Next
आली आली गौराई सोनपावली...
BOI
Monday, August 28, 2017 | 01:03 PM
15 0 0
Share this article:गणपती स्थापनेनंतर येणारा सर्वांत महत्त्वाचा आणि मोठा सण म्हणजे ज्येष्ठागौरींचे आगमन. या सणाच्या तयारीसाठी होणाऱ्या धावपळीत आणि दगदगीतसुद्धा स्त्रियांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा आनंद व समाधान असते. राज्यभरात या सणाच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. त्या पद्धतींवर टाकलेली ही नजर...
.................
व्रतवैकल्ये आणि सणावारांना घेऊन येणारा श्रावण जाताजाता भाद्रपदाबरोबर गणेशाच्या आगमनाची वार्ता देऊन जातो. श्रावण आणि भाद्रपद या दोन महिन्यांशी स्त्रियांचे खूप जिव्हाळ्याचे नाते आहे. माहेरवाशिणींचे तर खास आहे. कारण या महिन्यांत त्यांची माहेरच्या माणसांशी भेट होते; माहेरी जाणे होते. भाद्रपद महिन्यात गृहलक्ष्मीने आपल्या घराच्या सुख-समाधनासाठी व भरभराटीसाठी विविध पूजा, व्रते आणि काही नवीन संकल्प करण्याची पद्धत आजही चालू आहे. हरितालिका, गणपती स्थापनेनंतर सहसा तिसऱ्या दिवशी येणारा (यंदा पाचव्या दिवशी) येणारा सर्वांत महत्त्वाचा आणि मोठा सण म्हणजे ज्येष्ठागौरींचे आगमन. या सणाच्या तयारीसाठी होणाऱ्या धावपळीत आणि दगदगीतसुद्धा स्त्रियांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा आनंद व समाधान असते.
 
लक्ष्मीबाई आली सोन्याच्या पावलांनी
ज्येष्ठेच्या घरी कनिष्ठा आली
मालकाच्या घरी लक्ष्मी आली...
 
असे म्हणत गणेशापाठोपाठ भाद्रपद शुद्ध सप्तमीला गौराईचे आगमन होते. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या प्रांतांत गौराईची वेगवेगळी रूपे पाहायला मिळतात.काही ठिकाणी तिला गणेशाची आई मानतात,तर काही ठिकाणी बहीण.गौरींचे आगमन,पूजन आणि विसर्जन हे प्रांताप्रांताप्रमाणे बदलत जाते.प्रत्येक समाज आपापल्या पारंपरिक पद्धतीने हा उत्सव साजरा करतो.पद्धती वेगवेगळ्या असल्या,तरीही उत्सवाचा गाभा मात्र एकच असतो. जशा पद्धती वेगळ्या तशी नावेही वेगळी आहेत. काही भागांमध्ये गौरीलाच महालक्ष्मी म्हणतात आणि त्यांची ज्येष्ठा नक्षत्रावर पूजा होते, म्हणून ज्येष्ठागौरी असेही म्हणतात.

