Next
शेतीमालाला चांगले भाव मिळण्यासाठी ‘स्मार्ट’ प्रकल्प
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन; विविध कंपन्यांबरोबर ४६ सामंजस्य करार
BOI
Thursday, December 06, 2018 | 02:44 PM
15 0 0
Share this article:मुंबई :
शेतीमालाला योग्य भाव न मिळणे ही शेतकऱ्यांना भेडसावणारी मोठी समस्या आहे. त्यावर मात करण्यासाठी राज्य सरकारने जागतिक बँकेच्या साह्याने ‘स्मार्ट’ प्रकल्प हाती घेतला आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादनाला चांगला भाव मिळण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार असून, शेतकऱ्यांना त्यांची उत्पादने थेट कॉर्पोरेट कंपन्यांना किंवा थेट बाजारात विकणे शक्य होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पाच डिसेंबर २०१८ रोजी या प्रकल्पाचा शुभारंभ झाला. पहिल्या टप्प्यात राज्यातील १० हजार गावांत हा प्रकल्प राबविला जाणार आहे.  

महाराष्ट्र राज्य कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट) असे या प्रकल्पाचे नाव आहे. प्रकल्पाच्या उद्घाटनानंतर राज्य सरकार, विविध कॉर्पोरेट कंपन्या, शेतकरी कंपन्या यांच्यामध्ये ४६ सामंजस्य करार करण्यात आले. रिलायन्स रिटेल, ॲमेझॉन, वॉलमार्ट, महिंद्रा ॲग्रो, पेप्सिको, टाटा रॅलीज, बिग बास्केट, पतंजली यांसारख्या नामवंत कंपन्यांबरोबर हे करार झाले. ‘शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे, त्यांच्या मालाला चांगला भाव मिळवून देणे आणि या माध्यमातून कृषी, तसेच ग्राम विकासाला चालना देण्याच्या दृष्टीने ‘स्मार्ट’ प्रकल्प क्रांतिकारी ठरेल,’ असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वेळी सांगितले.

मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला सहकारमंत्री सुभाष देशमुख, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, राज्यमंत्री सदाभाऊ खोत, मुख्य सचिव दिनेशकुमार जैन, जागतिक बँकेचे भारतातील प्रमुख जुनैद अहमद, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, ‘वॉलमार्ट’चे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी क्रिश ऐयर आदी उपस्थित होते.कॉन्फेडरेशन ऑफ  इंडियन इंडस्ट्री (सीआयआय) हे या प्रकल्पाचे उद्योजकीय भागीदार आहेत. स्मार्ट प्रकल्पात सुमारे दोन हजार ११८ कोटी रुपये इतका निधी गुंतविण्यात येणार असून, त्यापैकी एक हजार ४८३ कोटी रुपये इतक्या निधीचा वाटा जागतिक बँक उचलणार आहे. राज्य सरकारतर्फे ५६५ कोटी रुपये, तर व्हिलेज सोशल ट्रान्स्फॉर्मेशन फाउंडेशनमार्फत ७१ कोटी रुपये इतका निधी पुरविण्यात येणार आहे. व्हिलेज सोशल ट्रान्स्फॉर्मेशन फाउंडेशनचा निधी हा ‘सीएसआर’च्या माध्यमातून उभा करण्यात आला आहे, अशी माहिती ‘महान्यूज’च्या वृत्तात दिली आहे.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘जलयुक्त शिवार अभियानामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात विकेंद्रित जलसाठे तयार झाले आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे; पण आता या उत्पादनाला चांगला भाव मिळवून देणे हे आव्हान आहे. यासाठीच राज्य शासनाने ‘स्मार्ट’ प्रकल्प हाती घेतला असून, या प्रकल्पातून शेतकऱ्यांच्या जीवनात मोठे परिवर्तन होईल. या प्रकल्पामुळे शेतकरी आणि बाजारपेठ, तसेच शेतकरी आणि कॉर्पोरेट कंपन्या यांच्यामध्ये थेट लिंकेज तयार होणार आहे. त्यामुळे मध्यस्थांना आळा बसून शेतकऱ्यांच्या कृषिमालाला चांगला भाव मिळेल.’

जागतिक बँकेचे भारतातील प्रमुख जुनैद अहमद म्हणाले, ‘भारतातील शेतकऱ्यांबरोबर काम करण्यासाठी वर्ल्ड बँक उत्सुक आहे. येथील शेती बाजारपेठेवर आधारित होणे गरजेचे आहे. यासाठी स्मार्ट प्रकल्पाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वर्ल्ड बँक सर्वतोपरी सहकार्य करील.’

‘वॉलमार्ट’चे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी क्रिश ऐयर म्हणाले, ‘महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये वॉलमार्ट आपले स्टोअर सुरू करत आहे. एका स्टोअरमधून साधारण दोन हजार रोजगार उपलब्ध होतात. आम्ही पुढील काही दिवसांत महाराष्ट्रात ३० हजार रोजगार उपलब्ध करू. ग्राहकांना किफायतशीर दरात उत्पादने विकण्याबरोबरच शेतकऱ्यांना चांगला भाव मिळवून देण्यावर आमचा भर असेल.’

या वेळी राज्य शासनाच्या व्हिलेज सोशल ट्रान्स्फॉर्मेशन फाउंडेशनचे, रिलायन्स रिटेल, ॲमेझॉन, वॉलमार्ट, महिंद्रा ॲग्रो, आयटीसी, पेप्सिको, टाटा रॅलीज, बिग बास्केट, टाटा केमिकल्स, एचयूएल, वरुण ॲग्रो, पतंजली, स्टार क्विक, एएए कमानी, आयडीएच सस्टेनेबल ट्रेड, मेरा किसान, लिन ॲग्री, वे कूल, मार्केट यार्ड, हॅपी रूट्स, ऑरगा सत्त्व, फार्मलिंक ॲग्री डिस्ट्रिब्युशन, प्युअरगॅनिक या कंपन्यांसमवेत सामंजस्य करार करण्यात आले. फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामनाथ सुब्रमण्यम यांनी या विविध कंपन्यांच्या अधिकाऱ्यांसमवेत सामंजस्य करार केले.याशिवाय विविध कॉर्पोरेट कंपन्या आणि शेतकरी कंपन्या यांच्यामध्येही कृषीमाल देवाणघेवाणीबाबतचे सामंजस्य करार या वेळी करण्यात आले. यात प्रामुख्याने एडीएम ॲग्रो इंडस्ट्रीज, आयएनआय फार्म्स, वरुण ॲग्रो, सीपीएफ इंडिया, ग्रोटर ऑरगॅनिक फूड्स, ॲग्रीटा सोल्युशन्स, गो फॉर फ्रेश, एस फॉर एस टेक्नॉलॉजी आदींबरोबर सामंजस्य करार झाले.

या कार्यक्रमात स्मार्ट प्रकल्पाच्या लोगोचे, तसेच वेबसाइटचेही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.

प्रकल्पाची वेबसाइट : http://www.smart-mh.org/mr
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search