Next
मिडनाइट इन पॅरिस
प्रसन्न पेठे (Prasanna.Pethe@myvishwa.com)
Tuesday, January 09 | 02:30 AM
15 2 0
Share this story

जॉनर कुठला का असेना, सिनेमा एन्जॉय करण्यातला आनंद आगळाच!.. त्यामुळे ‘सिनेसफर’मध्ये आतापर्यंत आपण काही वॉरफिल्म्स आणि काही रोमँटिक जॉनरमधल्या सिनेमांच्या कथांबद्दल बोललो असलो तरी आता आपण असे काही सिनेमे पाहू जे ‘मस्ट सी’ अशा कॅटेगरीतले आहेत... मग त्यांचा जॉनर कुठलाही का असेना!... या ‘मस्ट सी’च्या यादीत आज पाहू या वूडी अॅलनच्या ‘मिडनाइट इन पॅरिस’बद्दल...
..... 
खूप जण असतात जुन्या काळात रमणारे! भले त्यांनी स्वतः प्रत्यक्ष तो काळ ‘याचि देही याची डोळा’ अनुभवलेला नसतो; पण तरीही त्या काळाविषयी वाचून, ऐकून, फोटोज पाहून किंवा त्या काळचे सिनेमे पाहून एक विलक्षण ओढ वाटत असते. विशेषतः काही गिफ्टेड मंडळींना तर तो गुजरा हुआ जमाना इतका भावत असतो, की ते हळहळत असतात, त्या काळात आपण का नाही जन्मलो किंवा का नव्हतो म्हणून!... एक प्रकाराची आत्मीयता असते त्या काळाविषयी. तसंच काहीसं होतं ‘मिडनाइट इन पॅरिस’ या सिनेमाच्या कथानायकाच्या बाबतीत! या फिल्मचा हिरो हॉलिवूडचा धडपड्या पटकथाकार गिल पेंडर्स! त्याला कायम आकर्षण वाटत असतं, ते शंभर वर्षांपूर्वीच्या म्हणजे १९२०च्या दशकाचं! सिनेमाच्या कथानायकाची १९२०च्या दशकात जगण्याची स्वप्नं प्रत्यक्षात कशी उतरतात याची अत्यंत रंजक रोमँटिक कथा आपल्या हातखंडा धमाल स्टाइलमध्ये मांडलीय लेखक, दिग्दर्शक वूडी अॅलनने! 

वूडी अॅलन हा स्वतःच एक विलक्षण रसायन! अभिनेता, दिग्दर्शक, पटकथाकार, नाटककार आणि क्लॅरिनेट प्लेयर असं विविधांगी व्यक्तिमत्त्व! त्याने करिअरची सुरूवात स्टँड-अप कॉमेडियन म्हणून केली आणि पुढे ७०च्या दशकात स्वतः फिल्म्स लिहून दिग्दर्शित करायला सुरूवात केल्यावर एक वेगळाच धमाल ट्रेंड हॉलिवूडमध्ये आणला. आपल्या बहुतेक गाजलेल्या सिनेमांत तो मध्यवर्ती भूमिकेत असायचा आणि त्यातही लेखक हे कॅरॅक्टर त्याच्या विशेष आवडीचं. त्याच्या बऱ्याच सिनेमांची सुरूवात कुणाच्या तरी तोंडच्या संवादाने होत असते, क्वचित काही अपवाद वगळता त्याच्या सिनेमांत न्यूयॉर्कही हटकून येऊन जातं. 

