Next
पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची आवश्यकता
मदत करू इच्छिणाऱ्या स्वयंसेवी संस्थांनी प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहन
BOI
Wednesday, August 21, 2019 | 04:49 PM
15 0 0
Share this article:पुणे :
पूरग्रस्त सांगली, कोल्हापूर भागांतील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत असून, पूरग्रस्तांना शासनासह विविध स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून मदत पोहोचवली जात आहे. या भागातील शाळा आता सुरू झाल्या आहेत. आवश्यक शैक्षणिक साहित्याच्या दोन लाख २० हजार किट्सची गरज होती. त्यापैकी एक लाख पाच हजार किट्स उपलब्ध झाली आहेत. उर्वरित साहित्याची अजूनही आवश्यकता आहे. शैक्षणिक साहित्यासह अन्य कोणत्याही साहित्याच्या रूपाने मदत करण्यासाठी स्वयंसेवी संस्था आणि दानशूर व्यक्तींनी प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहन पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केले आहे. 

पुण्यातील कौन्सिल हॉल येथे २१ ऑगस्ट रोजी डॉ. म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली पुणे विभागातील प्रामुख्याने सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदतीच्या अनुषंगाने स्वयंसेवी संस्था व दानशूर व्यक्तींसोबत बैठक झाली. त्या वेळी त्यांनी सद्यस्थितीची माहिती दिली. या वेळी सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त संजयसिंह चव्हाण, पुरवठा विभागाच्या उपायुक्त नीलिमा धायगुडे, जिल्हा पुरवठा अधिकारी भानुदास गायकवाड, दानशूर व्यक्ती, तसेच विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी आणि उद्योगपती उपस्थित होते.

डॉ. दीपक म्हैसेकरडॉ. म्हैसेकर म्हणाले, ‘पूरग्रस्तांना आतापर्यंत आवश्यक त्या स्वरूपात मदत देण्यात येत असून, राज्य शासनाच्या वतीने रोख रकमेच्या रूपातही मदत देण्यात येत आहे. पुरामुळे सुमारे साडेतीन हजार घरे पडल्याची आतापर्यंत नोंद झाली आहे. पडलेली घरे उभी करण्यासाठी, तसेच पडझड झालेल्या घरांच्या दुरुस्तीसाठी राज्य शासन मदत करणार आहे. समाजातील दानशूर व्यक्ती व स्वयंसेवी संस्थांमार्फत जमा होणारी मदत जिल्हा प्रशासनामार्फत गरजू पूरग्रस्तांपर्यंत पोहोचविण्यात येईल. आतापर्यंत प्रशासनाकडे जमा झालेल्या आवश्यक त्या वस्तूंची मदत कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात पाठविण्यात आली आहे.’ 

‘सध्या या भागातील शाळा सुरू झाल्या असून, पूरबाधित विद्यार्थ्यांना ‘बालभारती’च्या वतीने पुस्तके पुरविण्यात येणार आहेत. उर्वरित शालेय साहित्य त्यांना उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. वही, पेन, पेन्सिल अशा विविध प्रकारच्या आवश्यक शैक्षणिक साहित्याच्या दोन लाख २० हजार किट्सची या भागात गरज होती. त्यापैकी एक लाख पाच हजार किट् उपलब्ध झाली आहेत,’ असे त्यांनी सांगितले. ‘पूरग्रस्तांना मदत करावयाची इच्छा असणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थांनी पुणे विभागीय आयुक्त कार्यालयातील उपायुक्त नीलिमा धायगुडे (७०३८१ ७४४६६), सांगली जिल्ह्यासाठी अपर जिल्हाधिकारी अण्णासाहेब चव्हाण (७७०९५ १२४१४), कोल्हापूर जिल्ह्यासाठी उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण (९७६३२ १२८१३) यांच्याशी संपर्क साधावा,’ असे आवाहन डॉ. म्हैसेकर यांनी केले. 

‘पूरग्रस्तांना आवश्यक असणाऱ्या गरजेच्या वस्तूंचे स्वरूप वेळोवेळी बदलले जाईल, हे ध्यानात घेऊन स्वयंसेवी संस्था व संबंधित व्यक्तींना समाजमाध्यमाच्या माध्यमातून वेळोवेळी माहिती देण्यात येईल,’ असे उपायुक्त्त संजयसिंह चव्हाण व नीलिमा धायगुडे यांनी सांगितले.

‘विविध वस्तूंच्या किटच्या माध्यमातून पूरग्रस्तांसाठी मदत देण्यात येईल,’ असे बैठकीला उपस्थित स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, दानशूर व्यक्ती आणि उद्योगपतींनी सांगितले. विविध सूचनाही त्यांनी केल्या. पूरग्रस्तांना आवश्यक असणाऱ्या वस्तूंची माहिती वेळोवेळी अद्ययावत करावी, मदत पोहोचविण्यात आल्याबाबतची माहिती संबंधितांना द्यावी, अशा सूचनांचा त्यात समावेश होता.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search