Next
पांडुरंगाची नगरप्रदक्षिणा
BOI
Tuesday, November 20, 2018 | 01:39 PM
15 0 0
Share this article:

लेखातील सर्व फोटो कार्तिकी एकादशीच्या (१९ नोव्हेंबर २०१८) निमित्ताने रत्नागिरीच्या विठ्ठल मंदिरात असलेला उत्सव आणि जत्रेचे आहेत. फोटो : सिद्धेश वैद्य, सुशांत सनगरे, नेत्रा आपटे (लेन्स आर्ट रत्नागिरी)कार्तिकी एकादशीनंतरच्या चतुर्दशीला म्हणजेच वैकुंठ चतुर्दशीला रत्नागिरीत विठूरायाची नगरप्रदक्षिणा होते. यंदा ती २१ नोव्हेंबर २०१८ रोजी दुपारी १२ वाजता सुरू होणार आहे. आपल्या जाणत्या पूर्वजांनी दैवताच्या आधाराने जोपासलेलं सोशल इंजिनीअरिंग जाणून घेण्यासाठी, जुन्या रत्नागिरीची हद्द समजून घेण्यासाठी ही नगरप्रदक्षिणा आवर्जून अनुभवावीच, असं रत्नागिरीतील ‘आर्ट सर्कल’चे नितीन कानविंदे यांना वाटतं. ते स्वतः अनेक वर्षे पंढरपूरच्या वारीलाही जातात. रत्नागिरीतल्या नगरप्रदक्षिणेबद्दलची माहिती देणारा आणि त्याबद्दलची निरीक्षणं, मतं मांडणारा त्यांचा हा लेख...
............
आज कार्तिकी (प्रबोधिनी) एकादशी! पंढरपूर यात्रा! लाखो भाविक आज पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपुरात जमलेत. ज्यांना तिकडे जायला जमलं नाही, अशी सगळी भक्तमंडळी आपापल्या गावातल्या प्रतिपंढरपूर समजल्या जाणाऱ्या विठ्ठल मंदिरात गेली असतील. रत्नागिरीतील विठ्ठल मंदिरात पण आज मोठी जत्रा भरली आहे. सगळा परिसर माणसांनी फुलून गेलाय. पहाटेपासून पूजा अर्चा, भजन-कीर्तनाने मंदिर परिसर मंगलमय झालाय. आता रात्री १२ वाजता रथातून आणि पालखीतून विठूराया नगरप्रदक्षिणेला बाहेर पडेल. त्याची सवारी जसजशी पुढे जाईल, तसतसा भरलेला बाजार शांत होईल. खरं तर चार महिन्यांच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर भक्तांची ख्यालीखुशाली घ्यायला बाहेर पडलेला विठूराया इतक्या रात्री का बाहेर पडतो, हा मला पडलेला प्रश्न आहे खरा! पण ते असो! 

या रथसोहळ्याचा मार्ग ठरलेला! विठ्ठल मंदिर ते गवळीवाडा घाटी सुरू होतानाचं दत्त मंदिर.... तिथे आरती.... तिथून परत फिरून राधाकृष्ण देवळाजवळून राम आळीमार्गे तेली आळीतील चव्हाट्यावर... उलट फिरून मारुती आळीमार्गे परत मंदिरात... इथे आल्यावर रथयात्रा संपते; पण पालखीतला विठोबा मात्र मुख्य रस्त्याने ग्रामदैवत कालभैरव देवस्थानला भेट देऊन परत मंदिरात येतो. हे सगळं होईपर्यंत काकड आरतीची वेळ झालेली असते. देवशयनी एकादशीला निद्राधीन झालेला पांडुरंग आज प्रबोधिनी एकादशीला आपली चार महिन्यांची विश्रांती संपवून भक्तांच्या अडचणीला धावून जायला सज्ज झालाय.

