Next
नारायण धारप, मीना प्रभू, सेतुमाधवराव पगडी, विनायक रामचंद्र करंदीकर
BOI
Sunday, August 27, 2017 | 04:00 AM
15 0 0
Share this article:

कमकुवत मनाच्या वाचकांनी ज्यांच्या पुस्तकांच्या वाट्याला जाणं टाळलं, एवढी जबरदस्त ताकद ज्यांच्या भयकथांच्या वातावरण निर्मितीत आहे, असे नारायण धारप, अत्यंत रंजक आणि लालित्यपूर्ण प्रवासवर्णनं लिहिणाऱ्या लंडनवासी मीना प्रभू, प्रसिद्ध इतिहाससंशोधक सेतुमाधवराव पगडी आणि संतसाहित्याचे गाढे अभ्यासक विनायक करंदीकर यांचा २७ ऑगस्ट हा जन्मदिन. त्यानिमित्त आज ‘दिनमणी’मध्ये त्यांचा थोडक्यात परिचय...
......................

नारायण धारप

२७ ऑगस्ट १९२५ रोजी जन्मलेले नारायण धारप हे मराठी भयकथांचे बादशहाच! त्यांच्या आधी मराठीत रहस्यकथा, डिटेक्टिव्हकथा होत्या; पण नारायण धारपांनी ज्या ताकदीनं विज्ञानकथा, गूढकथा, भयकथा सलग पन्नास वर्षं लिहिल्या ते पाहून थक्क व्हायला होतं. भयकथा या जॉनरवर त्यांचा निर्विवाद हातखंडाच होता. कमकुवत मनाच्या वाचकांनी त्यांच्या पुस्तकांच्या वाट्याला जाणंच टाळलं, एवढी जबरदस्त ताकद त्यांच्या भयकथांच्या पात्रांच्या वर्णनात आणि वातावरण निर्मितीत असे.

झपाटलेली वास्तू, मृत व्यक्तींच्या आत्म्याच्या अतृप्त वासना, गूढ चिरेबंदी वाडे, काळोख्या खोल्या, काजळी धरलेले कंदील, कुणाच्या तरी अस्तित्वाचे होणारे भास, पिशाच्च किंवा अघोरी शक्तींना हवे असणारे बळींचे नैवेद्य हे सगळं सामान्य माणसाच्या रोजच्या आयुष्यात न घडणारं; पण म्हणूनच त्याविषयी एक भययुक्त कुतूहलसुद्धा!

त्यातल्या त्यात दिलासा म्हणजे त्यांनी निर्माण केलेली अशोक समर्थ, आप्पासाहेब, ओंकार, कृष्णचंद्र, पंत यांसारख्या व्यक्तिरेखा, ज्या अघोरी शक्तींपासून सामान्य माणसाला वाचवण्याचं काम करतात.

धारपांनी विपुल लेखन केलं. त्यांच्या पुस्तकांची मुखपृष्ठसुद्धा आपल्याला दचकवतात. अंधारयात्रा, अघटित, द्वैत, ग्रास, इक्माई, काळी जोगीण, नवी माणसं, सावट्या, शपथ, आनंदमहल, चंद्राची सावली, चेटकीण, दरवाजे, दिवा मालवू नका, झाकलेला चेहेरा, लुचाई, महंतांचे प्रस्थान, चेतन अशी त्यांची अनेक पुस्तकं लोकप्रिय आहेत.

१८ ऑगस्ट २००८ रोजी पुण्यात त्यांचा मृत्यू झाला.

(नारायण धारप यांच्या पुस्तकांविषयी अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
...................................

मीना प्रभू

२७ ऑगस्ट १९३९ रोजी जन्मलेल्या डॉ. मीना प्रभू यांचं माहेर पुण्याचं असलं, तरी लंडन शहराला त्या दत्तक आई म्हणतात इतक्या त्या तिथं एकरूप झाल्यात. त्यांचं ‘माझं लंडन’ हे पहिलंच पुस्तक प्रचंड गाजलं आणि त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलंच नाही. गेली अनेक वर्षं त्यांनी जवळपास बहुतेक देश पालथे घातले आणि त्या भेटींवर अत्यंत रंजक, ओघवत्या भाषेत प्रवासवर्णनं लिहिली.