त्याने दिग्दर्शित केलेल्या ‘मिडनाइट इन पॅरिस’मध्ये त्याची स्वतःची भूमिका नव्हती. या सिनेमाच्या पटकथेबद्दल त्याला वयाच्या ७६व्या वर्षी ‘बेस्ट ओरिजिनल स्क्रीनप्ले’चं ऑस्कर अॅवॉर्ड मिळालं होतं! २०११ साली आलेला हा सिनेमा त्याच्या नेहमीच्या चाकोरीपेक्षा वेगळा ठरला तो त्याच्या अफलातून ट्रीटमेंटमुळे! याची कथा काहीशी नव्वदच्या दशकात ‘बीबीसी’वर दाखवल्या गेलेल्या ‘गुडनाइट स्वीटहार्ट’ नावाच्या सीरिजवरून प्रेरणा घेतलेली. त्या सीरिजमधला गॅरी स्पॅरो हा नव्वदच्या दशकातला टीव्ही रिपेअरमन एका टाइम पोर्टलमुळे उलटा कालप्रवास करून दुसऱ्या महायुद्धाच्या काळातल्या लंडनमध्ये जातो आणि कायकाय गमती घडतात ते त्यात दाखवलं होतं – वूडी अॅलनने कालप्रवासाची ही कल्पना वापरताना आपलं सुपीक डोकं चालवून अशी काही भन्नाट पटकथा तयार केली, की ते पाहताना आपण त्या कथानायकाच्या नॉस्टॅल्जियाचाच एक भाग होऊन जातो! 

सिनेमा सुरू होतो तो सिडनी बश्येच्या सॅक्सोफोनच्या जादुई जॅझ ट्यूनवर! पॅरिस शहरातल्या एकामागोमाग एक उलगडणाऱ्या अप्रतिम देखाव्यांनी! पॅरिसच्या वेगवेगळ्या भागातली दृश्य आपण डोळ्यांत साठवेपर्यंत टायटल्स सुरू होतात ती गिल आणि इनेझच्या संवादांच्या पार्श्वभूमीवर! गिल पेंडर्स (ओवेन विल्सन) हा आपली प्रेयसी इनेझबरोबर (रॅशेल मॅकअॅडम्स) बागेत फिरतोय. तो पॅरिसच्या अशक्य प्रेमात आहे. ‘हाच माहौल पावसाच्या वर्षावात कसला रोमँटिक असेल आणि १९२० सालचं पॅरिस तर कित्ती सुंदर असेल’ हे त्याचं म्हणणं इनेझला बिलकुलच पटत नाहीये. तो भयंकर स्वप्नाळू, तर ती अगदीच प्रॅक्टिकल! तो प्रचंड भारला गेलाय पॅरिसच्या सौंदर्याने. त्याचे आवडते सर्वच लेखक आणि संगीतकार, गायक हे २०च्या दशकात पॅरिसमध्ये राहिले होते, त्याविषयी वाचलेलं सर्व त्याला आठवतंय आणि त्यात हरवून जात, त्या जादुई वातावरणात राहण्यासाठी तो त्याच्या हॉलिवूडच्या स्क्रिप्ट रायटिंगच्या जॉबला लाथ मारून आणि तिथल्या घराचा त्याग करून अगदी एका सेकंदात इथे कायमचा राहायला एका पायावर तयार असल्याचं तिला सांगतोय... पण इनेझला न्यूयॉर्क सोडून जाण्याची कल्पनाच सहन न होणारी! लग्नानंतर पॅरिसला कायमचं शिफ्ट होण्याची गिलची कल्पना ती सपशेल धुडकावून लावते. 

