Next
रत्नागिरीत रोबोटिक्स कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद
रोबोटेक्स इंडिया आणि मुकुल माधव फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजन
BOI
Wednesday, July 17, 2019 | 04:59 PM
15 0 0
Share this article:

रत्नागिरी : तालुक्यातील गोळप येथील मुकुल माधव विद्यालयामध्ये  १६ जुलैला रोबोट बनविण्याची कार्यशाळा घेण्यात आली. रोबोटेक्स इंडिया आणि मुकुल माधव फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. 

या उपक्रमासाठी फिनोलेक्स इंडस्ट्रिजचे सहकार्य लाभले. मुकुल माधव फाउंडेशन आणि फिनोलेक्स इंडस्ट्रिज यांच्या संयुक्त विद्यमाने अशा प्रकारचे उपक्रम अनेक ठिकाणी घेण्यात येतात. विद्यार्थ्यांमधील कल्पनाशक्तीला वाव मिळावा व त्यांच्या बुद्धीच्या कक्षा रुंदाव्यात या दृष्टीने हा उपक्रम सातत्याने राबविण्यात येतो.

मुकुल माधव विद्यालयामार्फत गेली १०वर्षे गोळप येथे शिक्षण देण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी शाळेमध्येच विविध प्रकारचे उपक्रम शाळेच्या वेळेतच मोफत घेतले जातात. याचाच एक भाग म्हणून ही कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत शाळेतील सहावी ते दहावीतील ६० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. कार्यशाळेदरम्यान रोबोटिक्स हा विषय समजावून सांगण्यात आला; तसेच, रोबोट कशा प्रकारे बनविला जातो, त्याची कार्यपद्धती, ती बनविण्याची प्रक्रिया यांविषयी प्रत्यक्ष साहित्य हातात देऊन विद्यार्थ्यांना ओळख करून देण्यात आली. 


या कार्यशाळेसाठी रोबोटेक्स इंडियातर्फे पाच प्रशिक्षकांचा चमू पुण्याहून सहभागी झाला होता. यासाठी विद्यालयाच्या सभागृहात १५ संगणकांची व्यवस्था केली होती. रोबोट बनविण्याचा तसेच त्याला देण्यासाठीच्या सूचना तयार करण्याचा आनंद विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून लुटला. ६० विद्यार्थ्यांना एका संघामध्ये चार विद्यार्थी याप्रमाणे १५ संघामध्ये विभागण्यात आले. या संघांना कार्यशाळेदरम्यान प्रशिक्षित करून विभागीय पातळीवर होणाऱ्या स्पर्धेसाठी मार्गदर्शन करण्यात आले. 

कार्यशाळेमध्ये सहभागी होण्यासाठी साडेचार हजार रुपये प्रती विद्यार्थी शुल्क होते; परंतु विद्यार्थ्यांना रोबोटविषयी माहिती व्हावी व आजकालच्या यांत्रिक युगामध्ये ग्रामीण विभागातील विद्यार्थीही आत्मविश्वासाने सहभागी व्हावेत, या उद्देशाने मुकुल माधव विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी केवळ दीड हजार इतके शुल्क आकारण्यात आले. उर्वरीत तीन हजार रुपये प्रति विद्यार्थी हे मुकुल माधव फाउंडेशन आणि ‘फिनोलेक्स’तर्फे प्रायोजित करण्यात आले.

कार्यशाळेमध्ये सहभागी सर्व विद्यार्थ्यांना सहभागाचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रमाणपत्र तसेच रोबोट बनविण्यासाठीचे सर्व साहित्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी मुकुल माधव विद्यालयाचे रोहित देशपांडे, नवीन बिजलानी, राधा करमरकर यांच्यासह प्रशालेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. या संपूर्ण उपक्रमाला ‘मुकुल माधव’च्या व्यवस्थापकीय विश्वस्त रितू प्रकाश छाब्रिया यांचे मार्गदर्शन लाभले. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search