Next
चित्पावन मंडळातर्फे रत्नागिरीत कीर्तनसप्ताहाचे आयोजन
BOI
Friday, July 26, 2019 | 12:57 PM
15 0 0
Share this article:


रत्नागिरी : अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहायक मंडळातर्फे श्रावण महिन्यानिमित्त सलग नवव्या वर्षी कीर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. एक ते सात ऑगस्ट या कालावधीत दररोज ५.३० ते ७.३० या वेळेत मंडळाच्या जोशी पाळंद येथील केळकर वसतिगृहाच्या भगवान परशुराम सभागृहात कीर्तन होईल.

पहिल्या दिवशी रायगड येथील हभप धनंजय गद्रे हे लोकमान्य टिळकांवर कीर्तन सादर करतील. ते बीएस्सी पदवीधारक असून, त्यांचे कीर्तनाचे शिक्षण दादरमधील (मुंबई) अ. भा. कीर्तन संस्थेतून झाले आहे. रायगड, सातारा, इंदूर येथे सामाजिक, धार्मिक, अध्यात्मिक विषयांवर त्यांनी अकराशेहून अधिक कीर्तने केली आहेत.

दोन ऑगस्टला पुण्याचे हभप मंदार गोखले संत तुकाराम (जन्माख्यान) यावर कीर्तन करतील. ते मुळचे रत्नागिरी तालुक्यातील बसणी येथील आहेत. बीए पदवीनंतर त्यांनी कीर्तनाचे शिक्षण पुण्यातील श्री हरिकीर्तनोत्तेजक सभेचे नारद मंदिर येथे घेतले. पाच वर्षांचा वासंतिक कीर्तन वर्ग प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण आहेत. श्रीपादबुवा ढोले, रामचंद्रबुवा भिडे, हर्षदबुवा जोगळेकर, नलिनी कुलकर्णी, दीपक रास्ते, मंगलमूर्ती औरंगाबादकर, निवेदिता मेहेंदळे, नंदिनी पाटील, मिलिंदबुवा बडवे, श्रेयस व मानसी बडवे, नंदकुमार मेहेंदळे आदींकडून त्यांनी कीर्तनाचे मार्गदर्शन घेतले आहे. गेल्या १० वर्षांत त्यांची पुणे, सातारा, कराड, गोंदवले, मुंबई, गुजरातमध्ये कीर्तने झाली आहेत.

तीन ऑगस्टला पनवेलच्या वर्षा रानडे-सहस्रबुद्धे या ‘शिवपार्वती विवाह’ या आख्यान विषयावर कीर्तन सादर करणार आहेत. त्या एमकॉम, बीएड पदवीप्राप्त असून कीर्तनाचे मार्गदर्शन वडील ध्रुवकुमार रानडे व हरिहर नातू यांच्याकडून मिळाले. १२ वर्षांपासून त्यांनी महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक राज्यात अनेक कीर्तने केली आहेत. चार ऑगस्टला गोव्याची उदयोन्मुख युवा कीर्तनकार भक्ती धुपकर ही बार्शीचे संत ‘श्री जोगा परमानंद’ यावर कीर्तन करणार आहे. ती आता एफवायबीएच्या वर्गात शिकत आहे. गोव्यात तिची अनेक कीर्तने झाली आहेत. गायनामधील उपांत्य विशारद परीक्षा ती उत्तीर्ण असून, कीर्तनाचे शिक्षण पुण्यातील हरिकीर्तनोत्तेजक सभा येथे सुरू आहे.

पाच ऑगस्टला सातार्‍यातील युवा कीर्तनकार वेदिका गोडबोले ही ‘महाकवी कालिदास’ या आख्यान विषयावर कीर्तन करेल. ती बीए पदवीप्राप्त असून, सातारा, पुणे, पनवेलमध्ये अनेक कीर्तने केली आहेत. तिचे कीर्तनाचे शिक्षण प्रा. अपामार्जने यांच्याकडे झाले. गायनाचे शिक्षण डोईफोडे यांच्याकडे झाले. धर्मशास्त्राचे शिक्षण विवेकशास्त्री गोडबोले, यज्ञेश्‍वरशास्त्री जोशी, श्रीकृष्णशास्त्री जोशी यांच्याकडून मिळाले. संस्कृत व कीर्तन विषयात बीए पदवीप्राप्त आहे.

