Next
प्रयत्नांती ‘परमेश्वर’ मिळविणारी ‘त्रिमूर्ती’
वडिलांच्या अचानक मृत्यूनंतर तीन भावंडांनी सुरू ठेवली मूर्तिशाळा
नीलेश जोशी
Tuesday, September 11, 2018 | 12:54 PM
15 0 0
Share this article:मालवण :
त्या तीन भावंडांच्या वडिलांची मूर्तिशाळा अनेक वर्षांपासूनची. मुलांना मात्र मूर्तिकामातील फारसा अनुभव नाही. यंदा अचानक वडिलांचे अपघाती निधन झाले आणि त्यांचे छत्रच हरपले; पण खचून न जाता त्या तिघांनी आपल्या वडिलांच्या मूर्तिशाळेची परंपरा सुरू ठेवायचे ठरवले. वडिलांच्या सहकाऱ्यांचा आधार त्यांना मिळाला आणि त्यांनी जिद्दीने प्रयत्न सुरू केले. आणि त्यांच्या प्रयत्नांना परमेश्वर पावला! सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मालवण तालुक्यातील हडी गावातील नम्रता, चंद्रकला आणि तेजस कवटकर यांची ही गोष्ट आहे. मालवण-आचरा मार्गावरील हडी गावातील मार्गेश्वर मंदिरानजीक कवटकर कुटुंब राहते. संदीप मनोहर कवटकर हे कुटुंबातील कर्ते पुरुष. त्यांची पत्नी सुजाता आणि तीन मुलांसह पाच जणांचे कुटुंब. सुमारे ३५ वर्षांपासून त्यांच्या राहत्या घरी गणपती मूर्तिशाळा आहे. शाडूच्या मातीच्या मूर्ती बनविण्यात संदीप यांचा हातखंडा होता; मात्र २१ मे २०१८ रोजी कामानिमित्त मुंबईला जात असताना पेण येथे संदीप यांचे अपघाती निधन झाले. घरातील कर्ता पुरुषच गेल्याने कुटुंबीयांना फार मोठा धक्का बसला. अनेकांनी धीर दिला; पण संदीप यांची मूर्तिशाळा पुढे कशी चालविणार, असा प्रश्न उपस्थित झाला. छोटा मुलगा तेजस नववीत आहे, त्याच्याहून मोठी नम्रता १४वीत आहे, तर मोठी चंद्रकला ‘आर्टस्’ची पदवीधर. या तिन्ही भावंडांनी निश्चय केला, की काही करून वडिलांची मूर्तिशाळा पुढे सुरू ठेऊन वडिलांच्या स्मृती जपायच्याच. चंद्रकला व नम्रता यांनी मूर्तींचे अलंकार व शेडिंगची कामे करण्याचे ठरवले. या मुलांचा दृढनिश्चय पाहून संदीप यांचे सहकारी दिनेश मेस्त्री, नारायण बेडेकर, महेंद्र परब, संजय परब, नित्यानंद कदम यांनाही हुरूप आला आणि या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली ही मुले कामाला लागली. घरात मूर्तिशाळा असली, तरी या मुलांना मूर्तिकलेचे ज्ञान नव्हते. वडिलांच्या मूर्तिकलेचे फक्त निरीक्षण करीत मोठा झालेल्या तेजसने स्वतः कधीही मूर्ती साकारली नव्हती; पण त्याने निरीक्षणाच्या आधारे मिळविलेल्या ज्ञानाच्या आधारे यंदा शाडूच्या मातीच्या तीन मूर्ती स्वतः बनवून मूर्तिकलेचा श्रीगणेशा केला. शाळा सांभाळून त्याने हे काम केले. मूर्तीच्या सोंडेचे काम आपल्याला जमले नाही आणि ते संदीप यांच्या सहकाऱ्यांनी बनविल्याची प्रामाणिक कबुली या मुलाने दिली. येत्या काळात तेसुद्धा आत्मसात करणारच, असा विश्वास त्याने व्यक्त केला आहे.

चंद्रकलानम्रतातेजससध्या सर्व मूर्ती शाडू मातीच्या बनविणे शक्य नसल्याने प्लास्टर ऑफ पॅरिसच्याही काही मूर्ती आहेत. या मूर्तींचे कलर शेडिंग, मूर्तीवरील अलंकार यांचे काम चंद्रकला व नम्रता या दोन्ही भगिनी रात्री उशिरापर्यंत, तर कधी कधी पहाटे पर्यंत जागून मोठ्या आत्मविश्वासाने पूर्ण करीत आहेत. ‘प्रयत्नांती परमेश्वर’ ही उक्ती त्यांनी शब्दशः सिद्ध केली आहे. या तिघांच्या जिद्दीला सलाम आणि त्यांच्या वाटचालीला शुभेच्छा!

(‘बाइट्स ऑफ इंडिया’वरील गणेशोत्सवाच्या विशेष बातम्या व लेख https://goo.gl/X8v1iW या लिंकवर वाचता येतील. या तीन मुलांच्या मूर्तिशाळेतील व्हिडिओ सोबत देत आहोत.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search