Next
स्त्रियांना स्वावलंबनाचा मार्ग दाखविणाऱ्या डॉ. हर्षा सेठ
प्राची गावस्कर
Friday, March 08, 2019 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

आज स्त्रीने प्रगतीची नवनवी क्षितिजे पादाक्रांत केली आहेत. आई झाल्यावर मात्र नोकरी, घर यात महिलांची ओढाताण होते. अशा वेळी घरच्या घरी स्वतःचा व्यवसाय करण्याचा पर्याय अत्यंत उपयुक्त ठरतो. त्यातून गृहिणीलाही स्वतःची वेगळी ओळख निर्माण करता येते. पुण्यातील डॉ. हर्षा सेठ यांनी १९९८पासून विविध कलाकौशल्यांचे व्यावसायिक प्रशिक्षण देऊन शेकडो महिलांना स्वावलंबनाचा मार्ग दाखविला आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त डॉ. हर्षा सेठ यांची मुलाखत...
..........
डॉ. हर्षा सेठ- कलाकौशल्यांचे प्रशिक्षण देण्याच्या तुमच्या उपक्रमाची सुरुवात कशी झाली? पुढील वाटचाल कशी होत गेली?
- मला लहानपणापासून विविध कलांची आवड होती. घरातूनही सगळ्या गोष्टी शिकायला प्रोत्साहन दिले जायचे. मी नृत्य शिकले, गाणे शिकले, माझी चित्रकला चांगली होती. त्याशिवाय कलाकुसरीच्या वस्तू तयार करायलाही मला आवडायचे. अभ्यासातही मी उत्तम होते. मला मेडिकलला जायचे होते; पण मी फार्मसीचे शिक्षण घेतले. शिक्षण घेतल्यानंतर मी एका औषधनिर्माण कंपनीत नोकरी करू लागले. त्याचदरम्यान लग्न झाले, नंतर मुलगा झाला. मग मात्र जेजुरीला असलेल्या कंपनीत जाऊन काम करणे मला खूप त्रासदायक ठरू लागले. ही साधारण १९९७-९८ची गोष्ट आहे. त्या वेळी प्रवासाला दोन-तीन तास लागत. मी सकाळी पावणेसातला घर सोडत असे आणि रात्री आठ वाजता घरी येत असे. अवघ्या तीन-चार महिन्यांच्या बाळाला घरी सोडून इतका वेळ नोकरी करणे मानसिकदृष्ट्या खूप त्रासदायक वाटू लागले. अनेक महिला या मानसिक अवस्थेतून जात असतात. आपण मुलाकडे लक्ष देऊ शकत नाही, त्याला वेळ देऊ शकत नाही, ही अपराधी भावना जीवघेणी असते. त्यामुळे मी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. नोकरी सोडल्यानंतर येणारे आर्थिक परावलंबन टाळण्यासाठी मी स्वतःची आवड व्यवसायात रुपांतरीत करण्याचा प्रयत्न करण्याचे ठरवले. मला कलाकौशल्याच्या अनेक गोष्टी येत होत्या. त्यामुळे मी त्याच कौशल्यांचा वापर करायचे ठरवले आणि ज्वेलरी मेकिंग, पेंटिंग यांचे क्लासेस घरीच सुरू केले. हळूहळू प्रतिसाद वाढत गेला. वेगवेगळ्या कोर्सेसची संख्या वाढत गेली. आज जवळपास ५०-५५ वेगवेगळे आणि अगदी कम्प्युटर प्रशिक्षणापर्यंतचे कोर्सेस माझ्या संस्थेत शिकवले जातात. त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञमंडळी यात मार्गदर्शन करतात. नवीन काय शिकवता येईल, याचा गेली २० वर्षे मी सातत्याने अभ्यास करते आहे. त्यानुसार त्या विषयांचा समावेश अभ्यासक्रमात करत गेले. आज कुकिंग अँड आर्ट स्टुडिओ आणि एचआयसीसी इन्स्टिट्यूट ऑफ करिअर कोर्स या मी सुरू केलेल्या दोन संस्था महिलांना स्वयंसिद्ध करणाऱ्या नामांकित प्रशिक्षण संस्था म्हणून ओळखल्या जातात. शेकडो मुली-महिलांनी येथून प्रशिक्षण घेतले असून, आज त्या स्वतःचा व्यवसाय करत आहेत किंवा चांगली नोकरी करत आहेत. गेल्या वीस वर्षांत तुम्हाला महिलांच्या सामाजिक, मानसिक जडणघडणीत कोणते बदल जाणवले?
-मी ही संस्था सुरू केली, तेव्हा माझ्याकडे ज्वेलरी मेकिंग, पेटिंग, कागदाची फुले बनवणे, भरतकाम, शिवणकाम अशी कौशल्ये शिकण्यासाठी येणाऱ्या मुलींमध्ये मध्यमवर्गीय महाविद्यालयीन मुलींची, संसारी महिलांची संख्या अधिक होती. बहुतांश जणी याकडे छंद म्हणूनच बघायच्या. घरच्या घरी काही करता आले तर करावे, या उद्देशाने महिला ही कौशल्ये आत्मसात करायच्या. घरच्यांचाही तोच दृष्टिकोन असे. काळानुरूप बदल होत गेला. आताच्या मुलींना आपल्याला काय करायचे आहे हे पक्के माहीत असते. कोणते प्रशिक्षण का घ्यायचे, कुठे घ्यायचे, त्याची फी किती आहे, त्याचा फायदा काय, याचा सर्व अभ्यास त्यांनी केलेला असतो. आधुनिक तंत्रज्ञान, संगणक, मोबाइल, सोशल मीडिया यांचा प्रभावी वापर त्यांना करता येतो. घर, मुले यांना प्राधान्य देताना चांगल्या पगाराची नोकरी सोडून देऊन आपल्या आवडीच्या व्यवसायात उतरण्यासाठी त्यांची मानसिक तयारी असते. व्यवसाय करण्याचे धाडस आजच्या मुली, महिला सहज करतात. पूर्वी अशी स्थिती नव्हती. मुली आज खूप जागरूक झाल्या आहेत. शिक्षण घेण्याकडे आणि मुलींना शिकवण्याकडे कुटुंबाचा कल वाढला आहे. सोशल मीडिया, इंटरनेटची उपलब्धता यांमुळे घरबसल्या व्यवसाय करणे, आपल्या उत्पादनांची जाहिरात करणे सोपे झाले आहे. ही बाबही मुली व्यवसायाकडे वळण्यासाठी पूरक ठरली आहे. गेल्या काही काळात झालेले हे बदल खूप मोठे आणि महत्त्वाचे आहेत. 

