Next
इस्तंबूलचे सुंदर याल्ल!
BOI
Friday, June 22, 2018 | 09:45 AM
15 0 0
Share this storyइस्तंबूल हे टर्कीचं सगळ्यात मोठं शहर असून, अगदी पुन्हा पुन्हा पाहायला जावं, असं देखणं आहे. तिथल्या ऐतिहासिक वास्तू म्हणजे याल्ल. त्या वास्तू म्हणजे तिथल्या पूर्वीच्या रईस रहिवाशांची बॉस्फरसच्या किनाऱ्यावरची ‘समर होम्स’. या किनाऱ्यावर पूर्वी पाशा आणि वजिरांची कुटुंबं नौकाविहार करत, बागेत संगीत ऐकत सहल करत, पाण्याच्या बाजूनं घोडागाड्यांतून रपेट करत. एक लोभस विश्व होतं इथं....  ‘विश्वगामिनी सरिता’ सदराच्या आजच्या भागात इस्तंबूलमधल्या ‘याल्ल’बद्दल...
...........
प्रवास करताना आपण अमुक शहरात काही विशिष्ट वास्तू पाहायच्या, हे गृहीतच धरतो. न्यूयॉर्कला लिबर्टीचा पुतळा, लंडनला बिग बेन, पॅरिसला आयफेल टॉवर वा रोमला कॉलिसियम आणि इस्तंबूलला गेलं, की तिथले ब्लू मॉस्क. इस्तंबूलचे हगिया सोफिया, टोपकापी पॅलेस, तिथला बाजार ही ठिकाणं बघितली जातातच. खूप पुरातन इतिहास आहे, इस्तंबूलच्या या सर्व वास्तूंना. टर्कीच्या प्रवासवर्णनाच्या कुठच्याही पुस्तकात या सर्व ठिकाणांबद्दल खूप माहिती मिळतेच. म्हणून त्यांच्याबद्दल इथे लिहीत नाहीये.

मला इस्तंबूल खूप आवडतं. दोनदा प्रवास करून आले आहे टर्कीत. इस्तंबूल हे टर्कीचं सगळ्यात मोठं शहर असून, अगदी पुन्हा पुन्हा पाहायला जावं, असं देखणं आहे. इस्तंबूलला पर्यटक नेहमी बघतात त्या चाकोरीव्यतिरिक्त अन्य वास्तूंबद्दल या लेखात मी लिहिणार आहे. त्या वास्तू म्हणजे तिथल्या पूर्वीच्या रईस रहिवाशांची बॉस्फरसच्या किनाऱ्यावरची ‘समर होम्स’ अथवा याल्ल (Yalı). समुद्रकिनाऱ्याला ग्रीक भाषेत Yialos असं म्हणतात. या शब्दावरून ‘याल्ल’ हा शब्द आला आहे. या किनाऱ्यावर पूर्वी पाशा आणि वजिरांची कुटुंबं नौकाविहार करत, बागेत संगीत ऐकत सहल करत, पाण्याच्या बाजूनं घोडागाड्यांतून रपेट करत. एक लोभस विश्व होतं इथं.

मला प्रवास करताना पूर्वीचे भव्य महाल, वाडे, ऐतिहासिक बंगले बघायला खूप आवडतात. त्या काळचं राहणीमान, फर्निचर, पुतळे, पेंटिंग्स, सजावट, बागा, तेव्हाचे कपडे खूप भावतात. इंग्लंडला असताना तिथली जुनी ‘स्टेटली होम्स’ मुद्दाम जाऊन पाहिली. अमेरिकेत न्यूपोर्ट बीचला असलेली रईसांची ‘कॉटेजीस’ बघण्यासारखी आहेत. तसेच इस्तंबूलच्या ‘बॉस्फरस स्ट्रेट’वर असलेले ‘याल्ल’ खूप सुंदर व ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे आहेत.

