Next
राधाकृष्ण नार्वेकर यांना मुंबई मराठी पत्रकार संघाचा आचार्य अत्रे पुरस्कार जाहीर
BOI
Monday, July 15, 2019 | 12:42 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे दिला जाणारा ‘आचार्य अत्रे पुरस्कार’ यंदा ज्येष्ठ पत्रकार राधाकृष्ण नार्वेकर यांना दिला जाणार आहे. पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे यांनी नुकतीच ही माहिती दिली. आचार्य अत्रे यांच्या जयंतीदिनी, १३ ऑगस्टला हा पुरस्कार नार्वेकर यांना समारंभपूर्वक हा पुरस्कार देण्यात येईल, असे वाबळे म्हणाले.

मराठी पत्रकारितेत सुमारे पाच तपे कार्यरत राहिलेल्या नार्वेकर यांनी दैनिक नवा काळचे बातमीदार ते संपादक, दैनिक सकाळचे संपादक, दैनिक पुण्यनगरी या वृत्तपत्र समूहाचे सल्लागार संपादक अशी महत्त्वाची, जबाबदारीची पदे भूषविली आहेत. मुंबईतील दैनिक सकाळच्या संपादकपदावरून निवृत्त झाल्यावर नार्वेकर यांनी लिहिलेले ‘सेवानिवृत्त झालात, आता पुढे काय?’ हे पुस्तक लोकप्रिय ठरले. उर्दू भाषेतही त्याचा अनुवाद झाला असून, हिंदी व इंग्रजी भाषेतील अनुवाद लवकरच प्रकाशित होणार आहे. 

त्यांनी लिहिलेले ‘मनातली माणसं’ हे पुस्तकही प्रकाशित झाले आहे. मुंबईतील अनेक नामवंत पत्रकार आणि संपादक घडविण्यासाठी नार्वेकर यांनी दिलेले योगदान अमूल्य आहे. माथाडी कामगारांना त्यांचे हक्क मिळावेत, गिरणी कामगारांना न्याय मिळावा, नवी मुंबईमधील प्रकल्पग्रस्तांच्या हक्कांचे रक्षण व्हावे, वसई–विरार, मुरबाड, उल्हासनगर, ठाणे, नवी मुंबई, पालघर, शहापूर या शहरांचा विकास व्हावा, या हेतूने मुंबई सकाळच्या माध्यमातून विशेष पुरवण्या प्रकाशित करून या शहरांच्या विकासातील आपली जबाबदारी त्यांनी पार पाडली आहे. या उपक्रमांची शासनानेदेखील दखल घेतली आहे. या पुरवण्या निश्चितच मार्गदर्शक व संग्राह्य ठरल्या आहेत. 

दूरदर्शनचा सह्याद्री वाहिनीचा नवरत्न पुरस्कार त्यांना मिळाला आहे. अनेक महत्त्वाचे पुरस्कार प्राप्त झालेले नार्वेकर संपादक या नात्याने अमेरिका, जपान, रशिया, इस्राइल, बांगलादेश, सिंगापूर, मलेशिया, थायलंड अशा विविध देशांतील महत्त्वाच्या घटनांचे साक्षीदार राहिले आहेत. लोणावळा येथील दि. गो. तेंडुलकर स्मृतिमंदिर उभारण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. किंबहुना, त्यांच्याच पुढाकाराने निसर्गरम्य परिसरातील पत्रकार संघाची ही वास्तू उभी राहिली आहे. 

‘मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष आणि विश्वस्त म्हणून काम केलेल्या राधाकृष्ण नार्वेकर यांना आचार्य अत्रे यांच्या नावाचा पुरस्कार देताना पत्रकार संघाला आनंद होत आहे. आचार्य अत्रे यांच्याप्रमाणेच शिक्षकी पेशामधून पत्रकारितेचा मार्ग स्वीकारून समाजहितासाठी झटणारे आणि अनेकांना तसे झटण्याची प्रेरणा देणारे नार्वेकर यांनी हा पुरस्कार स्वीकारण्यास अनुमती दिल्याने आमचा आनंद द्विगुणित झाला आहे,’ असे पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे यांनी म्हटले आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search