Next
आभासी दुनियेची सत्यकथा
अनिकेत कोनकर
Sunday, December 17 | 03:36 PM
15 0 0
Share this story

अन्न, वस्त्र, निवारा आणि आरोग्य यानंतर गेल्या काही वर्षांत इंटरनेट आणि त्यातही सोशल मीडिया ही माणसाची पाचवी गरज बनत चालली आहे. या आभासी दुनियेच्या उपयुक्त बाजूंकडे दुर्लक्ष होऊन त्याचं व्यसनात रूपांतर होत चाललं आहे. अलीकडेच झालेल्या काही सर्वेक्षणांतून त्यावर शिक्कामोर्तब झालं आहे; मात्र आताच्या युगात सोशल मीडियासह जगणं अपरिहार्य आहे. त्यामुळेच धोके लक्षात घेऊन आहारी जाणं टाळलं, तरच हा ‘आभास’ न छळता आपल्याला बरंच काही देऊन जाईल. हीच आभासी दुनियेची सत्यकथा आहे.
...........
अन्न, वस्त्र, निवारा आणि आरोग्य या चार मूलभूत गरजांनंतर गेल्या काही वर्षांत इंटरनेट आणि त्यातही सोशल मीडिया ही माणसाची पाचवी मुख्य गरज बनत चालली आहे. आपण सगळे जण ते अनुभवत आहोतच; पण गेल्या एक-दोन महिन्यांत काही वृत्तपत्रं आणि सोशल मीडियावरच वाचनात आलेल्या या काही बातम्यांवरून त्याची तीव्रता स्पष्ट होईल. 

- सोशल मीडिया ठरतोय देशाच्या ‘जीडीपी’साठी मारक.
- ‘गुगल इफेक्ट’मुळे माणसाच्या शिकण्याच्या, लक्षात ठेवण्याच्या क्षमतेवर परिणाम.
- सोशल मीडियामुळे मनावर विपरीत परिणाम होऊ शकतो, असा अभ्यासाचा निष्कर्ष आणि फेसबुककडूनही त्याची कबुली.
- सोशल मीडियावर अकाउंट नसल्यास ५७ टक्के कंपन्या तुमचा नोकरीच्या निवडीसाठी विचार करणार नाहीत.
- सोशल मीडियामुळे होमप्रेन्युअर्सची (घरबसल्या कामे करणारे छोटे उद्योजक) संख्या वाढली.

कार्यक्षमतेवर परिणाम
‘बँक ऑफ इंग्लंड’च्या ‘कंटेंट अँड स्ट्रॅटेजी’ विभागातील डॅन निक्सन यांनी त्यांच्या बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी लिहिलेल्या एका लेखात असं अभ्यासपूर्ण निरीक्षण नोंदवलं आहे, की सोशल मीडियामुळे कर्मचाऱ्यांची (म्हणजेच पर्यायाने माणसांची) उत्पादकता कमी होत चालली आहे. सायबरस्लॅकिंग म्हणजेच कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत वैयक्तिक कारणांसाठी सर्फिंग करणं किंवा सोशल मीडिया वापरणं हे त्यासाठीचं एक कारण आणि दुसरं कारण म्हणजे सवय. ‘यूएस चेंबर ऑफ कॉमर्स फाउंडेशन’नं केलेल्या सर्वेक्षणात असं आढळलंय, की कर्मचारी कार्यालयीन कामकाजाच्या वेळेपैकी किमान एक तास सोशल मीडियावर घालवतात. नव्या, तरुण पिढीच्या बाबतीत हे प्रमाण १.८ तासांपर्यंत आहे. दुपारी दोन ते सायंकाळी सहा या वेळेत शॉपिंग साइट्सवरच्या हिट्स वाढत असल्याचंही निरीक्षण नोंदवण्यात आलं आहे. कर्मचारी ऑफिसमधून सोशल मीडिया वापरत असला, तर भीतीमुळे तो प्रत्येक वेळी साधारण दोन-तीन मिनिटंच त्याचा वापर करतो; पण त्या प्रत्येक वेळी त्याला मानसिकदृष्ट्या आपल्या कामावर लक्ष केंद्रित करण्यासाठी तब्बल २५ मिनिटं लागतात, असं लक्षात आलंय. म्हणजे कामाचा किती वेळ वाया जातो, हे यातून लक्षात येतं. हीच गोष्ट रात्रीच्या वेळी झोपेच्या मुळावर उठते. 