पूर्वी हा सगळा टर्कीचा प्रदेश सिल्क रूटवर असल्याने देश-विदेशातील अनेक लोक इथे जमिनीच्या मार्गाने येऊन स्थायिक झाले. ‘बॉस्फरस स्ट्रेट’चा समुद्रमार्ग ब्लॅक सी ते ‘सी ऑफ मरमरा’ला (Sea of Marmara) जातो. त्यामुळे त्या स्ट्रेटवर बोटींची खूप वर्दळ असते. अगदी पुरातन काळापासून या समुद्रमार्गेही इथं प्रवासी आले आहेत. या सर्व लोकांच्या संस्कृतीचा इस्तंबूलवर प्रभाव झाला. या याल्लमध्ये राहणाऱ्या रईसांची पार्श्वभूमी खूप आगळी होती. टर्कीच्या ऑटोमन वजिरांपासून रशिया, इजिप्त, अर्मेनिया, इराण, इटली, फ्रान्स इत्यादी देशांतले लोक इथे येऊन एकमेकांच्यात मिसळले गेले. 

इथले बरेचसे स्त्री-पुरुष खूप देखणे वाटले. अतिशय नितळ गोरी कांती, काळेभोर रेशमी केस, मोठे डोळे, आकर्षक शरीरयष्टी असलेल्या स्त्रिया व उंचपुरे नाकीडोळी नेटके पुरुष. हैदराबादच्या निजामाच्या जनानखान्यात दोन सर्वांत सुंदर, स्टायलिश आणि आधुनिक स्त्रिया होत्या. त्या म्हणजे टर्कीच्या प्रिन्सेस दुर्रू शेहवर आणि प्रिन्सेस निलूफर. या दोघी टर्किश प्रिन्सेस जगातल्या सर्वांत सुंदर स्त्रियांत गणल्या जातात. या याल्लमध्ये असे अत्यंत देखणे उच्चभ्रू लोक राहत.

इ. स. १७००च्या काळात या इमारती लाकडाच्या असत. नंतर काही इमारती विटांच्याही बांधल्या गेल्या. ही टर्कीच्या सुलतानाच्या वर्दीत असलेल्या वजिरांची उन्हाळ्यात राहायची म्हणजेच ‘समर होम्स’ होती. ही याल्ल आर्ट नुव्हो, बरोक, एक्लेकटिक, अरेबास्क, निओ क्लासिकल अशा अनेक आर्किटेक्चरल स्टाइलची (वास्तुशैलीची) आहेत. याल्लना ‘ऑटोमन रेड’ हा खास लाल रंग असे. नंतरच्या इमारती हलक्या युरोपियन रंगाच्या झाल्या. मोठ्या वास्तूंमध्ये पुरुषांना राहायचा खास ‘सेल्मलिक’ म्हणून भाग असे आणि स्त्रियांसाठीच्या भागाला हॅरमलिक असे म्हणत. याल्लमधे स्नानासाठी सुंदर संगमरवरी हमाम होते व त्यात शरीरावर वाफ घेण्यासाठी स्टीमरूम असे. या दोन-तीन मजल्यांच्या घरांना समुद्राच्या पाण्याचे दृश्य असलेल्या मोठ्या लांब खिडक्या असतात. या बे-विंडोजना (Bay Windows) ‘कुंबा’ म्हणतात. तळमजल्यावर नोकर राहत व वरच्या मजल्यांवर मालक मंडळी. तुम्ही पूर्वी टीव्हीवर ‘अपस्टेअर्स डाउनस्टेअर्स’ किंवा ‘डाउनटन अॅबी’ या ब्रिटिश मालिका पाहिल्या असल्यास, अपर क्लास व इतर कामगार वर्गाच्या राहणीच्या पद्धतीत केलेला भेद तिथे पाहिला दिसेल. दिवाणखान्याच्या मधल्या चौकात नक्षीदार कारंजे असे. घरात डेकोरेटिव्ह जिने, खांब आणि कोनाडे. बसायला सुंदर बैठका, पर्शियन गालिचे. त्यावर मखमली रेशमी उश्या. बाजूला सुगंधी हुक्के. इथे पाश्चिमात्य संस्कृतीचा पगडा असे आणि पियानोमधून वाजणाऱ्या बीथोवन आणि मोझार्टच्या संगीताने घर भरून जाई. त्या काळात स्त्रिया सुंदर पेहराव करत. इस्लामची त्यांच्या राहणीवर बंधनं नव्हती. याल्लमधे अतिशय थाट असे. परदेशी मुत्सद्दी, राजदूत, संगीतकार, कलाकार यांचे टर्किश वजीर मोठ्या दिमाखाने मनोरंजन करत. मेजवान्या होत. घराभोवती गुलाबांचे सुंदर बगीचे आणि वेलींनी सजलेल्या कमानी असत. आवारात उंच सुरू, मॅग्नोलिया, स्टोनपाइनची झाड होती. दोन याल्लना जोडणाऱ्या पुलांना आच्छादन असे. म्हणजे स्त्रियांना फिरताना ‘प्रायव्हसी’ मिळे. उन्हाळ्यात सजवलेल्या बोटींचे ताफे पाण्यातून संगीताच्या तालावर जात. कवी लॉर्ड बायरननं जेव्हा हे महाल पाहिले, तेव्हा तो अतिशय प्रभावित झाला. त्यानं त्याच्या ‘Don Juan’ या कवितेत म्हटलं आहे - ‘Each villa on the Bosphorus looks a screen. New painted or a pretty opera-scene.’  

