Next
इको-फ्रेंडली बाप्पा ऑनलाइन
मोबाइल अॅपच्या माध्यमातून पर्यावरणपूरक गणेशमूर्तींचा प्रचार- प्रसार
मानसी मगरे (manasee.magare@myvishwa.com)
Thursday, September 06, 2018 | 05:42 PM
15 1 0
Share this article:


अभियांत्रिकीचं शिक्षण घेत असलेल्या मनीष बुरडकर या तरुणानं आपल्या वडिलांच्या मूर्तिकलेच्या व्यवसायाला पर्यावरणपूरकतेचा आयाम दिला. त्यानं गावातून तो व्यवसाय शहरात तर आणलाच; पण त्याचं अॅप आणि वेबसाइट तयार करून पर्यावरणपूरक गणेशमूर्तींचा प्रसार-प्रचार त्याने सुरू केला आहे. तरुणांना संघटित करून मनीष हे सगळं करत असताना ग्रामीण भागातल्या कलाकारांना हक्काचं व्यासपीठ मिळवून देण्यासाठीही धडपडतो आहे. त्याच्या प्रयत्नांबद्दलचा हा लेख... 
..........
सण-उत्सव साजरे करताना पर्यावरणाची काळजी घेणं, जास्तीत जास्त पर्यावरणपूरक गोष्टींचा वापर करणं यासाठी प्रयत्न करणारे आणि त्याबाबतची जागृती करणारे अनेक जण आज पुढे येताना दिसत आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील एका तरुण अभियंत्यानंही पर्यावरणपूरक (इको फ्रेंडली) बाप्पाचा प्रचार-प्रसार करण्याचा विडा उचलला आहे. 

यवतमाळ जिल्ह्यातील वणी या लहानशा गावात सुधाकर बुरडकर हे सुप्रसिद्ध मूर्तिकार गेली कित्येक वर्षं मातीच्या विविध प्रकारच्या मूर्ती बनवण्याचा व्यवसाय करतात. अगदी आकर्षक आणि सुबक मूर्ती तयार करणारे कलाकार म्हणून त्यांची ख्याती आहे. आपल्या मुलानंही परंपरागत व्यवसाय करावा असा हट्ट न धरता त्यांनी मुलाला अभियंता बनवायचं ठरवलं. त्यानुसार त्यांचा मुलगा मनीष सध्या अभियांत्रिकीचं शिक्षण घेत आहे. मनीषनं देशभरात सध्या विविध पातळ्यांवर होत असलेल्या प्रदूषणाचा अभ्यास केला आणि ते आपल्या पातळीवर काही प्रमाणात कमी करता येईल का, असा सजगपणे विचार केला. आपले वडील करत असलेल्या मूर्तिकलेच्या व्यवसायाला पर्यावरणपूरक दिशा देता येईल, असा विचार त्याच्या मनात आला. गणेशोत्सवात पर्यावरणपूरक (इको फ्रेंडली) मूर्ती तयार करून त्यांचा प्रचार-प्रसार करण्याचं त्यानं ठरवलं. 

त्यानुसार, गावपातळीवरचाहा वडिलोपार्जित व्यवसाय मोठ्या शहरांमध्ये घेऊन जाण्याचा विचार मनीष करू लागला. मनीषने पुणे शहरात गणपती तयार करण्याचा व्यवसाय सुरू केला. मनीष आणि त्याचे वडील सुधाकर यांनी या कामात गावातल्या अनेक लोकांना सहभागी करून घेतलं आहे. ते नदीपात्रातील मातीपासून मूर्ती तयार करतात.

