Next
दृक्-श्राव्य माध्यमाचा वाचनाला फायदाच
ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ व लेखक डॉ. आनंद नाडकर्णी यांचे प्रतिपादन
विवेक सबनीस
Thursday, February 14, 2019 | 12:11 PM
15 0 0
Share this article:

डॉ. आनंद नाडकर्णी यांची मुलाखत घेताना वसंत वसंत लिमये (फोटो सौजन्य : प्राजक्ता ठकार यांची फेसबुक वॉल)पुणे : ‘ज्याप्रमाणे ‘मुन्नाभाई’ सिनेमा बघून गांधी साहित्याची मागणी वाढली; ‘स्वामी’ ही पेशव्यांवरील मालिका पाहून लोकांना ‘स्वामी’ कादंबरी वाचावीशी वाटली; शिवाजी महाराजांवरील सिनेमा पाहून शिवचरित्र वाचावेसे वाटते, या दोन्ही गोष्टींचा एकमेकांशी संबंध आहे. दृक्-श्राव्य माध्यमाने वाचन संस्कृती संपुष्टात आल्याची काळजी आपण करतो ते खरे नाही. दृक्-श्राव्य माध्यमाचा वाचनाला फायदाच होतो,’ असे प्रतिपादन ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ आणि लेखक डॉ. आनंद नाडकर्णी यांनी १३ फेब्रुवारी रोजी पुण्यात केले.

‘माझे वाचन-माझे वाचक’ या विषयावर प्रसिद्ध लेखक वसंत वसंत लिमये यांनी त्यांची प्रकट मुलाखत घेतली. त्या वेळी त्यांनी आपल्या वाचनासह विविध विषयांवर भाष्य केले. नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या ‘ग्रंथ तुमच्या दारी’ या उपक्रमाच्या दशकपूर्तीनिमित्त हा मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 

‘आपल्या राहत्या सोसायटीमध्येही एखाद्या विषयावरची फिल्म आधी दाखवली आणि मग त्यावरील काही साहित्य वाचून दाखवले, तर अशा विषयांवरील वाचन वाढू शकते. हा प्रयोग आज अधिक गांभीर्याने करायला हवा,’ असे डॉ. नाडकर्णी पुढे म्हणाले.

‘जाणत्या वयात वाचन तेवत ठेवण्याच्या उद्देशाने मित्रांचे गट आणि विविध विषय मला मिळत गेले. मानसिक आरोग्य हा मूळ संदर्भबिंदू धरून मी इतिहास, अर्थशास्त्र, तत्त्वज्ञान, व्यवस्थापन, भगवद्गीता, वेद-उपनिषदे, महाराष्ट्राचा भागवतधर्म इत्यादी विषयांशी वाचक म्हणून व नंतर लेखक म्हणून जोडला गेलो,’ असे डॉ. नाडकर्णी यांनी सांगितले.

तंत्रज्ञान व इंटरनेटच्या वापराने आज माणूस एकाकी पडत चालला आहे, हा मुद्दा वसंत वसंत लिमये यांनी या मुलाखतीच्या निमित्ताने उपस्थित केला. ते म्हणाले, ‘कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या ग्रंथपेटी या उपक्रमाने माणसाला जवळ आणले आहे. सार्वजनिक ठिकाणी एकत्र येऊन कामाचा आनंद घेणे आज झपाट्याने हरवत चालले आहे. अर्थात अशा प्रक्रियेत लेखन, वाचन यात लेखक हा निमित्तमात्र असतो.’

त्यावर डॉ. नाडकर्णी म्हणाले, ‘यात लेखक हा प्रभावी माध्यमाचे काम करतो. याचे कारण वाचकाने हाती घेतलेले पुस्तक वाचून पूर्ण करण्यात लेखकाने त्यासाठी जमा केलेली माहिती व प्रभावी लेखन हे महत्वात चे असतेच. ग्रंथपेटी या उपक्रमाचे मोल त्याअर्थाने मोठे आहेच.’ 

