Next
‘आयुर्वेदाला संशोधन, तंत्रज्ञानाची जोड हवी’
प्रेस रिलीज
Thursday, July 20, 2017 | 02:31 PM
15 0 0
Share this article:

‘केशायुर्वेद’च्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात दीपप्रज्ज्वलन करताना मंदार जोगळेकर, डॉ. सरिता गायकवाड, डॉ. अरुण जामकर, डॉ. सतीश डुंबरे, हरीश पाटणकर व इतर.पुणे : ‘आयुर्वेद हे भारतीय परंपरेने दिलेले आपले शास्त्र आहे. त्यामध्ये अनेक मोठ्या आजारांनाही बरे करण्याची क्षमता आहे. आयुर्वेदाला तंत्रज्ञान आणि संशोधनाची जोड मिळाल्यास त्यामध्ये ‘सुपर स्पेशालिटी’ येऊ शकते. केसांवर उपचारपद्धती विकसित करणारे केशायुर्वेद हे त्याचे आदर्श उदाहरण आहे,’ असे मत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. अरुण जामकर यांनी व्यक्त केले.

‘आयुर्वेदाच्या स्मृतीतून’ पुस्तकाच्या प्रकाशनावेळी डावीकडून डॉ. सतीश डुंबरे, डॉ. अरुण जामकर, वैद्य हरीश पाटणकर, मंदार जोगळेकर, डॉ. सरिता गायकवाड, वैशाली गायकवाड, स्वप्नाली गायकवाड.आरोग्यवर्धिनी चिकित्सालय आणि ‘बीव्हीजी इंडिया’तर्फे ‘केशायुर्वेद’च्या प्रथम वर्धापनदिनानिमित्त ‘आयुर्वेदाच्या स्मृतीतून’ पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. टिळक स्मारक मंदिर येथे आयोजित या कार्यक्रमात ‘केशायुर्वेद’च्या तीस उपकेंद्र प्रमुखांचा सत्कार सोहळादेखील झाला. त्या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी ‘बीव्हीजी इंडिया’चे संचालक दत्ताजी गायकवाड, संचालिका वैशाली गायकवाड, स्वप्नाली गायकवाड, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. सतीश डुंबरे, ‘आयुष’च्या संचालिका डॉ. सरिता गायकवाड, ‘केशायुर्वेद’चे संचालक वैद्य हरीश पाटणकर, स्नेहल पाटणकर आदी उपस्थित होते. या वेळी ‘असोसिएशन ऑफ कॉस्मेटॉलॉजी, ट्रायकोलॉजी अँड टेक्नॉलॉजी’ची स्थापना करण्यात आली.

अरुण जामकर म्हणाले, ‘आयुर्वेदिक उपचार पद्धतीचा अभ्यास करून ‘सुपर स्पेशालिटी’ मिळविण्याकडे सध्या कल वाढत आहे. परंतु, आयुर्वेदात आणखी मोठ्या प्रमाणात संशोधन होणे गरजेचे आहे. केसांची आयुर्वेदाच्या साह्याने निगराणी होणे ही काळाची गरज आहे. आयुर्वेदाची सेवा करणाऱ्यांनी त्यावर श्रद्धा ठेवली पाहिजे. आपण करीत असेलल्या संशोधनाचे दस्त जपले पाहिजेत. त्याला आधुनिकतेची जोड दिली पाहिजे.’

मंदार जोगळेकर म्हणाले, ‘आयुर्वेदामध्ये शास्त्रीय दृष्टिकोनातून संशोधन होत आहे, ही जमेची बाजू आहे. पाश्चात्य देशांमध्ये संशोधनाच्या जोरावर आयुर्वेद सिद्ध केला जात आहे. अशा वेळी आपले मूळ शास्त्र असलेले आयुर्वेद जगभर पोहोचले पाहिजे. त्यासाठी संशोधन आणि साहित्यनिर्मिती व्हायला हवी. मराठीमध्ये मोठी साहित्यनिर्मिती होते; ती ई-बुक, ऑडिओ बुक्सच्या माध्यमातून पोहोचविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.’

डॉ. सरिता गायकवाड म्हणाल्या, ‘आयुर्वेदात ‘सुपर स्पेशालिटी’ येणे ही बाब स्वागतार्ह आहे; मात्र आयुर्वेदात क्षमता असूनही, आयुर्वेद हे शास्त्र आहे, हे वारंवार सिद्ध करावे लागते. आयुर्वेदात शरीररचना आणि राहणीमान यावरून सगळ्याच विचार करावा लागतो. आयुर्वेदात क्षमता आहे, ती समजून घेतली पाहिजे. विविध चिकित्सेच्या माध्यमातून आयुर्वेदाची क्षमता सिद्ध करावी. विज्ञाननिष्ठ असलेल्या मराठी व संस्कृत भाषेत आयुर्वेद ताकदीनिशी मांडले आहे.’

डॉ. सतीश डुंबरे म्हणाले, ‘केसांवर आयुर्वेदातून उपचार हा नवीन विचार आहे. अशा प्रकारचा अभ्यासक्रम महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात फेलोशिपच्या अंतर्गत सुरू करण्याचा प्रयत्न केला जाईल. आयुर्वेदाच्या माध्यमातून वेगळा विचार देऊ. या सगळ्या अभ्यासाला संशोधनाचे स्वरूप यावे. आयुर्वेद सखोल शिकण्याची गरज असते.’

अरुण महाराज यांचे पारद शिवलिंग प्रयोग सादरीकरण या वेळी झाले. वैशाली गायकवाड यांनीही मनोगत व्यक्त केले. गरीब, गरजू विद्यार्थ्यांसाठी निवास, भोजन व त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाकरिता काम करीत असलेल्या विद्यार्थी सहायक समितीच्या कार्याचा गौरव करून मंदार जोगळेकर यांनी समितीप्रति कृतज्ञता व्यक्त केली. जोगळेकर व हरीश पाटणकर या दोघांनीही समितीत राहून शिक्षण घेतले आहे. त्या वेळच्या आठवणीही त्यांनी सांगितल्या. आपल्या जडणघडणीत समितीचे मोठे योगदान असून, समितीच्या सहकार्याने आज जीवनात यशस्वी झालो असल्याचे जोगळेकर म्हणाले.

वैद्य हरीश पाटणकर यांनी प्रास्ताविक केले. शुभदा कुलकर्णी यांनी धन्वंतरी स्तवन म्हटले. विवेक आंबरे यांनी सूत्रसंचालन केले. आभारप्रदर्शन स्नेहल पाटणकर यांनी केले.

(‘आयुर्वेदाच्या स्मृतीतून’ हे पुस्तक ‘बुकगंगा’वरून घरपोच मागवण्यासाठी इथं क्लिक करा. त्याचं ‘ऑडिओ बुक’ खरेदी करण्यासाठी इथं क्लिक करा.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search