प्रचार-प्रसारासाठी मोबाइल अॅप
स्पर्धेच्या युगात मातीच्या मूर्ती तयार करणारे कलाकार देशपातळीवर कुठेही मागे पडू नयेत यासाठी मनीषनं आपल्या परिसरातील युवा मूर्तिकारांना संघटित करून आपल्या अभियांत्रिकीमधील अनुभवाच्या आधारे ‘मंगलसुधा’ नावाचे मोबाइल अॅप तयार केले आहे. पुण्यात आपल्या कामाची व्याप्ती वाढवत असतानाच मनीषने भाऊ पंकज बुरडकर आणि मित्र रितेश साखरकर यांच्या मदतीने पुण्यात ‘मंगलसुधा क्रिएशन्स’ नावाची कला संस्था सुरू केली. प्रदूषणावर मात करण्यासाठी मातीचे गणपती कसे फायदेशीर ठरतात, अशा प्रकारच्या मूर्ती वापरल्यास त्यातून पर्यावरणाची हानी कशी कमी होऊ शकते, याचा प्रसार आणि प्रचार या अॅपच्या माध्यमातून या मंडळींनी केला आहे. विशेष म्हणजे ‘मंगलसुधा’ या संस्थेने दर्जेदार व ग्राहक समाधानासाठीचं विशेष नामांकनसुद्धा मिळवलं आहे. 

वडिलांच्या कलेला देशपातळीवर वाव मिळावा यासाठी मनीष प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे. तसेच ग्रामीण भागातील कलाकारांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावं, यासाठीही आपल्या संस्थेच्या मार्फत मनीष धडपड करीत आहे. ‘मूर्तिकला शिकण्यासाठी चार ते पाच लाख रुपये खर्च होतात. कलाकारांना नवीन दिशा मिळण्यासाठी मंगलसुधा नावाचं अॅप आम्ही तयार केले असून, या अॅपमुळे देशातल्या ग्रामीण भागातल्या कलाकारांना नवी दिशा मिळेल, अशी आशा वाटते. कला जिवंत ठेवण्यासाठी व ग्रामीण भागातल्या मातीच्या मूर्ती तयार करणाऱ्या कलाकारांसाठी हे अॅप नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे,’ अशा शब्दांत मनीष आणि त्याचा भाऊ पंकज यांनी या अॅपबद्दल माहिती दिली. 

https://mangalsudha.com/ या संकेतस्थळावर याबाबतच्या सर्व गोष्टी आणि माहिती उपलब्ध आहे. संकेतस्थळावर ‘मंगलसुधा कला संग्रहालय’ नावाचा टॅब आहे, तिथे आपल्याला आवडलेल्या मूर्ती ऑनलाइन विकत घेण्याची सुविधा उपलब्ध आहे. सोबतच मूर्ती घरपोच मिळण्याचीही सुविधा देण्यात आली आहे. त्यामुळे देशातल्या ग्राहकांना आता गणेशाच्या मूर्ती ऑनलाइन मिळण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे.

नदीपात्रातील मातीला प्राधान्य :
मंगलसुधा कला केंद्रात तयार केले जाणारे गणपती नदीपात्रात साचलेल्या चिखल-मातीपासून बनवले जातात. त्यामुळे या मूर्ती पर्यावरणपूरक आहेत. मूर्ती बनवण्यासाठी वापरली जाणारी माती पुन्हा वापरात आणता येऊ शकते. ग्राहकांनी पर्यावरणाचं संतुलन राखण्यासाठी अशा मातीच्या गणेशमूर्तींची खरेदी करण्याचं आवाहन ‘मंगलसुधा’मार्फत केलं जात आहे. 

पर्यावरणाचं संतुलन राखण्यासाठी ‘इको फ्रेंडली’ गणपती तयार करून त्यांचा प्रचार-प्रसार करण्याचं काम हे तरुण करत आहेत. यासाठी त्यांनी वणीसारख्या गावातून पुण्यात भरारी घेतली आहे. त्यांच्या या कार्याला अनेक शुभेच्छा... 

संपर्क : मनीष सुधाकर बुरडकर,
व्यवस्थापकीय संचालक, मंगलसुधा क्रिएशन्स
मोबाइल : ८२७५३ ०१८१२ 
वेबसाइट : https://mangalsudha.com/

(मंगलसुधा क्रिएशन्समधील मूर्ती घडवत असतानाचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
15 1 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search