Next
नाट्यवेडा धनू!
BOI
Thursday, May 24 | 06:45 AM
15 0 0
Share this storyशाळेत असल्यापासूनच असलेली नाटकांची आवड जोपासून धनंजय सरदेशपांडे यांनी आपल्यातील संवेदनशील माणूस जागृत ठेवून स्वतःतील नाटककाराला घडवत नेले. सामाजिक, पर्यावरणीय समस्या, स्त्रियांवरील अत्याचार अशा विविध विषयांना वाचा फोडणारी नाटकं, कथा, पथनाट्यं त्यांनी लिहिली. बालनाट्याची चळवळ सुरू केली. विविध नाटकं, शॉर्ट-फिल्म, मालिका यांमधून ते अभिनयही करतात. नाट्यक्षेत्राला जीवन वाहून घेतलेल्या धनंजय सरदेशपांडे यांची गोष्ट पाहू या ‘अनवट वाटेवरचे वाटसरू’ या सदरात...
........
धनंजय सरदेशपांडेही गोष्ट आहे माझ्या धनू नावाच्या मित्राची!!! धनंजय सरदेशपांडे हा माझा अकरावीत असल्यापासूनचा मित्र! धनंजय मूळचा मराठवाड्यातल्या परभणी या शहरातला! सेलू इथला रहिवासी. सेलू इथल्या नूतन विद्यालयात धनंजयचे वडील शिक्षक असल्यानं त्याचं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण सेलूमध्येच झालं. सेलूमधलं सांस्कृतिक वातावरण चांगलं असल्यानं शाळेत असल्यापासूनच धनंजयला नाटकाची गोडी लागली. कधी फॅन्सी ड्रेस स्पर्धा, तर कधी एकपात्री नाटकं/बालनाट्यं यांत भाग घेतल्यामुळे धनंजयला रंगमंचाची भीती कधी वाटलीच नाही. विजय तेंडुलकरांचं ‘कावळ्यांची शाळा’ हे नाटक आजही धनंजयच्या मनात आपला ठसा उमटवून आहे. नाटकाचं वेड लागलेल्या धनंजयला अभ्यासात मात्र जेमतेमच गुण मिळत राहिले. 

पुढलं महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी धनंजयच्या आई-वडिलांनी त्याला औरंगाबादला शिकायला पाठवलं. औरंगाबादच्या देवगिरी महाविद्यालयात वाणिज्य शाखेत प्रवेश घेतलेल्या धनंजयला औरंगाबादच्या न्यायालयाच्या ग्रंथालयात दोनशे रुपये महिना पगारावर नोकरी मिळाली. नोकरी आणि शिक्षण घेत असतानाच धनंजयने औरंगाबादला नाट्यशास्त्रातला डिप्लोमा करायचं ठरवलं. कॉलेजला असताना राज्य नाट्य स्पर्धेत ‘देवगिरी थिएटर्स’तर्फे ‘हैया हमला बोल’ या दोन अंकी नाटकात धनंजयनं अभिनय केला आणि मग तिथून एकीकडे शिक्षण, दुसरीकडे नोकरी आणि तिसरीकडे नाटक असा त्याचा प्रवास सुरू झाला. 

त्या वेळी जिकडे तिकडे वृक्षारोपणाचे कार्यक्रम होत असत; मात्र एकदा रोप लावलं, की त्या रोपाचं पुढे काय झालं हे कोणालाच ठाऊक नसे. एक इव्हेंट म्हणून, एक कार्यक्रम म्हणून वृक्षारोपण होतंय, तसंच बेसुमार लाकूडतोड, रस्तारुंदीकरणामुळे होणारी वृक्षतोड ही आपल्याच आसपास घडणारी दृश्यं पाहून धनंजयमधल्या नाटककाराला पर्यावरणाच्या ऱ्हासाचा विषय अस्वस्थ करू लागला. त्यातूनच त्याच्यातल्या बेचैनीनं त्याच्या हातात लेखणी दिली. या एकांकिकेनं संपूर्ण महाराष्ट्रात १००हून अधिक प्रयोग केले. अनेक राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये या एकांकिकेनं पारितोषिकं पटकावली. या निमित्तानं पर्यावरणाचा आणि वृक्षतोडीमुळे होणाऱ्या हानीचा प्रश्न सगळ्यांच्या मनावर ठसवण्याचा प्रयत्न धनंजयनं केला. 

