Next
आशियाई स्पर्धेतील ‘विक्रमी’ भारत...
६७ वर्षांनी सुवर्णपदकांच्या विक्रमाशी बरोबरी
BOI
Tuesday, September 04, 2018 | 07:00 AM
15 0 0
Share this article:


१५ सुवर्ण, २४ रौप्य आणि ३० कांस्य पदकांसहित तब्बल ६९ पदकांची लयलूट केलेल्या भारतीय खेळाडूंनी २०१८ची आशियायी क्रीडा स्पर्धा खऱ्या अर्थाने गाजवली.  इंडोनेशियाची राजधानी जाकार्ता येथे नुकत्याच पार पडलेल्या १८व्या आशियायी क्रीडा स्पर्धेतील भारतीय खेळाडूंच्या कामगिरीचा आढावा घेणारा हा लेख...
.............
जाकार्ता येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेचे सूप शनिवारी (एक सप्टेंबर) वाजले. दर चार वर्षांनी होणारी ही बहुक्रीडा आशियाई स्पर्धा ऑलिंपिक स्पर्धेच्या खालोखाल समजली जाते. आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीची पाल्य असलेली संस्था ‘आशिया ऑलिंपिक समिती’ हीच या आशियायी क्रीडा स्पर्धांचीही आयोजक असते. 

२०१६च्या ‘रिओ ऑलिंपिक’ स्पर्धेनंतर त्याखालोखाल मानाच्या समजल्या जाणाऱ्या या आशियाई स्पर्धेत भारताची कामगिरी कशी असेल, याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले होते. असंख्य  क्रीडाप्रेमींना भारतीय खेळाडूंनीही निराश केले नाही. १५ सुवर्ण, २४ रौप्य आणि ३० कांस्य पदकांसहित एकूण तब्बल ६९ पदकांची लयलूट भारताने आशियाई स्पर्धेंत केली. याबरोबरच भारताने आपला २०१०मधील सर्वाधिक ६५ पदकांचा विक्रम मोडीत काढला आहे. चीनमधील ग्वांगजू येथे झालेल्या १६व्या आशियायी स्पर्धेत भारताने एकूण ६५ पदकांची कमाई केली होती. 

१९५१मध्ये सुरू झालेल्या या आशियाई स्पर्धांच्या इतिहासात भारताच्या आजवरील कामगिरींपैकी यंदाच्या आशियाई स्पर्धेतील कामगिरी सर्वोत्तम ठरली आहे. या वर्षीच्या स्पर्धेतून भारताला क्रीडा क्षेत्रातील काही नवीन चांगले हिरे गवसले आहेत, ज्यांच्यामुळे आगामी टोकियो ऑलिंपिकसाठी आशा पल्लवित झाल्या आहेत.

भारताचा ‘सुवर्ण’वेध :
शनिवार, १८ ऑगस्टला जाकार्तामध्ये सुरू झालेल्या या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात भारताचा खेळाडू नीरज चोप्रा याने भारताचे प्रतिनिधित्व केले. १९ ऑगस्टला भारताचा कुस्तीपटू बजरंग पुनियाने या स्पर्धेतील पहिले सुवर्णपदक मिळवून श्रीगणेशा केला. त्यानंतर, ‘म्हारी छोरीयाँ छोरों से कम है के’ म्हणणारे महावीर फोगट यांच्या घराण्यातील कुस्तीपटू विनेश फोगटने पंच्याहत्तर सेकंदांत अक्षरशः मगरीप्रमाणे आपल्या विरोधी खेळाडूला फिरवून बाहेर नेले आणि अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरीत संघर्ष करून तिने सुवर्णपदक जिंकलं. या सुवर्णपदकाबरोबरच विनेश आजवरच्या आशियाई स्पर्धांत  सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ठरली आहे. पहिली ‘सोनपरी’ होण्याचा मान विनेशने मिळवला. आपल्या चुलत बहिणींप्रमाणे तिनेही देशाचे नाव सुवर्णाक्षरांनी कोरले. 