चंचलता हे मनाचं वैशिष्ट्य आहे, हे आपल्याला माहितीच आहे. त्यामुळे एकदा अशा प्रकारे लक्ष विचलित होण्याची सवय मनाला लागली, की ते आपोआप विचलित होऊ लागतं. सोशल मीडियात एखादा व्हिडिओ सुरू केला किंवा एखादी बातमी वाचायला घेतली, की त्यांचा प्रवाह कितीही स्क्रोलिंग केलं, तरी संपतच नाही. त्यामुळे आपण नेमकं कशासाठी तिथं गेलो होतो आणि काय पाहत राहिलो आणि त्यात किती वेळ गेला, हे आपल्यालाच कळत नाही. त्याचा परिणाम साहजिकच आपल्या कार्यक्षमतेवर होतो आणि कामाचा वेळ वाया जातो. अशी सगळ्या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता कमी झाली, तर देशाच्या ‘जीडीपी’वर म्हणजे सकल राष्ट्रीय उत्पादनावर विपरीत परिणाम न झाला, तरच नवल.

दी गुगल इफेक्ट
एखादी माहिती हवी तेव्हा सहज मिळविता येऊ शकते, असं लक्षात आल्यावर लोकांकडून ती माहिती लक्षात ठेवली जाण्याचं प्रमाण कमी झाल्याचं २०११मध्ये हार्वर्ड विद्यापीठाने संशोधनाद्वारे दाखवून दिलं आणि त्याला ‘दी गुगल इफेक्ट’ असं नाव दिलं. कोणतीही गोष्ट गुगलवरून मिळू शकते, हे लक्षात आल्यामुळे लक्षात ठेवण्याची गरज हळूहळू कमी होऊ लागली. एखादी माहिती नंतर इंटरनेटवरून सहज शोधता येऊ शकते, हे लक्षात आल्यावर ती स्मरणात ठेवली जात नाही. यालाच डिजिटल अॅम्नेशिया असंही म्हणतात. हल्ली कोणाला वाढदिवस लक्षात ठेवण्याची तसदी घ्यावी लागत नाही. कारण फेसबुकच ते काम करतं. फोन नंबर्सही लक्षात राहत नाहीत. कारण गुगल काँटॅक्ट्समध्ये ते सेव्ह असतात. एखाद्या ठिकाणी नव्यानं गेलो, तर तिथल्या खाणाखुणा लक्षात ठेवण्याची तोशीस घेतली जात नाही. कारण गुगल मॅप्सवर आपला विश्वास असतो. एकंदरीतच अचानक एखाद्या माहितीची गरज पडली, तर अलीकडे माणसं डोक्याला थोडाही ताण द्यायच्या ऐवजी सर्च इंजिन किंवा सोशल मीडियाचा आधार घ्यायला लागली आहेत. यामुळे माणसाची शिकण्याची/लक्षात ठेवण्याची प्रक्रियाच हळूहळू कमी होऊ लागली आहे किंवा त्यात बदल होऊ लागले आहेत, असं शास्त्रज्ञांना वाटू लागल्याचं ‘दी माइंड अनलीश्ड’मधल्या लेखात म्हटलं आहे.