यानंतर औरंगाबादमध्ये धनंजयनं आपल्या मित्रांच्या सहकार्यानं ‘स्नेहांकित’ नावाची नाट्यसंस्था स्थापन केली. या संस्थेद्वारे औरंगाबादमध्ये बालनाट्य चळवळ रुजली आणि फोफावू लागली. बुद्धाची गोष्ट, आदिंबाच्या बेटावर, गणपती बाप्पा हाजिर हो, हॅलो रोबो, भुताचा बाप, झिपऱ्या वेताळ, वडावरची चेटकीण, सावधान, अतिरेकी येत आहेत, गांधी व्हायचंय आम्हाला, डमडम डंबोला, चम चम चमको, ठोंब्या ठोंबीची गोष्ट, काही चुकल्यास क्षमस्व, मदर्स डे, सिद्राम सुडोकू, इन मीन साडे तीन, वुई वाँट चार्ली, जाईच्या कळ्या, चोर, काबुलीवाला, व्हॉट्सअॅपचा तमाशा, राजकन्येचे बंड, राजा झाला थंड, एलियन्स दी ग्रेट ही नाटकं धनंजयनं लिहिली आणि दिग्दर्शित केली. या बालनाट्यांनी औरंगाबादमधल्या बालनाट्य चळवळीला एक दिशा मिळाली. 

या प्रवासात अनेक अडथळे आले; पण कुठल्याही गोष्टीचा आणि अडचणींचा बाऊ करणं हे धनंजयच्या स्वभावातच नसल्यानं शांतपणे तो मार्ग चालत राहिला. ‘गणपतीबाप्पा हाजिर हो’ हे बालनाट्य सादर केलं आणि औरंगाबादच्या आबालवृद्धांना ते खूपच आवडलं. मग धनंजयच्या या बालनाट्याचं पुस्तकही प्रकाशित झालं. या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ आयोजित केला होता. अवघा महाराष्ट्र ज्यांना त्यांच्या ‘आई’ या कवितेनं ओळखतो ते विख्यात कवी फ. मुं. शिंदे यांच्या हस्ते पुस्तकाचं प्रकाशन होणार होतं. हे प्रकाशन वेगळ्या प्रकारे होणार होतं. हॉलमध्ये कोर्ट उभारलं गेलं होतं. या कोर्टातून मुलं फ. मुं. शिंदे यांना काही प्रश्न विचारणार होती. सगळी जय्यत तयारी झाली असताना अचानक तिथे सनातनी लोकांची गर्दी जमली आणि त्यांनी ‘हा हिंदू देवतेचा अपमान आहे’ असं म्हणून ‘गणपतीबाप्पा हाजिर हो’ या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या ठिकाणी येऊन निदर्शनं केली आणि कार्यक्रमात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. पुढे नाटक बघितल्यावर मात्र आपला विरोध अनाठायी असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. 

