Next
पुणेकरांनी अनुभवले कीटकांचे शब्दांपलीकडचे सौंदर्य
प्रेस रिलीज
Tuesday, April 24 | 11:57 AM
15 0 0
Share this story

पुणे : कीटकांमधील मानवी वृत्ती, त्यांच्यातील भावभावनांचा अनुभव पुणेकरांनी घेतला. देव-देवतांच्या प्रतिमेप्रमाणे तसेच पशु-पक्षांप्रमाणे दिसणाऱ्या विविध कीटकांची छायाचित्रे आणि चलचित्रावर आधारित एका विशेष कार्यक्रमात पुणेकरांना कीटकांच्या विश्वाचे एक वेगळेच अंतरंग दर्शन झाले. प्रा. आलोक शेवडे यांच्या ‘कीटक विश्व अंतरंग दर्शन’ या कार्यक्रमात पुणेकरांनी जैवविविधता अनुभवली.

जागतिक वसुंधरा दिनानिमित्त वनराई आणि पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने इंद्रधनुष्य पर्यावरण केंद्र येथे एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी वनराईचे अध्यक्ष रवींद्र धारिया, कृषी अधिक्षक विनयकुमार आवटे, कृषीतज्ञ डॉ. खाशेराव गलांडे, पुणे महापालिकेचे मंगेश दिघे, हरित मित्र संस्थेचे महेंद्र घागरे उपस्थित होते.

या वेळी बोलताना प्रा. शेवडे म्हणाले, ‘मानवाने प्रतिकूल परिस्थितीत जगण्याचे कीटकांकडून शिकावे. कीटकांचे सौंदर्य हे शब्दांपलीकडचे आहे. त्यांची घरे-घरटी, त्यांच्यातील भाव-भावना या मानवाप्रमाणेच वाटतात. किटकांची मानवीवृत्ती, त्यांच्या प्रसववेदना, त्यांचे मातृत्त्व हे क्षण कॅमेऱ्यात टिपताना भावूक होत असे. माणसांनी कीटकांप्रती आपल्या संवेदना जाग्या कराव्यात. कीटकांमधील संभाषण कौशल्य, एकमेकांच्या मदतीला धावून येणे, त्यांचे अपंगत्व, त्यावर मात करत मोठ्या ऐटीत व तोऱ्यात जगणे, त्यांची हतबलता, त्यांचा बावळटपणा टिपताना खूप गंमत वाटायची. कीटक जगले, तरच पशु-पक्षी जगतील, चांगले फळे-फुले पुढच्या पिढीला मिळेल. अन्यथा अन्नसाखळीतील एक घटक कमी होऊन त्याचे विपरित परिणाम मानवाला भोगायला लागतील.’

वनराईचे अध्यक्ष धारिया म्हणाले, ‘जैवविविधतेचा महत्त्वाचा घटक असलेल्या कीटक विश्वाचे प्रत्यक्ष ज्ञान छायाचित्रे आणि चलचित्रांच्या माध्यमातून पुणेकरांना व्हावे, पर्यावरण आणि जैवविविधता यांविषयी पुणेकरांमध्ये जागृती व्हावी या उद्देशाने या ‘कीटक विश्व अंतरंग दर्शन’ या एका खास स्लाईड शोच्या सादरीकरणाचे आयोजन करण्यात आले.’

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत जगताप यांनी केले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link