आता काही याल्ल पाडून तिथं लक्झरी अपार्टमेंट, हॉटेल, महागडे कॅफे झाले आहेत. ही जगातली अत्यंत महागडी रिअल इस्टेट आहे. प्रत्येक याल्लची किंमत अनेक मिलियन डॉलर आहे. आता बरेच अरब शेख त्यांचे मालक आहेत. मी बोटीतून बॉस्फरस सहल करताना बरीच याल्ल पाहिली. त्यांच्या आतमध्ये जाता येत नाही. मी बाहेरूनच नेत्रसुख घेऊन या घरांमध्ये कुठली माणसं राहिली असतील, त्यांच्या जीवनकथा, त्यांची रहस्यं वगैरेंच्या कल्पना मनात करत खूप फोटो काढले. त्यातल्या काहींचं फोटोंसकट वर्णन देत आहे.हा मिनी खडीव पॅलेस (Khedeve Palace) आता टर्कीमधली इजिप्शियन कॉन्सुलेट आहे. हा महाल इजिप्तचे शेवटचे खडीव अब्बास हिल्मी यांनी आपली आई एमिन हनिम हिच्यासाठी बांधला होता. इजिप्तच्या उन्ह्याळ्यात तिथल्या राजघराण्यातली मंडळी या हवेशीर, पाण्यालगतच्या आर्ट नुव्हो स्टाइलच्या महालात सुट्टीला येत. ऑटोमन सुलतानांचा आवडता इटालियन आर्किटेक्ट रेमांडो द आरोन्कोचं हे सुंदर डिझाइन आहे. याचं छप्पर खास फ्रेंच शॅटो पद्धतीचं आहे. महालासमोरचं रेलिंग खूप आकर्षक वाटलं. महमूद नदीम पाशा (१८१८-१८८३) याची ही सेल्मलिक, म्हणजे पुरुषांनी राहायची याल्ल. या इमारतीच्या शेजारी स्त्रियांसाठी याल्ल बांधली होती. नदीम पाशा हा ऑटोमन मुत्सद्दी होता. त्याचे पूर्वज जॉर्जियातले. त्याचे वडील बगदादचे गव्हर्नर होते. या इमारतीची खासियत म्हणजे तिचा टॉवर. हा पाशा पूर्वी व्हिएन्ना व प्रागला राहिला होता. म्हणून या याल्लवर तेथील बांधणीचा प्रभाव आहे. त्याचं रशियावर खास प्रेम होतं. म्हणून रशियन नावांप्रमाणे त्याला ‘नदीमॉ फ’ असं संबोधलं जात असे.या याल्लमध्ये नदीम पाशाचा जनाना राहत असे. त्याला हॅरमलिक म्हणत.Küçüksu Palace हा छोटा महाल ऑटोमन सुल्तान जेव्हा शिकारीला शहराबाहेर येत, तेव्हा थोड्या दिवसांसाठी वापरत असत. त्याचं बांधकाम युरोपियन धर्तीवर आहे. सुंदर कोरीव काम केलेल्या फायरप्लेसेस, युरोपियन फर्निचर, क्रिस्टलचे आरसे आणि हंड्या-झुंबरं, गालिचे, तैलचित्रं यांनी हा महाल सजलेला होता. जेम्स बाँडच्या ‘The World Is Not Enough’ या सिनेमाचं चित्रीकरण इथं झालं होतं. या याल्लजवळचा बॉस्फरसचा भाग सगळ्यात खोल असून, पाण्यात बरेच भोवरे असतात. इथे स्ट्रेट अरुंद होतो. ही वास्तू एडीप एफेंडी पाशाची आहे. तो सुलतानाच्या राज्यात खूपच मोठ्या पदावर होता. पुढे ही इमारत डोरीना नियेव्ह या एका ब्रिटिश महिलेनं विकत घेतली. अठराव्या शतकात तिनं इथल्या आयुष्याबद्दल ‘Romance of the Bosphorus’ असं पुस्तक लिहिलं. झेकी पाशाची याल्ल हे इ. स. १९००मधलं एक प्रमुख वॉटरफ्रंट मॅन्शन आहे. हा पाच मजली महाल बरोक शैलीमध्ये बांधला असून, त्यात २३ बेडरूम आहेत. नौकाविहारासाठी बोटी ठेवायला खाली पाण्यावर बोटहाउसदेखील आहे. ३२ हजार स्क्वेअर फुटांचा हा महाल दहा वर्षांपूर्वी एका अरब शेखने ११५ मिलियन डॉलरना विकत घेतला.