याच काळात धनंजयचा नाट्यशास्त्राचा डिप्लोमा पूर्ण झाला. तसंच त्याने पत्रकारितेचाही कोर्स पूर्ण केला. ‘एमकॉम’पर्यंतचं शिक्षण संपवून धनंजय ‘ओरिएंटल इन्शुरन्स’मध्ये नोकरीलाही लागला. काहीच काळात औरंगाबादहून पुण्याला बदली होताच धनंजयनं पुण्यातल्या ‘नाट्यसंस्कार कला अकादमी’ आणि कोल्हापूरच्या ‘बहुरूपी कलामंच’ या दोन संस्थांबरोबर जोडून घेऊन आपलं काम सुरूच ठेवलं. बालनाट्याबरोबरच संपूर्ण महाराष्ट्रात त्यानं बालनाट्य शिबिरं घ्यायला सुरुवात केली. या शिबिरात सहभागी झालेल्या मुलामुलींना बोलावं कसं, उभं कसं राहावं इथपासून ते त्यांच्यात आत्मविश्वास कसा निर्माण होईल, याचे धडे तो देऊ लागला. याच नाट्यशिबिरात मुलं थिएटर म्हणजे काय, नवरस कोणते, याही गोष्टी शिकू लागली. मुलांमध्ये चांगल्या मूल्यांची रुजवणूक करणं, त्यांना बोलतं करणं आणि त्यांना प्रोत्साहन देत राहणं याची खूप खूप आवश्यकता असल्याचं धनंजयला वाटतं. शिबिरात पहिल्या दिवशी आई-वडिलांचं बोट धरून आलेल्या मुला-मुलींमध्ये शिबिर संपल्यावर बदल झालेले पालकांना बघायला मिळू लागले.

गरजेतून लिखाण सुरू झालं आणि मनाला अस्वस्थ करणारा प्रत्येक विषय धनंजयकडे लेखनाची मागणी करत राहिला. त्यातूनच त्याची लेखणी लिहीत गेली. ‘रोपण खड्डा ओपन’, ‘मास्क’, ‘गर्भरेषा’, ‘मांजराच्या गळ्यात’, ‘फारच टोचलंय’, ‘इति श्री स्कंद पुराणे’, ‘मृत्यरोरमामं’, ‘प्रति गांधी’, ‘पाळी चुकली’ या एकांकिकांचं लेखन झालं. या एकांकिकांनी संपूर्ण महाराष्ट्रात अनेक प्रयोग केले आणि अनेक पारितोषिकंही पटकावली. 

एका बंदिस्त थिएटरमध्ये नाटकं करत असतानाच धनंजयने ‘कशाचा भारत बसलो चरत’, ‘अब तुम्हारे हवाले’, ‘पूर्वज’, ‘नयनी अश्रू घटले’, ‘येस, येस, फाइव्ह येस’, ही पथनाट्यं लिहिली आणि सादर केली. लोकांमध्ये ही पथनाट्यं करतानाचा प्रत्येक अनुभव वेगळा असायचा. केवळ कुतुहलापोटी थबकलेला प्रेक्षक नंतर संपूर्ण पथनाट्य होईपर्यंत जागचा हलायचा नाही. याचं कारण समोर घडणारा विषय त्याच्या जगण्याशी निगडित असायचा. त्या प्रश्नाचं उत्तर मिळालंच पाहिजे, असं त्या थांबणाऱ्याला वाटायचं आणि मग तो आपणच त्या पथनाट्याचा भाग असल्यागत जागीच खिळून राहायचा. कारगिल प्रश्नाच्या निमित्ताने सैनिकांची कथा आणि व्यथा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी धनंजयने ‘अब तुम्हारे हवाले’ हे पथनाट्य अनेक ठिकाणी सादर केलं. केवळ विद्यार्थीच नाही, तर सर्वच वयोगटातल्या लोकांनी या पथनाट्याची प्रशंसा केली. त्या वेळी वर्ल्ड कप सुरू असल्यानं जनता क्रिकेटच्या मॅचेसवर चर्चा करण्यात आणि मॅचेस बघण्यात गुंग झाली होती. अशा वेळी धनंजयला आपण शाळेत असतानाचं वातावरण आठवलं. ती प्रभातफेरी, हुतात्म्यांची आठवण, देशभक्तीनं भारलेली आणि वातावरणात दुमदुमणारी गाणी आठवली आणि यातूनच हे पथनाट्य साकारलं गेलं. 

कॉर्पोरेट कंपन्यांसाठी, तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी धनंजयने ‘फाइव्ह एस’ असं पथनाट्य बसवलं आहे. पाच जपानी एसची किमया या पथनाट्यातून उलगडते. काम करताना सॉर्टिंग कसं करावं, नको ते बाजूला करून क्रम कसा ठरवावा, शिस्त कशी असावी, टीमवर्कने काम कसं करावं, झालेल्या कामाचा पाठपुरावा कसा करावा या प्रश्नांना समोर ठेवून ती तत्त्वं नाट्यरूपात कर्मचाऱ्यांच्या मनात प्रभावीपणे रुजवली जातात. 

