Next
ज्येष्ठ मानसतज्ज्ञ उलगडणार ‘मैत्र मनाचे’
१० मार्च रोजी पुण्यात होणार पुरस्कार वितरण
प्रेस रिलीज
Friday, March 08, 2019 | 01:49 PM
15 0 0
Share this story



पुणे : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जेष्ठ महिला मानसतज्ज्ञांचा ‘मैत्र मनाचे’ या पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. या वेळी त्यांच्या मुलाखतीही ऐकण्याची संधी मिळणार आहे. हा कार्यक्रम १० मार्च २०१९ रोजी सायंकाळी पाच ते आठ या वेळेत एरंडवणे येथील डॉ. शामराव कलमाडी (कर्नाटक) हायस्कूलच्या सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे.

पुण्यातील सिग्मंड फ्रॉइड मेंटल हेल्थ रिसर्च अँड सायको अनॅलिसिस इन्स्टिट्यूट, इंडियन सायकिऍट्रिक सोसायटीची पुणे शाखा आणि पूना सायकिअॅट्रिस्ट असोसिएशन या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या पुरस्कार सोहळ्यासाठी मानसोपचारतज्ज्ञ आणि ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे, डॉ. उल्हास लुकतुके, डॉ. विद्याधर वाटवे व सनदी अधिकारी बालाजी मंजुळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. मानसशास्त्र आणि मानसिक आरोग्य क्षेत्रामध्ये आपापल्या योगदानातून शैक्षणिक पुस्तके, संशोधने, मानसशास्त्रीय उपचार तसेच मुलांची सर्वांगीण विकास पद्धती यात मोलाची कामगिरी करणार्‍या मान्यवरांचा प्रवास उलगडण्याबरोबरच त्यांचा सन्मान होणार आहे.

‘यंदाचा ‘मैत्र मनाचे’ पुरस्कार डॉ. उषाताई खिरे (प्रज्ञा मानस संशोधिका), प्रा. शामला वनारसे (साहित्य लेखन), डॉ. शुभा थत्ते (उपयोजित मानसशास्त्र), शोभाताई भागवत (विशेष योगदान), डॉ. सी. जी. देशपांडे व डॉ. आर. आर बोरुडे (शैक्षणिक), डॉ. पी. ए. भागवतवार (प्रशिक्षण) यांना जाहीर झाला आहे. डॉ. संज्योत देशपांडे व डॉ. शिरीष साठे या मान्यवरांच्या मुलाखती घेणार आहेत,’ अशी माहिती सिग्मंड फ्रॉईड मेंटल हेल्थ रिसर्च अँड सायको अनॅलिसिस इन्स्टिट्यूटचे संस्थापक- संचालक राजेश अलोणे यांनी दिली आहे.

‘मानसिक आरोग्य संवर्धन अलीकडच्या काळात महत्त्वपूर्ण गरज बनली आहे. जागतिक आरोग्य संस्थेच्या सर्व्हेक्षणानुसार भविष्यात भारत मानसिक आरोग्य समस्या असणार्‍या देशांच्या यादीत येणार आहे. अशा प्रकारच्या मानसिक आरोग्य सेवा देणार्‍यांची संख्या पुरेशी नाही. त्यामुळे सिगमंड फ्रॉइड मेंटल हेल्थ इन्स्टिट्यूटद्वारे समाजात मानसिक आरोग्याबाबत जागृती करण्यासाठी मनोस्वास्थ्य संवर्धन गट दर मंगळवारी संध्याकाळी सहा वाजता बाजीराव रोड येथील नवा विष्णू चौकातील भिडे आयुर्वेदिक संस्थेत विनामूल्य चालविला जातो; तसेच मानसिक आरोग्यामध्ये काम करणार्‍या व्यक्तींसाठी विविध मनोमापन आणि मनौपचार पद्धतीवर प्रशिक्षणे आयोजित केली जातात,’ असे अलोणे यांनी सांगितले.

कार्यक्रमाविषयी :
दिवस :
रविवार, १० मार्च २०१९
वेळ : सायंकाळी पाच ते आठ
स्थळ : डॉ. शामराव कलमाडी (कर्नाटक) हायस्कूलचे सभागृह, एरंडवणे, पुणे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link