आपल्या दृष्टीने कार्तिकी एकादशीचा उत्सव उद्याच्या काकड आरतीने संपेल; पण विठ्ठल मंदिरातील कार्यकर्त्यांची आणि जुन्या रत्नागिरी गावातल्या विठ्ठल भक्तांची लगबग सुरू होईल ती वैकुंठ चतुर्दशीदिवशी असणाऱ्या पांडुरंगाच्या नगरप्रदक्षिणेच्या तयारीची! ही नगरप्रदक्षिणा मी बघितलेली परिपूर्ण अशी परिक्रमा! अगदी विठ्ठलाच्या सर्वसमावेशी रूपाला साजेशी! अठरापगड जातींच्या आराध्य दैवताच्या लौकिकाला साजेशी! भक्तवत्सल ब्रीद मिरवणाऱ्या विठूरायाची भक्तांच्या दारी जाऊन अडीअडचणी समजून घेणारी नगर परिक्रमा! आपण अनुभवलीय का? आस्तिक असाल तर नक्कीच अनुभवा आणि समजा नसाल तरीही अनुभवा! आपल्या जाणत्या पूर्वजांनी दैवताच्या आधाराने जोपासलेलं सोशल इंजिनीअरिंग जाणून घेण्यासाठी, जुन्या रत्नागिरीची हद्द समजून घेण्यासाठी!ज्या मंडळींनी ही मंदिरं स्थापन केली किंवा अशा उत्सवांची आखणी केली, त्यांच्या सामाजिक दृष्टिकोनाला दाद द्यावी लागेल. मग तो काळभैरवाचा शिमगोत्सव असू दे किंवा विठ्ठल मंदिराचा कार्तिकोत्सव अथवा दहिकालोत्सव असू दे. भैरीबुवांची पालखी शिमगोत्सवात ज्या ठिकाणी जाऊ शकत नाही, त्या ठिकाणी दूत म्हणून त्याचं निशाण त्याच रात्री जातं. म्हणजे रात्री बारा वाजता निघालेला भैरीबुवांचा पालखी सोहळा होळी उभी झाल्यावर सहाणेवर विसावला, तरी त्या दिवशीचा कार्यक्रम संपत नाही. रात्री लगोलग निशाणं निघतात ती सर्व बारा वाड्यांत जाऊन दुसऱ्या दिवशी जवळपास दुपारी परत येतात. म्हणजे पूर्ण गावाची वार्षिक ख्यालीखुशाली ग्रामदैवताकडे जमा होते. अगदी तसंच काहीसं या नगरप्रदक्षिणेचं! एकादशीदिवशी विठूराया ज्या ठिकाणी गेला नाही, त्या सर्व ठिकाणी पालखी सोहळा जातो. त्यातला भक्तिभाव थोडा वेळ बाजूला ठेवून प्रदक्षिणामार्ग जरी समजून घेतला, तरी पूर्वजांच्या नियोजनाबद्दल नक्की कुतूहल निर्माण होईल.

बुधवारी (२१ नोव्हेंबर २०१८) दुपारी साधारण १२च्या आसपास नगरप्रदक्षिणा सुरू होईल देवळातून! गोखले नाका, राधाकृष्ण नाक्यामार्गे धनजी नाका! हा प्रदक्षिणेचा आरंभबिंदू! धनजी नाक्यातली रस्त्यांची रचना लक्षात घेऊ या, म्हणजे पूर्ण प्रदक्षिणा मार्ग कळेल. धनजी नाक्यातून गवळीवाडा चढाव चढून पालखी जेलरोडने गोगटे कॉलेजवरून कोर्टासमोरून विश्वेश्वराच्या घाटीने विश्वेश्वर देवळात! तिथून राजिवडा रस्त्याने तेली आळी तळ्याजवळून खडपे वठार, चवंडे वठार रस्त्याने मांडवी नाक्यात! तिथून मांडवीतल्या भैरी देवळासमोरून आताच्या नाईक फॅक्टरीपर्यंत! इथून मुख्य रस्ता सोडून पालखी नाईक फॅक्टरीच्या लगत च्या रस्त्याने समुद्रावर येते. (इथे रस्ता सोडण्याचं कारण पूर्वी तिथं असलेली खाजणं हे असेल का?) इथे पालखीतल्या विठोबाला समुद्रस्नान घडवलं जातं. ही परंपरा अगदी माऊलींच्या निरास्नानासारखी!भरतीची वेळ असली, तर किनाऱ्याने समोरच्या पेठकिल्ल्यात जायला मजाच येते. तिथल्या सांबाच्या देवळात घटकाभर विश्रांती! तिथून नाक्यातल्या राम मंदिरावरून मुरुगवाड्यातून पालखी येते मिऱ्या बंदराच्या चौकात! तिथून पांढऱ्या समुद्राच्या पुळणीजवळच्या रस्त्याने पालखी शिरते पिलणकर/भोळे वगैरे मंडळींच्या वाडीत! रत्नागिरीची मिऱ्याकडची हद्द! तिथला पाहुणचार घेऊन विठोबा येतो मुख्य मिऱ्या रस्त्यावर! तिथून रेमंडच्या जवळच्या शेताडातून पूर्वी पालखी जायची; पण आता हायवेवरून जाते परटवणे नाक्यात! परटवणे पुलापर्यंत येऊन मग पालखी प्रस्थान करते ती भार्गवराम मंदिराकडे! संपूर्ण परिक्रमेतला माझ्या आवडीचा टप्पा इथून सुरू होतो. संध्याकाळी साधारण साडेसहा ते सव्वासातच्या दरम्यान!