सीआयडीधनंजयच्या ‘पूर्वज’ या पथनाट्यात दोन माकडांचा खेळ दाखवलाय. यातलं माकड-माकडिणीचं दाम्पत्य माणसांसारखं वागायला जातं, तेव्हा माणसाला ते दृश्य आणि त्यांचे संवाद पाहून मनोमन लाज वाटते. हुंड्यासारख्या पसरत चाललेल्या रोगावर धनंजयनं माकड आणि माकडीण यांच्या खेळातून नाटक लिहिलं होतं. माणसाचा मृत्यू झाल्यावर तेरावा हा विधी करतात. या रुढीचा आधार घेऊन या रुढीपरंपरेच्या आहारी गेलेला समाज आणि त्यातून निर्माण होणारे प्रश्न धनंजयनं ‘तर्पण’ या नाटकात मांडले आहेत. धनंजयचं हे नाटक नभोनाट्याच्या स्वरूपात आकाशवाणी औरंगाबाद केंद्रावर प्रसारित झालं. तसंच या नाटकाला राज्य शासनाचा लेखनाचा पुरस्कारही मिळाला. ‘प्रत्यंचा’ या नाटकात घरातलीच वडिलांसमान व्यक्ती मुलीवर बलात्कार करते आणि मग या बलात्काराला वाचा कशी फुटते, मुलीला न्याय मिळतो का या प्रश्नाबाबत त्यानं लिहिलं आहे. या नाजूक बाबतीत आजही अनेक घरांत अशा गोष्टी दाबल्या-दडपल्या जातात, त्यावर धनंजयने प्रश्न उपस्थित केला आहे. ‘उलगुलान’ या नाटकातून धनंजयने नर्मदा बचाव आंदोलन डोळ्यांसमोर ठेवून धरणग्रस्तांच्या समस्या आणि त्यासाठी लढणारी स्त्री उभी केली. 

कट्टी-बट्टीयानंतर धनंजयनं ‘लाली’, ‘वेआउट’, ‘बायकांची स्वारी राजाच्या दारी’, ‘अस्वस्थ सूर्यास्त’, ‘कातळडोह’ ही नाटकं लिहिली आणि सादर केली. याचबरोबर ‘येथे वेळ आहे कुणाला’, ‘कथारहस्य’, ‘मास्क’, ‘स्वामी रामानंद तीर्थ’, ‘दिव्यत्वाची जेथ प्रचिती’, ‘महात्मा गांधी’ ही नभोनाट्यं औरंगाबाद आकाशवाणी केंद्रावर सादर केली गेली. यातल्या बहुतांश नाटकांना जाईल तिथे पारितोषिकं मिळाली. औरंगाबाद आकाशवाणी केंद्रावरून प्रसारित झालेल्या ‘दिव्यत्वाची जेथ प्रचिती’ या रूपकाला राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. ‘खाली डोके वर पाय’ या धनंजयने लिहिलेल्या चित्रपटाने कान्स महोत्सवात सहभाग घेतला. ‘तर्पण’ या नाटकाला राज्य शासनाचा राज्यस्तरीय पुरस्कार बहाल करण्यात आला. सोनी टीव्हीवरून प्रसारित होणाऱ्या सीआयडी या लोकप्रिय मालिकेतही धनंजयनं आपल्या अभिनयानं एक वेगळा ठसा उमटवला. ‘तुकाराम’, ‘मसाला’, ‘सलाम’, ‘रमा माधव’, ‘चेतन रणजित देशमुख’, ‘राक्षस’ या चित्रपटांमध्ये धनंजयनं भूमिकाही केल्या.

