Next
मार्गारेट वाईझ ब्राउन, स्कॉट ऑ-डेल
BOI
Wednesday, May 23, 2018 | 03:45 AM
15 0 0
Share this article:

रात्री झोपायला जायच्या आधी, आजूबाजूच्या सगळ्या गोष्टींना ‘गुडनाइट’ म्हणत झोपी जाणाऱ्या ससुल्याची काव्यमय गोष्ट सांगून बच्चेकंपनीत प्रिय झालेल्या मार्गारेट वाईझ ब्राउनचा आणि ‘आयलंड ऑफ दी ब्ल्यू डॉल्फिन्स’ या पहिल्याच रंजक कादंबरीमुळे लोकप्रिय झालेल्या स्कॉट ऑ-डेल यांचा २३ मे हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये दोघांचा अल्प परिचय....
..... 
मार्गारेट वाईझ ब्राउन

२३ मे १९१० रोजी ब्रुकलीनमध्ये जन्मलेली मार्गारेट वाईझ ब्राउन ही बालसाहित्यकार म्हणून ओळखली जाते. तिच्या कथा-कादंबऱ्यांनी अनेक पिढ्यांतल्या मुलांवर मोहिनी घातली होती. तिने शंभरावर पुस्तकं लिहिली आणि तिच्या पुस्तकांवर कायमच मुलांच्या उड्या पडत असत.

१९४७ साली तिने लिहिलेली ‘गुडनाइट मून’ ही तिची सर्वांत गाजलेली कादंबरी! तेरा भाषांमध्ये अनुवाद झालेल्या आणि पाच कोटींहून अधिक प्रती खपलेल्या या कादंबरीत लहान मुलांसारख्याच भावभावना असणारा एक छोटा ससुल्या रात्री झोपायला जायच्या आधी आजूबाजूच्या सगळ्या गोष्टींना ‘गुड नाइट’ म्हणतो आणि मगच झोपी जातो हे फारच सुरेख आणि काव्यमय पद्धतीनं सांगितलं आहे. 

बच्चेकंपनीमध्ये तुफान लोकप्रिय असलेलं तिचं दुसरं पुस्तक म्हणजे ‘दी रनअवे बनी’. यामधला ससुल्या आपल्या आईपासून दूर पळू पाहतोय....! मजेशीर कथा होती ही. 

बम्बल बग्ज अँड एलिफंट, नॉइझी बुक सीरिज, बेबी अॅनिमल्स, बिग डॉग लिटल डॉग, हॉर्सीज, दी लिटल फायरमन, बिग रेड बार्न, रेड लाइट ग्रीन लाइट, लिटल लॉस्ट लॅम्ब, दी लिटल आयलंड, दी लिटल फिशरमन, अशी तिची अनेक पुस्तकं लोकप्रिय आहेत.
 
१३ नोव्हेंबर १९५२ रोजी तिचा फ्रान्समध्ये मृत्यू झाला.
.........

स्कॉट ऑ-डेल 

२३ मे १८९८ रोजी कॅलिफोर्नियात जन्मलेला स्कॉट ऑ-डेल हा बालसाहित्यकार म्हणून प्रसिद्ध आहे. सुप्रसिद्ध ब्रिटिश लेखक सर वॉल्टर स्कॉट यांच्या घराण्याचा वारसा त्याला लाभला असल्यामुळे लेखनाकडे त्याचा नैसर्गिक कल होता. त्याच्या साहसी आणि ऐतिहासिक प्रकारच्या कथा बच्चेकंपनीला खूपच आवडून जायच्या. त्याला लहानपासूनच दर्यावर्दी जीवनाचं आकर्षण होतं. 

‘आयलंड ऑफ दी ब्ल्यू डॉल्फिन्स’ या त्याच्या पहिल्याच कादंबरीमुळे त्यानं जगाचं लक्ष वेधून घेतलं. पॅसिफिकमधल्या एका बेटावर तब्बल १८ वर्षं अडकून पडलेल्या मुलीच्या आयुष्यात आलेले अनुभव त्यात रंगवले आहेत. ही कादंबरी जुआना मारिया या मुलीच्या सां निकलस आयलंडमधल्या खऱ्या आयुष्यावर बेतलेली आहे. ब्राझील, बल्गेरिया, चीन, इराण, इस्रायल, चेकोस्लोव्हाकियासारख्या अनेक देशांत ही कादंबरी प्रसिद्ध आहे.

वूमन ऑफ स्पेन, सिया, सिंग डाउन दी मून, दी ब्लाक पर्ल, दी किंग्ज फिफ्थ, दी मिस्टिरियस सिटीज ऑफ गोल्ड यांसारख्या त्याच्या अनेक कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत. त्याच्या कादंबऱ्यांवर सिनेमे निघाले होते. 

१५ ऑक्टोबर १९८९ रोजी त्याचा न्यूयॉर्कमध्येच मृत्यू झाला. 

(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search