Next
रामचंद्र भंडारे नाथभूषण पुरस्काराने सन्मानित
अखिल भारतीय नाथपंथी समाज महासंघातर्फे प्रदान
BOI
Friday, February 08, 2019 | 01:31 PM
15 0 0
Share this article:

रामचंद्र भंडारे यांना सपत्निक नाथभूषण पुरस्कार प्रदान करताना आमदार संजय कदम, नगराध्यक्ष वैभव खेडेकर.

खेड : अखिल भारतीय नाथपंथी समाज महासंघातर्फे दिला जाणारा ‘नाथभूषण’ पुरस्कार हा सर्वोच्च सन्मान मंत्रालयात सेवा बजावणारे समाजाचे कोकणातील ज्येष्ठ कार्यकर्ते रामचंद्र रक्कमनाथ भंडारे यांना सपत्नीक सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील गणेश मंगल कार्यालयात झालेल्या कोकण मेळाव्यात दापोली-मंडणगड-खेडचे आमदार संजय कदम, खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.  या वेळी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मेळाव्यात ‘कोकण आणि नाथपंथ’ या विषयावर संवाद सत्रही झाले.

या प्रसंगी व्यासपीठावर महासंघाचे प्रदेशाध्यक्ष दिगंबर डवरी, प्रवक्ते, कीर्तनकार, अभियंता विश्वनाथ डवरी, सुरेखा रामचंद्र भंडारे, नाथजोगी सेवा समाज खेडचे अध्यक्ष संतोष शिर्के, महाराष्ट्र नाथजोगी सेवा समाजचे माजी अध्यक्ष संतोष जाधव, माजी कृषी अधिकारी शशिकांत पवार, को-ऑप सोसायटीचे चेअरमन अविनाश जाधव, संदीप भंडारे, लेखक धीरज वाटेकर उपस्थित होते.

या वेळी आमदार कदम यांनी नाथसंप्रदाय हा महान संप्रदाय असून, या संप्रदायाचे तत्त्वज्ञान सर्वांनीच अनुसरले पाहिजे, असे सांगितले. नगराध्यक्ष खेडेकर यांनी भंडारे यांना शतायुषी होण्याच्या शुभेच्छा दिल्या. या दोन्हीही लोकप्रतिनिधींनी भंडारे यांच्या कार्यशैलीचा गौरव केला.

‘परशुराम भूमी म्हणून प्रसिद्ध असलेल्या कोकणात प्रभू दत्तात्रेय आणि नवनाथांच्या भ्रमणाच्या अनेक खुणा आढळून येतात. आजही आपली संस्कृती, रितीरिवाज, विधी, चालीरीती सांभाळण्याचे प्रयत्न कोकणात अधिक आढळून येतात. याचा सारासार अभ्यास करून नाथ बांधवांनी आपली जीवनसिद्धता साधायला हवी,’ असे मत लेखक वाटेकर यांनी विशेष सत्रादरम्यान नोंदवले. वाटेकर यांनी या वेळी ‘नाथ संप्रदायातील परिवर्तन, कोकण, परशुराम आणि नाथ’ या विषयावर आपली अभ्यासपूर्ण भूमिका मांडली.   

विश्वनाथ डवरी यांनी महासंघाची भूमिका उपस्थितांसमोर मांडली. गरजू विद्यार्थ्यांना महासंघाचे अध्यक्ष डॉ. जयाजी नाथ यांच्या संकल्पनेतून देण्यात येत असलेल्या वार्षिक शिष्यवृत्तीबाबत त्यांनी माहिती सांगून आर्थिक मदतीची गरज असलेल्या समाजातील विद्यार्थ्यांची माहिती महासंघापर्यंत पोहोचविण्याचे आवाहन उपस्थितांना केले. मेळाव्यासाठी, मान्यवरांच्या आलेल्या प्रातिनिधिक प्रतिक्रियांचे वाचनही त्यांनी केले. समाजाचे काम महाराष्ट्रात प्रथम कोकणात सुरू झाले असून, त्याच कोकणाला महासंघाचा सर्वोच्च मानाचा पहिला पुरस्कार देण्यात येत असल्याचे सांगून त्यांनी समाजाने एकत्रित होण्याची गरज व्यक्त केली.

कार्यक्रमाला महिलांची मोठी उपस्थिती होती. अविनाश जाधव यांनी आभार मानले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search