सहा ऑगस्टला मूळचे मठ-लांजा येथील व सध्या रत्नागिरीत वास्तव्यास असलेले हभप भालचंद्र हळबे यांचे त्र्यंबकेश्‍वर आख्यान विषयावर कीर्तन होईल. त्यांच्या मातोश्री सुमती हळबे यांना असलेली कीर्तनाची आवड आणि कीर्तनकार वडील कै. उद्धव हळबे यांच्यामुळे भालचंद्रबुवांना घरातूनच मार्गदर्शन मिळाले. ज्येष्ठ कीर्तनकार नाना जोशी यांच्याकडून त्यांना कीर्तनाचे शिक्षण मिळाले. ते अ. भा. कीर्तन कुल संस्थेचे सदस्य आहेत. गोवा, पन्हाळगड, चिपळूण, देवरुखसह अनेक ठिकाणी कीर्तने केली आहेत. कर्नाटक, गोवा, जालना, पारनेर येथील कीर्तन संमेलनात, नाशिक, गुजरातच्या धर्मसंमेलनात त्यांनी भाग घेतला. गोळप देवस्थान व अठरा हात गणपती मंदिर संस्थेतर्फे त्यांना गौरवण्यात आले आहे.

कीर्तन सप्ताहाची सांगता सात ऑगस्टला मुंबईतील राष्ट्रीय कीर्तनकार क्रांतिगीता महाबळ यांच्या कीर्तनाने होईल. ‘बुंदेलखंडाची राणी सारंधा’ या आख्यान विषयावर त्या कीर्तन करतील. राष्ट्रीय कीर्तनकार गोविंदस्वामी आफळेबुवा यांच्या त्या कन्या. आजवर त्यांनी अडीच हजारांहून अधिक कीर्तन, प्रवचने, व्याख्याने, निवेदने, गीतगायन, काव्यगायन, वीरवाणी, पुराणकथन आदी कार्यक्रम केले आहेत. कीर्तन जुगलबंदी सर्वप्रथम सादर करणार्‍या कीर्तनकार कै. सुधाताई पटवर्धन-आफळे यांचे मार्गदर्शन लाभले. ज्ञानवंदना, संस्कारदीपिका, वैनतेयाची गगनभरारी ही पुस्तके प्रकाशित झाली आहेत. संगीत नाटकांमध्ये त्यांनी अभिनय केला आहे; तसेच सावरकर गाथा, संतमेळा, मोगरा फुलला, गोविंद गीतगंगा आदी कार्यक्रम त्यांनी केले आहे. २०१४मध्ये रत्नागिरीत आयोजित स्वा. सावरकर साहित्य संमेलनाच्या त्या स्वागताध्यक्षा होत्या. हिंदुधर्म प्रसारक मंडळ, स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारक, अ. भा. कीर्तन संस्था, हिंदू महासभा आदी संस्थांमध्ये त्यांनी पदे भूषविली आहेत.

कीर्तनसप्ताहात चैतन्य पटवर्धन व निरंजन गोडबोले (ऑर्गन) आणि प्रथमेश शहाणे, उन्मेश आवळकर (तबला) साथसंगत करतील. ही कीर्तने सर्वांसाठी मोफत व खुली असून, त्यासाठी कीर्तनप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहाण्याचे आवाहन मंडळाचे अध्यक्ष डॉ. विनय नातू, कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी, कार्यवाह राजेंद्र पटवर्धन, मंडळाचे पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्यांनी केले आहे.

कीर्तन सप्ताहाविषयी : 
कालावधी : एक ते सात ऑगस्ट २०१९ 
वेळ : दररोज ५.३० ते ७.३० 
स्थळ : केळकर वसतिगृहाचे भगवान परशुराम सभागृह, जोशी पाळंद, रत्नागिरी. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search