त्यानंतर पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत सौरभ चौधरीने सुवर्णवेध साधत या स्पर्धेतील नेमबाजीतले पहिले सुवर्ण पटकावले. या सुवर्णपदकाबरोबरच आजवरच्या आशियाई स्पर्धांमधील सुवर्णपदक मिळवणारा सर्वांत कमी वयाचा खेळाडू असा विक्रम त्याने केला आहे. त्याच्यापाठोपाठ महाराष्ट्रकन्या राही सरनोबत हिनेही एक विक्रम रचला. महिलांच्या २५ मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत सुवर्णपदक मिळवत आशियायी स्पर्धेंतील वैयक्तिक नेमबाजीत सुवर्णपदक मिळवणारी ती पहिली महिला नेमबाज ठरली आहे.

त्यानंतर स्पर्धेचा पाचवा दिवस (२४ ऑगस्ट) गाजवला तो रिले खेळाने. रिले खेळात भारताच्या सवर्ण सिंग, दत्तू भोकनळ, ओम प्रकाश आणि सुखमित सिंग यांच्या संघाने पुरुष रिलेमधील सुवर्ण मिळवत यंदाच्या स्पर्धेतील भारतासाठीचे पहिले सांघिक सुवर्णपदक पटकावले. त्याच दिवशी टेनिसपटू रोहन बोपण्णा आणि दिविज शरण यांनी टेनिस पुरुष दुहेरीचे विजेतेपद मिळवत स्पर्धेतील टेनिसमधले पहिले सुवर्णपदक पटकावले. 

नीरज चोप्रा२५ ते ३० ऑगस्ट हे मधले काही दिवस गाजवले ते अॅथलिट्सनी. यांत तेजिंदरपाल सिंग तूर, नीरज चोप्रा, मंजित सिंग, असपिंदर सिंग, स्वप्ना बर्मन, जीन्सन जॉन्सन या अॅथलिट्सनी विविध प्रकारात दर्जेदार कामगिरी करून सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. यंदाच्या आशियायी स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात भारताचे प्रतिनिधित्व केलेल्या नीरज चोप्राने भालाफेक या खेळात सुवर्णपदक पटकावून विक्रम नोंदवला. आशियाई स्पर्धेत भालाफेकमध्ये सुवर्ण मिळवणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.


भारतीय महिला रिले संघाने म्हणजेच एम. आर. पोवम्मा, सरिताबेन गायकवाड, हिमा दास आणि विस्मया यांच्या संघाने उत्तम कामगिरी करून आणखी एक सुवर्णपदक भारताच्या खात्यात जमा केले. हिमा दासने याच स्पर्धेत दोन रौप्यपदक पटकावले. यंदाच्या आशियाई स्पर्धेत तिने एकूण तीन पदके मिळवली आहेत.

स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच घेतलेला सुवर्णवेध भारतीय खेळाडूंनी अखेरच्या दिवसापर्यंत कायम ठेवला. आशियायी स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी म्हणजेच एक सप्टेंबरला अमित पांघळ याने मुष्टियुद्धात सुवर्णपदक मिळवले. ब्रिज खेळात प्रणव वर्धन आणि शिभनाथ सरकार यांच्या जोडीने सुवर्णपदक पटकावून यंदाच्या आशियाई स्पर्धेचा शेवट गोड केला. याबरोबरच प्रणव वर्धन यांनी आशियाई खेळांतील सर्वांत वयस्कर सुवर्णपदक विजेते होण्याचा मान मिळवला आहे.  

स्पर्धेत सर्वाधिक सुवर्णपदक पटकावण्याचा मान भारतीय पथकातील अॅथलेटिक्स संघाच्या खेळाडूंना मिळाला. भारताने अॅथलेटिक्समध्ये सात सुवर्ण, दहा रौप्य आणि दोन कांस्य पदकांची कमाई केली. याबरोबरच भारताने यंदाच्या आशियाई स्पर्धेत तब्बल ६७ वर्षांनंतर १५ सुवर्णपदकांच्या आपल्या विक्रमाची बरोबरी केली आहे. १९५१मध्ये नवी दिल्लीत झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने १५ सुवर्ण जिंकण्याचा विक्रम केला होता. 