मानसिक आरोग्यासाठी घातक
फेसबुकवरची माहिती सातत्याने पाहत राहिलं, (पॅसिव्ह कंझम्प्शन ऑफ इन्फॉर्मेशन) तर ते युझरच्या मानसिक आरोग्यासाठी चांगलं नाही... आतापर्यंत हा निष्कर्ष अनेक अभ्यास, सर्वेक्षणं आणि तज्ज्ञांकडून काढून झाला होता; पण परवा, शुक्रवारी हे खुद्द फेसबुककडूनच ऑफिशियल ब्लॉगपोस्टद्वारे जाहीर करण्यात आलंय. (तंबाखू आणि सिगारेटच्या पाकिटांवर त्यापासून आरोग्याला असलेल्या धोक्याचा इशारा दिलेला असतो. तसाच हा प्रकार झाला.) पण फेसबुकचा समजून-उमजून वापर केला, आपल्या मित्र-मंडळींना खऱ्या प्रतिक्रिया दिल्या, शेअरिंग केलं (अॅक्टिव्ह इंटरॅक्शन) तर ते मानसिक आरोग्यासाठी उपयुक्त ठरत असल्याचंही त्यात म्हटलं आहे. सोशल मीडियावर दुसऱ्यांबद्दल वाचत राहिल्याने नकारात्मक तुलना केली जाते आणि ते मानसिक आरोग्यासाठी चांगलं नाही, असा उल्लेख त्यात आहे. फोनमुळे आधुनिक युगात नातेसंबंधांच्या व्याख्या बदलल्या असून, एकत्र असूनही एकटेपणा अनुभवला जात असल्याच्या एका मानसशास्त्रज्ञाच्या म्हणण्याचा संदर्भ त्यात दिला आहे. तंत्रज्ञानाच्या वापरामुळे टीनएजर्समध्ये तणाव निर्माण होत असल्याचंही आढळून आलं आहे. ‘आमच्या नफ्यापेक्षा समुदायाचं रक्षण करणं अधिक महत्त्वाचं आहे,’ असं मार्क झुकेरबर्गनं गेल्या महिन्यात म्हटलं होतं. त्या पार्श्वभूमीवर, फेसबुकनं ‘स्नूझ’ नावाच्या नव्या फीचरची घोषणा आताच्या पोस्टमध्ये केली आहे. त्याच्या आधारे युझरला ३० दिवस फेसबुकपासून लांब राहता येणार आहे आणि तेही कोणाला अनफ्रेंड न करता.

ही झाली आत्ताची गोष्ट; पण काही दिवसांपूर्वीच फेसबुकचा पहिला अध्यक्ष सीन पार्कर यानं ‘अॅक्सिओस’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत असं सांगितलं होतं, की फेसबुक समाजाशी असलेले तुमचे नातेसंबंध बदलून टाकतं आणि कदाचित तुमच्या उत्पादकतेवरही विपरीत परिणाम करतं. ‘लोकांचं जास्तीत जास्त लक्ष वेधून कसं घेता येईल आणि त्यांना फेसबुकवर गुंतवून कसं ठेवता येईल, हे आमचं उद्दिष्ट आहे. सर्वच सोशल मीडियाच्या उद्गात्यांना आपण काय करतोय, हे माहिती आहे आणि आम्ही ते करत आहोत,’ असं पार्करनं म्हटलं होतं. त्यांचा उद्देश कसा सफल होतोय, याचा अनुभव आपण सगळेच घेत आहोत.

फायदे खूप मोठे...
हे झालं सोशल मीडियाच्या नकारात्मक परिणामांबद्दल; पण सोशल मीडियाला आजच्या काळात पर्याय नाही आणि त्याचा जबाबदारीने आणि नियंत्रित वापर किती फायद्याचा ठरू शकतो, हे सांगणाऱ्या बातम्याही अलीकडे सातत्यानं वाचनात येत असतात. एखादी व्यक्ती सोशल मीडियावर अतिरिक्त प्रमाणात अॅक्टिव्ह असली, तर १७ टक्के कंपन्या त्या व्यक्तीला नोकरीसाठी निवडणार नाहीत; पण सोशल मीडियावर अस्तित्वच नसलं, तर ५७ टक्के कंपन्या अशा उमेदवारांना नोकरी देणार नाहीत, असं नुकतंच एका सर्वेक्षणात आढळून आल्याची बातमी ‘टाइम्स ऑफ इंडिया’त प्रसिद्ध झाली होती. अलीकडे ९२ टक्के कंपन्या एखादा उमेदवार निवडण्यासाठी त्याचं फेसबुक, ट्विटर आणि लिंक्डइन अकाउंट तपासतात, असं त्या बातमीत म्हटलं होतं. स्वतःच्या ब्लॉगद्वारे किंवा सोशल मीडिया अकाउंटद्वारे आपले विचार सातत्याने मांडत राहण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. सोशल मीडियातील शेअरिंग, कमेंट्स, लाइक्स यांवरून त्या व्यक्तीचे विचार आणि व्यक्तिमत्त्व प्रतीत होत असतं. बऱ्याचदा ज्या गोष्टी इंटरव्ह्यूतून कळणार नाहीत, त्याही यातून सहज कळतात. त्यामुळेच कंपन्या या मार्गाचा अवलंब करत आहेत. सोशल मीडिया जबाबदारीनं वापरण्याचं महत्त्व यातून समजतं.