बागेतून फिरून ते हॉटेलवर परततात. तिथे इनेझचे आई-वडील त्यांची जेवणासाठी वाट बघतायत. खरं तर इनेझचे वडील त्यांच्या बिझनेस डीलसाठी आलेत; पण येताना त्यांनी गिल आणि इनेझला पॅरिसची सैर घडण्यासाठी बरोबर आणलंय. जेवताना गिल त्याचं पॅरिसवरचं प्रेम पुनःपुन्हा सांगतो; पण ते इनेझच्या वडिलांना पसंत नाही. दोघांचे काहीसे खटकेही उडतात. आणि तेवढ्यात पॉल बेट्स (मायकेल शीन) आपल्या प्रेयसीला कॅरोलला (नीना अरिआन्दा) घेऊन तिथे येतो. आपल्या या जुन्या इन्टलेक्च्युअल मित्राला अचानक तिथे आलेला पाहून इनेझ भलतीच खूश होते. पॉल कसल्याशा विषयावर लेक्चर द्यायला आलाय म्हणे तिथे. इनेझ ते ऐकून इम्प्रेस झालीय. ती त्या दोघांची गिल आणि आई-वडिलांशी ओळख करून देते. पॉल त्यांना आपल्याबरोबर व्हर्सायला येण्याचं आमंत्रण देतो. गिलच्या मनाविरुद्ध इनेझ त्याला आपल्याबरोबर यायला राजी करते. सगळे व्हर्सायला जातात. तिथे पॉलचं सर्वज्ञानी असल्यागत प्रौढी मिरवणं गिलच्या डोक्यात जातं. त्यातून इनेझ तो लिहीत असलेल्या ‘नॉस्टॅल्जिया शॉप’वरच्या कादंबरीचा विषय काढते. पॉल त्याला ‘मिनिव्हर चीव्ही’ संबोधून त्याची थट्टा उडवतो आणि अर्थातच गिलला ते आवडत नाही. पुढे रोदांच्या मॉन्युमेंटजवळ पॉल तिथल्या म्युझियम गाइडशी (कार्ला ब्रुनी) वाद घालतो, आपलीच माहिती बरोबर असल्याचं ठासून सांगत; पण त्या वेळी गिल तिची बाजू घेऊन आपण एक जाडजूड पुस्तक त्याच संदर्भात वाचलंय आणि त्यानुसार पॉलच चुकीचं असल्याचं सांगतो. इनेझला ते जरा चमत्कारिकच वाटतं. पुढे त्यांची पुन्हा वाइन टेस्टिंगच्या ठिकाणी भेट होते आणि पॉल त्या दोघांना डान्सला चलण्याविषयी आग्रह करतो. गिलला पॅरिसच्या रस्त्यावरून चालण्याचा आनंद घ्यायचाय आणि पॉलची कटकटही नकोच आहे. त्यामुळे इनेझला, पॉल आणि कॅरोलबरोबर सोडून तो एकटाच पॅरिसच्या अनोळखी गल्लीबोळांतून फिरत जातो आणि रस्ता चुकतो. एव्हांना रात्र झालीय. एका आडगल्लीतल्या एका चर्चच्या पायरीवर तो बसलाय. काय करावं याचा विचार करत. तेवढ्यात जवळच्या क्लॉकटॉवरमध्ये रात्रीचे बाराचे ठोके पडतात आणि त्या आडगल्लीच्या दुसऱ्या टोकाकडून त्या निर्जन बोळामध्ये एक व्हिंटेज प्युजो कार येताना दिसते. ती कार येऊन बरोबर त्याच्यासमोरच थांबते आणि दरवाजा उघडून आतली मंडळी त्याला हाक मारतात. त्याला वाटतं चुकून त्याला दुसराच कुणी समजून ते बोलावतायत; पण ते त्यालाच आग्रह करतात पार्टीला चलण्याचा! तो आत शिरून त्यांच्यात बसतो. कार निघते आणि सुरू होतो एक अद्भुत चमत्कारिक सिलसिला...

कारमधल्या मंडळींबरोबर तो एका क्लबमध्ये शिरतो. क्लबच्या एका कोपऱ्यातून कुणीतरी त्याच्या ओळखीचं जुनं गाणं ‘लेट्स डू इट..लेट्स फॉल इन लव्ह’ पियानोवर म्हणतोय! त्याला ते सूर ओळखीचे वाटतात. पार्टीत त्याच्यासमोर आलेली अमेरिकन तरुणी त्याची चौकशी करते. स्वतःची ओळख ‘झेल्डा’ अशी करून देते आणि गिल लेखक आहे ऐकल्यावर आपल्या पार्टनरला हाक मारून जवळ बोलावते. तो आपली ओळख ‘स्कॉट फित्झेराल्ड’ अशी करून देतो. त्या दोघांची नावं पूर्वीच्याच प्रसिद्ध लेखक पती-पत्नींची असल्याचा योगायोग गिलला विशेष वाटतो. दरम्यान ते पियानोवर वाजणारं गाणं आणि ती चाल, ते सूर कधीतरी ऐकलेत हे जाणवून गिल हैराण आहे... ‘मी कुठे आलोय?’ तो त्यांना विचारतो. ‘जां कॉक्तूसाठी पार्टी आहे ही!’ स्कॉटचे ते उद्गार त्याला दचकवतात. काहीतरी विचित्र घडतंय अशी जाणीव होतेय त्याला हळूहळू.... दरम्यान ते पती-पत्नी त्याची मनःस्थिती ठीक करण्यासाठी ती पार्टी सोडून दुसऱ्या पार्टीत जाऊ म्हणत त्याला खेचून नेतात, तर तिथे गिल पाहतो जोसेफाइन बेकर या एके काळच्या प्रसिद्ध डान्सरला... तिथून निघून फित्झेराल्ड पती-पत्नी त्याला नेतात आणखी एका क्लबमध्ये. आणि तिथे स्कॉट गिलची ओळख करून देतो अर्नेस्ट हेमिंग्वेशी!!! आता तर गिल पडायच्या बेतात. हे सगळं काय चाललंय?... हेमिंग्वेचा मोठा फॅन असलेला गिल बोलता बोलता त्याला आपलं पुस्तक वाचण्याची विनंती करतो. त्या वेळचे हेमिंग्वेचे डायलॉग्ज फारच चुरचुरीत आणि धम्माल! 