तुमच्या संस्थेत कोणकोणत्या कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाते?
- मी सुरुवात केली ज्वेलरी मेकिंगपासून. माझे काम बघून मला टीव्ही मालिका, चित्रपट यांसाठीही ज्वेलरी डिझाइन करण्याची संधी मिळाली. आज माझ्याकडे याचे प्रशिक्षण घेतलेल्या मुलीही स्वतःचा व्यवसाय करत आहेत. सध्या आयुर्वेदिक, पर्यावरणपूरक उत्पादनांना खूप मागणी आहे. त्यामुळे साबण, तेल, शाम्पू तयार करण्याचे प्रशिक्षणही आमच्या संस्थेत दिले जाते. सध्या होममेड चॉकलेट्स, चॉकलेट बुके यांनाही खूप मागणी असते. तेही आमच्याकडे शिकवले जाते. सजावटीच्या वस्तू, दिवाळीसाठी आकर्षक पणत्या, दिवे, तोरणे, माळा अशा वस्तू तयार करणे, जेली कँडल, अत्तर, परफ्युम्स, एअर फ्रेशनर्स, स्प्रे, डिओडरंट, टाल्कम पावडर तयार करणे, लाकडावरील, काचेवरील रांगोळी, फुले बनवणे, बांधणी कपडे तयार करणे असे छोटे-मोठे अनेक कोर्सेस आमच्या संस्थेत उपलब्ध आहेत. 

याशिवाय कुकिंगचे कोर्सेस आहेत. पंजाबी मिक्स, केक, केक डेकोरेशन, आइस्क्रीम बनवणे आदी कोर्सेसही आहेत. याशिवाय होम सायन्सचा डिप्लोमा, इन्टेरिअर डिझाइनिंग आणि डेकोरेशन डिप्लोमा आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा कोर्सही आहे. अगदी काही तासांच्या कालावधीपासून काही महिन्यांच्या कालावधीचेही अभ्यासक्रम आहेत. कोणतेही प्रशिक्षण घेतल्यानंतर त्याचा व्यावसायिक उपयोग करण्याआधी काय तयारी करायची, भांडवल कसे उभारायचे, आपल्या उत्पादनांची जाहिरात, त्याचे मार्केटिंग कसे करायचे याचीही सर्व माहिती संस्थेत दिली जाते. त्यामुळे नव्याने व्यवसायात उतरू पाहणाऱ्या मुलींना, महिलांना त्याचा खूप फायदा होतो. जास्तीत जास्त मुलींनी स्वावलंबी, आत्मविश्वासपूर्ण, सक्षम व्हावे, यासाठी मी प्रयत्नशील आहे. 


महिला दिनानिमित्त काय संदेश द्याल?
- प्रत्येक महिलेने आर्थिकदृष्ट्या सक्षम असले पाहिजे आणि प्रत्येकीने शिकलेच पाहिजे, असे मला वाटते. स्त्रिया शिकल्या तर त्यांचा स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. दुसरे म्हणजे, तुमच्याकडे कौशल्य असेल, तर त्याचा उपयोग करून जरूर स्वतःचा व्यवसाय सुरू करा. नोकरीच्या वेळा, प्रवास, तिथला ताण हे सगळे सोसताना गृहिणीची फार ओढाताण होते. योग्य प्रशिक्षण, चढ-उतार सहन करण्याची तयारी आणि चिकाटी असेल, तर व्यवसायात यशस्वी होणे शक्य आहे. सुरुवातीची काही वर्षे त्रास होतो; पण एकदा घडी बसली, की व्यवसाय करणे आर्थिकदृष्ट्याही फायद्याचे ठरते. स्वतःच्या मर्जीने वेळेचे नियोजन करता येते. तंत्रज्ञानाच्या साह्याने तर व्यवसाय करणे आणखी सोपे झाले आहे. त्यामुळे महिलांनी, मुलींनी जरूर व्यवसायाकडे वळावे असे मी सांगेन. 

संपर्क : डॉ. हर्षा सेठ
ई-मेल : hsethlt18@gmail.com

(डॉ. हर्षा सेठ यांच्या मनोगताचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
योगिता बनसोडे About 36 Days ago
माझ्या मुलीसाठी आहे. का कोणता कोर्स ती दहावी पास आहे
0
0

Select Language
Share Link
 
Search