२४ रौप्य आणि ३० कांस्य पदकांवरही कोरले नाव : 
यंदाच्या आशियायी क्रीडा स्पर्धांमध्ये सुवर्णपदकांच्या पाठोपाठ विविध खेळांमध्ये २४ रौप्य आणि ३० कांस्यपदके मिळवणाऱ्या भारतीय खेळाडूंची कामगिरीही नेत्रदीपक ठरली. नेमबाजीत दीपक कुमार, लक्ष्य शेओरन, संजीव राजपूत, शार्दूल विहान या नेमबाजांनी रौप्यपदक मिळवले, तर रवी कुमार, अपूर्वी चंडेला आणि अभिषेक वर्मा या नेमबाजांना कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. यामध्ये १५ वर्षीय विहानने पुरुष डबल ट्रॅप स्पर्धेत रौप्यपदक मिळवून आशियायी खेळांमध्ये सर्वांत कमी वयाचा भारतीय पदकवीर असा विक्रम स्वतःच्या नावे केला आहे. 

भारतीय महिला कबड्डी संघ आणि महिला हॉकी संघ यांना या दोन्हीही खेळांत रौप्यपदक मिळवण्यात यश आले. पुरुषांच्या कबड्डी आणि हॉकी अशा दोन्हीही संघांना मात्र कांस्य पदकांवर समाधान मानावे लागले. कायम सुवर्णपदक मिळवणाऱ्या कबड्डी संघाला या वर्षी सुवर्णपदकाला गवसणी घालता आली नाही. पुरुष आणि महिला दोन्ही कबड्डी संघांना सुवर्णस्पर्श झाला नाही. 

सायना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधूअॅथलेटिक्स वैयक्तिक प्रकारात विशेष कामगिरी करून हिमा दास, मोहम्मद आनास, दुती चांद, धरुन अय्यास्वामी, सुधा सिंग, नीना वर्किल, जिन्सन जॉन्सन या अॅथलिट्सनी रौप्यपदकावर आपले नाव कोरले. यानंतर विशेष कामगिरी ठरली ती गेल्या वेळची ऑलिंपिक पदकविजेती बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू आणि सायना नेहवाल यांची. सिंधूने अंतिम फेरीपर्यंत लढा देऊन रौप्यपदक पटकावले, तर साईना नेहवालने कांस्यपदकावर नाव कोरले. आशियाई खेळांत बॅडमिंटनमध्ये रौप्यपदक मिळवणारी सिंधू ही पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. ब्रिज खेळात पुरुष संघ आणि संयुक्त संघ या दोन्ही संघांनी विशेष कामगिरी करत कांस्यपदक मिळवले. स्क्वॅशमध्ये भारतीय महिला संघाने रौप्य तर पुरुष संघाने कांस्य पटकावले. आशियायी खेळांच्या इतिहासात यंदा भारताने टेबल टेनिसमध्ये पहिलेवहिले पदक मिळवले. टेबल टेनिसमध्ये पुरुष आणि मिश्र दुहेरीत शरथ कमल आणि मनिका बत्रा या जोडीने कांस्यपदक मिळवले. 

बॉक्सिंगमध्ये भारताची कामगिरी यथातथाच राहिली. विकास कृष्णनने उपांत्य फेरीत शारीरिकदृष्ट्या फिट नसल्याचे कारण देऊन स्पर्धेतून माघार घेतली आणि त्याचे सुवर्ण अथवा रौप्यपदकाचे स्वप्न भंग पावले. उपांत्यपूर्व सामन्यात चीनच्या बॉक्सरशी लढताना त्याच्या डोळ्याला दुखापत झाली होती. अमित पांघळने भारताकडून बॉक्सिंगमध्ये सर्वोत्तम कामगिरी केली. स्क्वॅशमध्ये महिला संघाने चांगली कामगिरी केली. ज्योत्स्ना चिनप्पा आणि दीपिका पल्लीकलने पदके कमावली. कुराश या मार्शल आर्ट क्रीडा प्रकारात समस्त भारतीय क्रीडाप्रेमींचे लक्ष वेधले ते पिंकी बलहारने. तिने रौप्यपदक मिळवले. थाळीफेक क्रीडाप्रकारात कांस्यपदक मिळवणाऱ्या सीमा पुनियाने मिळालेल्या रकमेतून केरळ पूरग्रस्तांना मदत करून आपली सामाजिक बांधिलकी जपली.