शिव आणि शक्तीचे रूप यात बघितले जाते. पाहुणे म्हणून आलेल्या गणरायांच्या पाठोपाठ गौराई माहेरवाशीण म्हणून येते. त्यामुळे त्यांच्या स्वागताची तयारी जणू श्रावणातच सुरू झालेली असते. संपूर्ण घराची साफसफाई केली जाते. गौरीपूजनाचा आदला दिवस हा तिच्या आगमनाचा असतो. माहेरी आलेल्या गौरीच्या आगमनाची घरात जय्यत तयारी केली जाते. अंगणात सडा-सारवण करून रांगोळ्या काढल्या जातात. संपूर्ण घर सजवले जाते. महालक्ष्मी आणि गौरी किंवा ज्येष्ठा-कनिष्ठा, सखी-पार्वती अशा जोडीने त्यांना घरात आणण्याची पद्धत आहे. स्थळपरत्वे गौरीच्या पूजेची पद्धत आणि परंपरा बदलेल्या आहेत. कोणाकडे गौरीचे मुखवटे असतात, तर काही ठिकाणी परंपरेनुसार पाणवठ्यावर जाऊन पाच खडे आणून त्यांची पूजा करतात. काही ठिकाणी पाच मडक्यांच्या उतरंडी करून त्यावर गौरीचे मुखवटे लावून त्या उतरंडींनाच साडी चोळी नेसवतात आणि त्यांची पूजा करतात. काही घरांत धान्यांची रास म्हणजेच गहू, तांदूळ, ज्वारी, हरभरा, डाळ इत्यादींपैकी एकदोन धान्याचे ढीग करून त्यावर मुखवटे ठेवतात. बाजारात पत्र्याच्या, लोखंडी सळ्यांच्या किंवा सिमेंटच्या कोथळ्या मिळतात. त्यावर मुखवटे ठेवतात आणि कोथळ्यांना साडी चोळी नेसवतात. सुपांत धान्याची रास ठेवून त्यावर मुखवटा ठेवतात. गहू आणि तांदूळ यांनी भरलेल्या तांब्यांवर मुखवटे ठेवून पूजा करतात. तेरड्याचीही गौर असते. तेरड्याची रोपे मुळासकट आणली जातात. ही मुळे म्हणजेच गौरींची पावले असतात असा समज आहे. आजच्या ‘रेडीमेड’च्या जमान्यात गौरीसुद्धा बाजारात रेडीमेड मिळतात. नवीन साड्यांनी नटलेल्या या गौरी मॉडर्न असतात. अशा विविध रूपात अनेक घरांत गौरी/महालक्ष्मी येतात.
आगमनाच्या दिवशी संध्याकाळी किंवा पंचांगात शुभ वेळ बघून मुखवट्यांची आणि लक्ष्मीच्या हातांची पूजा होते. त्याच रात्री गौरी उभ्या केल्या जातात. या गौरी/महालक्ष्मी किंवा सखी-पार्वतींसह त्यांची मुलेही (एक मुलगा आणि एक मुलगी) मांडतात. भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्षात अनुराधा नक्षत्रावर परंपरेप्रमाणे गौरी आणल्या जातात. कोकणात नदीच्या काठी जाऊन सुवासिनी व कुमारिका ५, ७,११ असे खडे निवडतात. ते स्वच्छ धुवून त्यांचे पूजन, आरती करून ते घरात मिरवीत आणतात. याला खड्याच्या गौरी असे म्हणतात. काही कुटुंबांत गौरीचे पितळी वा मातीचे मुखवटे स्थापन करतात. घराच्या उंबऱ्यातून ते आत आणताना त्यांचे पूजन केले जाते. महाराष्ट्रातील विविध प्रांतांच्या विविध पद्धती अशा आहेत.

कोळ्यांची गौराई
भाद्रपद सप्तमीच्या दिवशी सायंकाळी स्त्रिया सजून-नटून जवळच असलेल्या समुद्रकिनारी जाऊन तेथील तेरड्याच्या झाडाची एक फांदी गौरीरूप म्हणून, तर काही ठिकाणी मूर्तीरूपात वाजतगाजत घरी आणतात. घराच्या उंबरठ्यावर गौरीचे पाय धुतले जातात व मोठ्या उत्साहाने गौरीचे स्वागत केले जाते. त्यांची व्यवस्थित मांडणी करून स्थापना केली जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी गौरीचे पूजन केले जाते, तिला नटवले जाते, दुपारी गौरीला नैवेद्य दाखवला जातो. हा नैवेद्य सहसा मत्स्याहारी असतो. त्यामध्ये खेकडा (चिंबोरी), पाकट, हलवा अशा काही महत्त्वाच्या माशांचा ‘मान’ असतो. सध्या काही ठिकाणी शाकाहारी नैवेद्य दाखवण्याची प्रथा सुरू झाली आहे. त्यामध्ये घारी (मालपुआ), उंबर (गुलगुले) असे काही पदार्थ गोडाचा नैवेद्य म्हणून दाखवले जातात. महत्त्वाचे म्हणजे या दिवशी घरातील माहेरवाशिणींना मोठा मान असतो, माहेरवाशिणी उपवास करतात व तो आपल्या माहेरी सोडणे महत्त्वाचे असते.
कोळ्यांच्या घरी संध्याकाळी गौरी मांडाभोवती स्त्रिया एक ठरावीक पद्धतीच्या एकसारख्या साड्या (थाट) नेसतात व फेरा धरतात आणि पारंपरिक पद्धतीची गाणी म्हणतात. नवमीच्या दिवशी संध्याकाळी पारंपरिक पद्धतीने एकसारख्या साड्या नेसून स्त्रिया व पुरुषही एकसारखा पेहराव करून समुद्रावर वाजतगाजत मिरवणूक काढतात आणि गौराईला निरोप देऊन तिचे विसर्जन करतात.

