Next
‘भारतीय उद्योजकांनी अफगाणिस्तानातील व्यवसायसंधींचा लाभ घ्यावा’
आमदार नीलम गोऱ्हे यांचे प्रतिपादन
BOI
Monday, May 13, 2019 | 05:03 PM
15 0 0
Share this article:


पुणे : ‘जगभरातील व्यापाराच्या संधींचा वेध घेत आपला व्यवसाय जागतिक स्तरावर नेला पाहिजे. गेल्या पाच वर्षांत राज्य आणि केंद्र सरकारने जागतिक स्तरावर उद्योगांना प्रोत्साहन दिले आहे. सर्व प्रकारच्या उद्योगांना जागतिक व्यासपीठ देण्यासाठी डॉ. जितेंद्र जोशी यांनी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे’, असे मत शिवसेनेच्या उपनेत्या आमदार नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले. 

‘ग्लोबल इंडिया बिझनेस फोरम’तर्फे (जीआयबीएफ) आयोजित पश्चिम विभागीय पुरस्कार सोहळ्यावेळी गोऱ्हे बोलत होत्या. याप्रसंगी अफगाणिस्तानचे कॉन्सुल जनरल अब्दुल नफी सरवारी, इथिओपियाचे कॉन्सुल जनरल तेस्फामरियम मेस्केल, जीआयबीएफचे ग्लोबल प्रेसिडेंट डॉ. जितेंद्र जोशी तसेच समन्वयक दीपाली गडकरी, अभिषेक जोशी आदी उपस्थित होते. 

विविध क्षेत्रातील यशस्वी २५ उद्योजकांना या वेळी ‘जीआयबीएफ’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच विविध करारही या वेळी करण्यात आले. पुरस्कार सोहळ्याआधी ‘पश्चिमेपलिकडील व्यापार आणि अफगाणिस्तान व इथियोपिया व इंडोनेशिया येथे व्यापाराच्या संधी’ या विषयावर चर्चासत्र झाले. अफगाणिस्तानचे कॉन्सुल जनरल नदीम शरिफी, इथियोपियाचे कॉन्सुल जनरल तेस्फामरियम मेस्केल, अनंत सरदेशमुख, हरी श्रीवास्तव, सागर आरमोटे, निखिल ओसवाल यांनी या चर्चेत सहभाग घेतला. या वेळी भारतीय व्यावसायिक बाहेरच्या देशांत जाऊन उद्योगात कशा प्रकारे भागीदारी करू शकतात, यावरही चर्चा करण्यात आली. तेथील नियम, अटी, कायदा, प्रसिद्ध वस्तू, प्रचलित व्यवसाय व भारतीयांसाठीच्या संधी अशा गोष्टींवर इथियोपियाच्या कॉन्सुल जनरल मेस्केल यांनी मार्गदर्शन केले. तसेच कॉफीच्या क्षेत्रात उद्योग करणाऱ्यांसाठी खूप मोठी संधी उपलब्ध असल्याचेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.

नीलमताई पुढे म्हणाल्या, ‘सगळे जग भारताकडे व्यापारी संधींचे दालन म्हणून पाहत आहे. विविध देशातील उद्योजक भारतात येत आहेत, तर भारतीयांनाही  परदेशात व्यवसाय विस्तारासाठी निमंत्रित केले जात आहे. ग्लोबल इंडिया बिझनेस फोरमने विविध देशांत व्यापारासाठी संधी उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्याचा भारतीय उद्योजकांनी लाभ घ्यावा.’ 

‘अफगाणिस्तानात पेट्रोलियम, औषधी यांच्यासह फळे आणि सुका मेवा यांच्या निर्यातीत मोठ्या संधी आहेत. कार्पेट, मार्बल्स, सिल्क, सॅफ्रॉन या गोष्टीं अफगाणिस्तानात प्रसिद्ध असून, त्यात व्यवसायासाठीही भारतीयांना संधी आहेत. आमच्या देशात उद्योगाची सुरुवात करण्याची प्रक्रिया आणि करप्रणाली अतिशय सोपी आहे. यासाठी लागणारा परवानाही केवळ तीन दिवसांत मिळू शकतो. भारतीयांकडे ज्ञान आणि व्यावसायिक तंत्र मोठ्या पप्रमाणात आहे. त्यामुळे भारतीय उद्योजकांचे अफगाणिस्तानात स्वागत करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. भारतीय उद्योजकांनी अफगाणिस्तानात येऊन आपले उद्योग उभारावेत’, असे आवाहन अफगाणिस्तानचे कॉन्सुल जनरल नदीम शरफी यांनी केले.

‘कोणत्याही देशाच्या प्रगतीत तेथील औद्योगिक क्षेत्राचा मोठा वाटा असतो. लघू व मध्यम उद्योगांना जागतिक स्तरावर व्यवसाय विस्तारासाठी ग्लोबल इंडिया बिझनेस फोरम काम करत आहे. या फोरममध्ये अनेक देशांचे कॉन्सुलेट, मंत्री सहभागी होत असून, उद्योग देवाण-घेवाण करण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत’, असे मत जिंतेंद्र जोशी यांनी या वेळी व्यक्त केले. मुग्धाला करंदीकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर दीपाली गडकरी यांनी आभार मानले. 

(सोबत व्हिडिओ देत आहोत)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search