आणखी एक गोष्ट म्हणजे फेसबुक, यू-ट्यूब, ट्विटरसारख्या सोशल मीडियामुळे अगदी सामान्यातल्या सामान्य व्यक्तीलाही खूप मोठी शक्ती प्राप्त झाली आहे. रेल्वेत एखादी समस्या असेल, तर रेल्वेमंत्र्यांना टॅग करून ट्विट करा, विमानात किंवा परदेशात काही अडचण आली, तर परराष्ट्रमंत्र्यांना टॅग करून ट्विट करा, असे प्रकार अलीकडे सातत्याने होऊ लागले आहेत आणि त्याचा चांगला उपयोगही होत असल्याचं आढळून आलं आहे. यू-ट्यूबमुळे अनक सर्वसामान्य गृहिणी आज ‘मास्टरशेफ’ बनल्या आहेत; जगभरातल्या अनेक जणांच्या थेट मोबाइलवर जाऊन त्या रेसिपी शिकवू लागल्या आहेत आणि त्यातून त्यांना कमाईही होत आहे. अनेक गृहिणी, छोटे उद्योजक यांनी स्वतःच्या पातळीवर किंवा एकत्र येऊन फेसबुक पेज किंवा व्हॉट्सअॅप ग्रुपद्वारे व्यवसाय सुरू केला आहे आणि त्यांना खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. आपापल्या गावातील प्रेक्षणीय, ऐतिहासिक स्थळांची, वैशिष्ट्यपूर्ण पदार्थांची, संस्कृती अन् परंपरांची माहिती देण्यासाठी, चांगल्या वाचनीय साहित्याच्या प्रसारासाठी, उत्तम कार्यक्रमांच्या प्रसारणासाठी तुमच्या-आमच्यासारख्या सामान्य नागरिकांकडून सोशल मीडियाचा वापर करण्याचं प्रमाणही हळूहळू वाढत आहे. कोणाला रक्त हवं असेल तर, कोणाला सल्ला हवा असेल तर, कोणाला काही विशिष्ट माहिती हवी असेल तर, कोण्या गरजूला आर्थिक, वैद्यकीय किंवा अन्य कोणती मदत हवी असेल तर फेसबुक, ट्विटरचा चांगल्या पद्धतीनं वापर करण्याचं लोकांना हळूहळू समजू लागलं आहे. कौतुक केलेलं सगळ्यांनाच आवडतं आणि त्यासाठी सोशल मीडिया हे उत्तम व्यासपीठ आहे; पण केवळ लाइक्स मिळविण्याच्या नि स्वतःची जाहिरात करण्याच्या पलीकडे जाऊन सोशल मीडियाचा वापर वाढू लागणं हे नक्कीच सुखावह अन् दिलासादायक आहे. थोडक्यात सांगायचं, तर इंटरनेट, सोशल मीडिया आवश्यक आहेच; पण माहितीच्या प्रवाहात वाहून न जाता, काय चांगलं-काय वाईट हे निवडण्याची आणि त्यात किती वेळ रमायचं हे ठरवण्याची सद्सद्विवेकबुद्धी ते वापरताना सतत जागरूक ठेवणं आणि त्यानुसार वागणं अत्यंत आवश्यक आहे. ‘आपल्यासाठी सोशल मीडिया आहे, आपण सोशल मीडियासाठी नाही,’ याचं भान राखायला हवं, एवढाच या सगळ्याचा मथितार्थ.

सोशल मीडियावरच वाचनात आलेल्या एका वाक्यानं लेखाचा शेवट करतो. ‘यू ओन्ली नीड टू फाइंड युवरसेल्फ, एव्हरीथिंग एल्स कॅन बी गुगल्ड’ (तुम्हाला फक्त स्वतःला शोधण्याची गरज आहे. बाकी सगळं काही गुगलवर शोधता येऊ शकतं.) हे ते वाक्य. हीच आभासी दुनियेची सत्यकथा आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Vihang ghate About
Aniket, great going....mast lihilay
0
0

Select Language
Share Link