Next
लाल मातीच्या फडात मनाली करणार ‘दंगल’
दत्तात्रय पाटील
Tuesday, October 23, 2018 | 01:33 PM
15 0 0
Share this story

मनाली जाधव

ठाणे/पालघर :
क्षेत्र कोणतेही असो, आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असले, की यशालाही पर्याय नसतो. हे सत्यात उतरवले आहे पालघर जिल्ह्यातील झडपोली येथील जिजाऊ स्पोर्टस् अकॅडमीची खेळाडू मनाली जाधव हिने. आमीर खानच्या ‘दंगल’ चित्रपटातील गीता आणि बबिता या फोगट बहिणींप्रमाणेच तिची वाटचाल आहे. प्रतिकूल परिस्थितीचा सामना करणारी सामान्य घरातील मुलगी ते व्यावसायिक कुस्ती स्पर्धेत प्रतिनिधित्व अशी यशस्वी वाटचाल मनालीने केली आहे. 

सुशिक्षित समजल्या जाणाऱ्या अनेक घरांत मुलींना दुय्यम वागणूक मिळत असताना, ठाण्याच्या भिवंडी तालुक्यातील दुगाडफाटासारख्या (अंबाडी) खेडेगावात एक आई मुलीला कुस्तीपटू बनविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत होती. त्यांच्या प्रयत्नांना साथ मिळाली ती नीलेश सांबरे यांच्या भक्कम आधाराची. त्यांच्या जिजाऊ स्पोर्टस् अकॅडमीमध्ये मनालीची जडणघडण होत गेली. त्यानंतर पदके जिंकण्याचा तिने सपाटाच सुरू केला. तो आजतागायत सुरू आहे. ‘झी’च्या आगामी ‘महाराष्ट्र कुस्ती दंगल’ या व्यावसायिक कुस्ती लीगमध्ये सई ताम्हणकरच्या ‘कोल्हापुरी मावळे’ संघामध्ये मनाली जाधव प्रतिनिधित्व करणार आहे. 

लहानपणी खेळण्याच्या वयामध्ये मनालीच्या डोक्यावरून वडिलांचे छत्र हरपले. त्यामुळे मनाली पितृप्रेमाला लहानपणीच मुकली; मात्र आईच्या उत्तम संस्कारांनी मनाली मोठी झाली. पुढे तिला अनेक शिक्षक व प्रशिक्षकांचे उत्तम मार्गदर्शन मिळाले. त्यामध्ये ज्ञानेश्वर पाटील, पंकज पवार, सुदर्शन पाटील आणि अन्य व्यक्तींचा समावेश आहे. त्यानंतर नीलेश सांबरे यांनी तिला दत्तक घेऊन मनालीच्या आईला आश्वस्त केले. त्यानंतर मनालीने प्रत्येक स्पर्धेमध्ये विजेतेपद पटकावले. आता तर मनाली महाराष्ट्र कुस्ती दंगल स्पर्धेत आपले कसब दाखवण्यासाठी सज्ज झाली आहे. मनालीचे संपूर्ण ठाणे, पालघर जिल्ह्यातून कौतुक होत आहे.

मनालीची लहान बहीण गौरी कबड्डीपटू आहे. आपल्या उत्तुंग कर्तृत्वाने समाजाला दिशा आणि प्रेरणा देण्याचा वसा घेतलेले नीलेश सांबरे यांनी मनालीचे विशेष कौतुक केले आणि पुढील वाटचालीला शुभेच्छा दिल्या आहेत. ‘जिजाऊ संस्था व मी स्वतः मनालीच्या व तिच्या बहिणीच्या स्वप्नपूर्तीसाठी आधारवड म्हणून सदैव खंबीरपणे उभा राहीन,’ असे नीलेश सांबरे यांनी सांगितले. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link