गोळाफेक स्पर्धेत भारताचा ताजिंदर सिंग तूरने गोळा फेकून सुवर्णपदक मिळवून महाविक्रम केला. यंदाच्या आशियाई स्पर्धेत नौकायन स्पर्धेत भारताने एक रौप्य आणि दोन कांस्य अशा तीन पदकांची कमाई केली. वर्षा गौतम, श्वेता शेर्वेगर या जोडीने रौप्यकमाल केली, तर वरुण ठक्कर आणि चेंगप्पा केलापांडा या जोडीने कांस्यपदक मिळवले. हर्षिता तोमरने एक कांस्यपदक मिळवले. 

स्वप्ना बर्मनस्वप्ना बर्मन ही हेप्टॉथ्लॉन प्रकारात सोनपरी बनली. तिने या आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून इतिहास रचला. स्वप्ना बर्मनच्या दोन्ही पायांना सहा बोटे आहेत. या अडचणीवर मात करत तिने आत्मविश्वासाने स्पर्धेत कामगिरी करून या स्पर्धेतले आजवरच्या भारतीय इतिहासातील पहिले सुवर्णपदक मिळवले. हेप्टॉथ्लॉन खेळ प्रकारात धावणे, फेकी, उड्या आदी सात प्रकारच्या खेळांचा समावेश असतो, त्यामुळे सातही खेळांचा सराव करावा लागतो. त्यामुळे स्वप्ना बर्मनची कामगिरी अत्यंत कौतुकास्पद ठरते.

ज्यूडो आणि सायकलिंगमध्ये भारतीय खेळाडूंची कामगिरी अपयशी ठरली. परंतु ब्रिज या खेळात पदके मिळवण्यात भारतीय खेळाडूंना यश मिळाले. विशेष बाब म्हणजे यंदा पहिल्यांदाच आशियाई क्रीडा स्पर्धेत समाविष्ट करण्यात आलेल्या या ब्रिज खेळात भारताचे प्रतिनिधित्व रीता चौकसी नामक ७९वर्षीय महिला खेळाडूने केले. भारतीय खेळाडूंच्या ताफ्यातील त्या सर्वांत वयस्कर महिला होत्या.

अशा प्रकारे संमिश्र कामगिरी करून भारतीय खेळाडूंनी या वर्षीची आशियाई स्पर्धा गाजवली. अपेक्षेप्रमाणे चीन या पदकतालिकेत सर्वोच्च राहिला. त्याखालोखाल जपान आणि नंतर दक्षिण कोरिया. भारत पदकांच्या तालिकेत आठव्या क्रमांकावर आहे. चीन, जपान या देशांमध्ये लहानपणापासूनच खेळाडू, अॅथलिट्स घडवले जातात. तिथे खेळ संस्कृती खूप खोलवर रुजलेली आहे. भारतात मुळात यासाठीचे इन्फ्रास्ट्रक्चरच तितकेसे पूरक नाही. तरीही भारतीय खेळाडूंची यंदाच्या आशियाई स्पर्धेतील ही कामगिरी भारताच्या प्रतिष्ठेला चार चांद लावणारी ठरली. यंदाची खेळाडूंची ही कामगिरी आजवरच्या आशियाई स्पर्धांपैकी सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. 

- अभिजित पानसे
मोबाइल : ८०८७९ २७२२१ 
ई-मेल : abhijeetpanse.1@gmail.com
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search