Next
रत्नागिरीत क्षत्रिय मराठा मंडळाचा वर्धापनदिन उत्साहात
BOI
Monday, October 15, 2018 | 03:42 PM
15 0 0
Share this article:

क्षत्रिय मराठा मंडळाच्या वर्धापनदिन कार्यक्रमात मार्गदर्शन करताना राजेंद्र सावंत. शेजारी मान्यवर.

रत्नागिरी : येथील क्षत्रिय मराठा मंडळाचा अकरावा वर्धापनदिन साळवी स्टॉप येथील श्री स्वामी समर्थ मंगल कार्यालयात १४ ऑक्टोबर २०१८ रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून मुंबईतील निर्माण ग्रुपचे सर्वेसर्वा, नामवंत बांधकाम व्यावसायिक आणि मराठा बिझनेस फोरमचे प्रमुख राजेंद्र सावंत उपस्थित होते.

माता तुळजाभवानी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. या वेळी सांस्कृतिक कार्यक्रमही सादर करण्यात आले. या प्रसंगी क्षत्रिय मराठा मंडळाचे अध्यक्ष सुरेशराव सुर्वे, कार्याध्यक्ष दिवाकर साळवी, सल्लागार सतीश साळवी, नंदकुमार साळवी आदी मान्यवर आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

क्षत्रिय मराठा मंडळाच्या अकराव्या वर्धापनदिन कार्यक्रमाचे उद्घाटन दीपप्रज्वलनाने करताना उद्योजक राजेंद्र सावंत. शेजारी सुरेशराव सुर्वे, नंदकुमार साळवी, सतीश साळवी, दिवाकर साळवी आदी.

सावंत म्हणाले, क्षत्रिय मराठा मंडळाचे काम मला भावले. ज्येष्ठांचा सत्कार आपण येथे केला. आईला व मातीला व जातीला विसरतो त्याला मराठा म्हणता येणार नाही. आपण छत्रपतींचे वंशज, छातीला माती लावून लढणारे, जिजाऊंचे संस्कार असलेले लढवय्ये आहोत. आज मराठ्यांना आरक्षणाची भीक का मागावी लागते, ही नामुष्की का आली. ६० वर्षांत ही स्थिती का आली, माझ्या बहिणीला का प्रवेश मिळत नाही. मी आरक्षणाच्या विरोधात नाही पण मनगटाच्या जोरावर आपण जेते आहोत. आज मराठा मंडळींच्या मोठ्या शिक्षणसंस्था, बँका आहेत. आज छत्रपती असते, तर त्यांनी आरक्षण मागितले असते का?’

‘राज्य कोण चालवतो, राज्यकर्ता कोण आहे तर तो टाटा, अदानी, अंबानी आहे. त्यांना पाहिजे तो भूखंड, सुविधा मिळतात. मग अशा स्थितीत मराठा समाज मोठा करायचा असेल तर संघटित झाले पाहिजे. मुंबईत हॉटेल शेट्टी लोकांची आहेत, मोठी शोरूम कच्छी लोकांची व सर्व व्यापार जैन लोकांच्या ताब्यात आहे. मराठ्यांचे का नाहीत? मराठ्यांनी हे ध्यानात घ्यावे व आपल्या माणसांना मोठे करावे. कोट्यधीशांना आरक्षण मागावे लागत नाही. मग आपण आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी एका हातात तलवार व दुसर्‍या हातात तराजू म्हणजे व्यापारी झाले पाहिजे,’ असे सावंत यांनी सांगितले.

राजेंद्र सावंत यांचा सत्कार करताना सुरेशराव सुर्वे.

‘आयपीएस, आयएएस अशा मोठ्या नोकर्‍या मिळवण्यासाठी आम्ही मराठा बिझनेस फोरमतर्फे मराठा विद्यार्थ्यांना मदत करतो. मराठा समाज घडला पाहिजे. पालकांनी मुलाला सांगावे की मी तुला २४ वर्षे सांभाळेन, त्यांनतर सांभाळू नका. शिक्षणानंतर मुलांना उमेदवारी करायला सांगा, धंदा शिकून घ्या, पडलात तरी हरकत नाही, मराठा घरातील एक मुलगा उद्योजक व्हायला हवा. महाराष्ट्रात विविध भागांत मराठा बिझनेस फोरम कार्यरत आहे. सर्व मराठ्यांनी मराठा व मराठी माणसाकडेच खरेदी करा. माझा जावई उद्योजक पाहिजे, असं म्हटले पाहिजे,’ असे सावंत यांनी नमूद केले.

कार्यक्रमाला उपस्थित महिला

प्राची शिंदे यांनी प्रास्ताविक करताना मराठा महिला बिझनेस फोरमची स्थापना केल्याचे सांगितले. त्या म्हणाल्या, ‘यात ४० महिला उद्योजिका व २५० महिला सहभागी आहेत. मराठा मंडळाच्या विकासासाठी सांस्कृतिक, शैक्षणिक आदी विविध समिती नेमल्या आहेत. आपण संघटित झालो, तर काही चांगले करू शकतो.’

या प्रसंगी उल्हासराव घोसाळकर म्हणाले, ‘मराठा आरक्षण देण्यासाठी सरकारची मानसिकता दिसत नाही. दोन महिन्यांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीत मी अनेक मुद्दे मांडले. सर्व राजकीय नेत्यांची आरक्षणासाठी मानसिकता व पाठिंबा आहे. त्यामुळे सरकारने तत्वतः आरक्षण द्यावे व अधिसूचनेसाठी अडीच महिन्यांची मुदत द्यावी. युवकांनी आत्महत्या करू नये, असे आवाहनही या सभेनंतर करण्यात आले. आरक्षण मिळाले नाही, तर कर्तबगारीने एकत्र येऊन आपण संघटनशक्ती दाखवली पाहिजे. क्षत्रिय मराठा मंडळसुद्धा मजबुतीने उभे राहिले पाहिजे यासाठी समाजातील ज्येष्ठ, नामवंत मंडळींनाही सोबत घ्यावे.’

