Next
सप्तपदी हे रोज चालते...
BOI
Tuesday, December 19, 2017 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

जनकवी पी. सावळाराम यांचा २१ डिसेंबर रोजी स्मृतिदिन आहे. त्या निमित्ताने ‘कविता... स्वरांनी मोहरलेल्या’ या सदरात आज आस्वाद घेऊ या त्यांनी लिहिलेल्या, वसंत प्रभूंनी संगीत दिलेल्या आणि लतादीदींनी गायलेल्या एका सुंदर गीताचा... सप्तपदी हे रोज चालते...
...........
नेहमीप्रमाणंच ऑफिसला निघायला उशीर झालेला, त्यात रस्त्यात सतरा सिग्नल्स... लाल, पिवळा, हिरवा. बदलत्या रंगाशी जुळवून घेत ट्रॅफिक जॅममधून गाडी पळवताना एकच ध्येय, ऑफिसला वेळेवर पोहोचायचं... या ध्येयपूर्तीसाठी जिवाची बाजी लावणारे माझ्यासारखे रस्त्यावर अनेक जण होते. शेवटचा सिग्नल... हिरवा मिळेपर्यंत वाट बघणं क्रमप्राप्त... समोर प्रत्येक सेकंद दाखवणारे आकडे बदलत होते... रोज तेच बघायचा कंटाळा येतो. सारखं आपलं ‘घटका गेली, पळे गेली...’ वैताग येतो कधी कधी... म्हणून मी खिडकीतून फुटपाथवर नजर टाकली तर एक मध्यमवयीन जोडपं चाललं होतं... क्षणात तो पुढं झाला... त्याचा वेग जास्त होता आणि ती मागे पडली... त्याच्या बरोबरीनं चालण्याची तिची केविलवाणी धडपड. कधी त्याच्या बरोबर, तर कधी मागे... दमछाक होत होती तिची. हातातली पिशवी सांभाळत, साडीचा घोळ आवरत, तोंडानं काहीतरी बडबडत (बहुधा, ‘थांबा ना हो थोडं,’ असं म्हणत असावी) पाय ओढत त्याच्या मागे ती चालत होती. समोरच्या सिग्नलच्या खांबावर शेवटची काही सेकंदं उरली होती. मी त्या जोडप्याकडं पाहण्याचं सोडून गिअर बदलला आणि गर्दीच्या पुरात वाहत राहिले. बस्स... किनाऱ्यावर पोहोचलेसुद्धा. नकळत मनात गाणं सुरू झालं होतं आणि तेच गाणं ‘गीतगंगा’ या सुगम संगीताच्या कार्यक्रमात मी लावलं.

तुझ्यासवे ते, शतजन्मीचे हो माझे नाते...

पी. सावळारामांचे शब्द, लतादीदींचा स्वर आणि वसंत प्रभूंच्या संगीतावर मी डोलत राहिले, गुणगुणत राहिले. गाणं संपलं, पुढचे प्रायोजित कार्यक्रम सुरू झाले; पण मी मात्र त्या सप्तसुरांच्या ‘सप्तपदी’तच घुटमळत राहिले. डोळ्यांपुढे पुन्हा तेच जोडपं आलं. त्याच्या पावलावर पाऊल टाकून त्याच्या मागोमाग चालणारी ती दिसू लागली. हळूहळू विवाहसोहळा होत असलेला मंडप माझ्या डोळ्यांपुढे आला. अवघ्या आयुष्याची स्वप्नं डोळ्यांत साठवून, कपाळावर मुंडवळ्या बांधून सलज्ज वदनानं ‘सप्तपदी’ चालण्यासाठी सज्ज झालेली ती... तिच्या शेल्याची गाठ त्याच्या उपरण्याला... गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे त्याच्या हातात आपली करंगळी देऊन एकेक पाऊल ती पुढे टाकते... ‘प्रत्येक पावलागणिक आयुष्यभर सोबत करीन, साथ देईन,’ असा विश्वास देत राहते... स्त्रीच्या आयुष्यातली महत्त्वाची घटना घडत असते. देवाब्राह्मणांच्या समक्ष साक्षीला असतो आप्तजन आणि स्नेहीजनांनी भरलेला मांडव... अन् ओठांवर असतं हे सुरेख भावगीत... 