वाचनाचा मुद्दा पुढे नेताना डॉ. नाडकर्णी म्हणाले, ‘अनेक विषयांवर वाचन केले असले, तरी मी यातील कोणत्याही विषयातील तज्ज्ञ नाही; पण या विषयांशी जोडण्यासाठी एका ध्येयाने वाचत राहिल्याने त्याला एक अर्थ प्राप्त झाला. त्याचा लिखाणात उपयोग करता आला. त्यातून कथा, कादंबरी, नाटक ते कविता या साऱ्या अभिव्यक्तींमध्ये हा अनुभव पसरत चालला. व्यवहारात आणि रुग्णांशी बोलतानाही त्याचा खूप उपयोग होतो आहे.’ 

डॉ. नाडकर्णी पुढे म्हणाले, ‘रसातळाला गेलेल्या एका व्यावसायिकाचा दृष्टिकोन माझ्या ‘स्वभाव-विभाव’ या पुस्तकातील एक लेख वाचून बदलला आणि त्याचा व्यवसाय पुन्हा ऊर्जितावस्थेत आला. माझ्या लिखाणाचा लाभ आजच्या तरुण मानसोपचारतज्ज्ञांनाही होतो. मी लिहिलेली काही पुस्तके ते त्यांच्या रुग्णांना आवर्जून वाचायला देतात. त्यामुळे अशा रुग्णांना नीट समजावून सांगणे त्यांना अधिक सोपे जाते. लिखित शब्दाला आजही किंमत आहे, हे यातून स्पष्ट होते. माझ्या ‘मुक्तिपत्रे’ या कादंबरीचा उपयोग व्यसनाधीन रुग्णांच्या उपचारांसाठी केला जातो. यासारखी समाधानाची आणि उपयुक्त गोष्ट कोणती!’   

‘पुस्तकांच्या वाचनाबरोबरच इतरांच्या अनुभवांच्या वाचनाचा खजिना माझ्या व्यवसायात मिळतो,’ असे सांगून डॉ. नाडकर्णी म्हणाले, ‘अनेक मनोरुग्णांचे अनुभव नेहमीच कानावर पडतात. काम करताना समाजातील सर्व वयोगटांशी जोडला गेलो. दारूमुळे व्यसनाधीन असणाऱ्यांपासून असून कमांडो, कॉर्पोरेट्स ते अगदी आदिवासी समाजातील विविध प्रकारच्या माणसांशीही मी जोडला गेलो आहे. अशा अनुभवांमधून निर्माण झालेल्या अभिव्यक्तीमुळे ‘मुक्तिपत्रे’ या माझ्या कादंबरीवर आधारित ‘गेट वेल सून’ हे नाटकही सध्या रंगभूमीवर आले आहे.’  

‘कार्यशाळांमध्ये व सादरीकरणामध्ये मी विविध व्हिडिओ, छायाचित्रे दाखवतो. रेखाचित्रे काढतो. त्यातून पाहणाऱ्याला वाचनाची प्रेरणा मिळू शकते. स्केचेस काढणे हा माझा छंद आहे. ‘रेषामैत्री’ या पुस्तकातून बालवाचकांना जोडण्याचा प्रयत्न आहे. याचे कारण आपल्या लिखाणालाही रेषा जोडावी लागते,’ असे डॉ. नाडकर्णी यांनी सांगितले. 