स्मरणिकेचे प्रकाशन करताना मान्यवर.

क्षत्रिय मराठा मंडळाचे अध्यक्ष सुर्वे म्हणाले, ‘रत्नागिरीत श्री तुळजाभवानीचे मंदिर उभारण्यासाठी मंडळाचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. मराठा आरक्षण मिळण्यासाठी प्रथम मराठा मागासलेला समाज आहे, हे दाखवावे लागेल. त्यानंतर आरक्षण मिळेल. मराठा व मागास हे दोन शब्द एकत्र यावेत का, मराठे मूकमोर्चाने जगात आदर्श निर्माण केला. आरक्षण हा विषय क्लिष्ट आहे. घटनेत बदल केल्याशिवाय ते मिळणार नाही, सहजासहजी मिळणार नाही; पण मराठा समाजाला एकत्र येऊन ताकद दाखवावी लागेल.’

या वेळी क्षत्रिय मराठा मंडळाच्या स्मरणिकेचे प्रकाशन सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. स्मरणिकेच्या संपादिका रश्मी घाग यांचा सत्कार केला. या कार्यक्रमात मराठा समाजातील ७५ वर्षे पूर्ण झालेल्या ज्येष्ठांचा, पाचवी, आठवी शिष्यवृत्तीप्राप्त विद्यार्थी आणि उल्लेखनीय कार्य करणार्‍या मराठा समाजातील व्यक्तींना सन्मानित करण्यात आले. सूत्रसंचालन मनाली राणे आणि गौरी शिंदे यांनी केले. दिवाकर साळवी यांनी आभार मानले.

सत्कार आणि गौरव

या वेळी ७५ वर्षे पूर्ण झालेले मालती राजाराम घाग, सुशीला रामचंद्र सावंत, शीलावती दिलीप तावडे, शुभांगी शंकरराव मोरे, विभावरी यशवंतराव देसाई, अरुण बाबूराव साळवी, सतीश भीमराव साळवी, शांताराम शंकरराव सावंत यांचा सत्कार करण्यात आला.

इयत्ता आठवीची शिष्यवृत्ती मिळालेले मिथिल मिलिंद जाधव, श्रावणी संतोष सावंत, तन्वी मंगेश मोरे, वेदांग सुजित मोरे, लीना विनोद खामकर, भक्ती रवींद्र सावंत, यश सुधाकर सावंत, इयत्ता पाचवीची शिष्यवृत्ती मिळालेले वेदास बळीराम शिंदे, ओम ताकवले, उत्कर्षा मोहन आसवे, साईश सतीश गावडे, पार्थ प्रवीण मोरे यांना गौरवण्यात आले.

उल्लेखनीय कामगिरीबद्दल महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त वसंत काटे, राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदकप्राप्त पुष्कराज इंगवले, पीएचडीच्या सेट परीक्षेत राज्य सर्वप्रथम आलेले विनायक विश्वावसराव, महाराष्ट्र राज्य खो-खो संघटनेचे सरचिटणीस संदीप तावडे, एमटीडीसी संस्थेचा पर्यटनमित्र पुरस्कारप्राप्त कौस्तुभ सावंत, मुंबई विद्यापीठाच्या सिनेटवरील राज्यपाल प्रतिनिधी मंदार सावंतदेसाई, नॅशनल स्कूल कॅरम चँपियनशिप स्पर्धेतील विजेत्या दूर्वा देसाई, अमेरिकन कॉलेज ऑफ स्पोर्टस् मेडिसीनचा अभ्यासक्रम पूर्ण करणारे डॉ. नीलेश शिंदे, राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत रायफल व फायर प्रकारातील शूटर विनय देसाई, इंटेरिअर लाईफ स्टाईल अॅमवॉर्डप्राप्त दीप्ती खामकर यांनाही गौरवण्यात आले.

रत्नागिरी नगर परिषदेतर्फे आयोजित आंतरशालेय बालनाट्य स्पर्धेतील उत्कृष्ट अभिनेता अभिषेक मगदूम, डेरवण येथे १४ वर्षांखालील जिल्हास्तरीय नेमबाजी स्पर्धेचा विजेता स्वयम विक्रांत देसाई, १७ वर्षांखालील जिल्हास्तरीय नेमबाजी स्पर्धेचा विजेता आर्यन अभिजित सावंत यांचा सत्कार करण्यात आला.

मंडळातर्फे कै. मालती मधुकर देसाई यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेल्या हस्ताक्षर स्पर्धेतील विजेत्यांना या वेळी गौरवण्यात आले.
स्पर्धेचा निकाल असा - 

लहान गट - 
मराठी हस्ताक्षर - पूर्वा शंकर जाधव, सार्थक राजेंद्र सावंत, ऐश्वर्या सचिन सावंत. 
इंग्रजी हस्ताक्षर - जान्हवी सावंत, सन्मुख सावंत, गायत्री सावंत.

मोठा गट - 
मराठी हस्ताक्षर - श्रावणी रूपेश सावंत, नम्रता मनीष देसाई, साक्षी श्रीधर शिंदे.
इंग्रजी हस्ताक्षर - नम्रता मनीष देसाई, श्रावणी रूपेश सावंत, साक्षी श्रीधर शिंदे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search