Next
हम भी अगर बच्चे होते...
BOI
Sunday, April 22 | 06:45 AM
15 0 0
Share this story

हिंदी चित्रपटसृष्टीसाठी विविध प्रकारची अजरामर प्रेमगीते लिहिलेले गीतकार शकील बदायुनी यांचा स्मृतिदिन नुकताच (२० एप्रिल) होऊन गेला. त्या निमित्ताने ‘सुनहरे गीत’ या सदरात या वेळी पाहू या त्यांच्या प्रतिभेचा एक वेगळा आविष्कार असलेले गीत.... ‘हम भी अगर बच्चे होते...’
.........
इश्कगीतांचा राजा म्हणून ‘तो’ ओळखला जात असे! ‘मान मेरा एहसान.....’सारखे प्रेयसीला साद घालणारे गीतही त्याने लिहिले. ‘तेरे हुस्न की क्या तारीफ करूं..,’ ‘चौदहवी का चाँद हो....’ यांसारखी सौंदर्यवर्णनपर गीते लिहिताना तर तो रूपकांची, अलंकारांची उधळण करत असे. ‘विरह’, ‘बेवफाई’ ही प्रीतीच्या प्रांतातील अवस्था ‘मोहब्बत की झूठी कहानी पे रोए...’ अगर ‘मेरा जीवनसाथी बिछड गया....,’ ‘रहा गर्दिशो में हरदम...’ अशा कैक दर्दभऱ्या गीतांद्वारे तो अशा अचूक शब्दांत मांडत असे, की ती गीते दु:खद असूनही पुन्हा पुन्हा ऐकावीशी वाटतात.

वाट पाहणे, साद घालणे, मीलन झाल्यावरची आनंदी मनःस्थिती आणि प्रीतीच्या प्रांतातील हर एक प्रकारचे दु:ख अप्रतिम काव्यात मांडणारा हा इश्कगीतांचा राजा म्हणजे गीतकार शकील बदायुनी! २० एप्रिल रोजी त्याचा स्मृतिदिन होऊन गेला. उत्तर प्रदेशातील बदायूँ येथे तीन ऑगस्ट १९१६ रोजी एका मौलानांच्या घरी जन्मलेल्या शकील अहमद या मुलाला बालपणापासूनच शेरोशायरीची आवड होती. अरबी, फारसी, उर्दू आणि हिंदी या भाषा त्याला शिकवण्यात आल्या होत्या! त्यांचे पूर्वज खलिफा मोहम्मद वासिल हे उर्दूतील कवि होते. मौलाना जिया उल कादरी यांचा प्रभाव शकीलवर पडला होता. त्यांनी शकीलला काव्यलेखनात मार्गदर्शनही केले. १९३६मध्ये शकील यांनी अलीगड मुस्लिम विश्वविद्यालयात प्रवेश केला. तेथे ते कविसंमेलनात भाग घेऊ लागले. त्यामुळे एक प्रतिभावान कवी म्हणून त्यांचे नाव झाले. तेथेच गीतकार नीरज यांच्याशी त्यांची ओळख झाली. 

१९४२मध्ये त्यांनी दिल्लीत एका सरकारी खात्यात नोकरी स्वीकारली! १९४६मध्ये एका काव्यसंमेलनासाठी ते मुंबईत आले असताना तेथे निर्माता दिग्दर्शक ए. आर. कारदार यांनी त्यांच्यावर ‘दर्द’ या चित्रपटाची गाणी लिहिण्याचे काम सोपवले. १९४७च्या त्या चित्रपटाला नौशाद यांचे संगीत होते. त्या चित्रपटासाठी शकील यांनी लिहिलेली गीते प्रचंड लोकप्रिय झाली. ‘अफसाना लिख रही हूँ.....’ हे त्या चित्रपटातील गीत तर आजही आवर्जून ऐकले जाते.

त्यानंतर कारदार यांच्या नाटक, दिल्लगी, दुलारी, दिल दिया दर्द लिया या चित्रपटांसाठी शकील यांनीच गीते लिहिली होती व ती लोकांना भावली होती. ‘दर्द’पासून शकील यांची संगीतकार नौशाद यांच्याबरोबर जी जोडी जमली ती पुढे २१ वर्षे कायम राहिली. १९६८चा ‘संघर्ष’ हा या जोडीचा अखेरचा चित्रपट! या २१ वर्षांत या संगीतकार व गीतकारांच्या जोडीने दिलेल्या लोकप्रिय गीतांची यादी बरीच मोठी आहे. 