इतक्या सातत्यानं जगप्रवास करून प्रवासवर्णनं लिहिणाऱ्या त्या मराठीतल्या सर्वांत वाचकप्रिय लेखिका आहेत. अनंत काणेकर पुरस्कार, पु. ल. देशपांडे पुरस्कार अशा पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. गोव्याला भरलेल्या महिला साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या.


पाच मे २०१७ रोजी त्यांनी पुण्यामध्ये ‘प्रभू ज्ञानमंदिर’ नावाची एक अत्यंत आधुनिक मल्टीमीडिया लायब्ररी सुरू केली आहे. (त्याविषयी अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा).
..................................

सेतुमाधवराव पगडी

२७ ऑगस्ट १९२० रोजी निलंग्यामध्ये जन्मलेले सेतुमाधवराव हे उर्दू आणि फारसी ग्रंथांचे जाणकार अभ्यासक आणि इतिहाससंशोधक म्हणून ओळखले जातात. त्यांनी जवळपास ४० उर्दू, फारसी ग्रंथ मराठीत आणले.

आर्थिक अडचणीमुळे हैदराबादमधलं कॉलेज अर्धवट सोडून त्यांनी घरातून पलायन करून बनारस गाठलं होतं. तिथं श्री. पाटणकर यांच्याकडे राहून त्यांनी काशी आणि अलाहाबाद विद्यापीठातून उच्च शिक्षण पूर्ण केलं.

त्यांनी प्रचंड संशोधन करून मराठीत ५६ पुस्तकं आणि इंग्लिशमध्ये १४ पुस्तकं लिहिली. त्यांची स्मृती अतिशय तल्लख होती आणि बोलणंही सतेज होतं. त्यांच्या ६० वर्षांच्या अचाट इतिहास संशोधनाचा गौरव सरकारतर्फे होऊन त्यांना पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं.

अलकनंदा, अशोकाची पाने, नयन तुझे जादूगार, नेसोनि शालू हिरवा,  मोगल आणि मराठे, मराठ्यांचे स्वातंत्र्ययुद्ध, शिवचरित्र - एक अभ्यास, श्रीसमर्थ आणि समर्थ संप्रदाय, सुफी संप्रदाय यावर ग्रंथ, हैदराबाद राज्यातील स्वातंत्र्यसंग्रामावर ग्रंथ, तन्वी श्यामा, समग्र सेतुमाधवराव पगडी अशी त्यांची अनेक पुस्तकं प्रसिद्ध आहेत.

१४ ऑक्टोबर १९९४ रोजी त्यांचं मुंबईत निधन झालं.
............................  

विनायक रामचंद्र करंदीकर
 
२७ ऑगस्ट १९१९ रोजी जन्मलेले विनायक करंदीकर हे संतसाहित्याचे गाढे अभ्यासक म्हणून ओळखले जातात.
मराठी ज्ञानकोशाच्या संपादनाचंही त्यांनी काम केलं होतं. रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद यांच्या जीवनाचा त्यांनी सखोल अभ्यास केला होता. त्यांच्या आठ ग्रंथांना महाराष्ट्र शासनाची पारितोषिकं मिळाली आहेत.

वामन पंडितांची यथार्थदीपिका, भगवद्गीतेचे तीन टीकाकार, ज्ञानदेव : विवेकानंद, तीन सरसंघचालक, ख्रिस्त, बुद्ध आणि श्रीकृष्ण, रामकृष्ण आणि विवेकानंद, कुणा यात्रिकाचा जीवनसंवाद अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत.

१५ एप्रिल २०१३ रोजी त्यांचं निधन झालं.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search