Next
जरा विसावू या वळणावर...
BOI
Tuesday, December 26 | 06:45 AM
15 0 0
Share this story

सुधीर मोघेबघता बघता आणखी एक वर्ष सरलं... निरोपाचा दिवस जवळ आला... ही वेळ असते मागे वळून पाहायची आणि पुढच्या वाटचालीची दिशा ठरविण्याची... त्या निमित्ताने ‘कविता... स्वरांनी मोहरलेल्या’ सदरात आज पाहू या सुधीर मोघे यांचं हे अतिशय सुंदर गीत... जरा विसावू या वळणावर... 
............
डिसेंबर महिना सुरू झालाय, सरत्या वर्षाला निरोप देण्याची तयारी करायला हवी... म्हणजे नेमकं काय करायचं? गेलेल्या क्षणांचा हिशेब करायचा? हिशेब करायचा म्हणजे बेरीज, वजाबाकी आलीच. बेरीज-वजाबाकी म्हणजे सुख-दु:खाचे क्षण आठवायचे... सुखाचे क्षण बेरजेच्या घरात, दु:खाचे क्षण वजाबाकीच्या घरात... आणि मग पुढे काय? छे! नकोच ते गणित... आला क्षण आपला... आजचा, आत्ताचा अगदी या घडीचा... पण उद्यासाठी तर थोडी तयारी करायलाच हवी ना? आत्ताचा हा क्षण, ही घडी अशी सजवूया, की यातील काही क्षणांचा सुगंध भविष्यातही दरवळत राहील. अरे हो, पण हे सगळं सहज घडायला हवं... फूल उमलतं तितक्याच सहजतेनं, नाहीतर हाती असलेला क्षण निसटून कधी जाईल कळायचंच नाही. त्या क्षणाकडे डोळेभरून पाहयला तर वेळ काढायला हवा ना?... हा अस्सा खेळ सुरू होतो मनात, प्रश्नां चा फेर आणि उत्तरांचा झिम्मा... या खेळात वर्षाअखेरचं वळण केव्हा आलं ते कळलंच नाही. गंमत सांगते तुम्हाला, दर वर्षी या अखेरच्या वळणावर सुधीर मोघे यांनी लिहिलेलं गीत हमखास आठवतंच.

भले बुरे जे घडून गेले
विसरून जाऊ सारे क्षणभर
जरा विसावू या वळणावर...

प्रत्येकाच्या आयुष्यात येणारं हे वळण अटळ, फरक इतकाच, की कुणी या वळणावर थांबतो, कुणी रेंगाळतो, कुणी पुन्हा पुन्हा मागे वळून पाहतो, तर कुणी वळण ओलांडायच्या घाईत पुढची वाट चालायलाही लागतो. संवेदनशील मन मात्र या वळणावर जरा विसावतं... भल्या-बुऱ्या क्षणांची सुसंगती लावत बसतं... भावनांचा गुंता सोडवता सोडवता आणखीनच अडकून पडतं... शब्दांची भूल पडते... कवितेची चाहूल लागते... सुधीर मोघे यांनी म्हटल्याप्रमाणे...

शब्दांना नसते दु:ख
शब्दांना सुखही नसते
ते वाहतात जे ओझे
ते तुमचे आमचे असते...

किती खरंय आहे ना हे? आता या गाण्याचंच पाहा ना. दर वर्षी हे गाणं हमखास आठवतं, याचं कारण ते तुमचं-आमचं केव्हाच होऊन गेलेलं आहे, नव्हे तुमचं-आमचंच आहे. आपल्यासाठीच कवीनं लिहिलेलं आहे असं वाटावं इतकं जिव्हाळ्याचं!

कसे कोठुनि येतो आपण
कसे नकळता जातो गुंतून
उगाच हसतो, उगाच रुसतो
क्षणात आतुर क्षणात कातर
जरा विसावू या वळणावर... 

‘तुझ्यावाचून करमेना’ या चित्रपटातल्या कथानकाच्या एका वळणावर सुधीर मोघे यांनी हे गीत लिहिलं. ‘मेलडी मेकर्स’चे निर्माते, संगीतकार सुहासचंद्र कुलकर्णी यांचा हा चित्रपट होता. त्यांच्या ऑफिसमध्ये बसून सुधीर मोघे एकेक ओळ लिहीत होते. त्या क्षणी सुहासचंद्र चाल लावत होते. अवघ्या वीस मिनिटात गाणं तयार झालं. बॉम्बे लॅबमध्ये गाण्याचं ध्वनिमुद्रण झालं. सुमारे साठेक वादक आणि गायिका अनुराधा पौडवाल यांनी एकत्र एकाच वेळी ध्वनिमुद्रित केलेलं हे गाणं पहिल्याच टेकमध्ये ओके झालं. चित्रपटातील एका कौटुंबिक सोहळ्यात नायिका अलका कुबल यांच्या तोंडी असलेलं हे गाणं फार अप्रतिम झालंय. पडद्यावर श्रीकांत मोघे, अशोक सराफ, जयराम कुलकर्णी, शेखर ताम्हाणे इत्यादी कलाकारांच्या चेहऱ्यावरचे बदलते भाव आणि अनुराधा पौडवाल यांच्या स्वरांमधून सुधीर मोघे यांचे शब्द, सुहासचंद्र कुलकर्णी यांचं संगीत, सुश्राव्य असं हे गीत कितीही वेळा ऐकलं तरी हवंहवंसं वाटतं... आपल्या जीवनाचा सुरेख आलेखच जणू... 