अर्थात शकील यांनी अन्य संगीतकारांबरोबरही कामे केली! सुरुवातीच्या दहा वर्षांत संगीतकार गुलाम मोहम्मद यांच्यासमवेतही काही गीते त्यांनी रसिकांना दिली. त्या चित्रपटांची संख्या २२ आहे. संगीतकार रवी यांच्याबरोबरही त्यांची जोडी छान जमली होती.

चौदहवी का चाँद, घूंघट, घराना, गृहस्थी, दो बदन अशा एकूण १५ चित्रपटांतून शकील आणि रवी या जोडीने मधुर व अर्थपूर्ण गीते रसिकांना दिली. संगीतकार हेमंतकुमार व सी. रामचंद्र यांनीही शकील यांच्या काही गीतांना संगीत दिले आहे; पण अन्य संगीतकारांनी शकील यांची गीते संगीतबद्ध केलेली दिसून येत नाहीत.

शकील यांनी त्यांच्या कारकिर्दीत ८९ चित्रपटांसाठी एकूण ७५० गीते लिहिली. त्यामध्ये विविध प्रकार दिसून येत असले, तरी गझललेखनात ते निष्णात होते. बेगम अख्तर यांचे ते आवडते शायर होते. त्यांचे सहा काव्यसंग्रह प्रकाशित झाले होते. १९६० ते १९६२ अशा ओळीने तीन वर्षांत त्यांना चौदहवी का चाँद, घराना आणि बीस साल बाद या चित्रपटांतील गीतांकरिता सर्वश्रेष्ठ गीतकार म्हणून फिल्मफेअरचा पुरस्कार देण्यात आला होता. ‘ये जिंदगी के मेले दुनिया में कम न होंगे, अफसोस हम न होंगे’ या एकेकाळी आपणच लिहिलेल्या ओळींमधील दुःखाचा अनुभव घेत त्यांनी २० एप्रिल १९७० रोजी या जगाचा निरोप घेतला.

प्यार, मोहब्बत, इश्क या प्रकारातील एकापेक्षा एक अप्रतिम गीते लिहिणाऱ्या शकील बदायुनी यांच्या स्मृतीसाठी त्या प्रकारातीलच एखादे गीत ‘सुनहरे गीत’ म्हणून उलगडून दाखविण्याऐवजी शकील यांच्या प्रतिभेचा एक वेगळा आविष्कार दर्शवावा, असे मला वाटते.

बालगीते आणि वाढदिवसाबद्दलची अनेक गीते हिंदी चित्रपटगीतांच्या खजिन्यात सापडतात; पण बालगीते लिहिताना केवळ ‘अक्कड बक्कड’ असे शब्द लिहून गीत तयार न करता ध्रुवपदातच एक खंत हसत हसत व्यक्त करून, पुढील दोन कडव्यांत ‘रम्य ते बालपण’ या उक्तीची सार्थकता पटवणारी वस्तुस्थिती सांगणारे वर्णन करून, तिसऱ्या कडव्यात तत्त्वचिंतक शकील मोठेपणाची दु:खे हसत हसत सांगतो. ते ऐकल्यावर ‘खरे आहे रे बाबा तुझे म्हणणे’ असे उद्गार आपल्या ओठांवर येतात. गीतकार शकीलच्या प्रतिभेचा हा वेगळा आविष्कार पाहू या –

हम भी अगर बच्चे होते, 
नाम हमारा होता गबलू बबलू 
खाने को मिलते लड्डू 
और दुनिया कहती हॅपी बर्थ डे टू यू

(खरेच) आम्हीही लहान मूल असतो, तर आमचेही नाव गबलू , बबलू असे काही तरी असते (तर आमच्या वाढदिवशीही आम्हाला कोणी प्रेमाने दिलेले) लाडू खायला मिळाले असते आणि सारे जण आम्हाला ‘हॅपी बर्थ डे टू यू’ असे म्हणाले असते (नाही का?)

कोई लाता गुडिया, मोटार, तो कोई लाता फिरकी लट्टू 
कोई चाबी का तट्टू और दुनिया कहती ‘हॅपी बर्थ डे टू यू’

(तसेच आमचा वाढदिवस म्हणून) कोणी (आमच्यासाठी एखादी) बाहुली (नाही तर) मोटारगाडी (किंवा) चावीची खेळणी आणली असती व आम्हाला ‘हॅपी बर्थ डे टू यू’ असे म्हणाले असते (नाही का ?)

पण आता आम्ही मोठे झाल्यामुळे हे असे काही घडत नाही, ही खंत अप्रत्यक्षरीत्या सूचित करून शकील पुढे लिहितो - 

कितनी प्यारी होती है ये भोली सी उमर 
ना नौकरी की चिंना ना रोटी की फिकर 
नन्हे मुन्हे होते हम तो देते सौ हुकूम 
पीछे पीछे डॅडी मम्मी बनते नौकर 
चॉकलेट, बिस्कुट खाते और पिते दू दू
और दुनिया कहती.......