गिल : मला एक प्रचंड मोठी मदत कराल?
हेमिंग्वे : काय ती?
गिल : माझं लेखन वाचाल?
हेमिंग्वे : तुझी कादंबरी?
गिल : हो..म्हणजे....बघा...तुमची प्रतिक्रिया काय असेल....
हेमिंग्वे : माझी प्रतिक्रिया?...मला तिरस्कार आहे...
गिल : अहो..पण..तुम्ही अजून बघितलीही नाही आणि...
हेमिंग्वे : हे बघ ती जर भिकार असेल तर मला भयंकर तिरस्कार वाटेल. कारण मला राग येतो भिकार लिहिणाऱ्यांचा आणि जर का ती फारच चांगली असेल मग तर मला हेवा वाटेल आणि मग मी जास्तच तिरस्कार करेन....

..पण हेमिंग्वे त्याला सांगतो, की त्याच्या कादंबरीचं बाड गिलने गर्त्र्युड स्टाइनला दाखवावं, त्याच्या मते ती नक्कीच चांगलं मार्गदर्शन करेल गिलला! हर्षभरीत झालेला गिल ‘मी आलोच माझं हस्तलिखित घेऊन’ म्हणत तिथून पळतच बाहेर पडतो.... प्रचंड खूश होऊन तो स्वतःशीच बडबडत निघालाय हॉटेलकडे.... ‘हे जे काही चाललंय ते विलक्षण आहे... कोण कोण भेटलेत मघापर्यंत? फित्झेराल्ड्स, हेमिंग्वे, पापा... अरे हो, पण मी कुठे भेटू शकतो हे हेमिंग्वेला विचारायचं राहिलंच की..’ पुटपुटत तो पुन्हा उलटा वळून त्या क्लबपाशी येतो....तर....तर काय?....त्या रस्त्यावरून तो क्लब गायबच झालेला असतो.. तिकडे २०१० सालचं नवीनच दुकान उभं असतं... गिल वेडा!... तो पुनःपुन्हा ती बिल्डिंग आणि तिथली शॉप्स शोधतोय; पण त्या क्लबचा नामोनिशाणा नाहीये कुठे... गोंधळलेला गिल हॉटेलवर परत आलाय... इनेझला तो त्याने अनुभवलेले विलक्षण क्षण आणि फित्झेराल्ड, हेमिंग्वे, कोल पोर्टरविषयी सांगू पाहतो; पण ती अर्थातच त्याच्या मनाचे सारे खेळ म्हणून त्याला उडवून लावते...  

