Next
‘बालनाट्य चळवळ पुन्हा रुजण्याची गरज’
BOI
Thursday, December 20, 2018 | 09:18 PM
15 0 0
Share this storyरत्नागिरी :
‘सुधा करमरकर, विद्या पटवर्धन यांनी बालनाट्य चळवळ रुजवली; पण कालांतराने मूल हा मुख्य घटक दुर्लक्षित राहू लागला. मुलांना खेळण्यासाठी बागा नाहीत. मेंदूला चालना देणारे काही नसल्याने मुले कार्टून पाहतात; पण त्यातून ‘क्रिएटिव्हिटी’ला वाव मिळत नाही. नाटकातून तो मिळतो. म्हणूनच बालनाट्य चळवळ पुन्हा रुजण्याची गरज आहे, ’ असे प्रतिपादन अभिनेते वैभव मांगले यांनी केले. 

‘अलबत्या गलबत्या’ या बालनाट्याच्या प्रयोगासाठी वैभव मांगले १९ डिसेंबर २०१८ रोजी रत्नागिरीत आले होते. त्या वेळी अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या रत्नागिरी शाखेने त्यांच्याशी गप्पांचा कार्यक्रम आयोजित केला होता. तेव्हा ते बोलत होते. ‘अलबत्या गलबत्या’ या नाटकाचे १२ मेपासून आतापर्यंत २१० प्रयोग झाल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी नाट्य परिषदेचे कार्याध्यक्ष समीर इंदुलकर, नगराध्यक्ष राहुल पंडित, विजय साळवी, श्याम मगदूम, अप्पा रणभिसे, प्रफुल्ल घाग, विलास जाधव, आसावरी शेट्ये, पूजा बावडेकर आदी उपस्थित होते.

‘आताच्या नाटकांचा प्रेक्षकवर्ग ४५ ते ६० वयोगटातील आहे. भविष्यातही प्रेक्षक मिळण्यासाठी आज बालनाट्य चळवळ आवश्यक आहे. मुलांना संधीची आवश्यकता असते. फक्त शिबिराला काही अर्थ नाही. स्तोत्र, नक्कल आदी गोष्टींमधून मुले विकसित होतात. कलेतून पैसे मिळणार आहेत का, असे पालक विचारतात; पण कला ही आयुष्याला नवा रंग देणारी असते. कलेचे पॅशन असेल तर यश नक्की मिळते. आरोग्याकडे लक्ष देणे, वाचन, चिंतन, मनन या गोष्टींमधून सशक्त नट तयार होतो,’ असे प्रतिपादन मांगले यांनी केले. 

‘कोकणातच नाटक लिहून त्याचे २५ प्रयोग करायला हवेत. त्यातून नाट्यनिर्मितीची प्रक्रिया इथल्या युवा कलाकारांनाही कळू शकेल. यासाठी नाट्य परिषदेने पुढाकार घ्यावा,’ अशी सूचना त्यांनी केली. 

‘हौशी व व्यावसायिक रंगभूमीवर काम करताना सारखाच आनंद मिळतो. गाणे आणि अभिनय हे एकमेकांना पूरक आहे, हे किशोरी आमोणकर यांच्याकडून कळले,’ असे मांगले म्हणाले. त्यांच्या काही आठवणीही मांगले यांनी जागवल्या. 

(‘बाइट्स ऑफ इंडिया’च्या मराठी भाषा उत्सवासाठी वैभव मांगले यांनी केलेल्या कवितेच्या अभिवाचनाचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link