वाचनवेडाची कहाणी
आपल्या वाचनवेडामागची कहाणी सांगताना डॉ. नाडकर्णी म्हणाले, ‘जळगावात वडील प्राध्यापक व पुढे प्राचार्य असताना मंगल व विकास या माझ्या दोन्ही भावंडांसाठी पुस्तके आणत. ती वाचायची सवय लागली. शाळेत असतानाच अनेक अभिजात मराठी पुस्तके वाचून फस्त केली! पुढे बहिणीच्या एमजे कॉलेजातील ग्रंथालयात जे मिळेल ते वाचत राहिलो. आपण काय वाचतो आहोत, हे तेव्हा कळत नव्हते. वडिलांकडून आणली जाणारी पुस्तके व त्यातून निर्माण झालेले ग्रंथालय समृद्ध होत गेले. पुढे मुंबईत महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षण घेताना इंग्रजी वाचनाची जोड दिली ती फ्लोरा फाउंटन येथील फुटपाथवर स्वस्तात मिळणाऱ्या पेरी मॅसन या लेखकाच्या कादंबऱ्यांनी. यातूनच पुढे महाराष्ट्र टाइम्ससाठी विद्यार्थी पत्रकार म्हणून काम करत राहिलो आणि लेखनही सुरू केले. आपले लेखन वृत्तपत्रातून छापून येते, हे पाहून आत्मविश्वा स वाढत गेला. किशोर, साधना व फिल्मी साप्ताहिकांमधूनही मी लिहीत राहिलो. महाविद्यालयीन जीवनात विजय बेंद्रे यांच्यामुळे नाटकाविषयीची जाण वाढत गेली आणि ठाण्यातील डॉक्टर मित्रांच्या जोडीने मराठी कवितांच्या सादरीकरणाचे कार्यक्रम गेली २७ वर्षे करत आहे. विंदा करंदीकर, बापट, पाडगावकर, आरती प्रभू आणि मर्ढेकर यांच्या कविता वाचनात आल्या आणि त्यांना आम्ही चाली लावत गेलो.’ 

‘ग्रंथ तुमच्या दारी’ उपक्रमाचे सर्वेसर्वा विनायक रानडे यांनी नाशिकमध्ये या उपक्रमाची दशकपूर्ती संगीतमय कार्यक्रमाद्वारे सादर केली. ‘ग्रंथपेटी ही संवादिनी असून, त्यातून मी असंख्य वाचनप्रेमी कुटुंबांशी जोडले गेलो. हे काम माझ्या एकट्याचे नसून, त्यामागे ११ हजार कार्यकर्त्यांचा गोतावळा आहे. या निमित्ताने देशात, परदेशात आणि महाराष्ट्रातील सहा कारागृहांपर्यंत ग्रंथपेट्या पोहोचवता आल्या. हे काम यापुढेही तितक्याच जोमाने चालू ठेवले जाणार आहे,’ असे रानडे म्हणाले. 

या कार्यक्रमात पुण्यातील वाचनप्रेमींच्या वतीने विनय जोगळेकर, मुकुंद गायधनी, प्रा. सुषमा कातडे, या उपक्रमाचे समन्वयक श्याम पाठक, कराड अर्बन बँकेचे संचालक मंगेश टोके यांनीही मनोगते सादर केली. शैलजा किंकर यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. रानडे यांना पुणेकर वाचनप्रेमींच्या वतीने मानपत्र देण्यात आले. ज्येष्ठ लेखिका आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माजी कार्याध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांच्याकडे पुण्यातील ग्रंथपेटी रानडे यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आली. 

हा कार्यक्रम ‘व्हॅलेंटाइन डे’च्या पूर्वसंध्येला झाला. त्या निमित्ताने डॉ. नाडकर्णी यांनी स्वत: लिहिलेले गीत गाऊन सादर केले.

सोबतीने चालताना क्षण वेचत जायचं 
ओंजळीतलं चांदणं एकमेकांना द्यायचं 

(‘ग्रंथ तुमच्या दारी’ उपक्रमाचे सर्वेसर्वा विनायक रानडे यांची प्रेरक गोष्ट वाचण्यासाठी येथे क्लिक करा. डॉ. आनंद नाडकर्णी यांची पुस्तके ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून थेट घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा. वसंत वसंत लिमये यांच्याबद्दल जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा. त्यांच्या पुस्तकांसाठी येथे क्लिक करा.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search