Next
डेबिट-क्रेडिट कार्ड्समध्ये होणार क्रांती
BOI
Saturday, July 21, 2018 | 05:45 PM
15 0 0
Share this story


रोकडविरहित (कॅशलेस) भारताचे स्वप्न पाहत मागील वर्षी निश्चलनीकरणाचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. यामागे नागरिकांनी रोकड व्यवहारांचे प्रमाण कमी करून डिजिटल व्यवहारांना पसंती द्यावी हा मूळ उद्देश होता. या सर्व प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावली ती क्रेडिट आणि डेबिट कार्ड्सनी. या कार्ड्समध्ये लवकरच क्रांती होण्याची शक्यता आहे. 

निश्चलनीकरणानंतर देशभरात कार्ड्स वापरून व्यवहार करणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली. लोक डिजिटल व्यवहारांना पसंती देत आहेत. दिवसेंदिवस डिजिटल व्यवहारांत वाढ होत असताना या प्रक्रियेस आणखी चालना मिळावी यासाठी क्रेडिट आणि डेबिट कार्ड्समध्ये बदल करून खातेदारांना नव्या प्रकारची आधुनिक डेबिट-क्रेडिट कार्ड्स द्यावीत, अशी सूचना केंद्रीय अर्थ मंत्रालयाने सर्व बँकांना दिली आहे. 

असे असेल नवीन कार्डचे स्वरूप..
आधुनिक डेबिट-क्रेडिट कार्डच्या संकल्पनेत निअर फिल्ड कम्युनिकेशन्स (एनएफसी) अथवा कॉन्टॅक्टलेस क्रेडिट आणि डेबिट कार्ड्स खातेदारांना मिळावीत अशी अपेक्षा आहे. कोणत्याही मशिनशी संपर्क न करता केवळ सेन्सर्सच्या साहाय्याने हे कार्ड कार्यान्वित होऊ शकणार आहे, हे या नवीन कार्डचे वैशिष्ट्य आहे. केवळ या एका फीचरमुळेही डिजिटल व्यवहारांची व्याप्ती वाढू शकेल अशी आशा अर्थ मंत्रालयाला वाटते. 

कॉन्टॅक्टलेस कार्ड ही एक आधुनिक प्रणाली आहे. सध्या उपलब्ध असलेली कार्ड्स वापरताना ती स्वाइप मशिनमध्ये घालून, त्या मशिनवर देयकाची रक्कम टाइप करून दुकानदार देयकाकडे कार्डच्या पिनसाठी मागणी करतात. देयकाने आपला पिन त्या मशिनवर टाइप केल्यानंतर रक्कम देण्याची प्रक्रिया पूर्ण होते. परंतु नवीन कॉन्टॅक्टलेस कार्डसाठी ही प्रक्रिया करण्याची गरज भासणार नाही. या कार्ड प्रक्रियेत कार्डमध्ये असणारे इलेक्ट्रॉनिक सेन्सर्स काम करणार आहेत. या सेन्सर्समुळे हे कार्ड केवळ काही क्षण मशिनसमोर धरावे लागणार आहे आणि ती प्रक्रिया पूर्ण होणार आहे. अशा प्रकारे प्रत्यक्ष मशिनला हात न लावताही ही प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. असे झाल्यास या आधुनिक कार्डचा वापर केवळ दुकानांमध्ये न होता, रेल्वे, बस, मेट्रो यांमध्येही होणार आहे. 

अधिक सुरक्षित आर्थिक व्यवहारांसाठी ही नवी कार्डप्रणाली वैशिष्ट्यपूर्ण आणि सोयीस्कर ठरेल असा विश्वास केंद्र सरकारने व्यक केला आहे. या संपूर्ण कार्डप्रणालीबद्दल केंद्रीय अर्थमंत्रालयाने देशातील सर्व बँकांच्या कार्यकारी अधिकाऱ्यांना एक पत्र पाठवले आहे. ही कार्डप्रणाली नव्या पिढीशी नाते सांगणारी असून तरुणांकडून पुढील काळात डिजिटल व्यवहारांत वाढ होऊ शकेल. खातेधारकांच्या सध्याच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डच्या मुदती संपल्यानंतर त्यांना ही एनएफसी कार्ड्स दिली जावीत, अशी सूचना या पत्रांमध्ये करण्यात आली आहे. 

दक्षिण कोरियात यंदा फेब्रुवारीमध्ये झालेल्या विंटर ऑलिंपिकदरम्यान व्हिसाने ही नवीन कार्ड्स सादर केली होती. त्यानंतर इंग्लंड, ऑस्ट्रेलिया यांठिकाणी ही कार्ड्स वापरण्यास सुरूवात झाली आहे. आता येत्या काही काळात भारतातही जुन्या क्रेडिट-डेबिट कार्ड्सची जागा या नवीन एनएफसी कार्ड्सनी घेतलेली दिसेल. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link