Next
घुमट बनणार गोव्याचे वारसा वाद्य
BOI
Thursday, February 14, 2019 | 04:12 PM
15 0 0
Share this story


पणजी : घुमट या गोव्यातील पारंपरिक वाद्याला लवकरच वारसा वाद्याचा दर्जा देण्यात येणार असल्याची घोषणा गोव्याचे कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी नुकतीच पणजी येथे केली. 

घुमट हे गोव्यातील पारंपरिक वाद्य असून, हिंदू आणि ख्रिश्चन समाजातील लोकसंगीत आणि सणसमारंभात हे वाद्य वाजविण्यात येत असे. गणेशोत्सवात तर मोठ्या प्रमाणात या वाद्याचा वापर केला जात असे. विशेषतः आरत्या म्हणताना हे वाद्य वाजवण्याची परंपरा होती. वसंत ऋतूत देवळांमध्ये होणाऱ्या सुवारी वादनात याचा वापर केला जात असे. गोव्यातील काही ठराविक जमातींमध्ये धार्मिक कार्यात मोठ्या आकारातील घुमटचे वादन केले जाते. आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमधील काही भागांतही धार्मिक कार्यात हे वाद्य वाजवले जाते. ख्रिश्चन समाजातील मांडो या संगीतप्रधान सादरीकरणात, तसेच झागोर या लोकनृत्यातही हे वाद्य वाजवले जात असे. घुमटला एक हजार वर्षांचा इतिहास असल्याचे इतिहासकारांचे म्हणणे आहे.


पुढे मोठा आकार आणि मागे लहान आकाराचे मोकळे तोंड असलेला मातीचा घट आणि त्याच्या पुढच्या तोंडाला त्याच्या तोंडाला ताणून बांधलेले कातडे असे या वाद्याचे स्वरूप असते. यासाठी घोरपडीच्या कातड्याचा वापर केला जात असे. घोरपडींची संख्या कमी होऊ लागल्याने हा प्राणी दुर्मीळ वन्यजीव म्हणून घोषित करण्यात आला. त्यामुळे १९७२च्या वन्यजीव संरक्षण कायद्याखाली वनखात्याने या वाद्यावर बंदी घातली. त्यामुळे गेल्या काही वर्षांत याचा वापर कमी झाला होता. हे वाद्य नामशेष होण्याच्या मार्गावर होते.

मूळचे गोव्याचे असलेले पोर्तुगालचे पंतप्रधान अँटोनिओ कोस्टा २०१७मध्ये गोव्याच्या भेटीवर आले होते, तेव्हा त्यांना हे वाद्य भेट देण्यात आले होते. आता हे वाद्य बनविताना शेळीच्या कातडीचा वापर केला जात आहे, त्यामुळे हे वाद्य पुनरुज्जीवित होत असून, सरकारच्या या निर्णयामुळे एक नामशेष होऊ घातलेला ऐतिहासिक वारसा जतन करण्यास मदत होणार आहे, अशी भावना व्यक्त होत आहे.  
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link