Next
जोवरी हे जग, तोवरी गीतरामायण...
BOI
Tuesday, April 04, 2017 | 07:00 AM
15 14 0
Share this article:

प्रतिमा सौजन्य : www.gadima.comमराठी भाषेला अनेक प्रतिभावान कवी, गीतकार लाभले. तितक्याच तोडीची प्रतिभा असलेल्या संगीतकारांमुळे या कविता किंवा गीतं स्वरांनी अक्षरशः मोहरून गेली आणि त्यांनी रसिकांच्या काना-मनांवर रुंजी घातली. असेच काही गीतकार आणि संगीतकारांच्या अप्रतिम रचना, त्यांच्याबद्दलच्या काही वेगळ्या गोष्टी आणि आठवणींची सफर घडवण्यासाठी आम्ही सुरू करत आहोत ‘कविता...स्वरांनी मोहरलेल्या’ हे विशेष साप्ताहिक सदर...आजच्या रामनवमीच्या औचित्याने पहिला लेख आहे गीतरामायणावरचा, अर्थात गदिमा आणि बाबूजी या दैवी प्रतिभा लाभलेल्या  जोडीचा...
..............

चैत्रमास सुरू झाला की आम्रवृक्षाचा बहर, कोकिळस्वर आणि ऋतुराज वसंताच्या वाऱ्याची सुगंधी लहर अनुभवत आपण सुखाच्या लहरींवरच्या हिंदोळ्यावर झोके घेतो. झोके घेता घेता गीतरामायणाच्या ओळी कधी गुणगुणायला लागतो हे कळतही नाही.... ‘राम जन्मला ग सखी राम जन्मला....’ 

आधुनिक वाल्मिकी म्हणजे गदिमा अर्थात ग. दि. माडगूळकर आणि बाबूजी अर्थात सुधीर फडके या शब्दस्वरांच्या संगमावर उभं राहिलेलं उत्तुंग स्वरशिल्प म्हणजे गीतरामायण! हे स्वरशिल्प निर्माण झालं त्या सृजनक्षणाच्या निर्मितीचं भाग्य आकाशवाणी पुणे केंद्राला लाभलं आणि या पुण्यभूमीचं अक्षरश: सोनं झालं.

आकाशवाणी पुणे केंद्राची स्थापना झाली दोन ऑक्टोबर १९५३ रोजी. तत्कालीन कार्यक्रमप्रमुख सीताकांत लाड यांच्या मनात एक कल्पना आली, की गदिमांनी आकाशवाणीसाठी लिहावं. गदिमांनी लिहिलं गीतरामायण आणि ते विविध रागांमध्ये बांधलं बाबूजींनी. एक एप्रिल १९५५ रोजी गीतरामायणाच्या प्रसारणाला सुरुवात झाली. रसिकांना श्रवणसुखाची पर्वणी लाभली. ५६ गीतांमधून सुरेल, प्रासादिक, लडिवाळ रामकथा रसिकांना ऐकायला मिळाली आणि आजतागायत या गीतरामायणाची गोडी अल्पशीही कमी झाली नाही.

एखाद्या कलाकृतीला, कलाकारांना, कवीला मिळालेलं केवढं हे भाग्य! ज्या संस्थेत हे काव्यशिल्प निर्माण झालं त्या संस्थेत अर्थात पुणे आकाशवाणीत निवेदिका म्हणून काम करण्याचं भाग्य मला मिळालं. त्या निर्मितीची मी साक्षीदार नाही, पण ती अजरामर गीतं प्रसारित करण्याचं भाग्य मिळालं यातच आयुष्याची सार्थकता वाटते. आकाशवाणी पुणे केंद्राचा हीरकमहोत्सव आणि गीतरामायणाचा हीरकमहोत्सव या दोन्ही सोहळ्यांचा एक भाग होण्याचं भाग्य मला मिळालं याचं मला खूपच अप्रूप वाटतं.

गीतरामायणाच्या संगीताचा भाग बाबूजींबरोबर ज्यांनी सांभाळला ते विख्यात संगीतकार आणि व्हायोलीनवादक प्रभाकर जोग यांनी आकाशवाणीतल्या एका मुलाखतीत सांगिलं होतं...‘गदिमा गीत लिहित, ते गीत आणून बाबूजींकडे पोहोचवण्याचं काम माझ्यावर सोपवलं गेलं होतं. गदिमा पुण्यात राहत, तर बाबूजी मुंबईला. बाबूजी पुण्यात येईपर्यंत गदिमांकडून गीत मिळवायचं आणि बाबूजींकडे सुपूर्द करायचं. मी गीत आणायला गेलो, की गदिमा म्हणायचे आला रामाचा दूत!’ सुधीर फडके यांचं मूळ नाव राम होतं, हे सर्वश्रुतच आहे. प्रभाकर जोग असे किस्से सांगत होते आणि आम्ही भान हरपून ते ऐकत होतो.

बाबूजींनीही गीतरामायणाच्या सांगितलेल्या आठवणी पुणे आकाशवाणीच्या संग्रहालयात आहेत. गीतरामायणातलं गीत प्रसारित होण्याची वेळ जवळ आलेली असे, तरी गदिमांचं गीत कधीकधी तयार नसे, तेव्हा सर्वांचीच झालेली घालमेल बाबूजींच्या तोंडून ऐकताना नकळत आपणही त्या मंतरलेल्या काळात जाऊन पोहोचतो.

