Next
‘सत्यजित रे यांच्यासारख्या पितामहांच्या छायेत श्रीलंकन चित्रपटसृष्टी बहरली’
श्रीलंकन चित्रपट महोत्सवाला सुरुवात
BOI
Saturday, August 11, 2018 | 05:02 PM
15 0 0
Share this article:

धर्मसिरी बंदरनायके
पुणे : ‘चित्रपट निर्मितीमध्ये कार्यरत असलेली आमची श्रीलंकेतील ही चौथी पिढी आहे;मात्र बहुसंख्य कलाकारांनी चित्रपटसृष्टीसंबंधीचे शास्त्रोक्त वा तांत्रिक शिक्षण घेतलेले नाही. आमच्या अनेक कलाकृतींवर सत्यजित रे, अकिरा कुरोसावा आणि डॉ. लेस्टर जेम्स पेइरीस या आशियायी चित्रपटसृष्टीच्या पितामहांचा प्रभाव आहे’, असे मत श्रीलंकेचे प्रसिद्ध दिग्दर्शक, अभिनेते, निर्माते, नाटककार धर्मसिरी बंदरनायके यांनी व्यक्त केले.

पुणे इंटरनॅशनल सेंटर अर्थात ‘पीआयसी’च्या वतीने आजपासून येत्या सोमवार, दि. १३ ऑगस्टपर्यंत राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (एनएफएआय) येथे श्रीलंकन चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी बंदरनायके बोलत होते.

पुणे इंटरनॅशनल सेंटरच्या कार्यक्रम समितीचे अध्यक्ष प्रा. अमिताव मलिक, एनएफआयच्या नॅशनल फिल्म हेरीटेज मिशनचे संतोष अजमेरा, महोत्सवाच्या संयोजिका लतिका पाडगावकर, पीआयसीचे मानद संचालक प्रशांत गिरबने आदी या वेळी उपस्थित होते. 

पीआयसीच्या वतीने आयोजित होत असलेला हा सलग अकरावा चित्रपट महोत्सव आहे. महोत्सव सर्वांसाठी विनामूल्य आणि खुला आहे. श्रीलंकेतील अंतर्गत युद्धाचे परिणाम विषद करणाऱ्या ‘विथ यू, विदाऊट यू’ या चित्रपटाने महोत्सवाला सुरूवात झाली.

श्रीलंकन चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी धर्मसिरी बंदरनायके, पुणे इंटरनॅशनल सेंटरच्या कार्यक्रम समितीचे अध्यक्ष प्रा. अमिताव मलिक, एनएफआयच्या नॅशनल फिल्म हेरीटेज मिशनचे संतोष अजमेरा, महोत्सवाच्या संयोजिका लतिका पाडगावकर.
या वेळी बोलताना बंदरनायके यांनी त्यांचे पुण्याबरोबचे ऋणानुबंध उलगडले. ते म्हणाले, ‘एनएफएआयचे संस्थापक संचालक पी. के. नायर यांची मला १९८६ मध्ये  चित्रपट रसग्रहण शिबिरात सहभागी होण्यासाठी खूप मदत झाली. त्यानंतर श्रीलंकेत १९८९ मध्ये विचित्र राजकीय स्थिती असताना मी पुन्हा पुण्यात आलो आणि जवळपास महिनाभर मला पुन्हा एकदा भारतीय चित्रपट पाहण्याची संधी मिळाली.’

आपल्या शेजारील देशांमधील चित्रपटांना भारतात स्थान मिळावे, तेथील चित्रपट आपल्या देशात दाखविले जावेत, त्यांची संस्कृती आपल्याला कळावी, त्याचे आदानप्रदान व्हावे या उद्देशाने दरवर्षी पीआयसीच्या वतीने महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय यासाठी विशेष सहाय्य करीत असते. याआधी या महोत्सवा दरम्यान बांग्लादेश, अफगाणिस्तान, कझाकीस्तान, इराण, नेपाळ आदी देशांतील चित्रपट दाखविण्यात आले होते. 

यावर्षी भारताशी सांस्कृतिक साधर्म्य असलेल्या श्रीलंकेतील चित्रपट पुणेकर रसिकांना पाहायची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. ‘हंसा विलक’, ‘लेट हर क्राय’, ‘विथ यु, विदाऊ ट यु’, ‘दि फोरसेकन लॅण्ड’,‘वैष्णवी’, ‘फ्लॉवर्स ऑफ द स्काय’, ‘अलोन इन दि व्हॅली’, ‘संकरा’, ‘दि हंट’ आदी श्रीलंकन चित्रपट महोत्सवात दाखविण्यात येणार आहेत आहेत. श्रीलंकेतील आंतरिक युद्धाचा फटका त्यांच्या चित्रपटसृष्टीला बसला आहे. त्यांच्या कलाकृतींमधून दिसणारी त्याची झलक आणि इतरही विषयांवरील त्यांचा दृष्टीकोन या महोत्सवात पाहायला मिळणार आहे. या महोत्सवासाठी श्रीलंकेच्या एशियन फिल्म सेंटरचे संचालक, लेखक, संपादक, चित्रपट समीक्षक अॅश्ली रत्नविभुषणा यांचे विशेष सहकार्य मिळाले आहे. 
         
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search