Next
स्मरण एका भाषायोद्ध्याचे...
BOI
Monday, March 19, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this story

डॉ. राममनोहर लोहिया (पोर्ट्रेट : lohiatoday.com)डॉ. राममनोहर लोहिया म्हणजे इंग्रजीवर प्रभुत्व असूनही इंग्रजीची गुलामी मान्य नसणारा एक विरळा नेता. भारतीय भाषांच्या संदर्भात जेवढे चिंतन डॉ. लोहियांनी केले आणि इंग्रजीच्या विखारी स्वरूपाबाबत जनजागृती केली, तेवढी अन्य कोणी क्वचितच केली असावी. आज लोहिया लोकांना कसेबसे आठवतात. त्यांनी जे सांगितले ते कोणालाही आठवत नाही. २३ मार्चला त्यांची जयंती आहे. त्या निमित्ताने त्यांच्या भाषाविषयक विचारांबद्दलचा हा लेख..
.......
भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीची गोष्ट. एक तरुण आपली पी. एचडी. करण्यासाठी जर्मनीच्या बर्लिन विद्यापीठात गेला होता. त्या तरुणाचे मार्गदर्शक होते तेव्हाचे प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ प्रा. व्हर्नर जोम्बार्ट. या गुरूची निवड स्वतः विद्यार्थ्याने केली होती. आपल्या गुरूशी झालेल्या पहिल्या भेटीत या तरुणाने त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे इंग्रजीत दिली; मात्र गुरूने सांगितले, की मला इंग्रजी येत नाही. तेव्हा त्या तरुणाने तडक त्यांना आश्वासन दिले, की तीन महिन्यांच्या आत मी जर्मन भाषा शिकीन आणि तुमच्याकडे ज्ञान प्राप्त करीन.

तीन महिन्यांनी खरोखर तो तरुण प्रा. जोम्बार्ट यांच्याकडे परत आला. या वेळी त्याला जर्मन येत होती. पुढे त्याने आपला शोध प्रबंध जर्मनमध्येच सादर केला आणि पीएचडीही मिळविली. या प्रबंधाचा विषय होता ‘मिठाचा सत्याग्रह’. तो तरुण म्हणजे थोर समाजवादी नेते आणि देशातील ‘अंग्रेजी हटाओ’ चळवळीचे जनक डॉ. राममनोहर लोहिया. देशातील गैर-काँग्रेसवादाचे प्रणेते म्हणून डॉ. लोहिया आजही ओळखले जातात. त्यांचे अनेक शिष्य आज राजकारणात मोठ्या स्थानी आहेत. परंतु भारतीय भाषांच्या संदर्भात जेवढे चिंतन डॉ. लोहियांनी केले, त्यासाठी जेवढे जिवाचे रान केले आणि इंग्रजीच्या विखारी स्वरूपाबाबत जनजागृती केली, तेवढी अन्य कोणी क्वचितच केली असावी.

२३ मार्च ही डॉ. राममनोहर लोहिया यांची जयंती. आज ते असते, तर १०८ वर्षे वयाचे असते. परंतु आज भारतीय भाषांची स्थिती आणि इंग्रजीबाबत लोकांची अनावर ओढ पाहिली असती, तर त्यांना मेल्याहून मेल्यासारखे झाले असते. इंग्रजीवर प्रभुत्व असूनही इंग्रजीची गुलामी मान्य नसणारा हा एक विरळा नेता होता.

डॉ. लोहिया यांचे भाषाविषयक चिंतन सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक चिंतनाशी खोलवर जोडलेले आहे. जर्मनीतील त्या एका प्रसंगाने त्यांना एक शिकवण दिली होती, की कोणत्याही राष्ट्राच्या वैज्ञानिक प्रगतीमध्ये मातृभाषेची महत्त्वाची भूमिका असते. जर्मनी, अमेरिका, सोव्हिएत रशिया, जपान, इंग्लंड इत्यादी देश विज्ञान, तत्त्वज्ञान, गणित इत्यादी विषयांत पुढे गेले आहेत, त्यामागे एक महत्त्वाचे कारण म्हणजे ते मातृभाषेत अध्ययन, अध्यापन करतात.

त्याचमुळे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर डॉ. लोहिया यांनी ‘अंग्रेजी हटाओ’ आंदोलनाची हाक दिली. ब्रिटिश या देशातून गेल्यावरही इंग्रजीला या देशातून हद्दपार करण्यास सत्ताधारी का-कू करत होते. ‘हिंदीला आधी विकसित होऊ द्या, कामकाजाच्या लायक होऊ द्या म्हणजे इंग्रजीला घालवू,’ असा त्यांचा युक्तिवाद होता. डॉ. लोहियांना तो अजिबात मान्य नव्हता. ‘एखादी भाषा वापरातूनच विकसित होते, विकसित झाल्यामुळे वापरात येत नाही,’ असा त्यांचा अगदी योग्य तर्क होता. इंग्रज गेले तर इंग्रजीही जायलाच पाहिजे, असा त्यांचा आग्रह होता.