दुसऱ्या दिवशी ‘एक अफलातून सरप्राइज देतो’ असं सांगत तो तिला कसंबसं आपल्याबरोबर यायला तयार करून त्या आदल्या रात्रीच्या बोळात शिरतो आणि त्याच पायऱ्यांशी येतो... इनेझची टकळी चालू होते... ‘कशाला आणलंयस या बोळात? ..आणि ते हस्तलिखिताचं बाड बरोबर घेऊन का फिरतोयस?’ वगैरे... गिल बिचारा तिला ‘तू थांब..थोडी थांब...आणि मग बघ...तू वेडी होणारेस आश्चर्याने.. तू म्हणत होतीस ना, की मी जरा वेगळाच का वागतोय दिवसभर वगैरे...मग बघच आता.. तुझं तुलाच कळून जाईल...’ वगैरे सांगत राहतो... पण काही मिनिटांतच ती कंटाळते... ‘तुला यात कसली गंमत किंवा अॅडव्हेन्चर वाटतंय मला नाही ठाऊक, पण मी निघाले..’ असं म्हणून ती गिलला तिथेच सोडून कॅब करून निघूनही जाते.... गिल बिचारा स्वतःशी बोलत राहतो ‘काय चुकलं माझं....त्या दिवशी मी त्या वाइन टेस्टिंगच्या ठिकाणाहून निघालो.. तिला त्या डान्ससाठी पॉलबरोबर सोडलं.. मग इथे आलो.. इथे बसलो... आणि मग त्या वरच्या घड्याळात रात्रीच्या बाराचे टोले पडले....’ ..आणि तो हे म्हणत असतानाच रात्रीचे बारा वाजतात... टोले पडायला सुरुवात होते... आणि टोले थांबताना बोळाच्या टोकाकडून आदल्या रात्री त्याला घेऊन गेलेली व्हिंटेज कार पुन्हा येते... या वेळी कारमध्ये अर्नेस्ट हेमिंग्वे स्वतः असतो!... जाताना तो त्याला प्रेमाचं तत्त्वज्ञान ऐकवतो तेही अशा भारी शब्दांत – ‘I believe that love that is true and real creates a respite from death. All cowardice comes from not loving, or not loving well, which is the same thing. And when the man who is brave and true looks Death squarely in the face like some rhino-hunters I know, or Belmonte, who’s truly brave. It is because they love with sufficient passion, to push death out of their minds...’ 

गिलला घेऊन तो गर्त्र्युड स्टाइनच्या घरी जातो. तिथे गिलला आणखी एक मोठा धक्का मिळतो, जेव्हा त्याची ओळख तिथे असणाऱ्या पाब्लो पिकासोशी आणि त्याची मैत्रीण एड्रिआनाशी होते.... तिच्या अप्रतिम लावण्याने गिल भारून जातो... पिकासोने तिचं एक चित्रं काढलेलं असतं, ज्यावर तिथे बरीच चर्चा घडते.... इथून पुढे कथेला एक वेगळंच वळण मिळतं...

गिल कळत नकळत एड्रिआनाकडे आकर्षित होतो... आणि मग त्याच्या पुढल्या रात्रीच्या व्हिंटेज कारमधून त्याच्या आवडीच्या १९२०च्या दशकातल्या काळातल्या भेटी, एड्रिआनाबरोबरच व्हायला लागतात. आणि त्याचा परिणाम त्याच्या २०१० सालातल्या दिवसाच्या नॉर्मल रुटीनवर व्हायला लागतो. इनेझचे वडील त्याच्या कॅरेक्टरवर संशय घेऊन आपल्या या भावी जावयाच्या पाठलागावर एक डिटेक्टिव्ह सोडतात...

गिलला आपलं हे दोन-दोन काळात राहणं कठीण व्हायला लागतं आणि तो, पुढच्या भेटीत साल्व्हादोर दाली, मॅन रे आणि लुइस ब्युनेलसारख्या सर्रिअलिस्ट चळवळीच्या कलावंत मंडळींना ते सांगतो; पण आश्चर्य म्हणजे त्यांना त्याचं भविष्यकाळातून त्यांच्या काळात असं कालप्रवास करत येणं अगदीच पटतं आणि परफेक्टली नॉर्मलसुद्धा वाटतं. 

दरम्यान गिलला कळून चुकतं की त्याला जसं त्याच्या भूतकाळात म्हणजे २०च्या दशकात रमायला आवडतंय, तसंच एड्रिआनाला तिचा भूतकाळ म्हणजे १८८०-९०चं दशक जास्त आकर्षित करतंय. आणि मग त्याचा जरा गोंधळच उडायला सुरुवात होते. 