मला हे सुंदर याल्ल पाहिल्यावर असं वाटलं, की या भिंतींच्या मागे किती आयुष्यांच्या कथा काळाबरोबर नाहीशा झाल्या असतील. किती राजकीय खलबतं, खून-मारामाऱ्या, दुःखाच्या प्रसंगांना या भिंती साक्षी असतील. किती हळवे, प्रेमाचे शब्द बोलले गेले असतील, किती शेरो-शायऱ्या रचल्या गेल्या असतील, लपून केलेलं प्रेम असेल, प्रेमभंग आणि विरह असतील. कुटुंबांचे मानापमान असतील. इज्जतीखातर मनाविरुद्ध निकाह झाले असतील. जनानखान्यात सवतींचा मत्सर असेल. किती सौंदर्यवती इथं राहिल्या असतील. किती गुपितं इथं दडली असतील. पूर्वीच्या आलिशान, पण आता मोडकळीला आलेल्या या वास्तूंत या मंडळींची भुतं हिंडत असतील का? त्यांचं दुःख, विरह, प्रेम, संताप या याल्लना झपाटत असेल का?

नौकाविहाराच्या शेवटी बोटीतून उतरताना असे खूप विचार मनात येऊ लागले अन् मी एका सुंदर काल्पनिक जगात रमून गेले. 

सरिता नेने- सरिता नेने, कॅलिफोर्निया

(लेखिका हौशी आणि अभ्यासू पर्यटक असून, अमेरिकेतील पर्यटन क्षेत्रातील नामवंत कंपन्यांमधील दीर्घ अनुभवानंतर अलीकडेच निवृत्त झाल्या आहेत. लेखातील फोटो त्यांनी स्वतः काढलेले आहेत. ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर शुक्रवारी प्रसिद्ध होणाऱ्या ‘विश्वगामिनी सरिता’ या पाक्षिक सदरातील त्यांचे लेख  https://goo.gl/TjepRF या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध असतील.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link