Next
गम की अंधेरी रात में...
BOI
Sunday, February 10, 2019 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रतिभावान गीतकार जाँ निसार अख्तर यांचा आठ फेब्रुवारी हा जन्मदिन. त्या निमित्ताने, ‘सुनहरे गीत’ सदरात आज आस्वाद घेऊ या त्यांनी लिहिलेल्या ‘गम की अंधेरी रात में...’ या गीताचा...
...........
जाँ निसार अख्तर हे हिंदी चित्रपटसृष्टीतील गीतकार!अर्थातच आवडत्या पाच गीतकारांच्या नावात कोणी चित्रपटप्रेमी त्यांचे नाव सांगण्याची शक्यता दुर्मीळच! परंतु ‘बेचैन नजर बेताब जिगर...’ (यास्मिन), ‘आँखों ही आँखों में इशारा हो गया...’ (सीआयडी), ‘मैं तुम्हीं से पूँछती हूँ...’ (ब्लॅक कॅट), ‘आ जा रे मेरे दिलबर आजा...’ (नूरी) अशी छान गीते आवडणारे अनेक चित्रपटप्रेमी भेटतील! कोणी त्या गीताची चाल, संगीत यासाठी ते गीत लक्षात राहते असे म्हणेल, तर कोणी त्या गीताचा गायक अगर गायिका यांना श्रेय देईल! परंतु या सर्वांबरोबर त्या गीतातील शब्दही महत्त्वाचे असतात. चालींना साजेसे, पण अर्थपूर्ण, आशयसंपन्न! आणि हेच शब्द काव्यरूपाने लिहिणारे गीतकारही महत्त्वाचे असतात.

जाँ निसार अख्तर अशाच गीतकारांपैकी एक होते... आठ फेब्रुवारी १९१४ ही त्यांची जन्मतारीख! ग्वाल्हेर येथे जन्मलेल्या या कवीचे वडील मुजतर खैराबादी हे उर्दूतील मोठे शायर होते. वडिलांपासून प्रतिभेचा वारसा घेऊन आलेल्या अख्तर यांनी अलीगढ विश्वविद्यालयातून ‘एमए’पर्यंतचे शिक्षण घेऊन भोपळला प्राध्यापक म्हणूनची नोकरी स्वीकारली. या सर्व कालावधीत त्यांनी आपल्यातील काव्यप्रतिभा जोपासत, फुलवत एक प्रसिद्ध कवी म्हणूनही लोकप्रियता मिळवली होती.

सन १९४८मध्ये नवयुग चित्रसंस्थेच्या ‘शिकायत’ चित्रपटाद्वारे त्यांचा हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश झाला! १९५०च्या ‘आरजू’ आणि ‘खेल’ या दोन चित्रपटांत एक-एक गीत लिहिण्याची संधी त्यांना मिळाली आणि १९५३च्या सुप्रसिद्ध ‘अनारकली’ चित्रपटातही त्यांच्या ‘ओ जाने वफा’ या एकाच गीताचा समावेश करण्यात आला होता. १९५४पर्यंत हे असेच चालू राहिले होते. 

परंतु १९५५ पासून स्वतंत्ररीत्या संपूर्ण चित्रपटातील सर्व गीते लिहिण्याचे काम त्यांना मिळाले आणि त्यामधूनच ‘यास्मिन’, ‘हसीना’, ‘बाप रे बाप’ या चित्रपटांतील त्यांनी लिहिलेली गाणी रसिकांपर्यंत पोहोचली. संगीतकार ओ. पी. नय्यर यांच्याबरोबर त्यांची जोडी जमली व त्या दोघांनी साठच्या दशकात अनेक मधुर गीते दिली. बाप रे बाप, सीआयडी, छू मंतर, ढाके की मलमल, नया अंदाज, कैदी, उस्ताद, रागिणी अशा अनेक चित्रपटांतील गीतांचा त्यात समावेश आहे 