त्यांचे हे आंदोलन चालू असतानाच वेगवेगळ्या भारतीय भाषांमध्ये संघर्ष पेटला. दक्षिण भारतात हिंदीविरोधी आंदोलन पेटले. उत्तर भारताच्या दडपशाहीचे प्रतीक म्हणून हिंदीचे चित्रण करण्यात आले. खुद्द लोहिया यांनाही या आंदोलनात दगडफेक सहन करावी लागली. परंतु त्यांनी आपला आग्रह सोडला नाही. अन् दुर्दैव म्हणजे हा मुद्दा आजही सुटलेला नाही. यावर डॉ. लोहिया यांनी सुचविलेला तोडगा काय होता? ते म्हणत -

‘लोकांच्या इच्छेवाचून आता इंग्रजीचा सार्वजनिक वापर काढून टाकणे हे अशक्य आहे. इंग्रजीला भारतातून हळूहळू घालविण्याचे भारत सरकारने स्वीकारलेले धोरण हे इंग्रजीला कायमस्वरूपी ठेवण्यापेक्षा अधिक धोकादायक सिद्ध होत आहे. मुख्य समस्या ही हिंदी आणण्याची नसून, ती इंग्रजी हटविण्याची आहे. हे स्पष्टीकरण आवश्यक आहे. कारण म्हैसूर (तत्कालीन कर्नाटक), बंगाल, तमिळनाडूसारख्या गैर-हिंदीभाषक राज्यांना हिंदीचा वापर न करण्याचा पर्याय असायला हवा. त्यांनी स्वत:च्या भाषेचा जरूर वापर करावा. परंतु त्यांनी इंग्रजीलाही काढून टाकणे आवश्यक आहे.

एक योग्य भाषा धोरण उत्क्रांत झाले आहे. केंद्र सरकारची राजपत्रित पदे गैर-हिंदीभाषक राज्यांकरिता दहा वर्षांसाठी राखीव केल्यानंतर हिंदी ही त्वरित केंद्र सरकारची भाषा व्हायला हवी. केंद्राने राज्यांशी हिंदी भाषेत पत्रव्यवहार करावा, तर राज्यांनी हिंदी शिकेपर्यंत स्वतःच्या भाषांमध्ये केंद्राशी पत्रव्यवहार करावा. पदवीपर्यंतच्या शिक्षणाचे माध्यम प्रादेशिक भाषा असाव्यात आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाचे माध्यम हिंदी असावे. जिल्हा न्यायाधीश आणि दंडाधिकाऱ्यांनी आपल्या प्रादेशिक भाषांचा वापर करावा, तर उच्च न्यायालयाने आणि सर्वोच्च न्यायालयाने हिंदुस्थानीचा उपयोग करावा. लोकसभेतील भाषणे सर्वसाधारणपणे हिंदुस्थानीत केले पाहिजे. परंतु ज्यांना हिंदी माहीत नसेल, त्यांना स्वतःच्या भाषांमध्ये करता आली पाहिजेत. हे योग्य भाषा धोरण असेल. हे धोरण स्वीकारण्यास नाखूश असलेल्या आणि स्वतःची प्रादेशिक भाषा पुढे चालू ठेवण्याची इच्छा असलेल्या राज्यांना तसे करण्याची मोकळीक असायला हवी. राष्ट्रहिताच्या दृष्टीने इंग्रजीची हकालपट्टी यालाच आपले प्राधान्य असायला हवे, हिंदी आणण्याला नाही. कालांतराने हिंदी संपूर्ण भारतीय पातळीवर स्थापित होईल हे निश्चित आहे. परंतु काही राज्यांमध्ये आणि अगदी राष्ट्रीय पातळीवरही मराठी किंवा बंगाली भाषा स्थापित झाली, तर आपण त्याला हरकत घेता कामा नये.

उच्च जातीचे आणि उच्च वर्गातील, तसेच सत्ता, कायदा, सेना आणि उच्च सरकारी पदांवर बसलेल्या लोकांना आपला स्वार्थ साधण्यासाठी इंग्रजीला कायम ठेवायचे आहे. त्यासाठी ते विविध भाषांमध्ये वाद पेटवत आहेत. आज शाळा व महाविद्यालयांमध्ये इंग्रजी हा एक विषारी विषय आहे. त्यामुळे देशाचे नुकसान होत आहे. आपले ७०-८० टक्के विद्यार्थी सर्वसामान्य बुद्धिमत्तेचे असतात. इंग्रजीचे ज्ञान मिळविण्यातच त्यांची एवढी ऊर्जा खर्च होते, की भूगोल, इतिहास, विज्ञान अशा विषयांचे पुरेसे ज्ञान मिळविणे त्यांना शक्य होत नाही. 

ही डॉ. राममनोहर लोहियांची मांडणी. एवढे अचूक निदान एखादा डॉक्टरच करू शकतो. याची जिवंत उदाहरणे आजही आपण आजूबाजूला पाहू शकतो. देशाच्या स्वातंत्र्यसंग्रामात राष्ट्राची बाजू पार युरोपमध्ये मांडणारा हा कार्यकर्ता होता. स्वातंत्र्याची लढाई लढलेला हा सेनानी स्वातंत्र्यानंतर भाषेची लढाई देत होता. आज लोहिया लोकांना कसेबसे आठवतात. त्यांनी जे सांगितले ते कोणालाही आठवत नाही. ते आठवणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.

– देविदास देशपांडे
ई-मेल : devidas@dididchyaduniyet.com

(लेखक मुक्त पत्रकार व अनुवादक असून, भाषा हा त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे. ‘बाइट्स ऑफ इंडियावर दर सोमवारी प्रसिद्ध होणारे त्यांचे सर्व लेख https://goo.gl/wvsqQ8 या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)

(सोमय्या आणि अरुणा रावेला या समाजवादी दाम्पत्याच्या सहकार्याने तयार करण्यात आलेल्या www.lohiatoday.com या संकेतस्थळावर डॉ. लोहिया यांच्याबद्दलची दुर्मीळ माहिती, त्यांचे लेखन, विचार आणि व्हिडिओ क्लिप्स आदी साहित्य अभ्यासकांसाठी उपलब्ध आहे.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link