हळव्या तुझिया करात देता
करांगुली ही रूप गोजिरी
गोड शिरशिरी उरात फुलता
स्पर्शाने जे मुग्ध बोलते... सप्तपदी हे रोज चालते... 

पी. सावळाराम (फोटो सौजन्य : आठवणीतली गाणी)किती सुंदर लिहिलंय पी. सावळारामांनी! मुग्धता जिथं, तिथं बोलणं कसं? पण स्पर्शानं बोलणारी मुग्धता कवीलाच ऐकू येऊ शकते आणि अंगावर गोड शिरशिरी आणणाऱ्या मुग्ध भावनांना बोलतं करणारी कविता जन्माला येते. त्यात वसंत प्रभूंसारखा प्रतिभावंत संगीतकार सप्तसुरांच्या अलंकारांनी कवितेला जेव्हा नटवतो तेव्हा साक्षात शृंगारही लाजेल असं गीत जन्माला येतं. लतादीदींच्या सुकोमल स्वरांमधून हे गाणं ऐकणं म्हणजे नववधूच्या मनात हळूच डोकावणं... प्रीतभावनेनं रोमांचित होणं.

करकमलांच्या देठाभवती
झिम्मा खेळत प्रीत बिलवरी
दृष्ट लाजरी जरीकाठी ती
तुझ्या लोचने वळुनी बघते... सप्तपदी हे रोज चालते... 

करकमल हा शब्द आपण समजू शकतो; पण करकमलाच्या देठाभवती म्हणजे मनगटावरती झिम्मा खेळणारे बिलवर म्हणजे बांगड्या, त्याही कशा? सोन्या-मोत्याच्या नाहीत तर प्रीतीच्या... पी. सावळारामांच्या प्रतिभेला कोणती उपमा द्यावी? खरंच, दृष्ट लागावी अशी जरीकाठी प्रतिभा कवीची आणि सहजसुंदर चाल लावणाऱ्या संगीतकाराची. तशी ही गीतकार-संगीतकाराची जोडी अतिशय लोकप्रिय. पी. सावळारामांनी कविता लिहायची आणि वसंत प्रभूंनी तिला स्वरांमध्ये गुंफायचं! हा सुरेख गोफ लतादीदींच्या गळ्याला शोभून दिसायचा. पी. सावळाराम, वसंत प्रभू आणि लतादीदी या त्रिवेणी संगमावर रसिक आजही आनंदानं न्हाऊन निघतात. आत्ता या क्षणी कितीतरी गाणी आठवतात.

या गाण्यामधून नवविवाहितेच्या मनाचे सुंदर विभ्रम पी. सावळाराम आणि वसंत प्रभू यांनी दाखवले. वसंत प्रभू हे डान्समास्तर होते म्हणून त्यांच्या शांत भावगीतातूनही एक प्रकारचा मनाला आनंद देणारा ठेका ऐकायला येत असेल का? रसिक गाणं ऐकता ऐकता लतादीदींच्या स्वरात स्वर मिसळून गाणं बोलत राहतो आणि स्वरानंदात डोलत राहतो. आपल्याला गाणं फक्त बोलताच येणार, लतादीदींसारखं गाता थोडीच येणार?