किती छान आणि सुंदर असतो नाही तो बालपणाचा काळ? भोळेभाबडे वय असते ते, नोकरीची काळजी नसते आणि पोट कसे भरायचे याची फिकीर नसते. आम्ही लहान असूनही आमच्या आई-वडिलांना आंम्ही हुकूम देतो, तेव्हा आमचे आई-वडील नोकरासारखे आमच्यापाठी पळतात व आमची कामे करतात. (या वयात याचबरोबर आम्ही) चॉकलेट खातो, दूध पितो.

बालपणातील त्या दिवसांच्या स्मृती अशा शब्दांत जागृत करून शकीलमधील कवी पुढे लिहितो - 

कैसे कैसे नखरे करते घरवालों से हम 
पल में हसते पल में रोते करते नाक में दम 
अक्कड बक्कड, लुक्का छुप्पी, कभी छुव्वा छुव 
करते दिनभर हल्ला गुल्ला दंगा और उधम्
और कभी जिद पर अड जाते जैसे अडियल तट्टू
और दुनिया कहती.....

(खरेच त्या बालपणाच्या दिवसात) कसले कसले नखरे आम्ही करत असू? क्षणात हसायचे, क्षणात भोकाड पसरायचे (रडायचे), (आई-वडिलांना आमच्या त्या कृतीने आम्ही अगदी) नाकीनऊ आणायचो, लपंडाव, लपाछपी, पळापळी असे कैक खेळ खेळून दिवसभर नुसता दंगा करायचो आणि कधी कधी एखाद्या अडेलतट्टूसारखे एखादा हट्ट धरून हटून बसायचो.

असा तो बालपणाचा काल वर्णिल्यावर आता सध्या काय, हे सांगताना शकील लिहितो - 

अब तो है ये हाल जबसे बीता बचपन 
माँ से झगडा, बाप से टक्कर, बीवीसे अनबन,
कोल्हू के हम बैल बने है , धोबी के गधे 
दुनिया भर के डंडे सर पे खाए दन्नादन
बचपन अपना होता तो ना करते भेचू भेचू 
और दुनिया कहती .......

आमचे सुखद बालपण संपल्यानंतर आमची आता काय हालत आहे बघा. आई-वडिलांबरोबर झगडे, बायकोशी वादवादी (आणि याचबरोबर) आम्ही घाण्याचे बैल बनलो आहोत (चाकोरीत फिरणारे) धोब्याचे गाढव बनलो आहोत (फक्त ओझी वाहणारे) आमच्या माथ्यावर सारेच (अपयशाचे, भांडणाचे, वाईट घटनांचे) खापर फोडतात (खरेच हो) आमचे बालपण असते, तर आमची ही अशी अवस्था झाली नसती आणि आम्ही ही अशी कुरकुरही केली नसती.

१९६४ सालच्या देवेंद्र गोयल यांच्या ‘दूर की आवाज’ या चित्रपटातील संगीतकार रवी यांनी संगीत दिलेले हे गीत मोहम्मद रफी, मन्ना डे, आशा भोसले आणि सहकाऱ्यांनी गायले होते. पडद्यावर हे गीत जॉनी वॉकरच्या तोंडी आहे. वाद्यांचा वापर जास्त आहे; पण मुलाच्या वाढदिवसाचा प्रसंग, अन्य मुले यांमुळे तो वाद्यमेळ साजेसा वाटतो. शकील बदायुनी यांच्या लेखणीचा हा एक वेगळा आविष्कार आज ५४ वर्षांनंतरही ‘सुनहरा’च आहे, हे नक्की जाणवते.

- पद्माकर पाठकजी
मोबाइल : ८८८८८ ०१४४३

(लेखक चित्रपट समीक्षक आणि जुन्या चित्रपटगीतांचे अभ्यासक आहेत.दर रविवारी प्रसिद्ध होणाऱ्या त्यांच्या ‘सुनहरे गीत’ या सदरातील सर्व लेख https://goo.gl/8ABN2G या लिंकवर एकत्रितपणे उपलब्ध आहेत.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Arun vasant Kulkarni About 270 Days ago
खुपच सुंदर लेख, अगदी आपल्या ला त्या त्या काळातील आपल्या आठवणी डोळ्यासमोर घेऊन जातात, कधी कधी वाटतं की पाठकजींचे लिखाण, निवेदना पेक्षा सरस आहे
1
0

Select Language
Share Link