इनेझबरोबर फिरताना तो एका अँटिक शॉपमध्ये जातो आणि कोल पोर्टरची जुनी रेकॉर्ड विकत घेताना त्याची ओळख ते दुकान चालवणाऱ्या गॅब्रिएलाशी होते. तीही जुन्या काळात रमणारी आहे. पुढे एकदा इनेझ आणि पॉलबरोबर एका चित्रांच्या प्रदर्शनात गेल्यावर तिथे पाब्लो पिकासोने काढलेलं एड्रिआनाचं तेच चित्र ठेवलेलं असतं. पॉल आपल्या अतिशहाणपणाने सर्वांना इम्प्रेस करण्यासाठी ते पेंटिंग कुण्या मॅडेलीन ब्रीसूचं असल्याचं सांगू पाहतो, तेव्हा त्या चित्रामागची खरी कहाणी पिकासोच्या भेटीमुळे कळलेला गिल, ते पेंटिंग मॅडेलीन ब्रीसूचं नसून एड्रिआना नामक एका लावण्यवतीचं असल्याचं सांगत भडाभडा बोलत सुटतो... सगळे चाट!!! तो प्रसंग मजेदार!....

एका रोडसाइड शॉपमध्ये त्याला एड्रिआनाने त्या काळी लिहिलेली डायरी मिळते. म्युझियमच्या गाइडकडून (कार्ला ब्रुनी) तो ती इंग्लिशमध्ये समजावून घेतो आणि थक्क होतो. त्या डायरीत चक्क त्याचा उल्लेख असतो. त्याने इअररिंग्ज दिल्याचं आणि त्याच्याविषयी प्रेमभावना असल्याचंही लिहिलेलं असतं. डायरीबरहुकूम एड्रिआनाला इअररिंग्ज देण्यासाठी तो इनेझच्या इअररिंग्ज ढापून तिला द्यायचं ठरवतो; पण एक गोची होते... तो धमाल प्रसंग बघण्यासारखा! 

नंतर दुकानातून एड्रिआनासाठी इअररिंग्ज खरेदी करून (एव्हाना रूटीन झालेला रात्रीचा कालप्रवास करून) तिला भेटून त्या तिला देतो. त्यांच्यात प्रेमभरली गोड जवळीक! पण एक गंमत घडते. ती दोघं बोलत असताना एक बग्गी येते आणि त्यांना घेऊन जाते थेट ३० वर्षं आधीच्या १८९०च्या काळात जो काळ एड्रिआनाला आवडत असतो!.... तो माहौल बघून भारावलेली एड्रिआना उत्साहाने सांगते, ‘आपण पुन्हा १९२०च्या काळात न जाता इथेच राहू या. हेच खरं सुवर्णयुग आहे!’... गिलला आता मात्र तिला खरं काय ते सांगणं भाग पडतं. जशी ती कालप्रवास करून तिच्या आवडीच्या १८९०मध्ये आलीय, तसाच तोसुद्धा २०१० मधून १९२०मध्ये आल्याचं तो सांगतो. आणि आपापल्या आवडीच्या काळात राहण्यावरून दोघांमध्ये मतभिन्नता.... आणि त्याला साक्षात्कार होतो, की माणूस हा कायमच असंतुष्ट असतो... माणूस कुठल्याही काळत असला, तरी त्याला त्याच्या आधीचा काळ सुवर्णयुग वाटत असतो आणि त्या जुन्या काळात असावंसं वाटतं आणि तो जेव्हा त्या काळात जातो तेव्हा त्याच्याही आधीच्या काळाची मोहिनी वाटत राहते.. थोडक्यात आयुष्यात आपण कधीच समाधानी नसतो आणि त्यामुळे हे असं घडत राहतं......(कदाचित वर्तमानातल्या समस्यांपासून काढलेली ती पळवाट?)....हे असं आधीच्या काळासाठी झुरणं चांगलं नाही हे गिलला पटलंय...