भुताचा जन्म‘भुताचा जन्म’ या द. मा. मिरासदार यांच्या कथेवर आधारित शॉर्ट फिल्ममध्ये धनंजयने भाऊ कदमबरोबर अभिनय केला आणि या फिल्मची अमेरिकेमध्ये क्यूस्ट फेस्टिव्हलसाठी निवड झाली. यात सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता म्हणून धनंजयला मानांकन मिळालं. भारत, अमेरिका, रोम अशा अनेक ठिकाणी निवड झालेली ही अॅवॉर्ड विनिंग शॉर्ट फिल्म आहे. (ही शॉर्ट फिल्म https://youtu.be/AhtGak2psBM या लिंकवर पाहता येईल.) सध्या धनंजय ‘कट्टी बट्टी’ या झी युवा चॅनेलवर सुरू असलेल्या मालिकेत काम करतोय. 

सध्या पुण्यामध्ये धनंजय आणि त्याची टीम एक अनोखा प्रयोग राबवत आहे. तो आणि त्याची टीम पुण्यातल्या अनेक सोसायट्यांमध्ये जाऊन अभिवाचनाचे प्रयोग करते. हे प्रयोग मोफत केले जातात. त्यासाठी मानधन घेतलं जात नाही. वाचिक अभिनय आणि नाटक या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचाव्यात, त्यामुळे आपल्या पाल्यांमध्ये काय फरक पडू शकतो हे पालकांना समजावं, अनेक स्तरांतल्या लोकांशी संवाद आणि मैत्र वाढावं या हेतूने हा उपक्रम धनंजय करतो आहे. त्याला पुण्यातून चांगलाच प्रतिसाद मिळतो आहे. (या उपक्रमाविषयी सविस्तर लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.) विविध ठिकाणी होणाऱ्या नाट्यस्पर्धांत परीक्षक म्हणूनही धनंजयचा सहभाग असतो. 

गिरीश कुलकर्णींसह धनंजय सरदेशपांडेधनंजयने आजपर्यंत अनेक नाटकं केली, मराठी चित्रपटांमधून छोट्या-मोठ्या भूमिका केल्या. त्याला स्वतःला मात्र ‘समाजस्वास्थ’ हे र. धों. कर्वे यांच्या जीवनावर आधारित असलेलं नाटक खूप आवडतं. या नाटकाचे दिग्दर्शक अतुल पेठे यांच्या सान्निध्यात राहिल्यामुळे आणि त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाल्यामुळे आपण खूप समृद्ध होत चाललो असल्याची भावना तो व्यक्त करतो. या नाटकात काम करताना अतुल पेठे यांनी नाटकातल्या सर्वांना सिंहगडावर नेऊन लैंगिक शिक्षणावरची कार्यशाळा आयोजित केली होती. यामुळे नाटकात काम करताना त्या त्या पात्रांच्या मनातले ‘टॅबू’ गळून पडले. अनेक गोष्टींवरची आपली मतं किती पोकळ आणि तकलादू आहेत, हे लक्षात आलं, असं धनंजय म्हणतो. तसंच ‘समाजस्वास्थ्य’ या नाटकात कर्वेंची भूमिका करणारा अभिनेता गिरीश कुलकर्णी हा एक अभिनेता म्हणून किती ताकदीचा आहे आणि तो माणूस म्हणूनही किती मोठा आहे याबद्दलही धनंजय खूप भरभरून बोलतो. ‘नाटक ‘पॉज’ मध्ये घडत असतं,’ हे गिरीश कुलकर्णीचं वाक्य धनंजयच्या मनावर ठसलं आहे. 

कुटुंबासह धनंजय सरदेशपांडे

आपल्या या प्रवासात आपले मित्र, आपली टीम (सुयश झुंझुरके आणि इतर सर्व) आणि आपलं साथ देणारं कुटुंब यांचा खूप मोठा वाटा असल्याचं धनंजय आवर्जून सांगतो. त्यातही आपल्या प्रत्येक पावलावर हसतमुखानं सोबत असणारी आपली जोडीदार मंजू हिच्या साथीशिवाय हा नाट्यप्रवास शक्यच झाला नसता, असं धनंजयला वाटतं. 