कधी ऊन तर कधी सावली
कधी चांदणे कधी काहिली
गोड करूनिया घेतो सारे
लावुनिया प्रीतीची झालर
जरा विसावू या वळणावर... 

सुधीर मोघेगीत, संगीत आणि अनुराधा पौडवाल यांचा स्वर, सारं काही सुरेख जुळून आलेलं. संगीतकार आणि निर्माते सुहासचंद्र कुलकर्णी यांनी जुळवून आणलेला हा सुस्वर योग! कारण सुहासचंद्रांचं संगीतकलेवर अतिशय प्रेम. शालेय जीवनापासून गाण्याचं वेड... ‘मॉडर्न हायस्कूलमध्ये असताना वाद्यवृंदानं मला घडवलं,’ असं ते म्हणतात. शाळेतल्या प्रत्येक स्नेहसंमेलनात ते भाग घ्यायचेच. पुढे ‘मेलडी मेकर्स’च्या रूपातून भव्य ऑर्केस्ट्राची निर्मिती केली. १० सप्टेंबर १९६१ रोजी पहिला प्रयोग सादर केला आणि नंतर देश-विदेशात ‘मेलडी मेकर्स’चे असंख्य प्रयोग झाले. वाद्यं कशी जुळवायची, ट्युनिंग कसं करायचं, टीमवर्क म्हणजे काय, कार्यक्रमाची सुरुवात-शेवट कसा हवा यावर प्रचंड मेहनत घेतली आणि जगभरात नाव झालं. दोन हजारांच्या वर प्रयोग झाले. सुहासचंद्र म्हणतात, की मी लयींवर, कंपनांवर, संवेदनांवर, वेदनांवर प्रेम करतो... मानवी भावना प्रसन्न करणारं संगीत हे देवाकडं घेऊन जातं. खरोखर संगीतकलेशी ज्याचे सूर जुळले त्याचं देवत्वाशी नातं जुळतं... तसंच कवीचं असतं. ‘शब्दांचा खेळ मांडून देवी सरस्वतीला तो प्रसन्न करून घेतो. त्या शब्दांमध्ये, त्या कवितेमध्ये, त्या गाण्यामध्ये मन:पूर्वकता, स्वाभाविकता आणि कालजयित्व असायला लागतं,’ असं सुधीर मोघे यांनी म्हटलंय. असा हा शब्दसुरांचा खेळ जुना, पुरातन, युगायुगांचा! वर्षामागून वर्षं सरतात, सुख-दु:खाच्या क्षणांच्या आठवणी उरतात. त्या आठवणी, ते क्षण ज्यांना दु:खाची किनार असते, तर कधी प्रीतीच्या सुखाची झालर. कविमनात उठते एक संवेदनेची लहर... एक लाट. त्या लाटेवर उठतात अनेक तरंग... या तरंगांना कवी देतो शब्दांचे रंग. हे रंग कधी असतात गडद, तर कधी फिके. त्याच्या मनाचं आभाळ स्वच्छ निळं, तर कधी दाटून आलेलं असतं धुकं... धुक्याची चादर हलकेच बाजूला होते आणि समोर उभी असते कविता! अनिमिष नेत्रांनी कवी पाहत राहतो... शब्दांनी कवेत घेतो आणि त्याच्याही नकळत ती कविता रसिकांच्या स्वाधीन करतो. एखादा संगीतकार तिला स्वरांचा साज चढवतो... स्वरांनी कविता मोहरते... गाणं होते आणि सुमधुर गळ्यातून रसिकांच्या काना-मनात हळूच शिरते... हा प्रवास युगायुगांचा, वर्षानुवर्षं आपणही अनुभवायचा... सरत्या वर्षाला निरोप देताना कृतज्ञ भावनेनं जपायचा... 

खेळ जुना हा युगायुगांचा
रोज नव्याने खेळायाचा
डाव रंगला मनासारखा
कुठली हुरहूर कसले काहूर
जरा विसावू या वळणावर... 

- डॉ. प्रतिमा जगताप
संपर्क : ९४२२२ ९२३८४

(लेखिका पुणे आकाशवाणी केंद्रात वरिष्ठ उद्घोषिका म्हणून कार्यरत आहेत.)
 
(दर मंगळवारी प्रसिद्ध होणाऱ्या ‘कविता...स्वरांनी मोहरलेल्या’ या सदरातले लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/HfxM58 या लिंकवर वाचता येतील.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Chandrakantsalvi267 About 355 Days ago
Dr pratiba Jagtap kavita far sunder vatli( avadali
0
0
पुष्पलता लाड About 357 Days ago
भूतकाळ विसरून भविष्याकडे वाटचाल केली तर जगणे नक्की सुसह्य होईल
0
0
Amarr Paatiel About 357 Days ago
Vaaa
0
0

Select Language
Share Link