल्यांदाच माहितीचे संकलन ऑनलाइन पद्धतीने करण्यात येणार असून, त्याची चाचणी ‘प्री-टेस्ट’ मध्ये होणार आहे.

नवी दिल्लीतील महानिबंधक तथा जनगणना आयुक्तांच्या कार्यालयामार्फत देशाच्या सर्वांत मोठ्या प्रशासकीय कामाची म्हणजेच ‘जनगणना २०२१’ची तयारी सुरू झाली आहे. येणाऱ्या जनगणनेसाठी माहिती संकलनाच्या पद्धतीमध्ये क्रांतीकारक बदल प्रस्तावित आहेत. त्या अनुषंगाने जनगणना आयुक्त कार्यालयाने तीन ते ११ जून २०१९ या कालावधीत पुणे येथील यशदामध्ये राज्यस्तरीय प्रशिक्षकांचे प्रशिक्षण आयोजित केले होते. या प्रशिक्षणाचे उद्घाटन महाराष्ट्राच्या जनगणना संचालक रश्मी झगडे यांच्या हस्ते तीन जून रोजी झाले. 

राष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षकांनी महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा आणि गोवा राज्यांमधील प्रशिक्षकांना यशदा येथे प्रशिक्षण दिले. हे राज्यस्तरीय प्रशिक्षक पुढील टप्प्यात जिल्हास्तरीय प्रशिक्षकांना प्रशिक्षण देतील. प्रशिक्षणाच्या शेवटच्या दिवशी राज्यस्तरीय प्रशिक्षकांनी पुणे जिल्ह्यातील निवडक ग्रामीण व शहरी भागात चाचणीसाठी माहिती संकलन केले.

प्रशिक्षणाच्या उद्घाटन प्रसंगी झगडे म्हणाल्या, ‘‘प्री-टेस्ट’ ही जनगणनेची रंगीत तालीम असल्याने त्यातील प्रत्येक टप्प्यात बिनचूक काम झाल्यास प्रत्यक्ष जनगणनेची प्रश्नावली, सूचना पुस्तिका, माहिती संकलनाची पद्धती आणि माहिती संस्कारणाची पद्धती सुनिश्चित करणे शक्य होईल.’

प्रशिक्षणाच्या समारोप कार्यक्रमाला भारताचे महानिबंधक तथा जनगणना आयुक्त विवेक जोशी उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना ते म्हणाले, ‘‘जनगणना २०२१’साठी ‘प्री-टेस्ट’ अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. यामध्ये पहिल्यांदाच माहितीचे संकलन ऑनलाइन पद्धतीने करण्याचे प्रस्तावित असून, त्याची चाचणी ‘प्री-टेस्ट’ मध्ये होणार आहे. ‘जनगणना २०२१’मध्ये माहितीचे संकलन ऑनलाइन पद्धतीने झाल्यास शासकीय धोरण ठरविण्यासाठी आणि संशाधकांना आवश्यक जनगणनेची माहिती प्राधान्याने उपलब्ध होऊ शकेल.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search