Next
गृहवित्त, पेट्रोलियम कंपन्याचे शेअर्स घेण्यायोग्य
BOI
Sunday, May 27, 2018 | 03:45 PM
15 0 0
Share this article:

देशात आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या राजकीय घडामोडींचे पडसाद गेल्या आठवड्यात भारतीय शेअर बाजारावर उमटले. दोन्ही प्रमुख निर्देशांकांत मोठी घसरण झाली. या पार्श्वभूमीवर, शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी कोणते शेअर्स योग्य आहेत, याची माहिती घेऊ या ‘समृद्धीची वाट’ सदराच्या आजच्या भागात...
......
गेल्या आठवड्यात कर्नाटकच्या निवडणुकीनंतर पेट्रोल कंपन्यांनी भाव वाढवले आणि भाववाढीचा भडका बस, टॅक्सी वगैरेंना सहन करावा लागला. पर्यायाने ही झळ नागरिकांनाच बसली. सध्या सर्व राज्ये पेट्रोल, डिझेलवर मूल्यवर्धित कर बसवत आहेत. त्याऐवजी वस्तू सेवा कर लागू केला, तर दर उतरतील. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग उन यांची जूनच्या पहिल्या आठवड्यातील भेट रद्द झाल्याने आंतरराष्ट्रीय वातावरणातील तणाव वाढला आहे. देशात भाजप आणि पर्यायाने पंतप्रधान नरेंद्र मोदींचा प्रभाव कमी होत असल्याचे दूरचित्रवाहिन्या डांगोरा पिटून सांगत आहेत. महाराष्ट्रात सत्तेत राहूनही, शिवसेना भाजपला सर्वत्र नकार दाखवत आहे. या सर्व गोष्टींचा परिणाम शेअर बाजारावर होणे अपरिहार्य होते. तो गेल्या आठवड्यात झाला. शुक्रवारी (२५ मे २०१८) निर्देशांक ३४ हजार ९२४वर आणि निफ्टी १० हजार ६०५वर बंद झाला. पेट्रोल संबधित शेअर्सचे भाव खाली आले. 

गेल्या आठवड्यात चेन्नईमधील ‘वेदान्त’च्या स्टरलाइट इंडस्ट्रीजवर पर्यावरण खात्याची वक्रदृष्टी पडली. कंपनीला आपली एक भट्टी बंद करावी लागली. त्यामुळे या शेअरचा भाव २५२ रुपये झाला आहे. तो २४० रुपयांच्या आसपास आल्यास जरूर घ्यावा. वर्षभरात त्यात ३५ ते ४० टक्के भाववाढ मिळावी. कारण ‘वेदान्त’चा मार्च २०१८ तिमाहीचा करोत्तर नफा गेल्या मार्चपेक्षा २७ टक्क्यांनी वाढला आहे. 

याखेरीज ग्राफाइट इंडिया आणि हेग हे शेअर्स भागभांडवलात हवेतच. ‘ग्राफाइट इंडिया’चा भाव आता ८२३ रुपयांपर्यंत खाली आला आहे, तर हेग अजूनही तीन हजार ३१० ते तीन हजार ९० रुपयांच्या पट्ट्यात फिरत आहे. ग्राफाइट इंडिया शेअर वर्षभरात एक हजार रुपयांचा भाव दाखवेल, तर हेग कंपनीचा शेअर चार हजार ८०० ते पाच हजार रुपयांपर्यंत चढू शकतो; पण या शेअर्समध्ये आता एक वर्षभरच नफा मिळवण्याची संधी आहे. २०१९मध्ये चीनच्या ग्राफाइट कंपन्यांचे उत्पादन सुरू झाले की, या धातूंचे भाव कमी होऊ लागतील. सध्या इंडियन ऑइल आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या कंपन्यांचे शेअर्स गुंतवणूकयोग्य आहेत. पुढील दोन-तीन वर्षे गृहवित्त कंपन्यांचे शेअर्सही उत्तम आहेत. ‘रेप्को होम्स’चा शेअर वर्षभरात ८४० रुपयांपर्यंत जाईल. ‘दिवाण हाउसिंग’चा शेअरही ६०० रुपयांच्या आसपास घ्यावा. वर्षभरात तो ७५० रुपये होईल. 


- डॉ. वसंत पटवर्धन   
(लेखक ‘बँक ऑफ महाराष्ट्र’चे माजी अध्यक्ष आहेत.)

(शेअर बाजार, तसेच म्युच्युअल फंडातील गुंतवणूक जोखीमपूर्ण आहे. ‘समृद्धीची वाट’ या सदराचा उद्देश वाचकांना गुंतवणुकीसंदर्भातील अशा विविध बाबींची माहिती करून देऊन दिशा दाखवणे हा आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करताना वाचकांनी स्वतःच्या जबाबदारीवरच करावी. त्यासाठी ‘बाइट्स ऑफ इंडिया’ कोणत्याही प्रकारे जबाबदार नसेल. वाचकांनी गुंतवणुकीसंदर्भातील आपल्या शंका, प्रश्न article@bytesofindia.com या ई-मेलवर पाठवावेत. निवडक प्रश्नांना या सदरातून उत्तरे दिली जातील. हे सदर दर शनिवारी आणि रविवारी प्रसिद्ध होते. त्यातील लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/Vb1kM6 या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search