गर्त्र्युड स्टाइनच्या शेवटच्या भेटीत ती त्याच्या पुस्तकाविषयी बोलताना त्याने पुनर्लेखन केलेले दोन्ही भाग चांगले झाल्याचं सांगून हेमिंग्वेचा एक निरोप ती त्याला देते, ज्याने त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळते...

गिल आणि इनेझ हॉटेलात! त्याला पॅरिस सोडायचं नाहीये आणि तिला अमेरिका सोडायची नाहीये. मतभेद टोकाला जातायत... अखेर ब्रेकअपचा निर्णय!.... ती आई-वडिलांबरोबर निघून जाते...

(आणि एक खास वूडी अॅलन टच!! गिलच्या पाठलागावर असणारा तो डिटेक्टिव्ह कुठेतरी १९व्या शतकात जाऊन अडकलाय... एक मोठ्या उमरावाच्या राजवाड्यात...आणि सैनिक मागे लागून त्याची पळापळ....)

गिल निवांत....पॅरिस एन्जॉय करत फिरतोय.... रात्र होत आलीय..... कुठून तरी घड्याळाचे टोले पडतायत... तो विचारमग्न उभा... नदीकिनारी... दूरवर प्रकाशात झळाळणारा आयफेल टॉवर... अचानक ‘ए...हाय..’ ..हाक ऐकून तो वळतो... अँटिक शॉपवाली गॅब्रिएला समोर उभी. पॅरिसला कायमचा राहण्याचा आपला डिसिजन तो तिला सांगतो... दोघं बोलत निघतात. अचानक पाऊस सुरू होतो....

‘पावसाला सुरुवात होतेय...’
‘पण मला आवडतो पाऊस’ 
‘पावसातच पॅरिस खरं सुंदर दिसतं’
‘खरंय...’
‘बाय द वे मी गॅब्रिएला’..
‘मी गिल..’
‘नाइस टू मीट यू ..’

आणि दोघं त्या पावसातल्या रात्री भिजत निघालेत...त्यांच्यात खूप मोकळेपणा..

वूडी अॅलनने तो रोमँटिसिझमचा काळ - जेव्हा साहित्यिक, कला आणि संगीत क्षेत्रातली एकाहून एक दिग्गज मंडळी एकाच वेळी आपापल्या बुद्धीची सर्वोत्तम अदाकारी पेश करत होते तो काळ अक्षरशः जिवंत मांडलाय. सिनेमा बघताना आपणही गिलबरोबर तो काळ जगतो. आपल्यालाही वाटून जातं, की त्या काळातच जगावं. तिथेच असावं. कदाचित आपणही आपल्याकडच्या अशाच भूतकाळात जाऊन जगावं. आपल्या भारतातल्या त्या जुन्या काळात - जेव्हा आपल्याकडच्याही अशाच सगळ्या दिग्गज कवी, शायर, गायक, संगीतकार, लेखक, साहित्यिक, चित्रपट कलाकार, दिग्दर्शक अशा साऱ्यांच्या उत्तुंग प्रतिभेचा सर्वोत्तम आविष्कार जगासमोर प्रकट होत होता. कदाचित १९४०-७० मधली ती ३० वर्षं! जेव्हा मराठी, हिंदी, बंगाली.. नव्हे सर्वच भाषांमधली रंगभूमी, साहित्य क्षेत्र, संगीत क्षेत्र, चित्रपट क्षेत्र, कला क्षेत्र समृद्धतेच्या शिखरावर होतं! पण..पण.. पुन्हा हा आपलाही नॉस्टॅल्जियाच?....वर्तमानातल्या भेसूर समस्यांपासून दूर जाण्यासाठी काढलेली पळवाट? स्वप्नरंजन?..काही असो ‘मिडनाइट इन पॅरिस’ चुकवू नये असाच!

(दर मंगळवारी प्रसिद्ध होणाऱ्या ‘सिनेसफर’मधील सर्व लेख एकत्रितरीत्या या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
15 2 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
संग्राम About
Thanks a lot! एका खूपच सुंदर सिनेमा बद्दल खूपच छान लिहिल्याबद्दल!!!!
0
0

Select Language
Share Link