Next
‘सद्भावना असेल, तर सरकारशिवायही प्रश्न सोडवता येतात’
खासदार गिरीश बापट यांचे प्रतिपादन
प्रेस रिलीज
Wednesday, June 12, 2019 | 05:27 PM
15 0 0
Share this article:


पुणे : ‘प्रत्येक माणसात चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही भावना असतात. माणसातील सद्भावना वाढल्या, तर प्रश्न सोडविण्यासाठी सरकारचीही गरज भासणार नाही. सामान्य माणसंही आपापसात आपले मोठमोठे प्रश्न सोडवू शकतात. आजचा कार्यक्रम हे त्याचेच उदाहरण आहे असे मला वाटते,’ असे मत पुण्याचे नवनिर्वाचित खासदार गिरीश बापट यांनी व्यक्त केले.

अमनोरा येस फाउंडेशनतर्फे दुष्काळग्रस्त जनावरांच्या चारा छावण्यांना चारा पाठविण्याचा कार्यक्रम राबविण्यात आला. याचे वाटप खासदार बापट यांच्या हस्ते झाले. या वेळी अमनोरा- सिटी कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक अनिरुद्ध देशपांडे, भारतीय किसान संघाचे पदाधिकारी माऊली तुपे उपस्थित होते. या वेळी धर्मवीर शंभूराजे गोशाळा, तुकाराम टेकडी हडपसर येथून मारुती आबा तुपे, पुरंदर येथील श्री नाथ कृपा सहकारी नागरी पतसंस्थेकडून मनोहर धुमाळ व बलराम चारा छावणी नावळे येथून सागर जगताप यांनी मदत स्वीकारली.

या वर्षी दुष्काळामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. दुष्काळग्रस्त भागातील जनावरे ही छावण्यांवर आणून सोडली जातात. त्या जनावरांना मुबलक चारा व पाणी उपलब्ध करून देणे हा छावणी चालकांचा मुख्य उद्देश असतो; मात्र उन्हाळ्याच्या शेवटी हिरवा चारा मिळणे कठीण होते. यावर उपाय म्हणून दोन महिन्यांपूर्वी पाच एकर जागेवर अमनोरा मक्याची लागवड केली होती. यासाठी अमनोरातील रिसायकल पाण्याचा वापर करण्यात आला असून, पाच एकर मका व १६५ क्विंटल भुस्सा व पेंड आज तीन छावण्यांना पाठविण्यात आला. एकूण २०० टन चारा सुमारे १५ गाड्यांमधून पाठविण्यात आला.

या वेळी बापट म्हणाले, ‘काही काम अशी असतात की त्यासाठी विशेष वेळ काढायला हवा असतो. हे त्यातीलच एक काम आहे. जनतेच्या सहकार्याशिवाय एकटे सरकार काही करू शकत नाही. आपल्यातील संवेदना आपण सतत जाग्या ठेवायला हव्यात. मुक्या जनावरांना आपल्या भावना व्यक्त करता येत नाहीत; पण त्यांचाही त्रास समजून घेत मदत करणे हेच आपले कर्तव्य असते.’

अमनोरा येस फाउंडेशनविषयी अधिक माहिती देताना देशपांडे म्हणाले, ‘अमनोरा येस फाउंडेशन मुख्यत्वे शिक्षण, पर्यावरण, व वैद्यकीय विषयात काम करत आहे. विदर्भात खामगाव येथे पारधी व आदिवासी मुलांसाठी शाळा चालविली जाते. गरजू व होतकरू मुलांच्या शिक्षणासाठी मदत केली जाते. आज सुमारे ८०० मुला-मुली शाळेत शिक्षण घेत आहेत. दुर्बल घटकांना मदत करणे हा फाउंडेशनचा उद्देश आहे.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search