खंडकर खोतांच्या खासगी मालकीचं भार्गवराम मंदिर! देऊळ खूप जुनं असून मुख्य गाभाऱ्याचा भाग बघण्यासारखा आहे. भिंती इतक्या जाड आहेत, की भर उन्हाळ्यातही आत थंडगार वाटतं. इथली विश्रांती घेऊन झाली की सुरू होणारा पालखीचा टप्पा हा एकदम ‘थ्रिलिंग’ आहे.ज्याला आपण नर्मदा हायवे म्हणतो, त्याच्या अगदी खालच्या बाजूने डोंगरउतारावरच्या पायवाटेने आंब्याच्या बागेतून छोट्या छोट्या दिव्यांच्या प्रकाशात विठूमाऊली वाटचाल करते सावंतनगर, खालच्या फगरवठाराकडे! इतकी घरं या भागात आहेत अशी कल्पनाही येत नाही. सगळ्या चढ-उतारांतून, परटवणे नदीतून, काट्याकुट्यांतून वाट काढत पालखी वरच्या फगरवठारात येण्यासाठी छोट्याशा डोंगराच्या पायथ्याशी क्षणभर थांबते. सगळे पांडुरंगाचा जयजयकार करतात आणि सरळसोट उभी चढण पालखी आणि स्वतःचा तोल सावरत लीलया चढून येतात, तेव्हा फटाक्यांच्या आतषबाजीने स्वागत होतं. मंडळी दमलेली असतात; पण तहान भुकेची इतकी काळजी या सर्व टप्प्यांवर घेतलेली असते, की पोटोबाही विठोबा इतकाच खूश असतो. छोटी चढण चढून पालखी डीएसपी बंगल्यापाशी येते. तिथून बंगल्याला लागून असलेल्या उताराने चावडीवरून धनजी नाक्यात उभी राहते, तेव्हा रात्रीचे जवळपास साडेनऊ वाजलेले असतात. परिक्रमा इथे पूर्ण होते.
तिथलं भजन करून पालखी पुन्हा राधाकृष्ण नाक्यामार्गे देवळात येते आणि मंदिर प्रदक्षिणा करून देव देवळात विसावतो. दिवसभर भक्तांची धूळभेट घेत परतलेला विठोबा अत्यंत समाधानाने कमरेवर हात घेऊन देवळात उभा राहतो, वर्षभराची ऊर्जा साठवून! ज्यांनी ही सगळी ‘सिस्टीम’ बांधली, त्यांची मला कमाल वाटते. म्हणजे चातुर्वर्ण्याचा प्रभाव असण्याच्या काळात मंडळींनी देवाला केंद्रस्थानी ठेवून काही काळासाठी का होईना जातिव्यवस्था मुक्त केली होती. प्रत्येकाला गाव उत्सवांच्या वेळी एक ठराविक मानाची जागा देऊन त्यांचा त्यांचा मान राखला. बारा वाड्यांची एकी राखण्यासाठी त्या वेळी होत असलेले हे प्रयत्न खरं तर सोशल इंजिनीअरिंगचं उत्तम उदाहरण आहे; पण भक्तीच्या, चमत्कारांच्या आणि नवसाला पावणाऱ्या राजांच्या काळात या सामाजिक दृष्टिकोनाकडे आपण दुर्लक्ष करून बसलोय.कमी लोकसंख्या, तुलनेने कमी साधनसंपत्तीच्या काळात परस्परसंबंध राखण्यासाठी मंडळींनी आखलेले उत्सव हे खरं तर आजच्या काळासाठी जास्त आवश्यक आहेत. साधन उपलब्धतेच्या अतिरेकाच्या काळात सगळ्या गोष्टी हाताशी असूनसुद्धा आपण आपापसातलं अंतर वाढवून बसलोय. सोशल मीडियावर प्रचंड मित्रसमुदाय असणाऱ्या आपल्याला आज शेजारच्या विंगमध्ये राहणाऱ्या माणसांची ओळख नाहीये. त्यामुळे बुधवारी म्हणजे वैकुंठ चतुर्दशीला दुपारी निघणारी ही नगरप्रदक्षिणा, आपल्या शहराला, शहराच्या संस्कृतीला आणी शहरात राहणाऱ्या आपल्या मंडळींना जाणून घेण्यासाठी अत्यावश्यक आहे. 

एकादशी संपत आलीय. अनेकांनी देवळातल्या विठाबाचं दर्शन घेतलंही असेल; पण माणसातल्या विठोबाचं दर्शन घ्यायला परिक्रमेसारखं दुसरं साधन नाही. एकादशी तुम्हाला पुण्य मिळवून देईलही कदाचित; पण चतुर्दशीची चाल तुम्हाला सर्वाधिक आनंद मिळवून देईल.

पंढरीनाथ महाराज की जय!

नगरप्रदक्षिणेसंदर्भात अधिक माहितीसाठी संपर्क :
प्रवीण हेळेकर : ९९६०४ ५६४५३
पराग तोडणकर : ७३८७५ ०३३६०
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
makarand About 185 Days ago
नितीनजी खूपच उत्तम लिहिले अाहे अाणि सर्वांना छान माहिती देणारे. तुमची लेखणी जबरदस्त.... अाेघवत्या शब्दांत सुरेख चित्रण
0
0

Select Language
Share Link
 
Search