कोल्हापूरच्या गौराई
कोल्हापूर आणि तिथल्या आसपासच्या भागात गौरी आणण्याच्या पद्धतीत बराच फरक आहे.या ठिकाणी गौरी आणण्यासाठी नदी, विहीर किंवा तलावावर जातात.तेरड्याची जुडी एकत्र बांधून नदीच्या पाण्याने आंघोळ घालून तिची पूजा करून वाजतगाजत घरी आणली जाते. घरी आल्यानंतर ज्या माहेरवाशिणीने ती गौर आणली तिला दारात उभे करून पायावर पाणी घालून,हळदीकुंकू डोळ्याला पाणी लावून तिची आरती करून तिला उजव्या पायांनी आत घेतात. गौरी पाटावर किंवा चौरंगावर बसवली जाते.त्यानंतर तिला साडी नेसवून दागिने घालून नीट सजवतात.शेपू आणि भाकरीचा नैवेद्य दाखवून ‘माझ्या घरात सुख-शांती लाभू दे’ असे मागणे मागितले जाते. सकाळी पुन्हा तिची पूजा केली जाते. त्यानंतर घरात शंकराचे आगमन होते. शंकराची पूजासुद्धा नदीवरच करून त्याला वाजत गाजत घरी आणले जाते. त्या दिवशी पुरणपोळीचा आणि सर्व भाज्या एकत्र करून तयार केलेल्या भाजीचाही नैवेद्य दाखवला जातो. सुपात औसा पूजन करताना गौरी आणि शंकर या दोघांनाही सजवले जाते. विड्याच्या पानावर डोळे, नाक, ओठ काढून दागिने घातले जातात. तिला मंगळसूत्र आणि जोडवी हे दोन महत्त्वाचे दागिने घालतात. तेरड्याला म्हणजेच गौरीला हे दागिने लावले जातात. शंकराला सजवताना टोपी, शर्ट, उपरणे, धोतर ही वस्त्रे नेसवली जातात. भस्म लावून विड्याच्या पानावर डोळे, नाक, कानही काढतात. गौरीच्या ओटीमध्ये गणोबाला कुंची घालून ठेवले जाते. त्यानंतर गौरी-गणपतीची आरती करून नैवेद्य दाखवून पूजा करतात. अशा प्रकारे गौरींची पूजा केली जाते. गौरी विसर्जनाच्या वेळी पाणी तिच्या पायावर ओतून दृष्ट काढली जाते. त्यानंतर तेरड्याचा एक डहाळा घरावर टाकला जातो. गौरीचे विसर्जन केल्यानंतर पाच खडे घरावर टाकले जातात.

कोकणस्थांच्या गौरी
कोकणस्थांमध्ये खड्यांच्या गौरी आणायची पद्धत आहे. पाणवठ्यावरून पाच खडे वेचून घेतात. त्यातील एक ज्येष्ठ गौर व एक कनिष्ठ गौर व बाकीच्या सख्या अशी त्यांची स्थापना करतात. पाणवठ्यावर एखादी जागा स्वच्छ करून तिथे या गौरी ठेवून त्यांची पूजा व आरती करतात. त्यांना प्रसाद दाखवला जातो. यानंतर गौरी आणणारी जी माहेरवाशीण असेल, तिने तोंडात पाण्याची चूळ भरून रस्ताभर ती चूळ न टाकता मुक्या तोंडाने गौरी घरात आणायच्या  असतात. गौरीला दारातून आत हळदीच्या म्हणजे सोनपावलांनी घेऊन येतात. गौरी आणणाऱ्या मुलीने याच पावलांवर पाऊल ठेवून आत यायचे असते. यानंतर प्रथम गौरीला धान्याचे कोठार, स्वयंपाकाची खोली, तिजोरी आणि नंतर सारे घर दिव्याच्या प्रकाशात दाखवतात. त्या वेळी घंटानाद करायचा असतो. सरतेशेवटी तिची देवघरात स्थापना केली जाते. दुसरा दिवस गौरीपूजनाचा असतो. या दिवशी गौरीला घावनघाटल्याचा नैवेद्य दाखवला जातो. विसर्जनाच्या दिवशी नैवेद्याला खीरपुरी असते. जाताना रांगोळीची म्हणजे रुप्याची पावले रेखाटतात. गौरीच्या बरोबर दुपारच्या नैवेद्याची शिदोरी किंवा दहीपोह्यांची शिदोरी दिली जाते. जातानाही मुकेपणानेच गौरी विसर्जन केले जाते. पाणवठ्यावर जाऊन  तिथे पुन्हा एकदा आरती करून वाहत्या पाण्यात गौरी वाहवल्या जातात.