गदिमांचे चिरंजीव आनंद माडगूळकर यांनी एक किस्सा सांगितला होता.... ‘अण्णांना (गदिमा) रामजन्माचं गीत लिहायचं होतं. गीत काही सुचत नव्हतं. रात्रभर अण्णा वही-पेन घेऊन बसलेले. आईनं शेवटी विचारलं, ‘अहो झालं की नाही लिहून?’ तेव्हा अण्णा म्हणाले, ‘अग, प्रभू राम जन्माला यायचाय, अण्णा माडगूळकर नाही!’ आणि अखेर ते गीत जन्माला आलं, रामासारखं! तेजस्वी काव्यप्रतिभेची प्रभा लेऊन . . . 

चैत्रमास, त्यात शुद्ध नवमी ही तिथी,
गंधयुक्त तरीही वात उष्ण हे किती।
दोन प्रहरी का ग शिरी सूर्य थांबला?
राम जन्मला ग सखी राम जन्मला।।

रसिकहो, या गदिमांनी लिहिलेल्या ओळी इथे लिहिताना आत्ता या क्षणी अंगावर रोमांच फुलले आहेत. ते काव्य, ते शब्दसामर्थ्य, ते भावमाधुर्य, त्या प्रतिमा, त्या उपमा अशा अलंकारांनी सजलेलं गीत जेव्हा बाबूजींच्या हातात पडत असेल तेव्हा, आपण फक्त कल्पना करा, काय होत असेल? ते गीत बोलत असेल बाबूजींच्या पेटीतून, गळ्यातून! अनेक वादक कलाकार, गायक आणि प्रभाकर जोग यांच्यासारख्या संगीत संयोजकांच्या अथक परिश्रमातून ध्वनीमुद्रित झालेलं गीत, पुरुषोत्तम जोशी यांच्या निवेदनासह दर आठवड्याला प्रसारित होत असे. अशा अनेक गीतांपैकी समूहस्वरात प्रसारित झालेलं रामजन्माचं गीत सर्वभावसौंदर्यानिशी रसिकांच्या ओठांवर आजही आहे.

कौसल्याराणी हळू उघडी लोचने,
दिपून जाय माय स्वत: पुत्र दर्शने।
ओघळले आंसू, सुखे कंठ दाटला,
राम जन्मला ग सखी राम जन्मला।।

आज सर्वत्र रामजन्माचा सोहळा साजरा होतोय . . पुष्पमालांनी सुगंधित झालेला, सजलेला रामाचा पाळणा, त्या पाळण्याची दोरी हातात धरलेल्या ललना आणि ओठांवर याच ओळी ‘राम जन्मला ग सखी राम जन्मला...’

राम जन्माला येतो म्हणजे नेमकं काय होतं हो? मला वाटतं सज्जनशक्तीचा जन्म होतो, जे जे मंगल, उदात्त, पवित्र ते ते जन्माला येतं आणि हा जन्मसोहळा वर्षानुवर्षे, पिढ्यानपिढ्या साजरा होतो!

पुष्पांजली फेकी कुणी, कुणी भूषणे
हास्याने लोपविले शब्द भाषणे
वाद्यांचा ताल मात्र जलद वाढला
राम जन्मला ग सखे राम जन्मला ।।

कविवर्य बा. भ. बोरकर यांनी गीतरामायणाबद्दल म्हटलंय..., ‘धार्मिकतेला पाठमोऱ्या झालेल्या ह्या गलक्याच्या काळातदेखील मराठी लोकमानसाचा युगानुयुगांचा ध्यास यत्किंचितही कमी झालेला नाही याची जिवंत साक्ष या गीतरामायणाने घवघवीतपणे देऊन चिकित्सक तर्कपंडितांनाही चकित केले आहे. आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून या गीतरामायणाचं पहिलं गीत सुरू झाल्यापासून ते आजतागायत याची लोकप्रियता कलेकलेने सारखी वाढतच राहिली.’

बाकीबाबांचा अर्थात बा. भ. बोरकर यांचा प्रत्येक शब्द खरा आणि काळजातून उमटलेला, म्हणून तर गीतरामायणासारखा शब्दस्वरांचा संगम रसिकमनाच्या किनारी स्वच्छ निर्मळपणे झुळझुळता राहिला, गाता राहिला....जोवरी हे जग...तोवरी गीतरामायण....

गदिमा आणि बाबूजी यांच्या या स्वरशिल्पाला त्रिवार वंदन....

- डॉ. प्रतिमा जगताप
संपर्क : ९४२२२ ९२३८४

(लेखिका पुणे आकाशवाणी केंद्रात वरिष्ठ उद्घोषिका म्हणून कार्यरत आहेत.) 

(‘कविता...स्वरांनी मोहरलेल्या’ या सदराचे पुस्तक बुकगंगा डॉट कॉमवरून थेट घरपोच मागविण्यासाठी किंवा ई-बुक खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 14 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Avinash Paigude ( Rtd NRT ) About
लेख सुरेखच ! गीत रामायणात सर्वच छान जुळून आलय् ! योगायोग कि , परमेश्वरी नि्र्मिती ?
0
0
Neha J About
Sundar sadar, Sundar lekh. pudhchya mangalwar chi vaat baghtey.
0
0
Dr. Vaijayanti Kishor Badhe About
Welcome to Novine idea of Kavita swaranni........initiated by Geetramayan the devine creation,which appeal to every Marathi person.All the best Pratima for the further programmes on every Tuesday.
0
0
Kailas shinde About
वा आपल्या प्रतिभेला सलाम ती अजुन बहरावी ही शुभेच्या खुपच स्तुत्य उपक्रम
0
0

Select Language
Share Link
 
Search