Next
‘उच्च दर्जाची बांधकाम कौशल्ये अवगत असलेले प्रशिक्षक तयार करणे गरजेचे’
गौतम चटर्जी; ‘क्रेडाई पुणे मेट्रो’च्या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन
प्रेस रिलीज
Tuesday, July 16, 2019 | 04:30 PM
15 0 0
Share this article:

पुणे : ‘राज्यात महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणांतर्गत (महारेरा) २१ लाख सदनिकांचे बांधकाम चालू असून, त्यासाठी सुमारे १५ ते १६ लाख बांधकाम कामगार कार्यरत आहेत. या सर्व कामगारांना अधिक उत्तम कामासाठी प्रशिक्षण द्यायचे असेल, तर आपल्याला उच्च दर्जाची कौशल्ये अवगत असलेले अधिकाधिक प्रशिक्षक तयार करावे लागणार आहेत. ‘महारेरा’ प्राधिकरण त्यासाठी नेहमीच साह्य करेल,’ असे प्रतिपादन ‘महारेरा’चे अध्यक्ष गौतम चटर्जी यांनी केले.

‘क्रेडाई पुणे मेट्रो’च्या कुशल उपक्रमातर्फे आयोजित कार्यक्रमात ‘महारेरा’ तसेच इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या (बीओसीडब्ल्यू) सहकार्याने राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमाचे १५ जुलैला पुण्यात उद्घाटन करण्यात आले. याअंतर्गत कामगार, कंत्राटदार आणि महाराष्ट्राबरोबरच इतरही राज्यांमधून आलेल्या बांधकाम कौशल्य प्रशिक्षकांना एकत्र आणून अनुभवांच्या देवाणघेवाणीसाठी एक व्यासपीठ निर्माण करून देण्यात आले. या वेळी चटर्जी बोलत होते.

या वेळी वर्ल्डस्किल्स इंडियाचे प्रमुख रंजन चौधरी, इंडियन प्लंबिंग असोसिएशनचे अध्यक्ष गुरमीत सिंग अरोरा, क्रेडाई नॅशनलचे अध्यक्ष सतीश मगर, उपाध्यक्ष शांतीलाल कटारिया, क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष सुहास मर्चंट, क्रेडाई पुणे मेट्रोच्या कुशल उपक्रमाचे अध्यक्ष जे. पी. श्रॉफ, ‘क्रेडाई’चे रणजीत नाईकनवरे, जागतिक वर्ल्डस्किल्स स्पर्धेसाठी वीटबांधणी काम शिकवणारे तज्ज्ञ ट्रॉय एव्हरेट आदी मान्यवर उपस्थित होते.

चटर्जी म्हणाले, ‘पुढील तीन वर्षांनंतर राज्यात प्रत्येक बांधकाम कामगार हा कौशल्य विकसन प्रमाणपत्रप्राप्त आणि बीओसीडब्ल्यू मंडळाकडे नोंदणी केलेला असावा यासाठी कौशल्यपूर्ण प्रशिक्षक तयार होणे गरजेचे आहे.’


‘क्रेडाई पुणे मेट्रो’ व ‘महारेरा’तर्फे फेब्रुवारी २०१९ मध्ये सुरू करण्यात आलेल्या ‘ट्रेनिंग ऑफ ट्रेनर्स’ या उपक्रमात आतापर्यंत गवंडीकाम व बार बेंडिंग प्रकारात ३८ तज्ज्ञ प्रशिक्षक तयार करण्यात आले आहेत.

चौधरी म्हणाले, ‘वर्ल्डस्किल्स ही बांधकाम कौशल्यांचा कस पाहणारी जागतिक स्पर्धा असून, त्यात भारताची कामगिरी दर वर्षी उंचावते आहे. या वर्षी देशातून ४८ स्पर्धक रशियातील कझान येथे होणाऱ्या वर्ल्डस्किल्स स्पर्धेत सहभागी होत आहेत. यातील सर्वाधिक म्हणजे सात स्पर्धक महाराष्ट्राचे आहेत. यंदा प्रथमच भारताने प्लंबिंग कामाच्या प्रकारातही स्पर्धक पाठवले आहेत.’  

या वेळी क्रेडाई नॅशनलचे अध्यक्ष सतीश मगर आणि इंडियन प्लंबिंग असोसिएशनचे अध्यक्ष गुरमीत सिंग अरोरा यांनी एका करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या प्रसंगी सिंग म्हणाले, ‘कोणत्याही बांधकामात प्लंबिंगला प्रचंड महत्त्व आहे. प्लंबिंगच्या उच्च दर्जासाठी योग्य ते नियम पाळूनच प्लंबिंग काम व्हावे याची खबरदारी घेतली जायला हवी. या विषयी अभियंते, कंत्राटदार व कामगारांना प्रशिक्षित करण्यासाठी या काराराद्वारे काम केले जाईल.’ 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search