उभ्या गौरी
काही ठिकाणी पाणवठ्यावरून खड्यांऐवजी तेरड्याच्या गौरी आणतात. तिथे त्यांची पूजा व आरती केली जाते. घरी आल्यावर खुर्चीवर तेरड्याचे रोप ठेवून त्याला वर मुखवटा लावतात व गौरीला साडीचोळी नेसवून दागदागिने घालून त्यांचा शृंगार करतात. भाजीभाकरीचा नैवेद्य करतात. दुसऱ्या दिवशी तांदळाचे वडे आणि घारगे, वाटाण्याची उसळ, तर काही ठिकाणी मटणाचा नैवेद्य दाखवला जातो. याचप्रमाणे बायका औसे वसतात. गौरीपूजनाच्या दिवशी हा कार्यक्रम होतो.

मराठवाड्यातील गौरी
मराठवाड्यात गौरीपूजनाची पद्धत पूर्णपणे वेगळी आहे. इथे गौरी दोन प्रकारच्या असतात.एक उभ्या आणि दुसऱ्या म्हणजे बसलेल्या. उभ्या गौरी या स्टँडवर किंवा मडक्यांची उतरंड रचून त्यावर मुखवटे ठेवतात.कलश मांडून धन-धान्याची पूजा केली जाते, त्याला बसलेल्या गौरी म्हणतात. काही ठिकाणी गौरीला गणेशाची बहीण मानले जाते. म्हणूनच ज्येष्ठा व कनिष्ठा या अशा गौरींची पूजा केली जाते.

गौरीचे मुखवटे त्यांच्या मुलांसह सर्वप्रथम अंगणातील तुळशी वृंदावनाजवळ ठेवले जातात. तिथून त्यांना वाजतगाजत घरात आणले जाते. देवघरात देवापुढे ठेवून त्यांना नैवैद्य दाखविला जातो. त्यानंतर त्यांना स्टँडवर किंवा मडक्यांची उतरंड रचून उभे केले जाते. गौरींचे मुखवटे हे प्रामुख्याने ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’चे पाहायला मिळतात. त्याचबरोबर काही ठिकाणी ते पितळाचे असतात, तर काही ठिकाणी ते कणकेचेदेखील बनविलेले असतात. गौरींना साडी नेसविली जाते. त्याचबरोबर त्यांना दागदागिने चढविले जातात.

गौरी ज्या मखरात उभ्या केल्या जातात ते सजवून गौरींच्या पुढे त्यांचा संसार मांडला जातो. शिवाय त्यांच्यापुढे अनेक धान्यांच्या राशी मांडलेल्या असतात. त्याचबरोबर त्यांच्या मुलांसाठी अनेक प्रकारची खेळणीही समोर ठेवलेली असतात.

दुसऱ्या दिवशी घरातील पुरुष अभ्यंगस्नान केल्यानंतर गौरींची त्यांच्या बाळांसह पूजा करतात. त्यानंतर त्यांना नैवेद्य दाखविला जातो. हा नैवेद्य विशेष पद्धतीने बनविलेला असतो. त्यात सोळा भाज्या, १६ प्रकारच्या विविध चटण्या आणि पंचामृताचा समावेश असतो. काही ठिकाणी कणकेचे सोळा दिवेदेखील लावलेले असतात. त्याचबरोबर त्यांच्यासाठी पुरणपोळीचे जेवणही केलेले असते. संध्याकाळी फराळ आणि आरती केली जाते. तिसरा दिवस हा विसर्जनाचा असतो. विसर्जन करण्याआधी शेजारच्या बायकांना हळदी-कुंकवासाठी बोलावले जाते. त्यांच्याकडून गौरींची पूजा केली जाते. १६ पदरी दोऱ्यांचे पोते, वस्त्रमाळा अर्पण करून सोळा काडवाती व पंचारतीने आरती केली जाते. सुवासिनींकडून धन-धान्याच्या गाठी बांधल्या जातात. या गाठी तुळस, विड्याचे पान, हळद-कुकू, खोबरे, रेशीम इत्यादींच्या असतात. गाठी बांधल्यानंतर तिसऱ्या दिवशी मुहूर्तानुसार गौरींची पुन्हा पूजा करून त्यांच विसर्जन केले जाते.

 गौराई सजावटीचा एक नमुना  : https://youtu.be/S06vlp2NZsc
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search