जाँ निसार अख्तर ज्या काळात हिंदी चित्रपटसृष्टीत आले, त्या वेळी शैलेंद्र, हसरत जयपुरी, साहिर, शकील, मजरूह अशा प्रतिभासंपन्न गीतकारांना एकेका नामवंत संगीतकारांनी निवडून आपापल्या जोड्या बनवल्या होत्या. त्यामुळेच १९७०च्या दशकात तर आपल्याला असे दिसते, की संगीतकार एन. दत्ता अगर सी. अर्जुन यांच्याबरोबरच जाँ निसार अख्तर यांनी काम केले होते. अर्थात तरीही ब्लॅक कॅट, दो भाई, मंगू दादा, सुशीला अशा काही चित्रपटांकरिता त्यांनी लिहिलेली गीते रसिकांना भावली होती.

संगीतकार सज्जाद हुसेन, उषा खन्ना, जयदेव, खय्याम, सपन जगमोहन या संगीतकारांच्या धूनकरिता अख्तर त्यांनी आपले अप्रतिम शब्द दिले आणि त्यामधून रुस्तम सोहराब, नूरी, रझिया सुलतान, आवरा बादल इत्यादी चित्रपटांची गीते रसिकांपर्यंत पोहोचली. त्यांनी काही गैरफिल्मी गीतेही लिहिली असून, ती मोहम्मद रफी, बेगम अख्तर, मुबारक बेगम, तलत मेहमूद त्यांनी गायली आहेत. त्यांचे पाच काव्यसंग्रह प्रकाशित झाले होते. त्यापैकी ‘खाक - ए – दिल’ या काव्यसंग्रहाकरिता त्यांना १९७३चा ‘ सोव्हिएत लँड नेहरू’ पुरस्कार, तसेच १९७६चा साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला होता.

१९६७मध्ये जाँ निसार अख्तर यांनी ‘बहूबेगम’ या चित्रपटाची निर्मिती केली होती. १९७०नंतरच्या काळातही त्यांची काही गीते लोकप्रिय झाली. त्यामध्ये १९७३च्या ‘प्रेम पर्बत’ चित्रपटातील ‘ये दिल और उन की निगाहों के साये’ हे जयदेव यांनी संगीतबद्ध केलेले, लता मंगेशकर यांनी गायलेले गीत आजही श्रवणीय आहे.

२८ ऑगस्ट १९७६ रोजी वयाच्या ६३व्या वर्षी त्यांचे निधन झाले; पण १९७९चा ‘नूरी’ आणि १९८३चा ‘रझिया सुलतान’ या चित्रपटांत त्यांची गीते होती. मृत्यूपूर्वी त्यांनी आपला मुलगा ‘जावेद’ याचे पटकथा-संवाद लेखनातील यश व लोकप्रियता अनुभवली. प्रसिद्ध लेखकद्वयी ‘सलीम-.जावेद’ यामधील जावेद हे त्यांचे पुत्र आहेत.

अशा या गीतकाराचे एक आशयसंपन्न, सुनहरे गीत आपण आज येथे पाहणार आहोत. परंतु ते गीत पडद्यावर कोणावर चित्रित झाले आहे, हे आपणाला कळू शकत नाही. ते का, या प्रश्नाच्या उत्तरासाठी हे गीत ज्या चित्रपटातील आहे, त्यामागची थोडी हकीकत आपण जाणून घेऊ! ‘सुशीला’ नावाचा हिंदी चित्रपट १९६६मध्ये तयार झाला होता. ‘श्री विनायक चित्र, मुंबई’ या चित्रसंस्थेने तो तयार केला होता. त्यासाठी संगीतकार सी. अर्जुन यांनी सहा गीते तयार केली होती. त्यापैकी ‘गम की अंधेरी रात में....’ हे तलत मेहमूद आणि मोहम्मद रफी यांनी गायलेले व जाँ निसार अख्तर यांनी लिहिलेले गीत N54437 क्रमांकाच्या रेकॉर्डद्वारे रसिकांपर्यंत पोहोचले व त्या गीताने लोकप्रियताही मिळवली. आजही ते गीत रसिकांकडून आवर्जून ऐकले जाते. अन्य पाच गीते विस्मरणात गेली आहेत. 