अनेकदा डोळ्यांतून बोलणारा, समोरच्याच्या सुखदुःखानं आतून हलणारा हा मित्र जेव्हा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांबरोबर संवाद साधतो, तेव्हा दुःखानं बधिर झालेली मुलं त्याच्या सहवासात मोकळी होतात. रिमांड होममधल्या मुलांबरोबर बोलतो, तेव्हा कोरडी असलेली मुलं धनंजय परतीच्या प्रवासाला निघतो तेव्हा रडवेली होतात. आई-वडिलांच्या धाकात असलेली मुलं धनंजयला आपल्या मनातलं सगळं काही सांगत राहतात. त्यांच्यात दडलेले सुप्त गुण, त्यांच्यातल्या कला धनंजयला त्यांच्याशी बोलताना सहजपणे कळत जातात आणि आपल्याला प्रोत्साहन देणारा हा आपला शिबिरातला मार्गदर्शक नसून, आपलाच एक मित्र आहे असं मुलांना वाटायला लागतं. 

लेखिका दीपा देशमुख यांच्यासह धनंजय सरदेशपांडेआज आमची कामाची क्षेत्रं जरी वेगवेगळी झाली असली, तरी धनंजय आणि मी, मित्र म्हणून सोबतच वाटचाल करत आहोत. जमेल तसं भेटत असतो. कौतुकाची थाप एकमेकांच्या पाठीवर मारत असतो. कोणाशीही वैर नसलेला, कोणाविषयीही आकस नसलेला, जगताना फार मोठ्या महत्त्वाकांक्षांचं ओझं न बाळगणारा, साधेपणानं जगणारा असा हा माझा मित्र फक्त माझाच नाही, तर अनेक आबालवृद्धांचा मित्र बनला आहे आणि जगण्यातले प्रश्न सोपे करत आनंदाची फुलं वाटेवर उधळत चालला आहे. 

संपर्क : धनंजय सरदेशपांडे
मोबाइल : ९९२३३ ११६३८
ई-मेल : sdhanu00@gmail.com 

- दीपा देशमुख
मोबाइल : ९५४५५ ५५५४०
ई-मेल : deepadeshmukh7@gmail.com

(दीपा देशमुख या प्रसिद्ध लेखिका असून, त्या वैविध्यपूर्ण विषयांवर लेखन करतात. दर १५ दिवसांनी, गुरुवारी प्रसिद्ध होणाऱ्या ‘अनवट वाटेवरचे वाटसरू’ या त्यांच्या लेखमालेतील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/M3NCtW या लिंकवर उपलब्ध आहेत.)


 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
विनोद सिनकर About 239 Days ago
धनंजयं सरदेशपांडेचा अतिशय आगळावेगळा प्रवास दीपा देशमुख यांच्या या लेखामुळे समजला. लेखक व नाट्यवेडे धनंजय सरदेशपांडे यांचे हार्दिक अभिनंदन!!! पुढील प्रवासास मनःपूर्वक अनंतकोटी शुभेच्छा !!!
0
0
Sangeeta Kumthekar About 241 Days ago
खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचाली साठी शुभेच्छा...👍
0
0
Sanjay Rajurkat About 241 Days ago
Sunder
0
0
Mahesh Vaidya About 242 Days ago
Dear Dhanjay on reading your above achievements I really feel proud to say that I am associated with you being an OICIAN n from our Aurangabad. Wishing you All the Best in your future endeavors👍
0
0
Ar. ChandrashekharBurande About 242 Days ago
दीपा देशमुख यांच्या सिद्धहस्त लेखातून धनंजयं सरदेशपांडेचा अतिशय आगळावेगळा प्रवास समजला. लेखक व नाट्यवेडे धनंजय सरदेशपांडे यांचे अभिनंदन. दोघांच्याही पुढील प्रवासास मनपूर्वक शुभेच्चा!!
0
0
सतीश बोरा About 242 Days ago
ही तर सुरुवात आहे.धनुदा म्हणजे "बाबाजि की पोटलि" अजून काय काय बाहेर येइल हे सांगण कठीण आहे . बेस्ट ऑफ लक धनुदा. . .
0
0

Select Language
Share Link