Next
हलक्या विमानातून दोन महासागर ओलांडले; मुंबईच्या आरोहीची कामगिरी
असा विक्रम करणारी पहिली महिला वैमानिक
BOI
Saturday, August 24, 2019 | 06:04 PM
15 0 0
Share this article:

आरोही पंडित

मुंबई : अवघ्या २३ वर्षांची कॅप्टन आरोही पंडित ही छोट्या विमानातून एकटीने पॅसिफिक आणि अॅटलांटिक महासागर पार करणारी जगातील पहिली महिला ठरली आहे. याआधी मे महिन्यात तिने अॅटलांटिक महासागर पार केला होता. तिच्या या विक्रमाने भारताच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. 

आरोहीने २१ ऑगस्ट २०१९ रोजी आपल्या लहानशा विमानातून प्रशांत महासागर पार करून, रशियातील अँडीर विमानतळावर विमान उतरवले आणि एक जागतिक विक्रम नोंदवला. अमेरिकेच्या उत्तर टोकावर असलेल्या अलास्कामधील उनीलालाक्लीट विमानतळावरून तिने अवकाशात भरारी घेतली आणि पॅसिफिक महासागर ओलांडला. त्यानंतर नोम या ठिकाणी थांबून पुढे रशियातील अतिपूर्वेला असणाऱ्या अँडीर विमानतळावर तिने या अभूतपूर्व मोहिमेची सांगता केली. ग्रीनलँड आइसकॅप पार करणारी ती पहिली महिला वैमानिक ठरली आहे. तिने या मोहिमेत ११०० किलोमीटरचे अंतर पार केले. 

आंतरराष्ट्रीय वार/तारीख रेषाही तिने पार केली. ही रेषा ‘लाइन ऑफ कन्फ्युजन’ म्हणून ओळखली जाते. ही रेषा पार करताना ज्या वेळी तारीख बदलते, त्या वेळी काही मिनिटांसाठी सर्व उपकरणे पूर्ण क्षमतेने कार्य करत नाहीत. आरोहीने मंगळवारी, २० ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता नोम या ठिकाणाहून उड्डाण केले. तिचा प्रवास तीन तास ५० मिनिटांचा होता; मात्र ‘लाइन ऑफ कन्फ्युजन’ पार केल्यामुळे ती उतरल्याचा वार होता बुधवार. २१ तारखेला दुपारी १.५४ मिनिटांनी ती अँडीर विमानतळावर उतरली. 


या घटनेचे वर्णन करताना आरोही मिश्किलपणे म्हणते, ‘ही रेषा पार केल्यामुळे मी माझ्या आयुष्यातील एक दिवस हरवला. तो कधीच परत मिळणार नाही’.

‘पॅसिफिक महासागर हा अॅटलांटिक महासागरापेक्षा सुंदर आहे. माझी ही हवाईसफर अविस्मरणीय ठरली. हा विक्रम मी नोंदवू शकले याचा मला अभिमान वाटतो. माझ्या देशासाठी आणि जगभरातील महिलांसाठी हे अभिमानास्पद आहे,’ असे ती म्हणाली.

आरोहीकडे व्यावसायिक वैमानिकाचा आणि हलक्या विमानाचा परवाना असून, तिने बॉम्बे फ्लाइंग क्लबमधून प्रशिक्षण घेतले आहे. या मोहिमेत भाग घेण्याआधी आरोहीला अनेक खडतर चाचण्यांमधून जावे लागले. सात महिने कठोर प्रशिक्षण घ्यावे लागले. सायबेरिया, इटली येथे महासागर, अति उंच ठिकाणे, बर्फाच्छादित प्रदेश अशा ठिकाणी, अत्यंत प्रतिकूल हवामानात विमानोड्डाणाची परीक्षा द्यावी लागली. शारीरिक आणि मानसिक क्षमतेचा कस लावणाऱ्या या चाचण्या आरोहीने यशस्वीरीत्या पूर्ण केल्या. 

तिने ज्या विमानातून ही मोहीम पूर्ण केली, त्याचे नाव ‘माही’ असे आहे. एक इंजिन असणाऱ्या या विमानाचे वजन बुलेट मोटारसायकलपेक्षाही कमी आहे. आतापर्यंत तिने आपल्या छोट्या, हलक्या वजनाच्या विमानातून २० देश आणि २९ हजार ५०० किलोमीटरचे अंतर पार केले आहे. 

जगभरातील विविध देशांमधील काही महिला वैमानिकांनी एकत्र येऊन छोट्या विमानामधून पृथ्वी प्रदक्षिणा करण्याची मोहीम हाती घेतली आहे. आरोही या मोहिमेतील एक सदस्य आहे. ‘वुई’ (WE) असे या मोहिमेचे नाव आहे. 

(ही बातमी इंग्रजीमधून वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search