मराठी रसिकांच्या भावविश्वातली चिरस्मरणीय गाणी वसंत प्रभू यांची आहेत. त्यातली स्त्रीमनाच्या मुग्ध भावनांचं दर्शन घडवणारी अनेक गाणी आत्ता आठवताहेत. ‘हृदयी जागा तू अनुरागा, प्रीतीला या देशील का’ किंवा ‘मी मनात हसता प्रीत हसे, हे गुपित कुणाला सांगू कसे’, ‘लेक लाडकी या घरची, होणार सून मी त्या घरची’, ‘आली हासत पहिली रात’, ‘जिथे सागरा धरणी मिळते, तिथे तुझी मी वाट पहाते’, ‘कोकीळ कुहुकुहू बोले, तू माझा तुझी मी झाले’... किती गाणी सांगावीत? वसंत प्रभू यांच्या संगीताने बहरलेला संगीतरचनांचा आम्रतरू आणि लतादीदींचा कोकीळस्वर यांमुळे भावगीतांच्या विश्वाात वसंत सदैव फुलतच राहिला. रमेश अणावकर, मधुकर जोशी, द. वि. केसकर, भा. रा. तांबे यांच्या अतिशय भावमधुर कवितांना वसंत प्रभू यांनी स्वरबद्ध करून रसिकांपर्यंत पोहोचविल्या. तरीही पी. सावळाराम यांच्याबरोबर त्यांची जोडी खूपच लोकप्रिय झाली. गदिमा आणि बाबूजी ही जोडी, तशीच पी. सावळाराम आणि वसंत प्रभू यांची जोडी अजरामर झाली.

फूटपाथवरून चाललेली पतीपत्नीची जोडी पाहिली अन् ‘सप्तपदी हे रोज चालते’ या गाण्याची आठवण मला झाली. त्या गाण्याबरोबर जनकवी पी. सावळाराम आणि भावसंगीतातला वसंत अर्थात वसंत प्रभू यांचंही स्मरण होत राहिलं. एखादी कविता जेव्हा गीत होते, तेव्हा कवीचे शब्द संगीतकाराच्या संगीतरचनेतील सुरांबरोबर सप्तपदीच चालतात नाही का? हे चालणं, हा प्रवास जितका सुखकर, जितका सुमधुर तितकं ते गाणं हवंहवंसं वाटतं... आपल्या खऱ्याखुऱ्या आयुष्यासारखं... आरोह-अवरोहाचा सुंदर मेळ जमला, तर आयुष्यसुद्धा एक सुरेख गाणं होतं... आयुष्यातले चढउतार दोघांनी मिळून चालायचे... एकमेकांच्या साथीनं, सहवासानं आयुष्याची वाट चालत राहणं, म्हणजेच तर सुरेल गीत गाणं... यासाठी मात्र सप्तपदीबरोबर सुखदु:खातही साथ देणारं, घर आनंदी ठेवणारं, ‘अहं’ला दूर सारून द्वैत मिटवणारं, अद्वैताचा अनुभव देणारं फक्त अर्धांगिनीचंच नव्हे तर दोघांचही आठवं पाऊल खूप महत्त्वाचं... 

अर्धांगी मी सगुण साजिरी
मूर्त होता तुझ्या शरीरी
अद्वैताचे दैवत होते
सप्तपदी हे रोज चालते
तुझ्यासवे ते, शतजन्मीचे हो माझे नाते.

पी. सावळाराम यांनी हे फक्त भावगीत लिहिलं नाही, तर सुखी संसाराचं आणि सक्षम, समर्थ सहजीवनाचंही गमक सांगितलं आहे. आजच्या युगात कधी तो पुढे, तर कधी ती पुढे, तर कधी दोघे बरोबर... हातात हात घालून चालत राहिले तर जगणं किती सोपं होईल... त्याच्या हातात हात देऊन विश्वाासानं ती चालत राहते. जन्माची गाठ कधी सुटू नये म्हणून त्याची आणि तिचीही धडपड आयुष्याला रोज नवी उमेद देणारी असते. या वाटचालीत त्यांच्या बरोबर असतात अनेक सुखदु:खाच्या आठवणी आणि स्वरांनी मोहरलेल्या कवितांची गाणी... 

- डॉ. प्रतिमा जगताप
संपर्क : ९४२२२ ९२३८४

(लेखिका पुणे आकाशवाणी केंद्रात वरिष्ठ उद्घोषिका म्हणून कार्यरत आहेत.)
 
(दर मंगळवारी प्रसिद्ध होणाऱ्या ‘कविता...स्वरांनी मोहरलेल्या’ या सदरातले लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/HfxM58 या लिंकवर वाचता येतील.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search