Next
लीला पूनावाला फाउंडेशनतर्फे २१३ मुलींना शिष्यवृत्ती
आतापर्यंत आठ हजारांहून अधिक मुलींना लाभ
BOI
Monday, July 08, 2019 | 04:59 PM
15 0 0
Share this article:

शिष्यवृत्ती प्रदान करताना एरविन स्टीनहॉझर, लीला पूनावाला, फिरोज पूनावाला, स्नेहल कुलकर्णी आदी

पुणे : लीला पूनावाला फाउंडेशनतर्फे (एलपीएफ) यंदा २१३ मुलींना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. रविवारी, अल्पबचत भवन येथे हा शिष्यवृत्ती प्रदान सोहळा पार पडला. या वेळी लीला पूनावाला फाउंडेशनचे कॉर्पोरेट फंडिंग पार्टनर आणि सँडविक एशियाचे व्यवस्थापकीय संचालक एरविन स्टीनहॉझर, लीला पूनावाला, फिरोज पूनावाला, लीला फेलो स्नेहल कुलकर्णी यांच्यासह शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थीनी आणि त्यांचे पालक उपस्थित होते. या उपक्रमाचे यंदाचे हे नववे वर्ष आहे.  

लीला पूनावाला फाउंडेशनतर्फे दर वर्षी सातवीपासून पदव्युत्तर शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या होतकरू मुलींना शिष्यवृत्ती प्रदान केली जाते. २०११ पासून हा उपक्रम राबवण्यात येत आहे. दहा वर्षे ही शिष्यवृत्ती मिळण्याची तरतूद केली जाते. मुलींना शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहता यावे, या उद्देशाने लीला पूनावाला यांनी हा उपक्रम सुरू केला. आतापर्यंत पुणे शहर व ग्रामीण भागातील १९ शाळांमधील आठ हजार ५०० पेक्षा अधिक मुलींनी याचा लाभ घेतला आहे.  

या शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत, शालेय मुलींना दप्तरे, रेनकोट, बूट, मोजे, गणवेश, पुस्तके, सायकल इत्यादी उपयोगी वस्तूंसह आर्थिक मदत दिली जाते. तसेच या मुलींना आरोग्य शिक्षण, व्यक्तिमत्व विकासासाठीही मार्गदर्शन केले जाते. विविध उपक्रम,  प्रशिक्षण कार्यक्रमदेखील राबवले जातात.  


यंदा ही शिष्यवृत्ती मिळालेली सीईएस उत्कर्ष स्कूलमधील मैथिली बोडके म्हणाली, ‘‘एलपीएफ’मुळे आता मी पुढील शिक्षण घेऊ शकेन. पुढील १० वर्षांसाठी अशा कुटुंबाचा हिस्सा बनणे ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे.’ 

या वेळी लीला पूनावाला फाउंडेशनचे कॉर्पोरेट फंडिंग पार्टनर आणि सँडविक एशियाचे व्यवस्थापकीय संचालक एरविन स्टीनहॉझर म्हणाले, ‘भारतामध्ये शिक्षणास महत्त्व दिले जाते आणि भारतीय पालक त्यांच्या मुलींना शिक्षणासाठी पाठिंबा देत आहेत हे पाहून मला खूप आनंद झाला. लीला पुनावाला फाउंडेशनशी संबंधित असल्याचा आम्हाला अभिमान आहे’.

लीला फेलो आणि यशस्वी उद्योजक स्नेहल कुलकर्णी म्हणाल्या, ‘लीला पूनावाला फाउंडेशनच्या पोस्ट ग्रॅज्युएट शिष्यवृत्तीद्वारे माझ्या जीवन प्रवासाला सुरुवात केली आणि आज येथे अतिथी म्हणून उपस्थित राहणे ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. ‘एलपीएफ’ माझ्यासाठी पवित्र मंदिरासारखे आहे’.


‘एलपीएफ’च्या अध्यक्षा पद्मश्री लीला पूनावाला म्हणाल्या, ‘पालकांना माझी विनंती आहे, हुंड्यासाठी पैसे वाचविण्यापेक्षा ते मुलींच्या शिक्षणावर खर्च करा. म्हणजे त्या आपल्या कमाईच्या रुपात दर महिन्यास हुंडा घरात आणतील’. 
  
या वेळी ‘एलपीएफ’च्या ‘इन्सपीरा’ या न्यूजलेटरचा ५४ वा अंक प्रकाशित करण्यात आला.  
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search