असा हा ‘सुशीला’ चित्रपट १९६६मध्ये प्रदर्शित झाल्याची नोंद सापडत नाही. त्यामधील कलावंत कोण याचा शोध घेतला, तर फक्त ललिता देसाई एवढे एकाच नाव कळते. परंतु या चित्रपटातील गीते १९७७मध्ये प्रदर्शित झालेलया ‘सुबह जरूर आयेगी’ या चित्रपटात घेतली होती. ‘सुशीला’चे दिग्दर्शक महेंद्रप्राण हेच १९७७च्या या चित्रपटाचे दिग्दर्शक होते; पण तेथे त्यांच्या जोडीला दत्त चौहान हेही नाव नमूद आहे. ‘सुबह जरूर आयेगी’ या चित्रपटाच्या ‘बुकलेट’वरून असे समजते, की ‘सुशीला’ चित्रपटाच्या कथानकात थोडाफार बदल करून व चित्रपटाचे शीर्षक बदलून, पण त्यातील गीतेच यामध्ये घेऊन हा चित्रपट झाला होता. आशू, महेशराज असे नायक-नायिका त्यात होते; पण हा चित्रपट केव्हा आला व केव्हा गेला, हे चित्रपटप्रेमींना कळलेच नाही. श्री देवी फिल्म्स कर्नाटक या चित्रसंस्थेचा हा चित्रपट होता. 

चित्रपटसृष्टीत हे असेही घडते आणि चित्रपटगीताच्या बाबत त्यांचेही एक नशीब असते, असे म्हणावे लागते. चित्रपटगीत असूनही पडद्यावर कोण आहे, हे न दिसता मोहम्मद रफी व तलत यांच्या छायाचित्रासह आपणाला हे गीत यू-ट्यूबच्या माध्यमातून बघावे लागते. 

हे गीत दर्शनीय आनंद देत नसले, तरी सी. अर्जुन यांच्या संगीतामुळे, मोहम्मद रफी आणि तलत मेहमूद यांच्या मधुर स्वरांमुळे आणि जाँ निसार अख्तर यांच्या अप्रतिम काव्यरचनेमुळे आजही श्रवणीय आहे. या गीताचा आशय काय आहे, भावार्थ काय आहे?

... तर हे गीत आहे मानवी मनाच्या संवादाचे! एक मन दुसऱ्या मनाला सांगते, हे असे कर, दुसरे मन म्हणते असेच का करायचे? हे विचारांचे द्वंद आपल्या सर्वांच्या मनात अनेक वेळा, अनेक प्रसंगी होत असते. आणि असे द्वंद्व ‘जीवन म्हणजे काय’ या विचाराच्या संदर्भात चालते, तेव्हा दुःख, आशा, निराशा या सर्वांचा उलटसुलट विचार होतो आणि तोच विचार जाँ निसार अख्तर शब्दांतून उतरवतात! सी. अर्जुन यांच्यासारखा कल्पक संगीतकार ते काव्य स्वरांत गुंफताना ‘जीवन म्हणजे दु:ख, दु:ख आणि दु:ख’ या आशयाच्या ओळी तलतकडून गाऊन घेतो. कारण ‘दर्दभरे नग्में’ ही तलतची स्पेशालिटी ना! आणि रफीसाहेब या दु:खाचा इलाज सांगतात! हाच दोघांचा संवाद -

मोहम्मद रफी -
सुबह जरूर आएगी, सुबह का इंतजार कर

दु:खाच्या या काळरात्रीमुळे जिवाला व्याकूळ बनवू नकोस, घाबरवू नकोस. (ही दु:खाची काळरात्र संपून सौख्याची) सकाळ जरूर येईल, त्या प्रभातीची तू वाट बघ!

एक मित्र दुसऱ्या मित्राला अगर एक मन दुसऱ्या मनाला असा आशादायक विचार सांगते; पण आतापर्यंतच्या जीवनाची वाटचाल दु:खानेच करणारे मन म्हणते...

