Next
जुळून येती ‘रेशीमगाठी’...
BOI
Thursday, April 26 | 04:30 PM
15 0 0
Share this storyसोलापूर जिल्ह्यातील काळेगाव (ता. बार्शी) या गावात ज्वारी आणि ऊस ही पारंपरिक पिके घेतली जातात. यंदा मात्र या गावातील शेतकऱ्यांनी नवी परंपरा सुरू केली आहे ती म्हणजे रेशीम उद्योगाची. सोलापूर कृषी विज्ञान केंद्र आणि जिल्हा रेशीम कार्यालय यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या उपक्रमात २५ शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आहे. यात अनेक शेतकरी दाम्पत्यांचा समावेश आहे. त्यामुळे ‘रेशीमगाठी’ शब्दशः जुळून आल्या आहेत. त्या संदर्भातील माहिती...
..........
काळेगाव हे सुमारे अडीच हजार लोकसंख्येचे गाव. काळ्या व कसदार जमिनीचे वरदान या गावाला लाभले आहे. म्हणूनच की काय, या गावाला काळेगाव असे नाव पडले असावे. येथील शेतकरी आजवर ज्वारी आणि ऊस हीच पारंपरिक पिके घेत होते. त्यांनी यंदा प्रथमच रेशमाच्या उत्पादनाचा अपारंपरिक उद्योग सुरू केला आहे. यासाठी सोलापूर कृषी विज्ञान केंद्राने त्यांना चांगली साथ दिली आहे. या केंद्राने केवळ साथच दिली नाही, तर या शेतकऱ्यांच्या रेशीमगाठी बांधण्यासाठी हे गाव तीन वर्षांसाठी दत्तक घेतले आहे. त्यामुळे या गावाच्या कायापालटाला सुरुवात झाली आहे. या उद्योगामुळे गावात आता शेतीला आधुनिकतेबरोबरच शाश्वत उद्योगाची जोड मिळाली आहे. सध्या सुमारे २५ शेतकरी रेशीम उद्योगाकडे वळाले आहेत. पती-पत्नी दोघेही या कामात व्यग्र झाल्यामुळे रेशीम उद्योग चांगल्या प्रकारे चालला आहे.  सोलापूर कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. लालासाहेब तांबडे, जिल्हा रेशीम विकास अधिकारी एस. डी. जाधव, विनीत पवार, कीटकशास्त्रज्ञ डॉ. समाधान जवळगे, ‘कृषी विस्तार’चे श्री. गोंजारी, अमोल शास्त्री, अनिता शेळके, विकास भिसे, जिल्हा रेशीम कार्यालयाचे क्षेत्र सहायक महादेव गवंड, रोजगार सेवक शहाजी घायतिडक आदींनी येथील शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी प्रयत्न केले आहेत. शासनाच्या योजना समजून घेऊन त्यांचा योग्य लाभ घेतल्यास शेती कशी फायदेशीर होऊ शकते हे या गावाने दाखवून दिले आहे. 

कोषकृषी विज्ञान केंद्र व जिल्हा रेशीम कार्यालयाने येथील शेतकऱ्यांना वाई, पाचगणी व भाळवणी येथील रेशीम उद्योगांच्या प्रत्यक्ष भेटीतून माहिती दिली आहे. गावातील २५ शेतकऱ्यांनी स्वतंत्र गट निर्माण करून रेशीम उद्योगासाठी कंबर कसली आहे. केवळ नववीपर्यंत शिक्षण घेतलेले अल्पभूधारक शेतकरी शंकर व सुवर्णा घायतिडक या दाम्पत्याने गावातील पहिला रेशीम उद्योग यशस्वी केला आहे. त्यांनी ‘मनरेगा’ योजनेअंतर्गत ५० बाय ६० फूट आकाराची शेड बनवून त्यात साठ हजार रेशीम कोष जोपासले आहेत. त्यासाठी एक एकर क्षेत्रावर व्ही वन या जातीच्या तुतीची लागवड केली आहे. खर्चात बचत करणारी फांदी पद्धत त्यांनी अवलंबली आहे. अंडीपुंज मिळाल्यापासून फक्त एकाच महिन्यात कोषांची पहिली बॅच त्यांच्या हाती आली आहे. वर्षातून एकूण चार बॅच मिळाल्यास त्यांना सुमारे अडीच लाखांचे उत्पन्न मिळेल. 

पार्वती आणि शिवाजी गिलबिलेरेशीमगाठी...
कृषी विज्ञान केंद्र व जिल्हा रेशीम कार्यालयाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या ‘रेशीमगाठी’ बांधल्या गेल्यामुळे त्यांच्या प्रपंचातही गोडवा आला आहे. त्या शेतकरी दाम्पत्यांची नावे अशी -
शोभा आणि पांडुरंग घायतिडक, राणी आणि संजय घायतिडक, विद्या आणि दीपक घायतिडक, रतन आणि अण्णासो घायतिडक, सुवर्णा आणि शंकर घायतिडक, अर्चना आणि संजय घायतिडक, जगदेवी आणि संतोष घायतिडक, सरस्वती आणि प्रकाश काळे, शकुंतला आणि दादा देशमुख, प्रतिभा आणि बाळासाहेब घायतिडक, विजयमाला आणि दशरथ घायतिडक, पार्वती आणि शिवाजी गिलबिले, आशा आणि सुभाष मस्तूद, रंजना आणि विष्णू देशमुख, वेणूबाई आणि श्रीधर काळे, सुरेखा आणि भारत घायतिडक, पार्वती आणि सुनील घायतिडक, मंगल आणि शिवाजी घायतिडक, हिराबाई आणि लहू काळे, जयश्री आणि उद्धव घायतिडक, शीतल आणि नरसिंह घायतिडक, श्यामल आणि अशोक घायतिडक, मंगल आणि प्रभू घायतिडक. 

(या रेशीम शेतीसंदर्भातील व्हिडिओत सोबत देत आहोत.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Suryawanshi Balasaheb About 1 Days ago
खुपच छान,,,विज्ञान केंद्रातील सहकार्याने जिल्ह्यात असे 25 गावात हा उपक्रम हाती घेऊन शेतकरी बांधवांना रेशीम संगोपन साहित्य, तांत्रिक मिळण्याची अपेक्षा,,,
0
0
प्रविण साठे , सोलापूर About 6 Days ago
बातमी छान आहे . असे प्रयोग सगळीकडे व्हायला हवेत .
0
0

Select Language
Share Link