Next
वसंत आबाजी डहाके, शरदिंदू बंडोपाध्याय
BOI
Friday, March 30, 2018 | 03:45 AM
15 1 0
Share this story

‘तर हे कवितेच्या देवा तू आपली प्रचंड दगडी पावलं या शब्दाशब्दावर ठेवीत जा.. ’ असं म्हणणारे कवी वसंत आबाजी डहाके आणि ‘सदाशिव’ या शिवाजीसाठी लढणाऱ्या शूर लहान मराठी मावळ्याच्या आणि ‘डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी’च्या कथा लिहिणारे प्रसिद्ध बंगाली साहित्यिक शरदिंदू बंडोपाध्याय यांचा ३० मार्च हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांच्याविषयी...
.......
वसंत आबाजी डहाके 

३० मार्च १९४२ रोजी बेलोरा (जि. यवतमाळ) येथे जन्मलेले वसंत आबाजी डहाके हे कवी, कथाकार, निबंधकार, समीक्षक आणि मराठी भाषातज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांना लघुनियतकालिक चळवळीमधले एक महत्त्वाचे शिलेदार मानण्यात येतं.

‘लिहिणे ही माझ्या बौद्धिक आणि भावनिक क्रियांची निष्पत्ती असते,’ असं त्यांनी म्हटलंय. ‘भोवतालचं जग सतत समजून घ्यावं असं वाटलं, वर्तमानपत्रं, राजकीय-आर्थिक विश्लेषणं, चळवळींची माहिती यांची त्यात भर पडत गेली आणि हे सगळे संस्कार होत असताना लिहावंसं वाटलं,’ असं त्यांनी म्हटलं आहे. 

‘योगभ्रष्ट’ या पहिल्याच काव्यसंग्रहाने त्यांना प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळाली होती. ‘चित्रलिपी’ या त्यांच्या काव्यसंग्रहाबद्दल त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. 

२०१२ साली चंद्रपूरमध्ये भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. 

अधोलोक, चित्रलिपी, मराठी समीक्षेची सद्यस्थिती, मराठीतील कथनरूपे, प्रतिबद्ध आणि मर्त्य, रूपांतर, शुन:शेप, वाचाभंग, दृश्यकला आणि साहित्य, गोष्ट : न सांगता येण्याविषयीची, कवितेविषयी, काव्यप्रतीती, मालटेकडीवरून, शालेय मराठी शब्दकोश, असं त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे.

त्यांना जीवनव्रती पुरस्कार, गंगाधर गाडगीळ पुरस्कार, शांता शेळके पुरस्कार, दामोदर अच्युत कारे पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे.
 
(वसंत आबाजी डहाके यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा.) 
........

शरदिंदू बंडोपाध्याय 

३० मार्च १८९९ रोजी जौनपूरमध्ये (उत्तर प्रदेश) जन्मलेले शरदिंदू बंडोपाध्याय हे बंगाली कथाकार आणि कादंबरीकार म्हणून प्रसिद्ध होते. त्यांनी अनेक चित्रपटांसाठी पटकथा लेखनाचं काम केलं आहे. 

त्यांचा गाजलेला मानसपुत्र म्हणजे ‘डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी’. १९३२ सालच्या ‘सत्यान्वेषी’ कथेपासून त्यांनी त्याच्या कथा लिहायला सुरुवात केली होती आणि त्याच्या एकूण ३३ कथा त्यांनी लिहिल्या. पुढे १९९३ साली दूरदर्शवर ब्योमकेश बक्षीच्या कथांवर आधारित मालिका सादर झाली. त्यात रजित कपूर या अभिनेत्याने ही भूमिका प्रभावीपणे साकारली होती.

बंडोपाध्याय यांनी ‘बोरोदा’ या भुतांशी सामना करणाऱ्या शूरवीराच्या आणि ‘सदाशिव’ या शिवाजी आणि औरंगजेब काळातल्या मराठी मुलाच्या कथाही लिहिल्या होत्या. शिवाजीराजांसाठी त्याने पार पाडलेल्या अनेक साहसी कामगिऱ्यांवर आधारित त्या काल्पनिक कथासुद्धा चांगल्याच लोकप्रिय झाल्या होत्या. यावर आधारित काही कार्यक्रमही त्या वेळी आकाशवाणीने सादर केले होते. 

त्यांना १९६७ सालच्या रबिन्द्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. 

२२ सप्टेंबर १९७० रोजी त्यांचं मुंबईत निधन झालं.

(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)
 
15 1 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
drvijaykumarbpatil96@gmail.com About 355 Days ago
where did I get your book Sadashiv,,,,,i m from kolhapur
0
0

Select Language
Share Link