तलत मेहमूद - 
दर्द है सारी जिंदगी जिस का कोई सिला नही 
दिल को फरेब दीजिए, और ये हौसला नहीं

हे सगळे जीवन दु:खमय आहे. त्याच्या बदल्यात काही मिळणार नाही (म्हणजे, नंतर सौख्याचे दिवस येतील असे वाटत नाही. त्यामुळेच आशावादी विचाराने आपल्या) हृदयाला, मनाला एक धोकाच द्यावयाचा (हेच खरे आहे). त्यामुळे हिंमत वाढणार नाही. (हिंमत वाढेल हेही खरे नाही.)

अशी निराशेची भाषा बोलणाऱ्या मनाला ते पहिले मन समजावते -

मोहम्मद रफी -
खुदसे तो बदगुमाँ ना हो, खुद पे तो ऐतबार कर 
सुबह जरूर आएगी , सुबह का इंतजार कर

(या अशा निराशेच्या विचाराने) स्वतःच स्वतःकडे संशयाने पाहणारा (बदगुमाँ) असा न होता, तू स्वतःवर विश्वास ठेवणारा हो! हा आत्मविश्वासच तुला सांगेल, की (ही दु:खाची काळरात्र संपून सौख्याची) सकाळ जरूर येईल. त्या प्रभातसमयाची प्रतीक्षा कर!

हे विचार ऐकूनही निराश झालेले ते मन म्हणते -

तलत मेहमूद -
खुद ही तडपते रह गए, दिल की सदा से क्या मिला 
आग से खेलते रहे, हम को वफा से क्या मिला?

(या दु:खाने, अपशयाने) आमचे आम्हीच तळमळत राहिलो. आमच्या अंतःकरणातील आवाजाने आम्हाला काय दिले? (दु:खाच्या) वणव्यात आम्ही खेळत राहिलो, जळत राहिलो. आम्ही ज्या निष्ठा दाखवल्या त्याच्या बदल्यात आम्हाला काय मिळाले? त्यांनी आम्हाला काय दिले?

दु:खाने पिचून गेलेल्या मनाचे हे प्रश्न निरुत्तर करणारे आहेत? पण तरीही आशावादी मन सांगते...

मोहम्मद रफी -
दिल की लगी बुझा न दे, दिल की लगी से प्यार कर 
सुबह जरूर आएगी, सुबह का इंतजार कर 

(ही दु:खाची काळरात्र संपून जाऊन) सौख्याची प्रभात उगवेल हा मनात होणारा आशादायी विचाराचा (दिवा) विझून देऊ नकोस. (तो सतत तेवत ठेव.) या विचारांवर प्रेम कर! (म्हणजे बघ काही काळाने ती) सौख्याची प्रभात येईल. तिचीच प्रतीक्षा कर!

पडद्यावर या गीताचा आनंद घेता येत नसला, तरी गीताचा आशय, मोहम्मद रफी व तलत यांचे स्वर आणि सी. अर्जुन यांचे संगीत या गोष्टी हे गीत ‘सुनहरे’ आहे, हे सिद्ध करण्यास पुरेशा आहेत. जाँ निसार अख्तर यांच्या या प्रेरणा देणाऱ्या प्रतिभेस विनम्र अभिवादन!

- पद्माकर पाठकजी
मोबाइल : ८८८८८ ०१४४३

(लेखक चित्रपट समीक्षक आणि जुन्या चित्रपटगीतांचे अभ्यासक आहेत.दर रविवारी प्रसिद्ध होणाऱ्या त्यांच्या ‘सुनहरे गीत’ या सदरातील सर्व लेख https://goo.gl/8ABN2G या लिंकवर एकत्रितपणे उपलब्ध आहेत.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Jayawant Desai About 164 Days ago
एक सुंदर प्रयोग!
0
0
नीलकंठ भालेराव About 192 Days ago
आपल्या लेखामुळे या गीताचा छान आस्वाद घेता आला तसेच जान निसार अख्तर यांच्या बद्दल माहिती उपलब्ध झाली धन्यवाद
0
0

Select Language
Share Link
 
Search